नरेंद्र दाभोलकर : चित्र, शब्ददर्शन

डॉ. बाबूराव गुरव -

अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही केवळ एक संघटना नाही. तो केवळ एक विचार नाही, “संपूर्ण समाजाला विज्ञानाच्या, विवेकवादाच्या तर्कशीलतेच्या अनुभवातून शिकण्याच्या मार्गावरून घेऊन जाणारा हा मानव वंशाचा विकास करणारा मानवमुक्तीचा पुरोगामी, क्रांतिकारी महाप्रवाह आहे!” हा प्रवाह दिवसेंदिवस अधिक बळकट, अधिक लांबरुंद करण्यासाठी सर्वांनी झटले पाहिजे. ज्यांचे विचार अधिक सखोल, प्रगल्भ बनलेत त्यांनी समाजात अधिक कृतिशील, गतिमान होण्याची गरज आहे. संघटित कार्यकर्ते त्यांचे काम करत आहेतच; पण सर्व पक्ष, धर्म, भाषा, विभागातील जाणकारांनी, कलावंतांनी या समाज बदलाच्या कामात अधिक रस दाखविला पाहिजे.

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे व्यक्तिमत्त्व शतरंगी शतगुणी, नवरसाने समृद्ध असे व्यक्तिमत्त्व होते. ते माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठे होते. विद्यार्थिदशेतच १९६२ साली, माझ्या बालपणी माझी त्यांची ओळख, पुढे खेळाडू म्हणून सलगी आणि शेवटी विचारमैत्री झाली. आमच्या दोघांच्या जीवनात घडणार्‍या बारीकसारीक घटनांबद्दल आम्हाला माहिती होते. शिवाजी उदय मंडळाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा कबड्डी खेळाडू, समाजवादी युवक दलाचा संघटक, मुक्तांगण वसतिगृहाचा संस्थापक- सदस्य अशा अनेक अंगांनी दाभोलकर काम करत एक संघटक नेता म्हणून वाढत राहिले.

१९७४ साली मी सातार्‍यात लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयात मराठीचा प्राध्यापक म्हणून काम करू लागलो त्या वेळी चार वर्षे आम्हाला एकत्र काम करायला मिळाले. दाभोलकर हे समाजपरिवर्तनाच्या चळवळीतले जीवनदानी कार्यकर्ते, नेते होते. मूलत: ते पक्ष आणि निवडणुकीच्या राजकारणात व्यक्तिगतरित्या न अडकलेले हाडाचे, अव्वल दर्जाचे राजकीय नेते, चिंतक होते. ते क्रांतिकारी समाजवादी विचारांचे खरेखुरे वाहक होते. आपल्या कार्यक्षेत्रातील सामाजिक आणि राजकीय पर्यावरण पुरोगामी दिशेचे राहावे, यासाठी ते सतत दक्ष आणि आक्रमक, क्रियाशील असत.

१९८९ साली डॉ. दाभोलकरांनी प्रामुख्याने अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात स्वत:ला गाडून घेण्याचा निर्धार केला. ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ स्थापन केली. महाराष्ट्रभर फिरून तरुण कार्यकर्त्यांचे मोहोळ उभे केले. माझे दोन तरुण विद्यार्थी मित्र प्रताप घाटगे आणि अतुल वाघ पहिल्यापासून संघटनेचे सभासद, कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते बनले. आमचे राजाराम म्हसके, भास्कर सदाकळे, राहुल थोरात संघटनेत पुढे आले. सांगली जिल्ह्यात संघटना भक्कमपणे उभी राहिली. बुवा, महाराज, मांत्रिक पकडले जाऊ लागले. अभ्यास शिबिरे, बैठका, अधिवेशने गर्दीने फुलू लागली. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ उभी राहिली. गावागावांत नवे कार्यकर्ते तयार होऊ लागले. संघटनेची क्रियाशील कार्यकर्त्यांची साखळी उभी राहिलीच; पण संघटनेत सभासद नसलेले, पदाधिकारी नसलेले काही लाख हितचिंतक संघटनेच्या पाठीमागे उभे राहिले. अंनिवाचे वाचक बनले. संघटनेच्या कार्यकर्त्यांना प्रतिगामींनी त्रास दिला, धमकी दिली, मारहाण केली, तर त्या-त्या विभागात भकम सामाजिक पाठिंबा उभा राहू लागला. वार्तापत्राला देणग्या, जाहिराती भरपूर मिळू लागल्या. विवेक वाहिनी, विज्ञान जाणिवा प्रकल्प, ग्रहगोल दर्शन गाडी, देशभर फिरून अंधश्रद्धा, चेटकीण प्रथांचा अभ्यास करणारी लेखकांची टीम, प्रकाशन विभाग, प्रबोधन विभाग, भांडाफोड विभाग, वैज्ञानिक, मांत्रिक तयार करणे, अशी कामे झाली. पंचवीसपेक्षा जास्त पुस्तके प्रसिद्ध झाली. महाराष्ट्रभर खपली, वाचली जाऊ लागली. महाविद्यालयांमध्ये विवेकवाहिन्या उभा राहू लागल्या. राष्ट्र सेवा दल आणि अंनिसचा संवाद कार्यव्यवहार वाढला. चमत्कारांचे भांडाफोड करण्यासाठी बक्षिसे ठेवली गेली. विवेकवादाचे लेखन वाढले, कार्यकर्त्यांना, नेत्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळू लागले. ‘राष्ट्रीय सेवा योजना’ शिबिरातून, स्नेहसंमेलनातून अंधश्रद्धेवर भाषणे, चर्चा, प्रयोग होऊ लागले. बहुतेक सर्व राजकीय पक्ष, संघटना सकारात्मक किंवा नकारात्मक पद्धतीने; पण अंनिसची दखल घेऊ लागले. पुरोगामी राजकारणावर अंनिसमुळे बळ मिळू लागले. शेकडो देवदासींचे गुंतलेले, लगदा झालेले केस कापले गेले. नाटके, पथनाट्ये, गीते, जलसे, लोकनाट्ये यांच्यावर वैज्ञानिक जाणिवांचा प्रभाव जाणवू लागला. दैववाद, नशीब, अंधश्रद्धा, करणी, भानामती, चेटकीण प्रथा, चमत्कारामागील छुपे विज्ञान, छद्मविज्ञान, मुहूर्त, वास्तुशास्त्र, भूत, पिशाच, भयावह रहस्ये, भटके-अतृप्त आत्मे, शुभ-अशुभ वेळा, देवकल्पना, शाप, श्राप, कर्मविपाकाचा सिद्धांत, बखरी, पुराणे यावरून मांडला जाणारा इतिहास, वेगवेगळे आजार, औषधोपचार, मानसविज्ञान असे एक ना दोन असंख्य विषय चर्चेच्या, चिकित्सेच्या ऐरणीवर आले. साप्ताहिके, दैनिके, पाक्षिके, मासिके, विशेषांक, दिवाळी अंक आवर्जून अशा विषयांवर लेख, चर्चा, परिसंवाद छापू लागले. लग्नात पत्रिका पाहणे नाकारले जाऊ लागले. जातिअंताची चर्चा घडू लागली. आंतरजातीय विवाह वाढले. सत्यशोधक विवाह, नोंदणीकृत विवाह होऊ लागले. अमावस्येदिवशी रात्री स्मशान यात्रा निघू लागल्या. स्त्री-पुरुष समतेचा विषय चर्चेत आला. शोषणमुक्तीसाठी अंधश्रद्धा निर्मूलन महत्त्वाचे वाटू लागले. धर्मांची कालसुसंगत सकारात्मकता चिकित्सा सुरू झाली. दैवतांना पशुबळी देणे, प्रश्नांकित बनले. पर्यावरणाची चर्चा सुरू झाली. तर्क आणि अनुभवाधारित निर्णयाकडे कल वाढला. भटक्या जमाती, आदिवासी यांच्या अघोरी जातपंचायती कायद्याच्या कक्षेत आल्या. दीर्घ संघर्षातून ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायदा’ भारतात प्रथमच संमत झाला, वापरात आला. जात, धर्म, पंथ, भाषा याच्या पलीकडे जाऊन काम करणार्‍या तरुण-तरुणींची संघटित फळी उभी राहिली. अनेकांनी आपल्या मुलामुलींची नावे अनिस, मुक्ता, गार्गी अशी ठेवली. अंनिसच्या कामामुळे महाराष्ट्राचे मन्वंतर, परिवर्तन घडते आहे. लोकविज्ञानाभिमुखता वाढते आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि सहकार्‍यांनी पहिल्या पंचवीस वर्षांत संघटनेची एक सैल शिस्त, लोकशाही कार्यशैली, उच्च दर्जाची नैतिक मूल्य जोपासना, समाजवादी संस्कार, पुरोगामी दृष्टी, कार्यकर्त्यांत मैत्रीची जोपासना, आंतरजातीय संघटन, आर्थिक शिस्त, परस्पर विश्वास, राजकीय जाणिवांचा विकास अशी अनेक वैशिष्ट्ये तयार केली.

डॉ. दाभोलकर यांचा धर्मांध, जातीयवादी, प्रतिगामी शक्तींकडून मारेकरी घालून खून झाल्यानंतर चळवळीवर अनुकूल, प्रतिकूल असे खोलवर परिणाम झाले. दाभोलकरांनंतर कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या खुनानंतर देशभरातले पुरोगामी लोक एकत्र आले. प्रक्षुब्ध, निर्भय बनले. “आम्ही सारे दाभोलकर, आम्ही सारे पानसरे” अशा घोषणा सुरू झाल्या. काठावरचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात संघटनेत सहभागी झाले. मुद्देसूद विचार मांडणारे वक्ते तयार झाले. समाजाचे संघटनेभोवतीचे संरक्षण, सहकार्य, हितचिंतनाचे कडे अधिक भकम बनले. जागतिक पातळीवर संघटनेचे, विचारांचे हितचिंतक तयार झाले, होत आहेत. ‘माणूस मारून विचार मारता येत नाहीत!’, हा विचार जगभर मान्यता पावतो आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जाण्याने संघटनेचे, विचाराचे, चळवळीचे न भरून निघणारे नुकसान झालेले आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही केवळ एक संघटना नाही. तो केवळ एक विचार नाही, “संपूर्ण समाजाला विज्ञानाच्या, विवेकवादाच्या तर्कशीलतेच्या अनुभवातून शिकण्याच्या मार्गावरून घेऊन जाणारा हा मानव वंशाचा विकास करणारा मानवमुक्तीचा पुरोगामी, क्रांतिकारी महाप्रवाह आहे!” हा प्रवाह दिवसेंदिवस अधिक बळकट, अधिक लांब-रुंद करण्यासाठी सर्वांनी झटले पाहिजे. ज्यांचे विचार अधिक सखोल, प्रगल्भ बनलेत त्यांनी समाजात अधिक कृतिशील, गतिमान होण्याची गरज आहे. संघटित कार्यकर्ते त्यांचे काम करत आहेतच; पण सर्व पक्ष, धर्म, भाषा, विभागातील जाणकारांनी, कलावंतांनी या समाज बदलाच्या कामात अधिक रस दाखविला पाहिजे.

जगातील कोणतेही विचार, तत्त्वज्ञान, धर्म, इतिहास, कथा हे सामान्य माणसांच्या विचार आणि कृती दिशेचे भाग बनवायचे असतील, खोल रुजवायचे असतील, तर वैचारिक, पारिभाषिक लेखनाचे महत्त्व आणि गरज आहेच. त्याचबरोबर ज्या चौसष्ट कला भारतीय संस्कृतीत वर्णिल्या जातात त्या सर्व कलांचा वापर योग्य, कलात्मक वापर विचार प्रसारासाठी जाणीवपूर्वक केला पाहिजे. आपल्या पूर्वजांनी तो तसा केला आहे. याची अनेक उदाहरणे देता येतील.

विचार मग तो चांगला वा वाईट असो, पुरोगामी वा प्रतिगामी असो, वैज्ञानिक वा अवैज्ञानिक असो, समाजहितैषी वा समाजविघातक असो, बहुजन हिताय असो वा नसो, तर्कशुद्ध वा तर्कहीन असो, तो समाजाच्या मनात रुजवायचा असेल, तर त्यासाठी कला जास्त उपयोगी ठरतात. हा इतिहासातला अनुभव आहे. भारतातली नऊ तत्त्वज्ञाने जगभर मान्यता पावलेली आहेत; त्यापैकी सात तत्त्वज्ञानांनी ईश्वराचे अस्तित्व नाकारले आहे. आस्तिक आणि नास्तिकांचा दर्जेदार विचारसंघर्ष जगाच्या अभ्यासाचा ठेवा आहे. वैदिक-अवैदिकांचा, आर्य-अनार्यांचा, ब्राह्मण-श्रमणांचा, भौतिक-आदिभौतिकांचा विचार संघर्ष हे भारताचे वैभव आहे. चारी वेदांनी तत्त्वज्ञान मांडत असतानाच ऋग्वेदातल्या पुरुष सूक्तात ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण, बाहूतून वैश्य, पोटातून आणि शूद्र पायातून तयार झाले, हा अवैज्ञानिक सिद्धांत मांडलाय. उच्च दर्जाच्या उपनिषदांनी यावर विचार संघर्ष हवा तसा केला नाही.

सगळी पुराणे, भगवद्गीता, ज्ञानेश्वरीसारख्या महाग्रंथांनी चातुर्वर्णाचा सिद्धांत, कर्मविपाकाचा सिद्धांत बळकट करण्यास हातभारच लावला. मनुस्मृतीने तर स्त्री-शूद्रातिशूद्रांच्या गुलामीचा दस्तऐवजच तयार केला. जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता वर्धनाच्या वातावरण निर्मितीला मदत केली. रामायण, महाभारत महाकाव्यांनी, साहित्यकृतींनी राम, कृष्ण हे दैवी महापुरुष जगभर पोचविले.

काव्य, नाटक, पथनाट्य, कादंबरी, कथा, गोष्टी, कहाण्या, लोकसाहित्य, लावणी, पोवाडे, नाट्यछटा, प्रहसने अशा विविध साहित्यकृतींनी आपापले विचार जनमानसात पेरले आहेत. संगीत, गायन, वतृत्व या कलांनी आपापले विषय लोकांच्या काळजात पेरले. स्त्रियांच्या गाण्यांनी त्यांचे कष्ट, दु:खे, आग्रह, संघर्ष जिवंत ठेवले. “राम, राम, राम म्हणं/राम हलक्या मनाचा/नाही सीतेच्या मोलाचा” अशा शब्दांत अस्सल भारतीय स्त्रीवादाची मांडणी केली. “त्यांचं पीठ आणि माझं पीठ एकत्र करून आम्ही आमचा संसार चवदार केला!” अशा शब्दांत लक्ष्मीबाई टिळकांनी संसारातला स्त्रियांचा सहभाग नोंदवला आहे. अंनिसने ‘शब्दसामर्थ्य’ विचारप्रसारासाठी चांगले वापरले आहे. पन्नासच्या जवळपास लहानमोठी पुस्तके समाजाला पुरविली आहेत.

‘शिल्पकला’ तर इतिहासाचे अस्सल दस्तऐवज ठरली आहे. अजंठा-वेरूळ लेणी, विविध मंदिरशिल्पे, खजुराहो येथील शिल्पे अभ्यास विषय ठरली आहेत. पुतळे, मूर्ती ही आपला काळ उभा करतात. जे.जे. च्या तरुण विद्यार्थ्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कबड्डीतील ‘हनुमान उडी’च्या रूपाने शिल्पनिर्मितीला स्वागतार्ह सुरुवात केली आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचा खडतर इतिहास शिल्परूपाने उभा करता आला, तर फारच चांगले होईल.

‘चित्रकले’चा वापर पुस्तकांच्या मुखपृष्ठांच्या रूपाने सुरू झाला. शब्द चित्र, शिल्प या सर्व कलांच्या आधारे ‘फ्रेंडस् ऑफ दाभोलकर’ हा ग्रुप आणि जे. जे.तील तरुण कलावंत यांनी केलेले यशस्वी प्रयत्न हा अंनिसच्या इतिहासातला मैलाचा दगड आहे. हे कलाकार प्रबोधनाचे पुढचे पाऊल आहे. विचारमित्रांनी निधी जमविणे, जे. जे. च्या तरुण प्रतिभासंपन्न कलावंतांनी वर्ष-दीड वर्ष अभ्यास आणि कष्ट करून अप्रतिम प्रदर्शन तयार करणे, हे फारच आनंददायी आहे. मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुण्याच्या दर्दी प्रेक्षकांनी प्रदर्शन डोक्यावर घेणे; सारेच कार्यकर्त्यांना बळ देणारे आहे. जनप्रबोधनाचा नवा आयाम उभा राहतो आहे. सांगलीत शाळांनी रांगा लावून मुला-मुलींना प्रदर्शन दाखविले आहे. सोळा वर्षांखालील नव्या चित्रकारांनी भरभरून चित्रे काढण्यात सहभाग दाखविला. २७८ बालबालिकांनी भाग घेतला. निमणी (ता. तासगाव) येथील चित्रकलेचे शिक्षक उपलब्ध नसलेल्या छोट्या माध्यमिक विद्यालयातील वडील वारलेल्या नववीतल्या मुलाने, ओम नंदकुमार कुंभार याने प्रथम क्रमांक पटकावला. समाजाला नवप्रबोधनाची भूक आहे. जनतळातून नवा समाज आकार घेतो आहे.

काम चांगले, प्रभावी, परिवर्तनवादी आहे. कार्यकर्ते, नेते, हितचिंतक प्रशंसेस पात्र आहेत; पण हे काम अपुरे आहे. कितीतरी वाढले पाहिजे. परिस्थिती भयावह आहे. अमावस्येच्या अंधार्‍या रात्री आपल्या हातात एक पेटलेली मेणबत्ती आहे. मशाली, पलिते पेटले पाहिजेत. आसमंत मानवी प्रकाशाने पेटले पाहिजे. एका आंतरराष्ट्रीय अभ्यासाप्रमाणे भारतात ९८ टके लोक आस्तिक आहेत. तक्रार अस्तिकतेविषयी नाही. धार्मिक आणि सांस्कृतिक कर्मकांडात ९१.४ टके पुरुष तर ९१.३ टक्के स्त्रिया गुंतल्या आहेत. चिकित्सा कोण करणार? तर्कविज्ञानाचे, विवेकवादाचे काय होणार? नोकरी उद्योगात सहभागी पुरुष ५७.३ टके आहेत, स्त्रिया केवळ १८.४ टके आहेत. शिक्षण क्षेत्रात २३.५ टके पुरुष, तर १९.८ टके स्त्रिया आहेत. हे चित्र बदलले पाहिजे. चळवळीत तरुण मुलींचे प्रमाण वाढले पाहिजे. काम अवघड, खडतर, जिकिरीचे आहे; पण अशक्य मुळीच नाही. ‘एका मूर्ख म्हातार्‍याने डोंगर हलविला होता.’ आपणाला फक्त जिवंत माणसांच्या विज्ञान जाणिवा विकसित करायच्या आहेत. उठा, चला निष्ठेने कामाला लागू या. उद्याचा सूर्य आपला आहे!

लेखक संपर्क : ९७६६३९६९९०


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]