राजीव देशपांडे -
एन. डी. सरांनी आपल्या वैयक्तिक, सामाजिक, राजकीय जीवनात आयुष्यभर वैज्ञानिक दृष्टिकोन जपला; तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार-प्रसार व्हावा, तो समाजात रुजावा, यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. त्यामुळेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुढील वर्षभर ‘प्रा. डॉ. एन. डी. पाटील वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला. या अभियनांतर्गत पुढील वर्षभर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांशी वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयी विविध प्रकारे संवाद साधून एन. डी. सरांच्या स्मृतींना अभिवादन करणार आहेत. या अभियानाचे उद्घाटन; तसेच एन. डी. सरांच्या नंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्ष झालेल्या सरोजताई पाटील यांचा सत्कार असा दुहेरी कार्यक्रम कोल्हापूर येथील जय हिंद को-ऑप. सोसायटीच्या सभागृहात दि. 3 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता.
कोरोनानंतर सुरळीत होत असलेल्या परिस्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच कार्यकर्ते महाराष्ट्रभरातून जमणार होते. त्यामुळे गेली महिनाभर चालू असलेली कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांची संयोजनव्यवस्थेची धावपळ शेवटच्या टप्प्यात आली होती. कोल्हापूर शहराच्या सीमेवर असलेल्या रुईकर वसाहतीतील जय हिंद को-ऑप. सोसायटीच्या सभागृहाचे स्टेज परिषदेच्या भव्य बॅनरने सजले होते. डोंबिवलीच्या उदय देशमुखांच्या चारही शहिदांच्या भावमुद्रा टिपणारे चित्रप्रदर्शन कार्यकर्ते उत्साहाने पाहत होते. 2 एप्रिलच्या रात्रीपासूनच नागपूर, वर्धा, नाशिकसारख्या दूरवरील जिल्ह्यांतून कार्यकर्ते पोचण्यास सुरुवात झाली होती. सकाळी कोल्हापूरच्या आसपासच्या जिल्ह्यांतील आणि कोल्हापुरातील कार्यकर्ते येऊन पोचू लागले, तर प्रशांत पोतदार सातार्याहून स्वत:च चालवत घेऊन आलेली ‘विज्ञानबोध वाहिनी’ची गाडी हॉलबाहेर सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेत होती. ती गाडी म्हणजे ‘सेल्फी पॉईंंट’च बनली होती. हॉलबाहेरील माणगावे सरांचे पोस्टर प्रदर्शन शिक्षक, कार्यकर्ते कुतुहलाने पाहत होते. कार्यकर्ते आणि शिक्षकांच्या नोंदणी टेबलावरच्या गर्दीबरोबरच हॉलबाहेरील पुस्तकांच्या स्टॉलभोवतीची गर्दीही वाढू लागली होती. कार्यकर्ते कोल्हापूरच्या चटकदार मिसळीची चव घेत सभागृहात येत होते, तोपर्यंत ‘अंनिस’च्या सांस्कृतिक विभागाच्या कार्यकर्त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाची गाणी सुरूही केली होती.
उद्घाटन सत्र
पुढील वर्षभर चालणारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ‘प्रा. डॉ. एन. डी. पाटील वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन अभियान’ हे आजच्या प्रतिकूल परिस्थितीत टाकलेले एक मोठं धाडसी पाऊल आहे. ः विवेक सावंत
बरोबर दहा वाजता ज्येष्ठ वैज्ञानिक, शिक्षणतज्ज्ञ व ‘एमकेसीएल’चे मुख्य मार्गदर्शक डॉ. विवेक सामंत यांनी ‘अंनिस’च्या अध्यक्ष सरोजताई पाटील, शैलाताई दाभोलकर व इतर ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह हॉलबाहेर उभ्या असलेल्या ‘विज्ञानबोध वाहिनी’ला हिरवा झेंडा दाखवून अभियानाचे उद्घाटन केले. या अभिनव पध्दतीने केलेल्या उद्घाटनानंतर ‘अंनिस’चे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विलासराव पोवार यांनी सर्वांचे स्वागत करताना ‘वैज्ञानिक जाणिवा अभियाना’ची सुरुवात शाहू राजांच्या नगरीतून केल्याबद्दल संघटनेचे आभार मानले व कोल्हापूर अजूनही शाहू राजांच्या विचारांचे शहर आहे, असा विश्वास दिला. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या सहसंपादक मुक्ता दाभोलकर यांनी परिषदेची पार्श्वभूमी स्पष्ट करणारे प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी डॉ. एन. डी. पाटील यांच्या कार्याचा जागर करण्यासाठी शाळांत वैज्ञानिक जाणिवा सदृढ होण्याचे अभियान ‘अंनिस’ सुरू करत असून मुलांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवायचा म्हणजे शिक्षकांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्त्यासारखा गावातील बाबाचा भांडाफोड करावा, अशी त्यांच्याकडून अजिबात अपेक्षा नसून विज्ञान, गणित, मराठी, सामाजिकशास्त्रे, खेळ असा कोणताही विषय शिकता-शिकवताना मुलांच्या शोधक वृत्तीचा आणि तर्कबुद्धीचा विकास करण्याचे भान यात अभिप्रेत आहे, असे प्रतिपादन केले.
विवेक सावंत यांचा परिचय प्रा. प्रवीण देशमुख यांनी करून दिला. त्यानंतर केलेल्या आपल्या उद्घाटनपर भाषणात विवेक सावंत म्हणाले, लोकशाहीचा इतिहास आपण काढून बघितला तर आपल्या लक्षात येईल की, कुठल्याही दोन लोकशाही राष्ट्रामध्ये गेल्या तीनशे वर्षांत युध्द झालेलं नाही. जी युद्धे होत आहेत, त्याच्या एका बाजूला लोकशाही असू शकेल आणि दुसर्या बाजूला एकाधिकारशाही किंवा दोन्ही बाजूला एकाधिकारशाही असू शकेल. परंतु जागतिक शांतता, गरिबी निर्मूलन या सगळ्यांसाठी अधिक चांगली लोकशाही आपल्याला कशी निर्माण करता येईल, त्यासाठी एक सजग समाज निर्माण करावा लागतो. पुढील वर्षभर चालणारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ‘प्रा. डॉ. एन. डी. पाटील वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन अभियान’ हे आजच्या प्रतिकूल परिस्थितीत त्या दिशेने टाकलेले एक मोठं धाडसी पाऊल आहे. त्यामुळेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या धाडसाचे मला मनापासून खूप कौतुक आहे, असे अभियानाची व्यापकता व अपेक्षा लक्षात आणून देणारे प्रतिपादन त्यांनी केले.(हे उद्घाटनाचे संपूर्ण भाषण आम्ही वार्तापत्रात तीन भागांत देत आहोत. ‘वैज्ञानिक दृष्टिकोनापुढील आव्हाने’ हा भाषणाचा पहिला भाग या अंकात इतरत्र देत आहोत.)
अण्णा कडलासकर यांनी गायलेल्या गाण्याने सुरू झालेल्या या सत्राचे सूत्रसंचालन धनंजय कोठावळे यांनी केले. स्टेजवरील सर्व पाहुण्यांचे स्वागत गणेश चिंचोले, रमेश वडगणेकर यांनी गुलाबपुष्प देऊन केले. बाळासाहेब मुल्ला यांनी उपस्थितांचे आभार मानल्यानंतर उद्घाटन सत्राची सांगता झाली.
परिसंवाद: शाळा मुलांच्या मनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कसा रुजवू शकते?
औपचारिक शिक्षणाबरोबर अनौपचारिक शिक्षणाने वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते ः परिसंवादातील वक्त्यांचे मत
कार्यक्रमाच्या दुसर्या सत्राच्या या परिसंवादात अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सहसंपादक, समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी सुरुवातीला वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी शाळा करत असलेले प्रयत्न आणि तज्ज्ञांनी सांगितलेले मार्ग यांचा ऊहापोह केला. शैक्षणिक साधने, प्रयोगशीलता, प्रकल्प पद्धत, कृतियुक्त शिक्षण, यातून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते. वारकरी संतांच्या अभंगांतील वैज्ञानिक विचार, फुले-शाहू-आंबेडकर, गाडगेबाबा यांच्या जीवनातील वैज्ञानिक विचारांचे प्रसंग आणि त्यांचे विचार; तसेच सामाजिक क्षेत्रातील दाभोलकर-पानसरे यांचे कार्य आणि विचार, विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याची गरज त्यांनी उदाहरणाने स्पष्ट केली. ‘अंनिस’ने घेतलेली शिक्षक शिबिरे, गीते पाठांतर, कथालेखन, विविध उपक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे नियमित वाचन, अशा मार्गांनी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल, असा विश्वास त्यांनी दिला. अंधश्रद्धा केवळ धार्मिक आहेत, असे नाही, त्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीयही असतात. धर्मांधांनी पसरवलेल्या सामाजिक अंधश्रद्धा दूर केल्या पाहिजेत असे प्रतिपादन करत त्यांनी आपले भाषण संपविले.
त्यानंतर नाशिक येथील आनंदनिकेतन शाळेच्या दीपा पळशीकर परिसंवादात अनुभव मांडताना म्हणाल्या, वैज्ञानिक दृष्टिकोन हा वर्तनाचा विषय आहे; भाषणाचा नव्हे. विद्यार्थ्यांना विविध वैज्ञानिक प्रयोग करून दाखवल्यास त्यांच्यामध्ये वैज्ञानिक जाणिवा रुजतात. ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ हा शिक्षणाचा महत्त्वाचा गाभाघटक आहे. मुलांना निरीक्षण करून मत बनवायला प्रेरित करायला हवे. क्षेत्रभेटीतून मुलांना बर्याच गोष्टी प्रत्यक्ष पाहून, समजून घेता येतात व त्यातूनच त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास होतो, असे मत आपल्या शाळेत करत असलेल्या अनेक प्रयोगांचे दाखले देत दीपा पळशीकर यांनी व्यक्त केले.
परिसंवादाचे अध्यक्ष ‘अंनिस’चे ज्येष्ठ कार्यकर्ते सुकुमार मंडपे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि धर्म याचा कोणताही संबंध नसल्याचे सांगत वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल बोलताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक कोणत्याही ठराविक धर्माबद्दल बोलत नाहीत; पण आमच्याकडे त्या दृष्टीनेच बघितले जाते. असे असले तरी रयत शिक्षण संस्थेतील शाळांतून वेगवेगळे प्रयोग करत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचा कसा प्रयत्न केला, याचे विवेचन केले.
या परिसंवादाचे सूत्रसंचालन ‘वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प’ या विभागाच्या सदस्य सुजाता म्हेत्रे यांनी केले. वक्त्यांचा परिचय व्ही. टी. जाधव, प्रशांत पोतदार आणि विनोद वायंगणकर यांनी करून दिला. संजय अरदाळकर आणि प्रकाश मेटकर यांनी वक्त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
मअंनिसच्या राज अध्यक्ष सरोजमाई पाटील सत्कार सोहळा
सत्कार सोहळ्याची सुरुवात डॉ. हमीद दाभोलकर यांनी केलेल्या प्रास्ताविकाने झाली. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी एन. डी. सरांनंतर सरोजमाई महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्ष झाल्या, म्हणून योजिलेला हा सत्कार सोहळा नसून त्यांनी हे अध्यक्षपद स्वीकारण्यास संमती दिली, याबद्दलचा ‘अंनिस’च्या महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेल्या कार्यकर्त्यांकडून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेला हा कृतज्ञता सोहळा असल्याचे सांगितले. प्रास्ताविकानंतर सरोजमाईंना द्यावयाच्या प्रा. टी. एस. पाटील यांनी लिहिलेल्या मानपत्राचे वाचन प्रमोदिनी मंडपे यांनी केले. (हे मानपत्र वार्तापत्रात इतरत्र छापलेले आहे.) त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या हस्ते मानपत्र, ‘अंनिस’ची पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन सरोजमाईंचा सत्कार करण्यात आला.
मान्यवरांच्या मनोगतात सुरुवातीला अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सल्लागार-संपादक प्रा. प. रा. आर्डे यांनी आपल्या भाषणात सरोजमाईंच्या गौरवशाली शैक्षणिक कार्याची माहिती दिली; तर सामाजिक कार्यकर्त्या डॉ. मेधा पानसरे यांनी आजच्या अतिशय कठीण व आव्हानात्मक सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीला ही आव्हाने स्वीकारत पुढे जाण्यासाठी सरोजमाईंच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शन, आधार निश्चितपणे मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
कोल्हापूरच्या कार्यकर्त्या सीमाताई पाटील यांनी माईंच्या सहवासात असताना त्यांना जाणवलेल्या माईंच्या व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे आपल्या भाषणातून उघड केले. त्यांनी सरोजमाईंच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना जणू एखाद्या लेकीने आपल्या आईबद्दल व्यक्त कराव्यात, अशाच होत्या. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र ट्रस्टचे सचिव दीपक गिरमे यांनी ट्रस्टच्या वतीने सरोजमाईंनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल कृतज्ञता व आभार व्यक्त केले.
“देशात सध्या नोट, व्होट बँकेसाठी अधर्माचे राजकारण सुरू आहे. धर्म स्वीकारावा यासाठी आमिषे घेऊन फौजा तयार आहेत. देशाला खड्ड्यात घालण्यासाठी धर्मांध शक्ती तयारीत आहेत. कोरोना काळात ग्रामीण भागात आदिवासी पाड्यांत मुलाच्या शिक्षणाचे ‘ऑनलाईन’मुळे खूपच नुकसान झाले, अनेकांच्या नोकर्या गेल्या, अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली, खरे बोलणारे साथी जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत, पर्यावरणातील अंधश्रद्धा आव्हान बनत आहे. तसेच ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ अशा घोषणांच्या गदारोळात महिलांवरील अत्याचार थांबलेले नाहीत. अशा काळात विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीपुढील मोठे आव्हान आहे. परंतु सरोजमाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्वीकारेल व नक्की पार पाडेल,” असा विश्वास ‘नर्मदा बचाव’च्या नेत्या मेधा पाटकर यांनी सरोजमाईंचा सत्कार झाल्यानंतर केलेल्या भाषणात व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना सरोजमाई पाटील म्हणाल्या, “प्रा. एन. डी. पाटील, डॉ. दाभोलकर ही उत्तुंग व्यक्तिमत्त्वे होती, त्यांची कोणांशीच तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी भूषविलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेणे म्हणजे खूपच जबाबदारीचे काम आहे. माझ्या दृष्टीने ते शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे; पण तुम्हा कार्यकर्त्यांच्या बळावर मी ते निश्चितपणे पार पाडेन.” असा विश्वास व्यक्त करून आपल्या भाषणात त्यांनी मुंबईच्या झोपडपट्टीतील ज्या शाळेला तबेला, गोठा, गुंडांची शाळा असे संबोधले जात होते, त्या शाळेत आपण शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना त्यात बदल घडवून आणत त्या शाळेचे रूपांतर एका आनंदी शाळेत कसे केले, हे सांगून त्या म्हणाल्या, “कोणतेही मूल टाकाऊ नसते. ते मूल बुद्धिमत्तेचे लेणे लेऊनच जन्माला आलेले असते. त्या मुलांमधील सुप्त गुण ओळखून त्या मुलांमधील गुणात्मक, मूल्यात्मक दृष्टी विकसित करण्याचे काम शिक्षकाचे असते.” त्यानंतर या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. शैलाताई दाभोलकर अध्यक्षीय मनोगतात सरोजमाईंनी ‘अंनिस’चे अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना म्हणाल्या, “शहाणपणाच्या छोट्या-छोट्या गोष्टींतून आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनाचे बीज समाजात रुजवायचे आहे, जे जमिनीतून येणार्या पिकाप्रमाणे तरारून येईल आणि हे करण्याची क्षमता आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडे निश्चितच आहे.”
कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी गायलेल्या गाण्याने सुरू झालेल्या या सत्कार सोहळ्याच्या सत्राचे सूत्रसंचालन फारुख गवंडी यांनी केले. पाहुण्यांचे व स्टेजवरील उपस्थितांचे स्वागत अरविंद पाखले, संजय सुळगावे, संजय कळके आणि विनायक चव्हाण यांनी केले. आभार राहुल थोरात यांनी मानल्यानंतर सर्वांनी हातात हात घालून म्हटलेल्या ‘हम होंगे कामयाब…’ या गाण्याने दिवसभराच्या परिषदेची व सत्कार सोहळ्याची उत्साही सांगता झाली.
या परिषदेला सहकार्य करणार्या देणगीदारांचे मनःपूर्वक आभार..!
1) धोंडीराम रेडेकर 2) आर्कि. सुनिल पाटील 3) एम. बी. शेख 4) सरोजमाई पाटील
5) सुनिल कदम 6) मार्टिना विल्सन 7) एम. के. बाड 8) व्ही. बी. पाटील
9) गोकुळ दुध संघ सर्व कोल्हापूर