मोहोळ येथे सत्यशोधकी विवाह : महाराष्ट्र अंनिसचा पुढाकार

धर्मराज चवरे -

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा मोहोळ येथे दि. 2 जुलै रोजी सत्यशोधक विवाह झाला. ‘महा. अंनिस’ शाखा मोहोळचे ज्येष्ठ कार्यकर्ते बिरमल शंकर खांडेकर व जयश्री बिरमल खांडेकर यांची कन्या भक्ती हिचा सत्यशोधक विवाह चांगदेव बालाजी रोडे व मंगल चांगदेव रोडे यांचे पुत्र मच्छिंद्र चांगदेव रोडे (रा. येठेवाडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांच्याशी झाला.

सत्यशोधक विवाहाचे प्रसारण ‘फेसबुक लाईव्ह’ करण्यात आले होते. ‘महा. अंनिस’चे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी ‘ऑनलाईन’ मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘सत्यशोधकी विवाहाचा वारसा ज्या महात्मा फुले यांनी दिला, त्यांचे प्रेरणादायी कार्य अनुसरण्याचा प्रयत्न करणार्‍या खांडेकर व रोडे कुटुंबीयांचे अभिनंदन करतो.’ त्यांना भक्ती व मच्छिंद्र यांना सदिच्छा दिल्या. सत्यशोधक विवाहाची भूमिका ‘महा. अंनिस’चे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सुधाकर काशीद यांनी मांडली. वधू – वराचा परिचय संजय भोसले यांनी करून दिला. वधू-वरास जिल्हा कार्याध्यक्ष धर्मराज चवरे यांनी शपथ दिली, तर राष्ट्रपिता जोतिराव फुले यांनी लिहिलेल्या मंगलष्टकांचे गायन संगीत विशारद डॉ. अण्णासाहेब सुरवसे यांनी केले. उपस्थितांचे आभार रमेश आदलिंगे यांनी मानले

या सत्यशोधक विवाहाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रमेश साठे यांनी केले. ‘फेसबुक लाइव्ह’ प्रसारण दीपक पारडे यांनी केले. वधू-वरास सदिच्छा देण्यासाठी अनिल कादे, राजन ढवण, रणजित थिटे, सुरेश पवार, राजेंद्र बारबोले उपस्थित होते. हा सत्यशोधक विवाह यशस्वी होण्यासाठी सीताराम कांबळे, प्रदीप माळी, महादेव सोनटक्के, नवनाथ साळी, नितीन चितारे, गणेश कांबळे, सुधाकर खंदारे, पोपट डोलारे, दत्ता खरात, मानाजी थोरात, नितीन देवकर यांनी परिश्रम घेतले.