नरेंद्र दाभोलकर : ऑरगॅनिक इंटेलेक्चुएल

सौरभ बागडे -

२० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली तेव्हा मी दहावीत होतो. या हत्येनंतरच मला दाभोलकरांचे नाव माहीत झाले. त्यांच्याविषयी टी.व्ही., वृत्तपत्रांमध्ये ऐकायला, वाचायला मिळत होते. आजूबाजूच्या दाभोलकरांविषयीच्या चर्चा ऐकायला मिळत होत्या. काहीजण म्हणत, भला माणूस होता म्हणून हळहळ व्यक्त करत होती, तर काहीजण धर्माच्या विरोधी माणूस मेला असं म्हणत होती. दहावीची परीक्षा संपल्यावर मी उमेश पान शॉप व स्वीट मार्ट येथे कामाला जाऊ लागलो. त्या दुकानात वेगवेगळ्या प्रकारची लोकं यायची, तिथेही चर्चा ऐकू यायची. तिथेच मला कळलं की, दाभोलकरांची मुलगी दापोलीतच राहते. थोडक्यात, हत्येची चर्चा समाजातील सर्व स्तरांत चालू होती. त्यामुळे दाभोलकर या व्यक्तीविषयी कुतूहल निर्माण झालं. त्यानंतर दाभोलकर वाचले, ऐकले त्यातून माझ्यात जे परिवर्तन झालं त्याविषयी…

उमेश पान शॉप व स्वीट मार्ट हे दापोलीतील फार गजबजलेलं दुकान. ते सकाळी आठला उघडायचे ते रात्री बाराला बंद व्हायचं. कोकणातील सरबतं, आंबे, काजू वगैरे प्रॉडक्टस् पण ठेवत असल्याने सुट्टीच्या हंगामात पर्यटकांची पण फार गर्दी असे. त्या दुकानाचे मालक मला म्हणाले, “तू जर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत येणार असशील तर तुला २५०० रुपये पगार देऊ आणि रात्री दुकान बंद होईपर्यंत थांबणार असशील तर ४५०० रुपये पगार देईन.” मला या सुट्टीच्या तीन महिन्यात कॉलेजची फी जमवायची होती. म्हणून मी पूर्णवेळ काम करायला लागलो. ही रकम माझ्यासाठी मोठी होती. या आधी मी पेपर वाटून, पापड-लोणची विकून, बागेला पाणी घालून आईला मदत करत असे. म्हणजे मी सहावीत असताना वडील वारल्यापासून मीच माझ्या शिक्षणाचा खर्च केला. अर्थात, वडील घरी काही मदत करत नसत. ते दारू पिऊन घरी भांडणे करत. आई जातीने मराठा होती तर वडील तथाकथित खालच्या-शिंपी जातीतील. तिने घरच्यांच्या संमतीविरुद्ध लग्न केल्याने माहेरची दारं बंद होती. मी कधी मामाकडे गेलो नाही आणि आम्ही भाड्याच्या घरात वेगळे राहात असल्याने वडिलांच्या नातेवाईकांचाही संपर्क केवळ सणासुदीला किंवा लग्नकार्यातच येत असे. मला भाऊ-बहीण खासकरून बहीण असावी असे वाटत असे, पण ती नव्हती तेच बरं! अशा परिस्थितीचा त्रास माझ्यापेक्षा बहिणीलाच झाला असता!

आई बी. ए. झालेली. तिने दोन-तीन खासगी शाळेत नोकरी केली होती. पण त्या वडिलांच्या ‘कृपे’मुळे सोडाव्या लागल्या. आमच्या इथे शाळेतील मुलं शिकवणीला येत. वडिलांची भांडणे सोडली तर घरचे वातावरण शांत असे. आई माझ्याकडून शाळेचा अभ्यास व्यवस्थित करून घेई. मुद्दामहून वतृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धांना पाठवत असे. तिने मला गोष्टीची पुस्तक वाचायला देऊन वाचनाची आवड लावली. आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत अवांतर पुस्तकं नव्हती, मात्र शाळेजवळच गजानन महाराजांच्या मंदिरात दुर्वांकुर नावाचे छोटेसे वाचनालय होत. तिथे आम्ही चार-पाच मित्र शाळा सुटल्यावर जात असू. तिथे लहान मुलांची मासिकं, रोजचे पेपर्स असत. आठवीला दापोलीच्या ए.जी. हायस्कूलमध्ये आलो. त्या शाळेचे मोठे वाचनालय होते. तिथे बोक्या सातबंडे, अरेबियन नाईटस्, श्यामची आई वगैरे गोष्टींची पुस्तकं वाचली. मला आठवतंय, आठवीला असताना शाळेच्या लायब्ररीची सर्वांत जास्त पुस्तकं वाचली म्हणून मला ५० रुपयांचे बक्षीस मिळाले होते. या पुस्तकांनीच वाचनाची गोडी निर्माण केली. वाचन आनंददायी बनवलं.

दहावीनंतर दापोलीत एन. के. वराडकर कॉलेजमध्ये अकरावीला प्रवेश घेतला. पैशाची गरज होतीच. म्हणून दिवसभर कॉलेज आणि संध्याकाळी ६ ते रात्री १२ उमेश पान शॉपमध्ये नोकरी करू लागलो. दहावीमुळे अवांतर वाचन बंद पडले होते, ते पुन्हा चालू केले. एकदा इंग्रजीचे सर तास चालू असताना वाचनाचे महत्त्व सांगत होते. तास संपल्यावर मी त्यांना म्हणाला, “मला डॉ. नरेंद्र दाभोलकरांची पुस्तकं वाचायची आहेत.” त्यांनी हुं करून म्हणाले, “अरे भालचंद्र नेमाडेंच्या ‘हिंदू’ला ज्ञानपीठ मिळाले आहे. ती कादंबरी वाच.” मी तेव्हा पहिल्यांदाच नेमाडे आणि ज्ञानपीठ असा काही पुरस्कार असतो हे वाचलं. कॉलेजच्या लायब्ररीतून ते जाडजूड पुस्तक घेतलं. त्याची भाषा भारी होती. आधी कधी अशा भाषेतील साहित्य वाचलं नव्हतं. इतकं मोठं पुस्तक मी पहिल्यांदाच वाचून पूर्ण केलं होतं. त्याचं एक मानसिक समाधान होतं. सरांना सांगितलं, ‘हिंदू’ वाचून पूर्ण केलं तर त्यांचा विश्वासच बसेना. ते पुस्तकाविषयी प्रश्न विचारू लागले. मी त्यांना पुस्तकाविषयी सांगू लागलो. परत मी नरेंद्र दाभोलकरांच्या पुस्तकांचा विषय काढला. पण त्यांनी दाभोलकरांच्या पुस्तकांविषयी बोलणे टाळले. कॉलेजची लायब्ररी समृद्ध होती. अगदी विश्रब्ध शारदेचे खंड ते वसंतराव तुळपुळेंनी अनुवादित केलेले दास कॅपिटलचे खंड लायब्ररीत होते. पण नरेंद्र दाभोलकरांची पुस्तकं तिथे काही दिसली नाहीत. मग मी शहरातील हरी केशव गोखले लायब्ररीत गेलो. तिथे दाभोलकरांची दोन-तीन पुस्तकं दिसली. ती वाचून काढली. दिवाळीत दापोलीत पुस्तकांचा सेल आला होता, तिथे सर्व पुस्तकं होती. दिवाळीच्या बोनसच्या पैशातून दाभोलकरांची सर्व पुस्तकं विकत घेतली. दाभोलकरांनी मनावरील अंधश्रद्धेची पुटं काढली. स्वतःकडे आणि समाजाकडे बघण्याचा चिकित्सक दृष्टिकोन दिला. तो दृष्टिकोन माझ्यासाठी पूर्णपणे नवा होता. प्रश्न विचारा सांगितलं. मी विचार करू लागलो. देवाधर्मावरील विश्वास कमी होत गेला. लोक बाबा-बुवाकडे का जातात, त्यांची फसवणूक कशी होते हे दाभोलकर समोरच्याला मूर्ख न लेखता करुणेच्या भावनेतून पोटतिडकीने समजावून सांगत होते. कॉलेजच्या लायब्ररीचा अनुभव बरा नव्हता, मात्र एका मित्रासोबत निराळाच अनुभव आला. रा. स्व. संघात जाणारा अभिजित नावाचा सिनिअर मित्र होता, त्याच्या मोबाईलमध्ये नवी गाणी असायची. मी त्याला गाणी ब्लू टूथने पाठव म्हणालो, त्याने चुकून डॉ. दाभोलकरांची दहा भाषणे पाठवली होती. तुझ्याकडे ही भाषणे आली कशी हे त्याला विचारायच्या भानगडीत पडलो नाही, पण मला त्याचं आजही आश्चर्य वाटतं. त्या भाषणांची अक्षरशः पारायणं केली.

डॉ. दाभोलकर वाचल्या-ऐकल्यानंतर विचार करण्याची दिशा बदलून गेली. वाचनाची दिशा बदलली. मी पूर्वी देवळात जात असे, ते देवळात जाणं आपोआप बंद झालं. सिनिअर कॉलेजमध्ये गेल्यानंतर डॉ. आंबेडकर ग्रंथालयात जाऊन अभ्यास करू लागलो. ते ग्रंथालय प्रशस्त होतं. ग्रंथपालाची अनावश्यक बडबड सोडली तर वातावरण पूर्ण शांत. अभ्यास, वाचन उत्तम व्हायचं. ग्रंथालयातून घरी. मग पुन्हा संध्याकाळी सहाला नोकरीवर जायचो. डॉ. दाभोलकरांच्या लेखनात सतत बुद्धिवाद, बुद्धिप्रामाण्यवाद शब्द यायचा. एकदा हरी केशव गोखले वाचनालयात ग्रंथनाम तालिका पाहात असताना मामा तोरडमलांनी अनुवादित केलेलं र. धों. कर्वेंचे बुद्धिप्रामाण्यवाद नावाचे पुस्तक दिसले, ते वाचून काढले. तेव्हा प्रथमच र. धों. चं नाव माहीत झालं. र.धों.चे गाव दापोली आणि मी देखील दापोलीकर असून इतकी वर्षे मला त्यांचे साधे नाव देखील माहीत नसावं याचं वाईट वाटलं. कर्वेंची शैली धारदार, तिखट! या मनुष्याने स्त्री-पुरुष समानता, लैगिक संबंध, संततीनियमन यांसारख्या चारचौघांतच काय तर खासगीत देखील न बोलायच्या समजल्या जाणार्‍या गोष्टीवर बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टिकोनातून प्रकाश टाकला होता. कर्वेंनी अतिरिक्त संतती आणि त्याचा स्त्रीच्या, कुटुंबाच्या आणि पर्यायाने देशाच्या आरोग्यावर होणार्‍या विपरीत परिणामांचे भेदक विश्लेषण केले होते आणि पत्नी-मालतीसोबत संततीनियमन केंद्र सुरू केलं होतं. र.धों. समाजसुधारणेच्या बाबतीत वडिलांच्या महर्षी कर्वेंच्याही दहा पावले पुढे होते. बहुधा त्यामुळेच जेव्हा महर्षी कर्वेंच्या कार्याला सामाजिक मान्यता प्राप्त झाल्यावर लोक र.धों.ना ‘सूर्या पोटी शनी’ म्हणू लागले. आज मात्र र.धों.च्या संततीनियमनाच्या विचारांना सामाजिक मान्यता मिळाली आहे.

डॉ. दाभोलकरांमुळे महाराष्ट्राच्या खणखणीत बुद्धिवादी परंपरेचा परिचय होत होता. म. फुलेंच्या ‘शेतकर्‍याच्या आसुडा’ने पुरोहितशाहीने शेतकर्‍याचे चालवलेले शोषण दाखवून डोळे उघडले. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशींनी म. फुलेंचे शेतकर्‍यांचा पहिला अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांच्या कार्याचे यथार्थ वर्णन केलं आहे. मात्र फुलेंचे कार्य समाजात आमूलाग्र परिवर्तन घडवणारे होते. लोकहितवादी आणि रानडे फुलेंचे समकालीन. लोकहितवादी जातीने ब्राह्मण होते. मात्र पेशवाई, पुरोहितशाहीने केलेल्या देशाच्या अवनतीबद्दल त्यांनी या व्यवस्थेवर ‘शतपत्रा’तून जहरी टीका केली. न्या. रानडेंनी बुद्धिवादाबरोबरच उदारमतवादाचा पाया रचला. आज आपण त्या पायावर इमारत बांधली की संकुचितच राहिलो हा प्रश्न अलाहिदा! तिरपागड्या पुरोगामी मंडळींकडून फुले-रानडे वादाचा उगाच बाऊ केला जातो. फुले-रानडे तुलना करून रानडेंना जाणीवपूर्वक खुजं दाखवलं जातं, हे चुकीचं आहे. याला तुलनात्मक अभ्यास म्हणत नाहीत. तुलनात्मक अभ्यासासाठी दोन व्यक्तींच्या कार्याचा काळ आणि त्या काळाच्या मर्यादा, बलस्थाने समजून घ्यावी लागतात, आताच्या संदर्भात काय लागू पडते, काय गैरलागू पडते हे उदारपणे पहावे लागते. आपली ना अभ्यासाची तयारी आहे, ना उदारपणे पाहण्याची, पण आपल्याला झटपट सोईचे निष्कर्ष काढण्याची हौस फार आहे. या वृत्तीने त्या महान व्यक्तीचे काहीच नुकसान होणार नसतं, ते त्यांचा काळ जगून गेलेले असतात. वर्तमानाला आपल्याला सामोरे जायचे त्यामुळे नुकसान होतं ते आपलंच! डॉ. दाभोलकरांच्या ठायी उदारमतवाद होता. त्यांना अनेक धमक्या येत असत, विरोधक कार्यक्रमात व्यत्यय आणत असत, खोटी बदनामी करत असत, तरी त्यांचा कधी तोल गेला नाही. आपल्या कार्यात असे प्रसंग येणारच याची त्यांनी मनाशी खूणगाठ बांधली होती. दाभोलकरांनी जरी अंधश्रद्धा निर्मूलन समिती काढली नसती तरी ते या उदारमतवादासाठी ग्रेट ठरले असते.

मी वाचनामुळे पुरोगामी विचारांचा झालो होतो. देवाधर्मावरून घरी, मित्रमंडळींसोबत खटके उडत असत. नंतर नंतर मी त्याविषयी फार बोलणे सोडून दिलं. खरे म्हणजे आजूबाजूला समविचारी कोणच नव्हतं. त्यामुळे मोकळेपणाने बोलण्याची पंचाईत होती. दाभोलकरांची मुलगी दापोलीत राहते म्हणून त्यांच्या घरचा पत्ता काढून तिथे गेलो तर कळलं की त्या दापोली सोडून मुंबईत राहायला गेल्या आहेत. हा काळ माझ्यासाठी फार अस्वस्थतेचा होता. पुढे काही तरी शिकलं पाहिजे. बी. कॉम. करून काही चांगलं काम मिळणार नाही आणि शिक्षणाशिवाय काही तरणोपाय नाही हे दिसून येत होतं. गिरीश कुबेर यांच्या प्रभावाखाली होतोच, त्यामुळे पत्रकारिता करावी असंही वाटत होतं. नेहरू-आंबेडकरांसारखे दिग्गज वकील होते म्हणून वकिली करावी असंही वाटत होतं. चळवळीविषयी प्रेम होतं म्हणून कार्यकर्ता व्हावं असंही वाटायचे. पण कार्यकर्त्याने आधी घर-संसाराकडे लक्ष द्यावे, असा दाभोलकरांचा सल्ला वाचला होताच. त्यामुळे कार्यकर्ता होण्याची वाट बंद झाली. चळवळ एकट्या-दुकट्या माणसावर चालत नाही. तिला कार्यकर्त्यांची नितांत गरज असते. मात्र, आपल्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झालेल्या माणसाला तू काम धंदे सोडून पूर्णवेळ चळवळ कर, असा दिशाभूल करणारा सल्ला दाभोलकरांनी कधीच दिला नाही. सांपत्तिक स्थितीकडे दुर्लक्ष करून तरुणवयातच पूर्णवेळ कार्यकर्ता झालेल्या सेवादल-पुरोगामी कार्यकर्त्यांच्या हलाखीची अनेक उदाहरणे आज दिसतात, कधी त्याचे उदात्तीकरण केलं जातं तर कधी आम्ही समाजासाठी इतके झटलो तरी आमच्या पदरी समाजाने काय दिलं, असा नाराजीचा सूरही लावला जातो. तेव्हा दाभोलकरांच्या सल्ल्याचे महत्त्व पटते. अंनिसच्या एकाही कार्यकर्त्यावर हलाखीची स्थिती आल्याचं उदाहरण दिसत नाही हा दाभोलकरांच्या नेतृत्वाचाच परिणाम!

मी समविचारी व्यक्तीच्या शोधात होतोच. लायब्ररीत आपण ज्या विचारांची पुस्तकं वाचतो ती वाचणारं किंवा सा. साधना वाचणारा कोणी दिसतो आहे का ते पहायचो. पण कोणीच दिसायचा नाही. एक दिवस रात्री दुकान बंद करत असताना दोन माणसं काहीतरी घ्यायला आली. त्याला दुकान मालकांनी विचारलं, “काय रे एवढ्या रात्री कुठून येताय?” ते म्हणाले, “अनिश शेठचा मुंबईतून फर्निचर आणायला गेलो होतो.” मी त्या माणसांना विचारलं, “अनिश शेठ म्हणजे अनिश पटवर्धन का?” ते हो म्हणाले. मग मी दुसर्‍याच दिवशी सकाळी अनिश काकांच्या घरी गेलो. पावसाचे दिवस होते. काका घरात लुंगी घालून बसले होते. त्यांनी घरात घेऊन कोण वगैरे विचारलं. मी रात्री कामाला जाऊन पुस्तक वाचतो, साधना वाचतो, याचं काकांना कौतुक वाटलं. मला त्या दिवशी समविचारी माणूस भेटल्याचे फार समाधान वाटलं. काका म्हणाले, “अश्विनी वैद्य नावाच्या बाई साधना वाचतात, अंनिसचे काम करतात, आपण त्यांना भेटायला जाऊ या.” अश्विनी काकी, आनंद काकांना माझं कौतुक वाटलं. मी आधी फक्त मराठी पुस्तकं वाचत होतो. अश्विनी काकी, आनंद काकांनी इंग्रजी पुस्तकं वाचण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यांच्याकडची पुस्तकं दिली. एकदा त्या ठाण्याला गेल्या असताना त्यांनी माझ्यासाठी खवशर एुलहरपसश नावाचं पुस्तक आणलं होतं. अनिश काका मुंबईतून पाच-सहा दिवसांसाठी दापोलीत यायचे. तेव्हा मला त्यांच्यासोबत फिरायला, रहायला, बोलायला खूप आवडायचं. काका माझ्यापेक्षा दुप्पट वयाने. त्यांची मुलगी मला एक वर्षाने लहान. पण मला काकाशी बोलताना कधीच वयाची अडचण आली नाही. मला तर ते माझ्यापेक्षा फक्त एक-दोन वर्षांनीच मोठे वाटतात. मागे मितवा-अनिश काकांची मुलगी म्हणत होती, “माझा बाबा माझ्यापेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम करतो. मला अश्विनी काकींचा धाक वाटतो, चुकलो तर त्या कान धरतात.” अश्विनी काकी, अनिश काकांनी माझ्यावर पुत्रवत प्रेम केलं. मी वयाने, आर्थिकदृष्ट्या फार लहान होतो तरी कधीच छोटेपणाची वागणूक दिली नाही. नेहमीच समतेने वागले. खूप मानसिक, आर्थिक, बौद्धिक आधार दिला. पुण्यात वकिलीचे शिक्षण घेऊ शकलो ते या दोघांच्या खमक्या आधारामुळेच! मागे मी हीनाकौसर खान या साधनेतल्या मैत्रिणीशी या सगळ्याविषयी बोलत होतो, तेव्हा ती म्हणाली, “आपल्यावर प्रेम करताना आंधळेपणा न करणारी माणसं लाभणे फार दुर्मीळ!” मला हीना ताईचं वाक्य फार खरं वाटतं. मला नेहमीच असं वाटतं की वाचनामुळे दाभोलकर सापडले, दाभोलकरांमुळे दिशा सापडली, अश्विनी काकी, अनिश काकांसारखी माणसं सापडली. चांगल्या पुस्तकांमुळे चांगली माणसं सापडतात असा माझा अनुभव आहे. जर मी दाभोलकर वाचले नसते तर आज छोटीशी नोकरी करत राहिलो असतो, नशिबाला दोष देत राहिलो असतो.

खरे तर दाभोलकरांमुळे माझ्यात जसं परिवर्तन झालं तसं परिवर्तन दाभोलकरांनी अनेकांच्या आयुष्यात घडवून आणले. ही माणसं समाजाच्या सर्व स्तरातील होती. आंतोनियो ग्राम्शी या इटालियन मार्क्सवादी विचारवंताने जीसरपळल Organic Intellectual ही संकल्पना मांडली आहे. ऑर्गनिक बुद्धिवंत व्यक्ती केवळ सैद्धांतिक मांडणी करणार नाही, तर ती प्रत्यक्षात तळागाळात जाऊन काम करेल. प्रत्यक्ष कामाचा अनुभव त्या व्यक्तीस असेल. व्यावहारिक कौशल्ये, तांत्रिक कौशल्ये सेंद्रिय बुद्धिवंतास अवगत असतील. हस्तिदंती मनोर्‍यातील सिद्धांताच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष कामात, चळवळीत सहभाग घेणारी ही व्यक्ती असेल. ही बुद्धिवंत व्यक्ती कार्यकर्ता आणि विचारवंत या दोहोंचे काम करेल. तिचे ज्ञान हे प्रत्यक्ष व्यवहार आणि सैद्धांतिक आकलन यातून निर्माण झालेले असेल, अशी ही संकल्पना आहे. अंनिसची चळवळ, चतु:सूत्री, ब्रीदवाक्य, काम करण्याची पद्धत यामुळे मला दाभोलकर खरेखुरे जीसरपळल Organic Intellectual वाटतात. आदर्श कार्यकर्ता, बुद्धिवंत कसा असावा याचा दाभोलकर वस्तुपाठ आहेत. दाभोलकरांच्या हत्येनंतर कार्यकर्ते, बुद्धिवाद्यांनी निषेध नोंदवताना ‘आम्ही सारे दाभोलकर’ असल्याची घोषणा दिली. दाभोलकरांच्या विचारांचे आहोत, हे सांगण्यासाठी ती घोषणा उत्तमच आहे. मला मात्र ही घोषणा देताना थोडी भीती वाटते. कारण दाभोलकर होणं फार अवघड आहे. त्यासाठी विशिष्ट ध्येयासाठी आख्खं आयुष्य खर्चावं लागतं. त्यामुळे मी दाभोलकरांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणणे योग्य वाटतं! धन्यवाद..!

– सौरभ बागडे

लेखक संपर्क : ७३५०७ ७३४२७


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ]