नीतीश नवसागरे -
आधुनिक काळामध्ये न्यायसंस्थेची जडणघडण आधुनिकतेवर, वैज्ञानिक दृष्टिकोनावर झाली आहे; म्हणजे प्राचीन काळातील रामायणातील सीतेच्या अग्निपरीक्षेची कथा तर सर्वांना माहीतच आहे. पुरावा देण्यासाठी अग्निपरीक्षा हे कोणत्या वैज्ञानिक तर्कावर आधारित होते?
मध्य युगामध्ये सुद्धा अशाच अमानवीय व अवैज्ञानिक पद्धतीने न्यायनिवाडा होत होता. युरोपमध्ये अनेक प्रज्ञावान स्त्रियांना जिवंत जाळले गेले, त्यांना जिवंत पाण्यामध्ये बुडवण्यात आले. कारण त्या प्रश्न विचारत होत्या. स्त्रीने प्रश्न विचारला म्हणजे तिला भुताटकी झाली आहे; मग काय करायचं? तर तिच्या गळ्यामध्ये एक दगड बांधायचा व तिला पाण्यात सोडायचे. जर ती बुडाली तर तो पुरावा आहे की, तिला भुताटकी झाली होती, तिला झपाटलं होतं. जर ती तरली तर निर्दोष आहे. असल्या रानटी पद्धतीने चालणारी न्यायव्यवस्था युरोपात प्रबोधनाची, आधुनिकतेची, विज्ञानाची लाट आल्यानंतर पूर्णपणे बदलली.
छद्म विज्ञान सध्या ‘विज्ञान’ म्हणून मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. इंग्रजीमध्ये छद्म विज्ञानाला ‘सुडो सायन्स’ म्हटले जाते. मंत्र-तंत्र, यज्ञयाग, अंधश्रद्धा विज्ञानाच्या परिभाषेत मांडायच्या व त्या जणू काही वैज्ञानिकरित्या सिद्ध झालेलं सत्यच आहे, असा रेटून दावा करायचा, असा एक नवा प्रकार चलनात आला आहे. यालाच छद्म विज्ञान म्हणता येईल. खरे तर भारतीय राज्य घटना असे म्हणते की,वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. शिक्षणामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंतर्भाव असणे गरजेचे असते. परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव सगळीकडेच दिसतो. न्यायसंस्थेमध्ये देखील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव अनेक वेळेस दिसतो. त्याची चर्चा या लेखात केलेली आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय? प्रत्येक घटनेमागचा कार्यकारणभाव समजून घेणे किंवा दोन घटनांमधील परस्परसंबंध तपासून पाहणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सोपा अर्थ असा की, जेवढा पुरावा उपलब्ध असेल, तेवढा विश्वास ठेवणे. वैज्ञानिक दृष्टिकोन असे मानतो की, हे विश्व कार्यकारणभावाने बद्ध आहे आणि स्वायत्तपणे अस्तित्वात आहे. ज्ञान आत्मसात करण्याची विज्ञानाची पद्धत म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. ‘मी सांगितलेला शब्द शेवटचा’ ,‘माझा निष्कर्ष अंतिम’ असा दावा वैज्ञानिक कधीच करत नाही. ‘मला सर्व काही समजले आहे, विश्वाचे कोडे उलगडले आहे, सर्व ज्ञान प्राप्त झाले आहे; आता फक्त माझा आदेश माना,’ असे धर्म सांगतो. विज्ञानाने मनुष्य डोळस बनवतो, कार्यकारणभाव शिकवतो. ज्या गोष्टी प्रत्यक्षात किंवा अप्रत्यक्षपणे निरीक्षण करता येतात, मोजमाप करता येतात, पाहणी करता येतात अशा गोष्टींची विज्ञान दाखल घेते.
छद्म विज्ञान म्हणजे काय? यापूर्वी सांगितल्याप्रमाणे अंधश्रद्धा विज्ञानाच्या परिभाषेत मांडायच्या प्रकाराला छद्म विज्ञान म्हणतात. अनेक वेळा छद्म विज्ञानाचे पुरावे पुराणकाळातील संदर्भावर आधारित असतात. कित्येक शतके लोक या शास्त्राचा उपयोग करत आहेत, युगायुगांचा विश्वास खोटा कसा असेल, अशी भाषा छद्म विज्ञानवाले वापरतात. छद्म विज्ञानामध्ये लेखक तांत्रिक शब्द तर वापरतात; परंतु त्याची व्याख्या मात्र करत नाहीत. रूढ विज्ञानाच्या कक्षा ओलांडल्याशिवाय या विषयाला स्पर्श करता येत नाही, असले स्पष्टीकरण छद्म विज्ञानवाली मंडळी देतात. ही गोष्ट प्रयोगाने सिद्ध झाली आहे, असा दावा छद्म विज्ञानामध्ये काहीही संदर्भ न देता केला जातो. परंतु हे तथाकथित प्रयोग अशा व्यक्ती सोडून अन्य कोणीही केल्याचे ऐकिवात नसते. छद्म विज्ञान हे कधी चालते, कधी नाही. ‘श्रद्धेने कराल तर प्रचीती येईल,’ असली भाषा त्यांची असते.
जे पाश्चिमात्य आहे, ते माणसाच्या अंतिम कल्याणासाठी फारसे उपयोगी नाही. आपली अतिप्राचीन, शाश्वत सुखाची थोर परंपरा हेच अंतिम सत्य आहे, हे जनमानसात रुजवण्याचा दांभिकपणा एकोणिसाव्या व विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हिंदू पुनरुज्जीवनवादी लोकांनी मोठ्या प्रमाणात केला. पाश्चिमात्य विचारांना स्वीकारणे ज्यांना जड जात होते, त्यांनी भारतीय दृष्टिकोन मांडण्याच्या नादामध्ये छद्म विज्ञानाची मांडणी करण्यास सुरुवात केली. खरे तर भारतीय पुनरुज्जीवनाची मांडणी करणार्या लोकांना नेहमीच आधुनिक विज्ञानाचे आकर्षण राहिले आहे. जे काही आधुनिक विज्ञानामध्ये आहे, ते सर्व आमच्या प्राचीन ग्रंथांमध्ये आहे, हे सांगता यावे म्हणून ही मंडळी विज्ञानाची भाषा वापरतात. वैदिक परंपरेमध्ये असणारे विज्ञान आधुनिक विज्ञानापेक्षा अधिक प्रगत होते, हा त्यांचा नेहमीचा दावा. वैदिक ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, आयुर्वेद, वैदिक गणित हे सर्व फक्त विज्ञानच नाहीत, तर आधुनिक विज्ञानापेक्षा अधिक प्रगत आहेत, असा त्यांचा दावा असतो. हिंदूचे अध्यात्म, वेद, यज्ञ, शास्त्र यांची पश्चिमी देशांमध्ये मांडणी करत असताना हिंदू पुनरुज्जीवनवाद्यांनी आधुनिक विज्ञानाची भाषा वापरली; म्हणजे वेद, यज्ञ ध्यान शिकवताना आधुनिक विज्ञानाची भाषा वापरणे. उदाहरणार्थ राजा राम मोहन रॉय असे म्हणत, ‘ऋग्वेद हे व्यावहारिक भौतिकशास्त्राचे पुस्तक आहे’ किंवा स्वामी विवेकानंद असं म्हणत की, ‘आज जे आधुनिक विज्ञानाचे शोध पाहून तुम्ही अचंबित होत आहात, ते सर्व वेदांमध्ये पूर्वी होते. आता त्याचाच पुन्हा शोध घेतलेला आहे.’
सांस्कृतिक राष्ट्रवादाची मांडणी करणारे नेहमी असा दावा करतात की, आधुनिकतेमध्ये आहे ते सर्व प्राचीन हिंदू परंपरेमध्ये फार पूर्वीपासून आहे. मग आपण स्त्रीवादाचा मुद्दा मांडला तरी हे लोक म्हणतात, आपल्या परंपरेत स्त्रीवाद पूर्वीपासूनच होता. सध्या तर जणू काही चढाओढ लागली आह,े हे दाखवण्यासाठी की, पाश्चात्य विज्ञानात जे काही मांडले आहे, ते सर्व काही वैदिक/हिंदू परंपरेमध्ये फार पूर्वीपासून होते. प्लास्टिक सर्जरी, टेस्ट ट्यूब बेबी, अणुबॉम्ब व अणुऊर्जा, विमानशास्त्र व अजून बरंच काही वैदिक ऋषींना माहीत होते. आधुनिक विज्ञानाने आज जेवढं काही संशोधन केलं आहे, ते सर्व प्राचीन भारतामध्ये होते. अशा परिस्थितीत छद्म विज्ञानाला भारतीय न्यायपालिकेने कसे हवा-पाणी दिले आहे, हे पाहणे गरजेचे आहे.
न्यायसंस्थेची जडणघडण : आधुनिक काळामध्ये न्यायसंस्थेची जडणघडण आधुनिकतेवर, वैज्ञानिक दृष्टिकोनावर झाली आहे; म्हणजे प्राचीन काळातील रामायणातील सीतेच्या अग्निपरीक्षेची कथा तर सर्वांना माहीतच आहे. पुरावा देण्यासाठी अग्निपरीक्षा हे कोणत्या वैज्ञानिक तर्कावर आधारित होते? किंवा रामायणातील शंबूकाचा वध. रामाने शंबूकाला का मारले, तर त्याने तपश्चर्या केल्याने एका ब्राह्मणाचा मुलगा अकाली मृत्यू पावला. रामराज्यात पाप घडले. या पापासाठी शंबूकाला रामाने मृत्युदंड दिला. या दोन्ही घटनांमध्ये कोठे आला न्याय व कोठे वैज्ञानिक दृष्टिकोन? हे झालं पुराणात. मध्य युगामध्ये सुद्धा अशाच अमानवीय व अवैज्ञानिक पद्धतीने न्यायनिवाडा होत होता. युरोपमध्ये अनेक प्रज्ञावान स्त्रियांना जिवंत जाळले गेले, त्यांना जिवंत पाण्यामध्ये बुडवण्यात आले. कारण त्या प्रश्न विचारत होत्या. स्त्रीने प्रश्न विचारला म्हणजे तिला भुताटकी झाली आहे; मग काय करायचं? तर तिच्या गळ्यामध्ये एक दगड बांधायचा व तिला पाण्यात सोडायचे. जर ती बुडाली तर तो पुरावा आहे की, तिला भुताटकी झाली होती, तिला झपाटलं होतं. जर ती तरली तर निर्दोष आहे. असल्या रानटी पद्धतीने चालणारी न्यायव्यवस्था युरोपात प्रबोधनाची, आधुनिकतेची, विज्ञानाची लाट आल्यानंतर पूर्णपणे बदलली. साक्षीदाराचा पुरावा घेत असताना साक्षीदाराने जे आपल्या इंद्रियांनी अनुभवले आहे, तेवढेच ग्राह्य मानण्यात आले, त्याने तेवढेच न्यायालयासमोर सांगणे अपेक्षित आहे. साक्षी-पुराव्याच्या कायद्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन समाविष्ट करण्यात आला. इंग्रजांच्या आमदानीसोबत इंग्रजी न्यायव्यवस्थासुद्धा भारतामध्ये आली व त्यासोबत बर्याच मोठ्या प्रमाणामध्ये आधुनिकता न्यायव्यवस्थेत समाविष्ट झाली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा आपण तीच इंग्रजी न्यायव्यवस्था पुढे चालू ठेवली.
राज्य घटनेचा अंमल सुरू झाल्यानंतर न्यायसंस्था आता घटनेच्या चौकटीत कार्य करते. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय जो निवडा देतात, तो खालच्या कोर्टावर बंधनकारक असतो. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे बोलतात, तो कायदा असतो. एखाद्या प्रकरणावर निवडा देत असताना, कायद्याचा अर्थ लावत असताना अनेक वेळेस न्यायाधीश स्वतःची तात्त्विक भूमिका सुद्धा मांडत असतात. अशी तात्त्विक मांडणी करताना स्वतःचे पूर्वग्रहसुद्धा ही मंडळी मांडतात. या लेखामध्ये असेच काही उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याबद्दल चर्चा करणार आहोत, जेथे न्यायाधीशाने विज्ञानाच्या भाषेमध्ये छद्म विज्ञानाची मांडणी केली आहे.
न्यायमूर्ती कृष्णा अय्यर व महर्षी महेश योगी यांचे ध्यानतंत्र (ट्रान्सडेन्टल मेडिटेशन) : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश कृष्णा अय्यर हे गरीब व वंचितांची बाजू घेणारे न्यायमूर्ती म्हणून प्रसिद्ध होते. आधुनिक भारतातील इतिहासात त्यांचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते. ते डाव्या विचारसरणीचे होते. त्यांचे अनेक निवाडे मानवाधिकाराच्या कक्षा रुंदावणारे होते. परंतु त्यांना सुद्धा महर्षी महेश योगी यांच्या ध्यान करण्याच्या तंत्राची भुरळ पडली होती. त्यांनी काही निकालांमध्ये महर्षी महेश योगी यांचे ध्यानतंत्र तुरुंगातील कैद्यांना शिकवण्याचे आदेश दिले आहेत. 1977 मध्ये मोहम्मद गियासुद्दीन विरुद्ध आंध्र प्रदेश राज्य या खटल्यामध्ये न्यायमूर्ती कृष्णा अय्यर म्हणतात, तुरुंगातील कैद्यांना सुधारण्यासाठी महर्षी महेश योगी यांचे ध्यानतंत्र शिकवण्यात यावे. ते पुढे असेही म्हणतात की, अनेक देशांतील संशोधन असे सिद्ध करते की, हे ध्यान केल्याने अनेकांच्या सामाजिक वागणुकीत बदल घडला आहे व त्यांची गुन्हा करण्याची प्रवृत्तीसुद्धा कमी झाली आहे. आता हे संशोधन कोणाचे? कोणत्या नावाजलेल्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे? त्याचा काही थांगपत्ता नाही; म्हणजे आपल्या स्वतःच्या अनुभवावर महर्षी महेश योगी यांच्या ध्यानतंत्राने गुन्हेगारी प्रवृत्ती कमी होते, असे सांगून मोकळे होऊन जायचे. 25 ऑक्टोबर 1978 रोजी अमेरिकेत झालेल्या अमेरिकन न्यायाधीशांच्या संमेलनामध्ये भाषण करताना न्यायमूर्ती कृष्णा अय्यर यांनी पुन्हा तोच मुद्धा मांडला. ते म्हणतात, “जेव्हा व्यक्ती शांत असते, तेव्हा ती अगदी व्यवस्थित असते. परंतु जेव्हा ती चिडते, गरम होते तेव्हा ती विस्कटलेली असते.” ते पुढे म्हणतात, “थर्मोडायनामिक्सचा तिसरा नियम हेच तर सांगतो. थर्मोडायनामिक्सचा तिसरा नियम आणि मन हे एका एकच नियमावरती चालतात, हे काही अध्यात्म नाही; परंतु भौतिकशास्त्र आहे.” इथे पुन्हा ते महर्षी महेश योगी यांच्या ध्यानतंत्राचा उल्लेख करतात. हिरालाल मुलीक विरुद्ध बिहार राज्य या 1977 च्या निवाड्यामध्ये सुद्धा कृष्णा अय्यर पुन्हा महर्षी महेश योगी यांच्या ध्यानतंत्राचा सराव तुरुंगातील कैद्यांना सुरू करण्याचा सल्ला देतात.
महर्षी महेश योगी फक्त ध्यानाचे तंत्रच शिकवत नाहीत, तर त्या सोबत हिंदू पूजा, कुंडलिनी, 6 चक्र हे सुद्धा शिकवतात. अमेरिकेतील शाळेमध्ये हे ध्यानतंत्र शिकवण्यास न्यू जर्सी न्यायालयाकडून मज्जाव करण्यात आला होता. हे ध्यानतंत्र धार्मिक आहे, हिंदू धर्माचा प्रचार करते, असे कोर्टाचे म्हणणे होते. महर्षी महेश योगी यांच्या सांगण्यावरून श्री श्री रविशंकर यांनी बंगळुरू येथे वेद विज्ञान विद्यापीठाची स्थापना 1985 ला केली. कर्नाटक सरकारने 60 एकर जमीन 33 वर्षांच्या भाडेतत्त्वावर रविशंकर यांना दिली. त्या वेद विज्ञान विद्यापीठात न्यायमूर्ती कृष्णा अय्यर, न्यायमूर्ती पी. एन. भागवती व बंगळुरूचे महापौर लाक्षिमी राव हे ट्रस्टी होते.
वैदिक विज्ञान : महर्षी महेश योगी यांनी मध्य प्रदेश सरकारच्या मागे लागून मध्य प्रदेशमध्ये वैदिक शिक्षणासाठी महर्षी महेश योगी वैदिक विश्वविद्यालयाची स्थापना 1995 मध्ये केली. हे विश्वविद्यालय वैदिक व संस्कृतच्या अभ्यासासाठी स्थापित करण्यात आले होते. परंतु या विद्यापीठाने बी. बी. ए., बी. सी. ए., टायपिंग, स्टेनोग्राफर, बी एड. असले अभ्यासक्रम सुरू केले. 2000 मध्ये मध्य प्रदेश सरकारने कायद्यामध्ये दुरुस्ती करून फक्त वैदिक व संस्कृत अभ्यासक्रमापुरतेच या विद्यापीठाचे अधिकार ठेवले. मध्य प्रदेश सरकारच्या या निर्णयाविरुद्ध महर्षी महेश योगी मध्य प्रदेश उच्च न्यायालयामध्ये गेले. या खटल्यात न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांनी जवळजवळ 20 पानी चर्चा वेद, संस्कृत व वैदिक शिक्षणावर केली. पुढे हेच न्यायमूर्ती दीपक मिश्रा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले. न्यायमूर्ती दीपक मिश्रा असे म्हणतात की, वेदातले प्राचीन ज्ञान हे हळूहळू आधुनिक वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध होत आहे. वेदांमध्ये गणिताची सूत्रे आहेत. या सूत्रांचा उपयोग करून क्लिष्ट गणितही सोडवले जाऊ शकते. विचार करणे ही मेंदूची विद्युत-रासायनिक क्रिया आहे. वैज्ञानिकांना आतापर्यंत तरी मेंदूच्या काही भागांचा उपयोग ज्ञात नाही. हे एक कोडेच आहे. शास्त्रात असे म्हटले आहे की, ध्यान केल्याने मेंदूतील काही पेशी जागृत होतात. यालाच योगिक भाषेमध्ये ‘कुंडलिनी’ असे म्हणतात. वैदिक शिक्षणामध्ये दर्शन, इतिहास, पुराण, उपनिषद, ज्ञान व विज्ञान हे सर्वच आहे; तसेच संस्कृत भाषेचा उपयोग आधुनिक काळामध्ये जास्त महत्त्वाचा आहे. अनेक संशोधन हे सिद्ध करतात की, संस्कृत ही भाषा कॉम्प्युटरसाठी अधिक उपयोगाची आहे. पाणिनीचे व्याकरण कॉम्प्युटरसाठी हे अधिक उपयोगाचे आहे. काही वैज्ञानिक अणुकणाची गती नटराजाच्या नृत्यामध्ये शोधतात. उदाहरणादाखल मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या निवाड्यातील काही उतारे येथे दिले आहेत –
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने निवाडा दिला की, विद्यापीठाला वेदविद्या व संस्कृत शिक्षणाव्यतिरिक्त इतर अभ्यासक्रम सुद्धा चालवता येतील. परंतु विद्यापीठाला इतर ठिकाणी संलग्न महाविद्यालये काढता येणार नाहीत. या निर्णयाविरुध्द विद्यापीठाने सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केले. 2013 मध्ये महर्षी महेश योगी वेद विश्वविद्यालय विरुद्ध मध्य प्रदेश राज्य या निवाड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने विद्यापीठाच्या बाजूने निकाल दिला. हा निवाडा न्यायमूर्ती बी. एस. चौहान व न्यायमूर्ती इब्राहिम कलीफुल्ला यांनी दिला. या निवाड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांनी मांडलेल्या मतांशी पूर्ण सहमती दर्शवली. इथे कोर्ट असे म्हणते की, आधुनिक ज्ञानशाखेतील प्रत्येक विषय वेदामध्ये आहे, म्हणून प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट, फायनान्स मॅनेजमेन्ट, क्रोप मॅनेजमेन्ट, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेन्ट, गणित व इतर विज्ञानाचे विश्व हे वैदिक शास्त्रामध्येच येते.
भारतीय पुनरुज्जीवन हे प्रामुख्याने हिंदू पुनरुज्जीवन म्हणून पुढे आले. यामध्ये नवीन काही मांडण्यात आले नाही; परंतु जुनेच धर्मग्रंथ कसे वैज्ञानिक आहेत, विज्ञानाशी सुसंगत आहेत, अशी मांडणी झाली. वेदांमध्ये सर्व ज्ञान समाविष्ट आहे, वेदांचा व्यवस्थित अभ्यास केला तर आधुनिक विज्ञानाने जे काही सिद्ध केले आहे, ते सर्व आपल्याला वैदिक ग्रंथांमध्ये सापडते. अशा मांडणीला हिंदू पुनरुज्जीवन करणारी मंडळी मांडत आली आहेत. भारतीय न्यायपालिकेचे न्यायाधीश सुद्धा अशाच प्रकारची मांडणी करताना दिसतात. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्यापेक्षा आज जे काय विज्ञानाने सिद्ध केले आहे, ते आमच्याकडे फार पूर्वीपासून होते, असा दृष्टिकोन बाळगण्यात त्यांना काहीही गैर वाटत नाही.
मोर ब्रह्मचारी आहे ः ही काही उदाहरणे आहेत, जिथे न्यायाधीश निवाडा देत असताना स्वतःच्या चुकीच्या वैज्ञानिक धारणा समाजावरती लादतात. ही मंडळी खासगी आयुष्यात सुद्धा अवैज्ञानिक धारणा जोपासतात. खासगी आयुष्यात त्यांची संवैधानिक मूल्यांची बांधिलकी असतेच, असे नाही. राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश महेशचंद्र शर्मा एका निवाड्यामध्ये असे म्हणतात की, गोहत्येसाठी मृत्यूची शिक्षा दिली गेली पाहिजे. 33 कोटी देवी-देवता गायीच्या पोटामध्ये राहतात. फक्त गायच एक असा प्राणी आहे, जी प्राणवायू घेते व सोडते. केंद्र सरकारने गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केली पाहिजे. हेच वक्तव्य महेशचंद्र शर्मांनी निवृत्त झाल्यानंतर केले होते. मोर हा लांडोरासोबत संभोग करत नाही. मोराचे अश्रू पिऊन प्रजनन होते. मोर हा ब्रह्मचारी असतो. ही सर्व विधाने वैज्ञानिक कसोटीवरती कधीही सिद्ध होऊ शकत नाहीत. परंतु तरीही ही मंडळी असली अवैज्ञानिक वक्तव्यं सार्वजनिकरित्या करत राहतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत की, राज्य घटना कितीही चांगली का असेना, तिची अंमलबजावणी करणारे लोक चांगले नसतील, तर त्या राज्य घटनेचा काही सुद्धा उपयोग होत नाही. हे वाक्य राजकारण्यांच्या संदर्भात जितके समर्पक आहे, तितकेच ते न्यायाधीशांबद्दल सुद्धा खरे आहे. न्यायाधीशांमध्ये जर वैज्ञानिक दृष्टिकोन नसेल तर ते छद्म विज्ञान व विज्ञान यामध्ये फरक करू शकत नाहीत आणि जर का ते हा फरक करू शकले नाहीत, तर ते संविधानाशीच प्रतारणा करत असतात, असेच म्हणावे लागेल.
वरती चर्चा केलेल्या निवाड्यातील चर्चा कायद्याच्या दृष्टिकोनातून फारच रंजक होत्या. परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहत असताना विज्ञानाच्या ऐवजी अवैज्ञानिक तर्कावरच निष्कर्ष काढण्यात आला आहे. वेद, उपनिषद हे धर्मग्रंथ आहेत. सगळ्याच धर्मग्रंथांमध्ये जगाच्या निर्मितीचे सत्य, चमत्कार, नीतिशास्त्र असतं. हे सर्व याही धर्मग्रंथांमध्ये आहे, म्हणून आधुनिक विज्ञानाला माहीत असलेले सत्य या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये पूर्वीच होतं, असा दावा करणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन नाकारून स्वतःच्या धार्मिक नेणिवांना कुरवाळत असणे, असा होतो.
(लेखक हे आय.एल.एस. लॉ कॉलेज, पुणे येथे प्राध्यापक आहेत.)
लेखक संपर्क ः nawsagaray@gmail.com