नरेंद्र लांजेवार - 9422180451

“बापू, आज माझ्या वडिलांचे आजोबा जिवंत असते, तर ते तुमच्या वयाचे नक्कीच असते. गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्याशी संवाद साधावा म्हणतोय; पण तसं पाहिलं तर बापू तुमच्याशी संवाद होत नाही, असा एकही दिवस जात नाही. तुमचे नाव घेतल्याशिवाय आमच्या कोणत्याच राज्यकर्त्यांना चांगले दिवस येत नाही, हेही तितकेच खरे आहे. तुम्हाला विरोध करणारेही प्रात:स्मरणीय म्हणून तुमचे नाव घेतात.
तुम्ही अहिंसक मार्गाने जी निर्भयता उभी करून ठेवली आहे ना, तिला तोड नाही. तुमच्यासारखा डेअरिंगबाज, जिगरबाज माणूस पृथ्वीतलावर दुसरा झालेला आम्हाला दिसत नाही. ब्रिटिश साम्राज्याच्या सूर्य कधीच ढासळत नाही, असं म्हणणार्या पोलादी तटबंदीच्या इंग्रज साम्राज्याचा पाया तुम्ही मुळापासून हादरविला; तोही अहिंसक मार्गाने. ‘आज जगाला युद्ध नको, बुद्ध हवा,’ ही शिकवण खर्या अर्थाने तुम्ही पटवून सांगितली. त्यामुळे जगभर आज तुम्हाला मानणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. तुमचे विरोधक सुद्धा तुमच्यावर तोंडसुख घेत असले, तरीसुद्धा त्यांना तुमचे स्मरण केल्याशिवाय त्यांचे पानही हालत नाही, हेही सत्यच आहे.
तुम्ही आम्हाला यासाठी अधिकचे प्रिय आहात की, तुम्ही समाजाला नेहमी सांगितलं – तत्त्वाविना राजकारण करू नका, श्रमाविना संपत्ती गोळा करू नका, नीतीविना व्यापार करू नका, चारित्र्याविना शिक्षण देऊ नका, सदसद्विवेक बुद्धीविना विलास नको, मानवतेविना विज्ञान नको आणि त्यागाविना पूजा नको… तुमची ही सात सामाजिक पातके आम्हाला खर्या अर्थाने दिशादर्शक आहेत. तुम्ही संपूर्ण आदर्श मानवी समाजाचं चित्र या सात सामाजिक पातकांतून सांगितले आहे.
तुम्ही म्हणाला होता की, या पृथ्वीची क्षमता सर्वांना जे-जे हवे, ते-ते देण्याची आहे; परंतु एकाही अतिमहत्त्वाकांक्षी माणसाची महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकण्याची क्षमता तिच्याजवळ नाही. आज हाच प्रश्न आम्हाला सुद्धा भेडसावतोय… निदान आमच्या मुला-बाळांसाठी, नातवंडांसाठी तरी आता इथून पुढे ही पृथ्वी सुरक्षित राहील की नाही, हाच प्रश्न विचार करणार्यांसमोर आहे. बापू, तुम्ही जैवविविधतेचा पुरस्कार केला. तुमचा रामसुद्धा ‘मंदिर वही बनायेंगे’वाल्यांपेक्षा खूप वेगळा होता. ‘परमेश्वर हेच सत्य’ हे रूढ असणारे वाक्य तुम्ही ‘सत्य हाच परमेश्वर’ असं करून टाकलं आणि कोट्यवधी मूक जनतेच्या हृदयात आढळणार्या परमेश्वराशिवाय मी दुसरा कोणताही परमेश्वर ओळखत नाही, असं तुम्ही जाहीर केलं. तुम्ही कधीच कोणत्या मंदिरामध्ये जाऊन घंटा वाजली नाही किंवा कुठे अभिषेक करतानाचा ‘सेल्फी’ काढला नाही. म्हणूनच, ‘सब को सन्मती दे भगवान’पर्यंतची तुमची वैश्विक मांडणी होती. संत तुकारामांचे अनेक मराठी अभंग तुम्ही गुजराती आणि इंग्रजी भाषेत अनुवादित केलेत. ‘देव आहे ऐसी वदवावी वाणी’ आणि ‘देव नाही ऐसे जाणावे मनी’ ही तुमची खरी भूमिका होती; पण ही भूमिका समजायला आम्हाला अनेक वर्षे लागली. “या देशाच्या सर्वोच्च पदी अस्पृश्य व्यक्ती असणं, हे माझं स्वप्न आहे आणि तोच माझा स्वातंत्र्याचा अर्थ आहे,” असं तुम्ही तुमच्या स्वातंत्र्याच्या भूमिकेबद्दल आणि अस्पृश्यता निवारणाच्या अनुषंगाने बोलत असत. “अस्पृश्यता ही धर्माने मान्य केलेली बाब नव्हे, तर ती सैतानाची करामत आहे. सैतानाने नेहमीत धर्मग्रंथाचा आधार घेतला आहे,” असे तुम्ही म्हणत. “अस्पृश्यता हा हिंदू धर्माचा भाग नाही आणि जर असे असेल तर मग असा हिंदू धर्म मला नको. मी हिंदू धर्मावर प्राणापेक्षाही अधिक प्रेम करीत असल्याने मला या अस्पृश्यतेच्या कलंकाचा भार असह्य होऊ लागला आहे.” म्हणून आपण अस्पृश्यता निवारणाचे काम हाती घेतले होते. आपण आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले. या गोष्टी बापू अनेक वर्षे अनेकांनी जनतेपासून लपवून ठेवल्यात. तुमचे टीकाकार सुद्धा टीका करून-करून थकून गेले. शेवटी तुमच्या विचारांशी आणि आचरणाशी सामना करता येत नाही, हे लक्षात आल्याने तुमची हत्या करण्यात आली. व्यक्तीची हत्या करून तिचे विचार संपवता येत नाहीत. मनुष्य संपला तरी त्याचे विचार संपवता येत नाहीत, हे शाश्वत मूल्य तुमच्या हत्येने जगन्मान्य केले.
बापू, तुमचे विचार आजच्या वैश्विक अशांततेच्या काळात आम्हाला जास्तच महत्त्वाचे वाटतात. तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात प्रयोग केलेत – आरोग्याच्या क्षेत्रात, रोजच्या आहाराच्या क्षेत्रात, शिक्षण, शेती, विज्ञान, पर्यावरण, खादी, ग्रामोद्योग, निसर्गोपचार… या सर्वच क्षेत्रांतील तुमचे प्रयोग आता लोकांना पटू लागले आहेत. मानवी जीवनाचे असे एकही अंग नाही की, ज्यात तुमचे विचार अंगीकारून पाहता येत नाहीत.
आपला देश आणि आपल्या देशातल्या खर्या समस्याच अजून लोकांना कळल्या नव्हत्या. तुम्ही संपूर्ण देश उघड्या डोळ्यांनी पाहिला आणि मग तुम्हाला या देशातील दारिद्य्राचे, अज्ञानाचे खरे कारण समजले. तुम्ही सर्वसमावेशक अशी भूमिका घेऊन सर्व जाती समुदायांनी एकत्र राहून हा देश बांधला पाहिजे, यासाठी आग्रही राहिलात.
आज तुमच्या विचारांची आवश्यकता अधिक तीव्रतेने आम्हाला जाणवते आहे. आज हेकेखोर वृत्ती वाढत आहे. ‘हम करे सो कायदा…’ अशी भाषा बोलली जात आहे. प्रश्न विचारणार्यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करून देशद्रोही ठरविले जात आहे, म्हणून बापू आज तुमची जास्त आठवण येते.
आज तुम्ही असता तर तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, गुगल मीट, फेसबुक लाईव्ह ही सर्व संवादाची माध्यमं हाताळली असती. तुमच्याइतका कुशलतेने संवाद साधणारा दुसरा कोणी नेता नव्हता. रात्रभर जागून तुम्ही आलेल्या पत्रांना उत्तर देत असत. आता तर तुम्हीसुध्दा देशभर घडणार्या छोट्या-मोठ्या गोष्टींवर याच माध्यमातून मत व्यक्त केले असते. शेतकरी आंदोलन असो, सुशिक्षित बेरोजगारांच्या वाढत्या आत्महत्या असोत की, तान्हुल्या बाळांचे होरपळणे, याबाबत तुम्ही राज्यकर्त्यांना खडसून जाब विचारला असता. कदाचित संवेदनाहीन झालेल्या, निगरगट्ट राज्यकर्त्यांवर हातातली काठीसुद्धा उगारली असती.
तुमच्यासारखा नैतिकतेचा धाक असणारा नेताच देशात न राहिल्याने आज हे असे दिवस बघावयास मिळतात. बापू, वाईट असलं तरी हेही सत्य आहे. तुमच्या नावाने चालणार्या संस्था-संघटनांमध्ये सुद्धा आता तुमच्या विचारांचे विरोधक मोठ्या प्रमाणावर घुसले आहेत. तुमच्या नावाने उभ्या राहिलेल्या सार्वजनिक मालमत्ता हडपण्यासाठी धूर्त मंडळी कोर्टात जात आहेत.प्रत्येकाचा ‘इगो’ वाढत चालला आहे आणि तुमच्या ‘ईको’चा विचार कोणीच करीत नाही. कोरोनावर लस निघाली, तशी या ‘ईगो’वर सुद्धा लस निघाली असती तर बापू, अधिक बरं झालं असतं…असो.
अशीच जावीत काही वर्षे
आणि महात्मा यावा पुढचा।
आम्हांस आम्ही पुन्हा पाहावें
काढुनि चष्मा डोळ्यांवरचा ॥
बापू, शेवटी खरं सांगू का? या जगात जोपर्यंत हिंसा आहे, तोपर्यंत तुम्ही काही मरत नाही… आणि आम्हीसुद्धा तुमचा विचार मरू देत नाही. कारण तो कालातीत आहे.
चला, अधून-मधून भेटत राहू…”
तुमचा चाहता
नरेंद्र लांजेवार, बुलडाणा
संपर्क ः 9422180451