अनिल चव्हाण -
गणेशोत्सव जवळ आला, तशी लगबग वाढली. घरातल्या गणपतीची आरास कशी करावी, यावर वीरा आणि आदि हे दोघे चर्चा करू लागले; तर या वर्षी गौरीला शालू नेसवावा की साडी, यावर आई आणि काऊ एकमत करण्याच्या प्रयत्नाला लागल्या. मी आपला शंकरोबासारखा तटस्थपणे सर्व पाहत होतो. एवढ्यात, दारात सोटा आपटल्याचा आवाज आला आणि त्या पाठोपाठ सूर्याला गिळल्यासारखी एक धिप्पाड सावली दरवाजातून आत आली. हा होता गुंड्याभाऊ! त्याच्या मागोमाग डोक्याचा चंद्र झालेला एक किरकोळ इसमही आत आला.
“आई, आम्ही गणपती विसर्जनाबद्दल बोलायला आलोय.” गुंड्याभाऊने येण्याचे कारण सांगितले.
“हात मेल्या! अजून बाप्पांचे आगमनही झाले नाही आणि तू त्यांच्या विसर्जनाची चर्चा करतोस? तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही?”आईची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली.
“तसे नाही! एकदा बाप्पा आले की, कोणत्याही विषयावर बोलायला वेळ असत नाही. प्रत्येकजण कामात असतोय! तेव्हा म्हटलं, आधीचं धार्मिक प्रबोधन करावं. काय हो आप्पासाहेब, खरे ना?” सोबतच्या ‘चंद्रा’चा त्यांनी होकार घेतला.
आप्पासाहेबांनीही पृथ्वीभोवती फिरणार्या चंद्राप्रमाणे फेर धरला. त्यांचा आवाज गोड आणि मंजूळ होता. “त्याचं काय आहे आई! गणेश चतुर्थीला आपण गणेशमूर्ती घरी आणतो; मग प्राणप्रतिष्ठा, आरती, पूजा, नैवेद्य अशा कामांतून विचार करायला सवड मिळत नाही, म्हणून म्हटले धर्माचे ज्ञान आधीच द्यावे.”
“बरं बाबा! बोल!!” आईने परवानगी दिली.
पुन्हा त्यांच्या गळ्यातून गोड आवाज निघू लागला- “या काळात पृथ्वीवर गणेशतत्त्वात वाढ होते.”
“म्हणजे काय होते?” वीराचा प्रश्न!
“मुळात तत्त्व म्हणजे काय?” – आदिची शंका.
“सांगतो. वातावरणात प्रत्येक देवतेची तत्त्वे असतात. विशिष्ट काळात, विशिष्ट देवत्वात वाढ होते. आपण पूजा करतो, तेव्हा मूर्तीवर ‘पवित्रके’ जमा होतात. विसर्जनासाठी मूर्ती हलवतो, तेव्हा ही ‘पवित्रके’ पूजा करणार्यांना मिळतात. उरली-सुरली ‘पवित्रके’ विसर्जन केल्यावर पाण्यात मिसळतात, पाण्याबरोबर वाहत सर्वदूर जातात, वाफेबरोबर वातावरणात पसरतात. म्हणून मूर्ती वाहत्या पाण्यातच विसर्जित करावी, असे शास्त्र सांगते.”- गोड आवाज.
“आप्पासाहेब, असे धर्मशास्त्रात कुठेच सांगितलेले नाही.”- मी जाणीव करून दिली.
“पण काका, उरली-सुरली ‘पवित्रके’ जर पाण्यात मिसळत असतील, तर मूर्ती तलावात विसर्जित करणे फायद्याचे आहे. ‘पवित्रके’ इथेच राहतील ना! वाहत दूर नाहीत जाणार.” – आदि.
“हो, आणि घरच्या घरी टबात विसर्जित केले, तर सर्वच ‘पवित्रके’ आपल्याच घरी राहतील; आणि शिवाय नदी, तलावाचे पाणी प्रदूषणही टळेल.”- वीरा.
“मला मेलीला काय कळतंय? पण नदी, तलावात विसर्जनाला आता कायद्यानेच बंदी घातलीय ना?”- काऊ!
“हो, हो आई! या कोरोनानेही लोकांना शहाणे केलंय! आता ते स्वत:हूनच प्रदूषण टाळायला लागलेत! शब्दाच्या घरी तर गेल्या वर्षीपासून धातूचीच मूर्ती पूजतात.”- वीराने माहिती दिली.
“शब्दाच्याही घरी! म्हणजे?” – आदिला कुतूहल वाटले.
“अरे, शब्दा म्हणजे माझी मैत्रीण, अक्षराची बहीण!” वीरा म्हणाली.
“मग तुझ्या वर्गात अजून वाक्या, अनुस्वरा, प्रश्ना, उत्तरा, अशाही मुली आहेत काय?”- आदि टोचू लागला.
“आमच्या वर्गातल्या मुलींची नावे तुला कशाला हवीत? बाबांना सांगू काय?” वीराने तंबी भरली.
आदि नरमला.
“धातूची मूर्ती तर खूपच चांगली. जमा झालेली ‘पवित्रके’ पाण्यात आणि हवेत उडून जाणरच नाहीत. वर्षभर पुरवून पुरवून मिळतील.”- आदिने फायदे सांगितले.
“मूर्ती पार्थिवाची असावी आणि ती नंतर विसर्जित करावी, असे धर्मशास्त्र सांगते.” आप्पासाहेबांनी धर्माची साक्ष काढली.
“काका पार्थिवाची म्हणजे काय हो?” – वीराचा प्रश्न.
“पार्थिवाची म्हणजे पृथ्वी, जमीन, माती यांची. पूर्वी शेतातल्या मातीची मूर्ती केली जाई किंवा कुंभार नदीकाठच्या शाडूची मूर्ती करत. ती विसर्जित करायची म्हणजे पुन्हा पृथ्वीला द्यायची!” – आप्पासाहेबांनी खुलासा केला.
“मग आपणही आपल्या बागेतल्या मातीची मूर्ती करूया का?”- आदि.
“हो करू या! पण आपल्याला जमणार आहे का?”- वीरा.
“का नाही जमणार? आपण बैल आणि नागोबा करतोच ना? आणि ते बागेतच विसर्जित करतो.”- आदि.
“मग तर चालेल ना काका?” वीराने गुंड्याभाऊकडे विचारणा केली.
“कसे चालेल? विसर्जित मूर्ती वाहत्या पाण्यातच सोडली पाहिजे; नाहीतर आमच्या धार्मिक भावना दुखावतात.” आप्पासाहेबांनी ठेवणीतले अस्त्र काढले.
“काय म्हणताय? तुमच्या धार्मिक भावना दुखावतात? अहो काका, गणपती आमचा; आम्ही भक्ती करणार. ‘हा गणपती आमचा आहे,’ तुम्ही आम्हाला सांगणारे कोण? आमचा गणपती आम्ही वर्षभर पुजू, नाहीतर दोन दिवसांत विसर्जित करू. टबात विसर्जित करू, नाहीतर दान देऊ. तुम्हाला चोंबडेपणा करायचा अधिकार दिला कोणी?” आदिला संताप अनावर झाला.
“होय काका! आमच्या गणपतीवर अधिकार आमचा. आम्हालाही धर्म समजतोय बरं! आमच्या आजीला तुकारामाची गाथा तोंडपाठ आहे! तुम्हाला धर्माचा ठेका दिला कुणी? आमच्या इथे हे चालणार नाही.” – वीरानेही आदिला साथ दिली.
“अरे, मोठ्या माणसांशी असे बोलतात का?” – मी रागावलो.
“चुकले बाबा, पण आमची नम्र विनंती आहे. आमच्या मूर्तीचे काय करायचे, ते आमचे आम्हाला कळतेय; इतरांनी नाक खुपसू नये, एवढीच अपेक्षा आहे.”- वीराने खुलासा केला.
“मला मेलीला काय कळतंय? पण हे चांगलं आहे ना भावोजी. धातूची मूर्ती करता येते. मातीची किंवा शाडूची करता येते आणि घरच्या घरी टबात विसर्जित करता येते. आम्ही असे करू.”- काऊने निर्णय दिला.
“होय बरे काऊ, देव भावाचा भुकेला. मूर्ती महत्त्वाची नाही; भाव महत्त्वाचा.”- आई म्हणाली.
“थोडक्यात म्हणजे गणेश बुद्धीची देवता आहे; आपण सर्वांनी बुद्धी वापरली, तर प्रदूषण टाळूनही भक्ती करणे अवघड नाही. होय ना गुंड्याभाऊ?” मी म्हटले.
“ठीक आहे, तसेच करा!” इथे आप्पासाहेबांची डाळ शिजत नाही, म्हटल्यावर गुंड्याभाऊंनीही आसन सोडले आणि नव्या भाविकाच्या शोधात निघाले.
– अनिल चव्हाण, कोल्हापूर