राजीव देशपांडे -
गेल्या दोन वर्षांत लाखो लोकांचा बळी घेत, अनेकांचा रोजगार, व्यवसाय उद्ध्वस्त करत कोरोना परिस्थिती जसजशी पूर्वपदावर येऊ लागली. लोकांच्या बोलण्यातून ‘ऑक्सिजन’, ‘हॉस्पिटल’ शब्द विरून गेले, त्यांची जागा ‘मंदिर-मशीद’, ‘ईडी-सीबीआय’ छापे, ‘बुलडोझर’ यांनी घेतली. रुग्णवाहिकेच्या सायरनऐवजी मशिदीवरच्या भोंग्याबरोबर ‘हनुमान चालिसा’ही ऐकू यायला लागली. सण-समारंभ, सभा-संमेलने, जत्रा-यात्रा, मिरवणुका नव्या उत्साहाने साजर्या होऊ लागल्या; आणि त्याचबरोबर सणांच्या निमित्ताने होणार्या मिरवणुका, त्यावरील दगडफेक, त्यामुळे उसळणारे दंगे त्यावरील पोलिसी कारवाया हे सर्व ‘नित्यनेमाने’ चालू झाले. या सगळ्या सामाजिक, राजकीय, आर्थिक पातळीवरील निराशाजनक पार्श्वभूमीवर एक आशादायक घटना घडली, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांनी अनिष्ट विधवा प्रथा बंद करण्याबाबतचा ठराव आपणहून सर्वप्रथम केला तेव्हा! त्यांचा कित्ता गिरवीत कोल्हापूर जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांनी घेतलेल्या अस्पृश्यताविरोधी परिषदेमुळे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेल्या माणगावानेही अनिष्ट विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव करत यापुढे गावातील कोणत्याही स्त्रीला वैधव्याच्या वेदनादायी अनिष्ट कर्मकांडांना सामोरे जावे लागणार नाही याची खात्री दिली आणि हाच धागा पकडत महाराष्ट्र शासनानेही धोरणात्मक निर्णय घेत अनिष्ट विधवा प्रथेच्या बंदीला शासकीय कार्यक्रमाचे स्वरूप दिले. या सर्व ग्रामस्थांचे व शासनाचे याबद्दल अभिनंदन करावे तितके थोडे आहे.
विधवा बाईला संपूर्ण सामाजिक, धार्मिक, कौटुंबिक व्यवहारातून बहिष्कृत करण्यार्या प्रथांविरोधात महात्मा फुले, महर्षी कर्वे यांच्यासारख्या समाजसुधारकांनी विधवांसाठी शिक्षण, व्यवसाय, विधवा विवाह याद्वारे प्रयत्न केले, काही प्रमाणात ते यशस्वीही झाले. पण आपला जोडीदार गेल्यावर दुखा:तून सावरण्याआधीच तिच्या बांगड्या फोडणे, मंगळसूत्र तोडणे, कुंकू पुसणे तसेच तिच्या राहण्या-जेवण्या-दिसण्यासारख्या गोष्टीत तिच्या सणा-समारंभात सहभागी होण्यासंदर्भात तिला दूर ठेवणार्या, तिची मानहानी करणार्या प्रथा मात्र आजही चालू आहेत. त्या प्रथांविरोधात जाण्याचा ग्रामस्थांनी केलेला निर्धार आणि सरकारने त्याला दिलेला प्रतिसाद आजच्या परिस्थितीत खूपच कौतुकास्पद आहे.
असे ठराव ग्रामपंचायतीने करावेत, यासाठी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील महात्मा फुले समाज सेवा मंडळाचे प्रमोद झिंजाडे यांनी कोविड महामारीच्या आधीपासूनच काम चालू केले होते. जेव्हा आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी सामाजिक जीवनातून एकदम लुप्त झाल्याचे त्यांच्या लक्षात आले, तेव्हा हे बदलले पाहिजे असे त्यांना प्रकर्षाने वाटू लागले व त्यांनी या संदर्भात अनेक पुरुषांशी बोलणे चालू केले, तेव्हा ते सांगत, ‘आम्ही गेल्यावर आमच्या बायकांनाही अशाच परिस्थितीला तोंड द्यावे लागेल.’ आपल्या मृत्यूनंतर पत्नीला या प्रथांचा त्रास होता कामा नये म्हणून त्यांनी स्वत: 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर कायदेशीर करार केला व हा बदल तळापासून झाला पाहिजे, यासाठी गावागावांतील सरपंचांशी संपर्क साधणे चालू केले व त्याला पहिले यश हेरवाड ग्रामपंचायतीत मिळाले. 31 मे रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे हेरवाड आणि माणगाव या दोन्ही गावांचा सत्यशोधक केशवराव विचारे स्मरणार्थ सामाजिक प्रेरणा पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. त्याचवेळेस या अनिष्ट प्रथेला मूठमाती देण्यासाठी ज्या प्रमोद झिंजाडे यांनी प्रयत्न केले, त्यांचाही सत्कार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे करण्यात येणार आहे. परंतु महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती फक्त पुरस्कार देऊनच थांबणार नसून विधवांना समान हक्क व अधिकार प्रत्यक्षात कसे मिळतील, याबाबतही निश्चितच प्रयत्नशील राहील.