चमत्काराला विरोध कशासाठी?

प्रा. प. रा. आर्डे - 9822679546

चमत्कार तपास अवघड का?

विज्ञानपूर्व काळात चमत्काराची चिकित्सा व तपास, धर्माचा प्रभाव आणि लोकांची मानसिकता यामुळे सहज शक्य नव्हते; पण सोळाव्या शतकापासून विज्ञानाच्या प्रकाशात चमत्कारांची तपासणी आता सहज शक्य झाली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि महा. अंनिस; तसेच भारतातील इतर विवेकवादी चळवळी आणि जगभरातील रिचर्ड डॉकिन्स, जेम्स रँडी आणि इतर विवेकवाद्यांनी चमत्कारांची खोल चिकित्सा केली आहे.

चमत्काराची व्याख्या

प्रथम आपण चमत्काराची नीट व्याख्या करूया आणि धार्मिक क्षेत्रातील व जगप्रसिद्ध अशा चमत्कारांची चिकित्सा करूया. विश्वकोषाने चमत्काराची व्याख्या केली आहे – अद्भुत घटना म्हणजे चमत्कार. निसर्गाचे नियम किंवा कार्यकारणभाव ज्या घटनांना लागू पडत नाहीत, अशा घटनांना अद्भुत म्हणजेच आश्चर्यकारक म्हणतात. निसर्गाच्या नियमांप्रमाणे एखाद्या वस्तूची हवेतून आपोआप निर्मिती करता येत नाही. पदार्थाच्या अविनाशित्वाच्या नियमांनुसार पदार्थाचा किंवा वस्तूचा नाश किंवा आपोआप निर्मिती होत नाही. एक पदार्थ नाहीसा होत असेल, तर त्या क्रियेत नवीन पदार्थ तयार होतो. सत्य साईबाबा मोकळ्या हवेत हात फिरवून विभूती किंवा अंगठी हातातून काढतो, हे निसर्ग नियमाच्या विरोधात जाते, म्हणून हा चमत्कार समजला जातो.

भारतात 25 वर्षांपूर्वी प्रचंड गाजलेला चमत्कार म्हणजे गणपती दूध पितो! निर्जीव मूर्तीने दूध पिणे हे निसर्ग नियमाला धरून नाही; पण हा चमत्कार सर्वत्र गाजला. केवळ सामान्य लोकच नव्हे, तर भले-भले तथाकथित या चमत्काराला फसले. जगभर गाजलेली चमत्काराची घटना म्हणजे यूरी गेलर या इस्त्रायली जादूगाराची बुवाबाजी. धार्मिक क्षेत्रातील चमत्कार; तसेच जगभरातील गाजलेले चमत्कार यांची चिकित्सा हा आपला चर्चेचा विषय आहे.

चमत्कारांची परंपरा

चमत्कारांना फार प्राचीन परंपरा आहे. जगातील जवळजवळ सर्वच धर्मग्रंथांत किंवा धर्मांच्या इतिहासात चमत्काराची असंख्य उदाहरणे खच्चून भरलेली आहेत. वेद, त्रिपिटक, बायबल, अवेस्ता, कुराण, जैन पुराणे, ग्रीक-रोमन-चिनी पुराणकथांसारखे साहित्य यामध्ये चमत्कारांचे उल्लेख सापडतात. बुद्धाच्या एका शिष्याने चमत्कार करून भिक्षापात्र तयार केले, ते बुद्धाने फोडून टाकले आणि आपल्या शिष्यांना निक्षून सांगितले की, त्यांनी कधीही चमत्कार करता कामा नयेत. असे असले तरी बुद्धाने महापूर हटवला किंवा तो पाण्यावरून चालत असे, पाण्यात शिरावे तसा तो जमिनीत शिरत असे. त्याला भिंतीचा अडथळा होत नसे, अशा गोष्टी बुद्धाच्या नावावर पसरवल्या गेल्या आहेतच. महंमदालाही चमत्कार मान्य नव्हते. येशू ख्रिस्ताच्या नावावर तर अनेक चमत्कार आहेत. कुष्ठरुग्णाच्या अंगावरून हात फिरवताच त्या माणसाचा रोग बरा झाला, मेलेल्या माणसाला त्याने पुन्हा जिवंत केले, तो समुद्रावरून चालत जात असे वगैरे अनेक चमत्कार त्याच्या नावाशी जोडले आहेत.

‘ऋग्वेदा’त अनेक अद्भुत कथा सापडतातच; शिवाय गौतम ऋषींची पत्नी अहिल्या; तिची शिळा होणे, गोरा कुंभाराने आपल्या मुलीला मातीत रगडून मारणे व पुन्हा जिवंत करणे, नरसिंह सरस्वतींचे एकाच वेळी अनेक शिष्यांच्या घरी दिवाळीच्या फराळासाठी जाणे, शंकराचार्यांनी तोंड न भाजता तप्त धातुरस प्राशन करणे इत्यादी अनेक प्रकारचे चमत्कार आज वाचायला किंवा ऐकायला मिळतात.

आपल्याकडच्या पोथ्या आणि पुराणकथा चमत्काराच्या कहाण्यांनी तुडुंब भरलेल्या आहेत. ‘वडाचे झाड जोपर्यंत उभे आहे, तोपर्यंत पांथस्थाला सावली देणार व जीर्ण-शीर्ण झाले की, त्याच पांथस्थाच्या डोक्यावर कोसळून त्याचा जीव घेणार. अशा वृक्षाला दोरे गुंडाळून पतीचे आयुष्य वाढेल, असे मानणे ही असत्याची पूजा आहे,’ असे सावरकर म्हणत. हे चमत्कारापोटी बुद्धी गहाण ठेवलेल्या मंडळींना कसे पचणार? उलट, चमत्कारांना आधुनिक विज्ञानाची रुपे देण्याचा त्यांचा खटाटोप सदैव चालूच असतो. धृतराष्ट्राला युद्धभूमीवरचे वर्णन त्याच्या महालात बसून सांगण्याचे काम संजय आपल्या दूरदृष्टीने करत असे. हा चमत्कार पूर्वजांनी ‘दूरदर्शन’चा शोध लावल्याचे उदाहरण आहे. असे म्हटले की, एकाच फटक्यात चमत्कार आणि विज्ञान दोन्हींचाही निकाल लागतो.

चमत्कारांचा असा प्रभाव असलेल्या लोकांना चमत्काराचे सत्यस्वरूप आणि चमत्कारातून उद्भवणारे धोके समजावून सांगणे म्हणून महत्त्वाचे आहे.

चमत्काराची चिकित्सा कशासाठी?

जोपर्यंत आपल्याला पैसा मिळतो, तोपर्यंत तो कोणत्या का मार्गाने मिळत असेल, त्याला हरकत कशासाठी? याचे कारण नीती-अनीतीचा निकष आपण महत्त्वाचा मानायला हवा. योग्य काय आणि सत्य काय, ही मूल्ये समाजधारणेसाठी महत्त्वाची आहेत. याच न्यायाने चमत्कार सत्य की असत्य किंवा योग्य की अयोग्य, याची चिकित्सा अटळ ठरते.

एखादी गोष्ट परंपरेने हजारो वर्षेचालत आली आहे म्हणून ती स्वीकारणे अर्थातच गैर ठरेल. दलितांना अस्पृश्य समजण्याची प्रथा हजारो वर्षेभारतीय समाजात चालत आली होती. ही चुकीची किंवा असत्य प्रथा भारतीय राज्य घटनेने नाकारली. कारण ही प्रथा सत्य नव्हती; आणि योग्यही. याच न्यायाने परंपरेत चालत असलेल्या धार्मिक चमत्कारांची चिकित्सा करून चमत्कार त्याज्य का, याचा निर्णय घ्यायला हवा.

प्रथम चमत्काराची सत्यता तपासून पाहूया. प्रख्यात तत्त्वज्ञ सर डेव्हीड ह्युम याने चमत्काराबद्दल अतिशय परखडपणे स्पष्टीकरण दिले आहे. सर्व प्रकारचे चमत्कार हे साध्या निसर्गनियमाने स्पष्ट करता येतात. निसर्गनियमाच्या विरोधात दैवी अथवा अतिनैसर्गिक चमत्कार शक्य नाही, असा त्याचा दावा होता. ह्युमचा हाच विचार जगभरातील विवेकवादी स्वीकारतात आणि आपणही तो स्वीकारायला हवा.

चिकित्सेचे हत्यार

चमत्कार सत्य की असत्य, हे ठरवण्याचं उत्कृष्ट साधन म्हणजे वैज्ञानिक चिकित्सा. चमत्कारांची वैज्ञानिक पद्धतीने नियोजनबद्ध चिकित्सा प्रख्यात बुद्धिप्रामाण्यवादी डॉ. अब्राहम कोवूर यांनी करायला सुरुवात केली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून केरळमधील विवेकवादी बी. प्रेमानंद यांनी चमत्काराला आव्हान देणारी भूमिका मांडली; ती डॉ. नरेंद्र दाभोलकर व ‘महाराष्ट्र अंनिस’मधील त्यांच्या सहकार्‍यांनी चालू ठेवली. जागतिक पातळीवर प्रख्यात चमत्कार संशोधक जेम्स रँडी यांनी यूरी गेलर सारख्या लबाड लोकांना उघडे करून चमत्काराला आव्हान देणारी भूमिका सतत मांडली आहे.

कोवूरांचे कार्य

डॉ. अब्राहम कोवूर यांनी धार्मिक क्षेत्रातील आणि अन्य प्रकारच्या बुवाबाजीच्या चमत्काराचा तीव्र शब्दांत उपहास केला. चमत्काराला आव्हान देण्याची प्रक्रिया भारत आणि श्रीलंका; तसेच आशिया खंडातील इतर देशांत त्यांनी धगधगत ठेवली.

चमत्कारांना रोख रकमेचे आव्हान देण्याची कल्पना प्रथम डॉ. अब्राहम कोवूरांची. त्यांनी रुपये एक लाखाची आव्हान रक्कम चमत्कार सिद्ध करणार्‍यास देऊ केली होती. मात्र या आव्हानप्रक्रियेसाठी एक विशिष्ट पद्धत त्यांनी निर्माण केली होती. ती पुढीलप्रमाणे –

विज्ञानाच्या ज्ञात नियमांशी विसंगत दावे करणार्‍या व त्या आधारे अंधश्रद्धा वाढवून बुवाबाजी, फसवणूक व शोषण करणार्‍या कोणत्याही व्यक्तीची तपासणी करण्यास डॉ. अब्राहम कोवूर तयार आहेत. या चाचणीचा खर्च अब्राहम कोवूर करतील. कोणत्याही प्रकारची लबाडी टाळण्यासाठी दोन्ही बाजूच्या साक्षीदार संबंधित व्यक्तीची शारीरिक तपासणी; तसेच चमत्काराची जागा इत्यादी तपासून मगच चमत्काराची शहानिशा केली जाईल. चमत्कार सिद्ध करणार्‍याने स्वत:च एक हजार रुपये अनामत रक्कम ठेवायला हवी. चमत्कार सिद्ध न झाल्यास ती रक्कम जप्त केली जाईल. चमत्काराची चाचणी दोनवेळा केली जाईल.

सर्व प्रकारचे बुवा-बाबा तथाकथित संत, योगी इत्यादींनी खालील प्रकारचे चमत्कार सिद्ध केल्यास त्यांना एक लाख रुपयांची आव्हान रक्कम त्यांच्या अनामत रकमेसहीत परत केली जाईल.

1) बंद पाकिटातील नोटेचा नंबर ओळखणे.

2) त्याच प्रकारची नोट नवीन निर्माण करणे.

3) जळत्या निखार्‍यावर अर्धा मिनिट पाय न भाजता उभे राहून दाखविणे.

4) आम्ही सांगू ती वस्तू हवेतून निर्माण करणे.

5) धातू किंवा तत्सम घनवस्तू केवळ मन:सामर्थ्याने जागचे हलवणे किंवा वाकवणे.

6) ‘टेलिपॅथी’च्या सामर्थ्याने दुसर्‍याच्या मनातील विचार ओळखणे.

7) पवित्र रक्षा, श्रद्धा सामर्थ्य (Healing Power) किंवा इतर आध्यात्मिक शक्तीने छाटलेला शारीरिक अवयव एक इंच किंवा जास्त वाढवून दाखविणे.

8) योगिक सामर्थ्याने हवेत तरंगून दाखविणे.

9) योगिक सामर्थ्याने हृदयाचे ठोके पाच मिनिटांसाठी बंद करणे.

10) योगिकसामर्थ्याने अर्धा तास श्वासोच्छवास बंद करून दाखविणे.

11) पाण्यावर चालणे.

12) शरीर एका ठिकाणी ठेवून दुसर्‍या ठिकाणी प्रकट होणे.

13) भविष्यातील घटना अचूकपणे सांगणे.

14) अतींद्रिय शक्ती किंवा योगसामर्थ्याने बौद्धिक सामर्थ्य वाढवणे.

15) माहीत नसलेल्या भाषेत बोलणे किंवा अर्थ लावणे.

16) भुताचा फोटो घेणे.

17) निगेटिव्हमधील फोटो गायब करणे.

18) आध्यात्मिक सामर्थ्याने कुलूपबंद खोलीतून बाहेर पडणे.

19) दैवी सामर्थ्याने पदार्थाचे वजन वाढवून दाखविणे.

20) गुप्त वस्तू शोधून काढणे.

21) पाणी किंवा पेट्रोलचे दारूमध्ये रूपांतर करणे.

22) दारूचे रक्तात रूपांतर करणे.

23) दहा पत्रिका किंवा हस्तरेषा यावरून संबंधित व्यक्ती जिवंत आहे का मृत, हे 90 टक्क्यांपेक्षा जास्त अचूक सांगणे.

हे आव्हान अब्राहम कोवूर यांनी धार्मिक क्षेत्रातील तथाकथित योगी आणि बुवा, ज्यात सत्य साईबाबा अशांसारख्या मातब्बर बुवांसाठी प्रसिद्ध केले. पण कोणीही माईचा लाल हे आव्हान स्वीकारण्यास पुढे आला नाही.

सत्य साईबाबाला आव्हान

भारतातील एकेकाळचा प्रख्यात बुवा सत्य साईबाबा हवेतून हात फिरवून वस्तू निर्माण करण्याचा चमत्कार करीत असे. डॉ. कोवूर यांनी सत्य साईबाबाला हा चमत्कार स्वत:समोर फसवणूक टाळून (under fraud proof condition) सादर करण्याचे आव्हान दिले. त्यासाठी ते बंगळूरला सत्य साईबाबा आलेत, हे कळल्यावर तेथे पोचले व त्यांचे आव्हान स्वीकारण्याची मागणी केली; पण सत्य साईबाबाला हे कळताच त्याने तडक बंगळूर सोडले आणि म्हैसुरला गेला. तेथेही अब्राहम कोवूर पोचले. तो म्हैसूरच्या वृंदावन गार्डनमध्ये आहेत, हे कळल्यावर कोवूर तेथेही पोचले; पण तेथूनही सत्य साईबाबा गायब झाला होता, याचा अर्थ काय? अब्राहम कोवूर आपल्या चमत्काराचे बिंग फोडतील, या धास्तीमुळेच त्याने कोवूर यांच्यासमोर चमत्कार सिद्ध करण्यास नकार दिला असावा.

सत्य साईबाबाच्या चमत्काराचा पर्दाफाश जादूगार सरकार या जादूगारानेही केला. सत्य साईबाबा दरबारात हवेतून हात फिरवून चमत्कार करीत होता. भक्त बनून गेलेल्या जादूगार सरकारच्या हातावर त्याने हवेतून विभूती काढून ठेवली. त्याच क्षणी जादूगार सरकारने स्वत: हवेत हात फिरवून सत्य साईबाबाच्या हातावर रसगुल्ला काढून दिला. हा जादूगार आहे, हे सत्य साईबाबाच्या लक्षात येताच त्याने जादूगार सरकारला दरबारातून बाहेर हकलून दिले. खरं तर चमत्कार हे असे जादूगार करतात. त्याप्रमाणे हातचलाखीचे किंवा विज्ञानाचा वापर करून केलेली फसवाफसवी असते. हा दैवी शक्तीचा प्रकार नसतो.

सत्य साईबाबाच्या एका चमत्काराची चित्रफीत ‘महाराष्ट्र अंनिस’च्या हाती लागली. ती महाराष्ट्रात सर्वत्र दाखविली गेली आणि सत्य साईबाबाचे असत्य स्वरूप महाराष्ट्रातील जनतेला कळून चुकले. या चित्रफितीत सत्य साईबाबाचे आश्रमाचे बांधकाम करणार्‍या तंत्रज्ञाचा सत्कार साईबाबा करीत असल्याचे दाखविले आहे. शाल ठेवलेले सत्काराचे तबक साईबाबाचे एक शिष्य साईबाबाच्या हातात देत आहे. त्याचवेळी ताटाखालून एक साखळी तो सत्य साईबाबाच्या हातात सरकवत असल्याचे चित्रफितीत स्पष्ट दिसते. नंतर साखळी घेतलेल्या हातावर शाल ठेवून ती संबंधित व्यक्तीच्या खांद्यावर घालता-घालता हवेतून हात फिरविण्याचे नाटक करून सत्य साईबाबा त्या तंत्रज्ञाच्या गळ्यात ती साखळी घालतो.

प्रेमानंदांचे कार्य

सत्य साईबाबाच्या चमत्कार भंजनाच्या चळवळीची परंपरा केरळमधील प्रख्यात बुद्धिप्रामाण्यवादी बी. प्रेमानंद यांनी चालविली. वयाच्या बाराव्या वर्षापासून बी. प्रेमानंदांना चमत्कार शोधण्याचा छंद जडला. पुढील आयुष्यात खर्‍याच चमत्काराच्या व खर्‍या योगी, संत-महंत यांच्या शोधात असताना त्यांना एकही खरा गुरू भेटला नाही. भेटले ते सर्व लबाडीच करत होते. तेव्हापासून बी. प्रेमानंद चमत्कार करणार्‍या आणि चमत्कार करण्याचा दावा करणार्‍या बुवा-बाबांचा पर्दाफाश करू लागले. आपल्या हयातीत बी. प्रेमानंदा यांनी विविध प्रकारचे चमत्कार करणार्‍या 1500 बुवा-बाबांचे पितळ उघडे पाडले आहे. आपल्या मृत्यूपर्यंत निदान एखादा तरी दैवी सामर्थ्याने खराखुरा चमत्कार करणारा गृहस्थ भेटेल, अशी त्याची इच्छा होती; पण त्यांच्या मृत्यूपर्यंत असा एकही चमत्कारी बुवा-बाबा त्यांना भेटला नाही.

अंनिसचे चमत्कार भंजन

अब्राहम कोवूर आणि बी. प्रेमानंद यांच्यापासून प्रेरणा घेऊन डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि ‘महाराष्ट्र अंनिस’च्या त्यांच्या साथीदारांनी दैवी सामर्थ्याने चमत्कार करणार्‍या बुवा-बाबांना आव्हान देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. पूजेच्या साहित्यात लपविलेला विभूतीचा खडा शिताफीने हातात घेऊन हवेत हात फिरवून विभूती काढणार्‍या मसले चौधरीच्या अनुराधा देशमुख यांचे पितळ ‘महा. अंनिस’ने उघड केले आहे. पूजेच्या साहित्यातून विभूतीचा खडा काढणार्‍या तिच्या युक्तीची चित्रफीत ‘महा. अंनिस’ला उपलब्ध झाली आहे. अशाच प्रकारचे शेकडो चमत्कार हे दैवी नसून केवळ हातचलाखी किंवा विज्ञान-तंत्रज्ञानाच्या करामतीचे खेळ आहेत, हे ‘अंनिस’ने वारंवार सिद्ध केले आहे.

प्रेषितांचे धार्मिक चमत्कार

विविध धर्मप्रेषितांनी पाण्यावरून चालणे, कुष्ठरुग्णाला बरे करणे, समुद्रापलिकडचे पाहणे, असे चमत्कार केल्याचे धार्मिक ग्रंथ आणि पुराणात उल्लेख आहेत; पण अशा चमत्कारांची वर्तमानकाळात आपण शहानिशा कशी करणार? तार्किकदृष्ट्या नीट विचार केला, तर असे चमत्कार हे असंभव या सदरातच मोडले पाहिजेत. धर्मप्रेषितांच्या पुढच्या पिढीतील शिष्यांनी त्यांच्या नावावर असे चमत्कार ग्रंथात घुसडण्याचा अप्रामाणिक प्रयत्न केला असावा, असा निष्कर्ष काढण्यास हरकत नाही. याचे एकच उदाहरण पुरेसे आहे. महाराष्ट्रात होऊन गेलेले प्रख्यात संत, समाजसुधारक गाडगेबाबा यांनी आपल्या सबंध आयुष्यात एकही चमत्कार केला नाही. ‘पण गाडगेमहाराज मृत्यूनंतर सदेह वैकुंठाला गेले,’ असे त्यांच्या चरित्रात लिहिले गेले आहे. खरं तर ज्ञानदेव, तुकाराम, संत गाडगेबाबा किंवा विविध धर्मांच्या प्रेषितांनी जगाला जो नैतिक आचरणाचा ठेवा दिला, तेच त्यांचे खरे कार्य होय. तुकारामांची ‘गाथा’ किंवा ज्ञानेश्वरांची ‘ज्ञानेश्वरी’ हा खरा मौलिक ठेवा. संत आणि धर्मप्रेषितांवर चमत्काराचा आरोप करून त्याचं अवमूल्यन करणे योग्य नाही. (Love thy neighbour – you love yourself) म्हणजेच स्वत:वर जितके प्रेम करता, तितकेच शेजार्‍यावर करा, हा येशु ख्रिस्ताचा संदेश खरा मूल्यवान होय. त्यासाठी त्यांच्यावर चमत्कार सारण्याचे कारण नाही. अलिकडच्या काळातील तथाकथित संत-महंत, बुवा-बाबा यांनी आपापल्या धर्माच्या प्रभावाने पुराणात वर्णिलेले चमत्कार स्वत: करून दाखवायला काय हरकत आहे? धर्मप्रेषितांचा त्यांच्यावर अनुग्रह असेल, तर त्यांना अशा प्रकारचे दैवी चमत्कार करणे सहज शक्य आहे आणि अशा प्रकारचे तथाकथित दैवी चमत्कार करून दाखवण्याचा ते प्रयत्न करतातसुद्धा; परंतु विज्ञानाच्या प्रकाशात अशा चमत्काराची तपासणी सिद्ध करता, हे दैवी चमत्कार नसून विज्ञानाच्या नियमाप्रमाणे घडत असलेल्या घटना आहेत, हे वारंवार सिद्ध झाले आहे, म्हणून चमत्कार असंभवनीय असतात. ज्याला चमत्कार म्हणतात, ते निसर्गनियमाचेच आविष्कार असतात, हे कटू सत्य स्वीकारावेच लागते. ख्रिस्ती धर्मात समाजसेवा करणारी व्यक्ती संतपदाला पोचण्यासाठी तिने दोन किंवा तीन चमत्कार केले पाहिजेत, अशी अट आहे. मदर तेरेसा या प्रख्यात समाजसेविकेला संतपद देण्यासाठी ख्रिस्ती धर्माने ही अट घातली होती; पण खरी धार्मिकता ही सेवाकार्यात असून किंवा प्रेमाने व त्यागाने, खचलेल्यांना सहाय्य करणे, हीच खरी सेवा आणि हाच खरा धर्म, म्हणून चमत्काराची ख्रिस्ती धर्मातील अट विवेकवादाला मान्य नाही.

जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले॥

तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा॥

हाच तुकारामांनी सांगितलेला धार्मिकतेचा खरा अर्थ आहे.

दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो।

जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात॥

हाच ज्ञानेश्वरांनी सांगितलेला खरा धर्म. सारांश, धार्मिकतेचा संबंध उन्नत नैतिक जीवनाशी जोडायला हवा; चमत्कारांशी नाही.

जागतिक चमत्कार भंजन

जगभरातील विवेकवाद्यांनी चमत्काराला विरोधच केला आहे. ह्युमच्या व्याख्येप्रमाणे चमत्कार हे निसर्गनियमाचेच आविष्कार असतात, हे जगभरातील विवेकवादी विचारवंतांनी मान्य केले आहे. काही धार्मिक गटसुद्धा देवाने निर्माण केलेल्या सृष्टीतील रचनेत तो स्वत: नंतर काहीच हस्तक्षेप करत नाही, असे समजतात; ते दैवी चमत्कारांना मान्यता देत नाहीत. प्रख्यात अमेरिकन जादूगार जेम्स रँडी हा अमेरिकेतील विवेकवादी चळवळीचा समर्थक होता. त्याने दैवी शक्तीच्या नावाखाली चमत्कार करणार्‍या अनेक ढोंग्यांचा पर्दाफाश केला आहे. त्यापैकी एक इस्त्राईलचा युरी गेलर. स्टॅनफोर्ड रिसर्च इन्स्टिट्यूट या अमेरिकेतील प्रख्यात संशोधन संस्थेतील डॉ. पुरीख या शास्त्रज्ञाच्या मदतीने युरी गेलरने विद्यापीठात गूढ सामर्थ्याचे प्रयोग करून सर्वांना चकित केले. नजरेने चमचा वाकवणे, दुसर्‍याच्या मनातील विचार ‘टेलिपथी’ने ओळखणे असे भन्नाट प्रयोग करून त्याने शास्त्रज्ञांनाही चकित करून सोडले. या प्रयोगात प्रख्यात अंतराळवीर एडवर्ड मिचेलही सामील झाला होता. त्यामुळे युरी गेलर अतींद्रिय शक्तीचा सुपरस्टार म्हणून अमेरिकेत प्रसिद्धीला आला. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ आणि भल्या-भल्या प्रसिद्धिमाध्यमांनी आणि जगप्रसिद्ध वैज्ञानिक मासिक ‘नेचर’मध्ये देखील युरीचे प्रयोग प्रसिद्धीला दिले गेले. प्रसिद्धिमाध्यमांना सत्यशोधनापेक्षा सनसनाटी बातम्यांची हौस किंवा गरज असते, त्याचाच हा परिणाम. आपल्या क्षेत्रात पारंगत असणार्‍या शास्त्रज्ञांना आपण सर्वज्ञ नसतो, हे लक्षात येत नाही. त्यामुळे जादूच्या प्रयोगाची साधी लबाडी त्यांच्या लक्षात येत नाही. जेम्स रँडीचं एक प्रसिद्ध वाक्य आहे- ‘निसर्ग कधीही लबाडी करत नाही; पण माणूस लबाडी करतो.’ माणसांची ही लबाडी जादूगारांना लगेच समजते. जेम्स रँडीला युरी गेलर हा हातचलाखीचे साधे प्रयोग करून लोकांना उल्लू बनवत आहे, हे लक्षात येण्यास वेळ लागला नाही. माणसांना सदासर्वकाळ फसवता येत नाही; न फसणारा कुणीतरी बहाद्दूर ढोंगी लोकांचं बिंग फोडतोच. अमेरिकेतील ‘टाइम’ मासिकाच्या संपादकाला युरीच्या गूढ सामर्थ्याची चिकित्सा करण्याची गरज वाटली. त्याने जेम्स रँडीला मदतीला घेतले आणि आपला फोटोग्राफर त्याच्या मदतीला दिला. या फोटोग्राफरबरोबर रँडी हा रिपोर्टर बनला आणि ‘टाइम’च्या कार्यालयात युरीची चाचणी घेण्यात आली. या चाचणीत युरी गेलर हा साधे जादूचे आणि हातचलाखीचे प्रयोग करतो आहे, हे रँडीने ओळखले आणि त्याने या प्रकाराला ‘टाईम’मध्ये प्रसिद्धी दिली. तेव्हापासून युरी गेलरच्या फुगा फुटण्यास अमेरिकेत सुरुवात झाली.

इंग्लंडमधील प्रख्यात गणितज्ज्ञ जॉन टेलर यालाही युरीने ‘मामा’ केला. टेलरच्या समोर युरीने चमत्काराचे प्रयोग सादर केले. टेलर फसला आणि अक्षरश: युरीचा भक्त झाला. त्याच्या जीवनावर ‘सुपर माईंड्स’ हे पुस्तकही टेलरने प्रसिद्ध केले. हा प्रकार समजल्यावर जेम्स रँडी नाव बदलून टेलरच्या प्रयोगशाळेत पोचला आणि युरी गेलरने वाकवलेला बंद नळीतील धातूचा तुकडा शिताफीने बाहेर काढून त्यावर ‘बेंट बाय रँडी’ अक्षरे लिहून पुन्हा त्या नळीत ठेवला. हे साधे जादूगाराच्या हातचलाखीचे काम होते. रँडीने मग ‘मॅजिक ऑफ युरी गेलर’ हा गाजलेला ग्रंथ प्रसिद्ध करून युरी गेलरची बुवाबाजी जगाच्या पाठीवर उघडी केली.

अशाच प्रकारच्या चमत्काराच्या अनेक घटना जेम्स रँडीने उघडकीस आणल्या. त्यात प्रामुख्याने केवळ नजरेने समोरील पुस्तकातील पाने उघडण्याची ट्रिक, हायड्रीक हा ढोंगी करत होता. रँडीने पुस्तकाच्या बाजूला साध्या, हलक्या फोमच्या गोळ्या पसरून ठेवल्या आणि हायड्रिकला पुन्हा प्रयोग करायला सांगितले. यावेळी मात्र हायड्रिक उघडा पडला. कारण तो नकळत फुंकर मारून पुस्तकाची पाने उघडीत होता. फुंकर मारली तर फोमच्या गोळ्या देखील उघडतील, हे लक्षात आल्याने त्याने सपशेल माघार घेतली.

पीटर पोफोफ हा ख्रिश्चन पाद्री मंत्रशक्ती आणि प्रार्थना यांनी लोकांचे रोग बरे करायचा; विशेष म्हणजे समोर बसलेल्या लोकांबद्दल अगोदर काहीही माहीत नसताना त्यांचे आजार ओळखायचा, लोक आश्चर्यचकित व्हायचे. दूरचित्रवाणी स्टार जॉनी कार्सन याच्या मदतीने रँडीने पोफोफची बुवाबाजी उघड केली. पोफोफ स्टेजच्या पाठीमागे असलेल्या आपल्या बायकोच्या मदतीने सूक्ष्म ट्रान्समीटरच्याद्वारे बाईने त्याला दिलेल्या माहितीवरून लोकांचे आजार ओळखत असे.

1996 मध्ये जेम्स रँडीने ‘जेम्स रँडी एज्युकेशन फौंडेशन’ची (जेआरईएफ) स्थापना केली. ‘ना नफा-ना तोटा’ तत्त्वावर ही संघटना कार्य करते. ज्याला विश्वसनीय पुरावा नाही, अशा दाव्यावर विश्वास ठेवल्यामुळे होणारे संभाव्य धोके लक्षात यावेत, यासाठीचे लोकशिक्षण आणि मीडियाचे प्रबोधन करणे हा या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. अतींद्रिय शक्तीची नियंत्रित वैज्ञानिक चिकित्सा करणार्‍या संशोधकांनाही ही संस्था मार्गदर्शन करते. 2015 मध्ये या कार्यासाठी ‘जेआरईएफ’ने सक्षम संशोधकांना अनुदान देण्यास सुरुवात केली. व्हर्जिनिया राज्यातील फॉल्स चर्च येथे ‘जेआरईएफ’चे मध्यवर्ती कार्यालय आहे. 1964 मध्ये परामानसिक म्हणजे ‘पॅरानॉर्मल’ शक्ती सिद्ध करणार्‍या व्यक्तीला 1000 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस रँडीने जाहीर केले. मात्र दोन्ही पक्षांनी चाचणीसाठीच्या वैज्ञानिक कसोट्या मान्य करण्याचे बंधन पाळणे अनिवार्य होते. ही रक्कम पुढे 10 लक्ष डॉलर्सपर्यंत वाढविण्यात आली. संबंधित आव्हान प्रक्रियेची जबाबदारी ‘जेआरईएफ’वर सोपवण्यात आली. एक हजारांपेक्षाही जास्त महाभागांनी हे आव्हान स्वीकारले. त्यापैकी बहुतेकजण हरले, तर इतरांनी आव्हानप्रक्रियेतून पळ काढला. 2015 नंतर ‘जेआरईएफ’ने ही आव्हान प्रक्रिया थांबविली आहे. कारण कोणीही लुंग्या-सुंग्याने संस्थेचा वेळ वाया घालवू नये म्हणून; मात्र असे आव्हान देणार्‍याने पहिल्यांदा प्राथमिक चाचणीत यशस्वी व्हावे, मगच अंतिम चाचणी ठेवली जाईल, असे जाहीर केले आहे.

बोगस एडीई651.’

जिम मॅकॉर्मिक हा ब्रिटीश व्यावसायिक असून त्याने बोगस ‘एडीई-651’ या बॉम्बशोधक उपकरणाचा शोध लावला. 2008 मध्ये जिमला त्याचे उपकरण विश्वसनीय असण्याच्या चाचणीला सामोरे जाण्याचे आव्हान रँडीने दिले. रँडीच्या मते, ‘एडीई’ हे साधन बोगस व निरुपयोगी असून ते फक्त भोळसट लोकांचे खिसे रिकामे करण्याचे काम करते. याची विक्री ही सरळसरळ फसवणूक आहे. माझे आव्हान स्वीकारावे व दहा लाख डॉलर्स जिंकावेत, असे सरळ आव्हान रँडीने जिमला दिले. हे आव्हान मॅकार्मिकने स्वीकारले नाही. मिळवलेल्या रिपोर्टनुसार, बगदाद बॉम्बशोधक पथकाला हे बोगस साधन भरमसाठ किमतीला विकण्यात आले. बॉम्ब वाहून नेणार्‍या गाड्या चेक स्थानकावर तपासण्यास ‘एडीई’चा वापर करण्यात आला; पण हे साधन गाडीतील बॉम्ब शोधू शकले नाही; परिणामी बॉम्ब वाहून नेणारे अतिरेकी त्यांची वाहने इच्छित ठिकाणी घेऊन गेले आणि हजारो लोकांचे प्राण घेण्यात यशस्वी झाले. 2013 मध्ये मॅकार्मिकवर बोगस बॉम्बशोधक विक्रीबद्दल खटला भरण्यात आला. त्यात त्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. या गृहस्थाला शिक्षा होण्यासाठी रँडीने केलेले संशोधन व आव्हान उपयोगात आले. इराकी सरकारने वेळीच रँडीचे मत लक्षात घेऊन बोगस बॉम्बशोधक विकत घेण्याचे थांबविले असते, तर निरपराध इराकी नागरिक व सैनिकांचे प्राण वाचले असते.

विवेकवादाचा प्रचार करणार्‍या जगभराच्या संघटना ‘स्केप्टीक’ या नावाने ओळखल्या जातात. धर्मनिरपेक्ष आणि इहवादी तत्त्वांच्या प्रसारासाठी त्या कार्यरत आहेत. रिचर्ड डॉकिन्स, हेन्रिक फ्रेजिअर, रँडी, मार्टीन गार्डनर यांसारखे वैज्ञानिक व विचारवंत या चळवळीत कार्यरत आहेत. चमत्काराला नाकारून धर्माचा खरा नैतिक आशय लोकांपर्यंत पोचवण्याचे काम ही मंडळी करतात.

समारोप

धार्मिक किंवा अन्य प्रकारचे गूढ चमत्कार हे सत्य नसतात. याचबरोबर चमत्काराच्या नावाखाली बुवाबाजी फोफावण्यास वाव मिळतो. म्हणून चमत्काराला विरोध हवा आणि हा विरोध जागतिक पातळीवर संघटितपणे सुरू आहे व सुरू राहील. ‘महाराष्ट्र अंनिस’ याच विचारांनुसार चमत्काराला विरोध करीत आली आहे.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]