अॅड. अतुल अल्मेडा -
“ज्याने माणसाचे सर्वोच्च कल्याण होते तो नीतीचा धर्म म्हणजे सेक्युलॅरिझम.” – जॉर्ज जेकब होलिओक
आपले पंतप्रधान मोदी जाहीरपणे म्हणाले, “आपले भारतीय संविधान हाच आपला पवित्र ग्रंथ.” मात्र, संविधानाचा योग्य सन्मान तेवढ्याच जाहीरपणे करताना ते दिसत नाहीत.
१. प्रत्येक व्यक्तीला, समूहाला आपला धर्म आदर्श वाटतो. आपला धर्म तेवढा खरा, बाकीचे धर्म काही बरोबर नाहीत. विशेष म्हणजे सुशिक्षित असो वा अडाणी असो, दोघांना आपला धर्म आदर्श व खरा वाटतो. कारण, धर्माचा सखोल अभ्यास त्यांनी केलेला नसतो ना कधीही नि:पक्षपाती आपल्या धर्माची चिकित्सा केली. तरीही आई-वडिलांनी दिलेल्या श्रद्धेमुळे व समाजाने पाळलेल्या कर्मकांडे व रूढी-परंपरेमुळे प्रत्येकाला आपला धर्म आदर्श वाटतो, खरा वाटतो व इतर धर्मांपेक्षा आपला धर्म श्रेष्ठ वाटतो. याकरिता विचारवंत नरहर कुरुंदकर म्हणतात, “माझी अशी श्रद्धा आहे की, बहुतेक लोक धार्मिक आहेत, याचे कारण त्यांनी धार्मिक वाङ्मय वाचलेले नाही.”
२. माणसाला धर्म, जात व श्रद्धा जन्मामुळे प्राप्त होतात. त्या उपजत नसतात. उपजत असते बुद्धी, विचार करण्याची शक्ती व भावना. प्रेम हे उपजत भावनेचे लक्षण आहे. द्वेष ही जाणूनबुजून विकसित केलेली भावना असते. याकरिता वयात आलेल्या प्रत्येक विचारी किंवा समंजस माणसाने धर्म, जात व श्रद्धा अभ्यास करून नाकारल्या पाहिजेत; पण तसे होताना दिसत नाही. ” Religion is regarded by the common people as true, by the wise as false and by the rulers as useful.” -Seneca
तर ‘All religion have been made by men’ हे सम्राट नेपोलियन बोनापार्टचे वाक्य सुप्रसिद्ध आहे.
३. जो धर्म लोकांना आपला वाटतो त्याच धर्मामुळे जगाच्या इतिहासात नोंद असलेल्या चौदा हजारांहून अधिक युद्धांपैकी ८० टके युद्धे धर्माच्या नावाने झाली आहेत. एवढेच कशाला, हिंदुस्थानचे दोन तुकडे होऊन ७५ वर्षे होत आली, तरी आपण शेजारी युद्धाच्या तयारीत आहोत. ज्यांनी ज्यांनी धर्म आदर्श खरा की खोटा, धर्म समाजाची धारणा की समाजाला विनाशाकडे नेणारा अशी चिकित्सा करण्याचे, प्रबोधन करण्याचे ठरविले, त्या धर्मसुधारकांचे व मानवतावादी चळवळ करणार्यांचे खून भूतकाळात युरोपात झाले, तर आज पुरोगामी महाराष्ट्रात झाले म्हणजेच धर्माचे भूत धर्माभिमानाच्या मानगुटीवर किती घट्ट बसले आहे, कल्पनाही करवत नाही. जगातील धर्माविषयी तत्त्वज्ञानी बेनेदिक्टर स्पिनोझा म्हणतो, ‘धर्मसत्तेचे उद्दिष्ट सत्यदर्शन नसून आज्ञापालनाची सक्ती असते.’ मग आदर्श धर्म कोणता? यक्ष प्रश्न या संकल्पनेला भारतीय विचार परंपरेमध्ये फार महत्त्व आहे. ज्या प्रश्नांमध्ये अनेक गोष्टींची व्यामिश्रता सामावलेली असते, अशा प्रश्नांचे उत्तर भावनेच्या आहारी न जाता, फक्त उपयुक्ततावादाच्या दृष्टीने न पाहता बुद्धीच्या/तर्काच्या कसोटीवर अतिशय संयमाने शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणून पाहता येते. महाभारताच्या वनपर्वात धर्मराज आणि यक्ष यांच्या संवादात धर्म म्हणजे काय? थोर पुरुष ज्या मार्गाने जातात, तोच मार्ग इतरांनी अनुसरावा व त्यालाच धर्म मानावे असे यक्ष सांगतो. मात्र थोर पुरुष परस्पर भिन्न विचार मांडत असतील, तर धर्म कोणता मानावा हा प्रश्न शिल्लक राहतो. यावर धर्माचे उत्तर “तो मार्ग विवेकाचा आहे.”
४. आपल्या देशातील काय किंवा जगातील काय, सर्वच धर्म कर्मकांडी धर्म आहेत. नीतीचा आणि धर्माचा काही संबंध दिसत नाही. अलीकडील धर्माचे पेव म्हणजे बिना गुंतवणुकीचा पण शंभर टके फायदा व्यवसाय आहेत. आपल्या भारत सरकारजवळ ३०० टन सोने आहे, तर आपल्या भारतातील मंदिरात ३०,००० टन म्हणजे जवळजवळ १०० पट सोने आहे, असे समजते. देश गरीब, नागरिक गरीब, भक्त गरीब; पण देव धनवंत! गंमत आहे ना?
५. स्वामी विवेकानंद हे आपल्या भारतीयांचे जागतिक किर्तीचे आध्यत्मिक महापुरुष! विवेकानंद सांगतात, “हिंदूंनी स्वत:चा धर्म श्रेष्ठ मानू नये. दुसर्या धर्माला कमी लेखू नये. स्वत:च्या धर्माबद्दल गर्व बाळगण्यात शहाणपणा नव्हे. तसे करणे म्हणजे ईश्वरनिंदाच होय. माझे गुरू श्री. रामकृष्ण परमहंस यांनी सर्व धर्म सत्य आहेत, हे स्वीकारले होते.” दुसर्या विश्व परिषदेनंतर ख्रिस्ती धर्माधिकारी सुद्धा ख्रिस्ती धर्मच श्रेष्ठ न मानता इतर धर्मातूनही मुक्तता मिळू शकते, हे मान्य करतात. देवाची किंवा धर्माची निर्मिती मनुष्य नीतिमान व्हावा म्हणून झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात धर्मामुळे मानून नीतिमान न होता असहिष्णू झाला आहे. सर्व धर्म एकाच सुरात सांगतात, माणसाने माणसांवर प्रेम करावे, हा खरा धर्म आहे; पण दोन भिन्न धर्मातील लोक हा संदेश पाळत नाहीत.
६. धार्मिक वेडेपणाचा कळस म्हणजे ११ सप्टेंबर २००१ ला अमेरिकेच्या ट्रेड सेंटरवर झालेला हल्ला. त्या धक्क्याने संपूर्ण जग भयभीत झाले, नव्हे तर खडबडून जागे झाले. या हल्ल्यामुळे सार्या जगाच्या शांततेला झालेला धक्का स्पष्ट दिसू लागला व त्याचबरोबर शांततेचे महत्त्वसुद्धा लोकांना समजले आणि शांतीभंग कशामुळे होते, याच्या मुळाशी जायला पाहिजे, असे शांतीचे उपासक असलेल्या जागतिक कीर्तीच्या लोकांना वाटू लागले. त्यातूनच निर्माण झालं, ‘सिनारिओ प्लॅनिंग’ म्हणून एक तंत्र. या तंत्रानुसार राजकीय, सामाजिक, धार्मिक बाबींचे विश्लेषण करून भविष्यात काय होईल, कसे थांबविता येईल या संबंधी अंदाज वर्तविण्याचे ठरविले. जागतिक आघाडीवर शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून या तत्त्वानुसार कार्य करणारी संस्था, १ जानेवारी २००२ रोजी ‘स्ट्रॅटेजिक फोरसाईट’ ग्रुप नावाने सुरू झाली आहे. प्रणेते आहेत शांततेचे उपासक आपले भारतीय नागरिक संदीप वासलेकर.
७. आपण सर्व जण दिवाळी, होळी, ईद, इस्टर आणि नाताळ हे सण आनंदाने, उत्साहाने साजरे करतो; पण सर्व धर्मांचे सण आणि लोक भारतीय नागरिकांमध्ये फरक करतात, तफावत करतात. धर्म माणसाला भेद करायला शिकवतो; पण आपले संविधान भारतीय नागरिकत्वाच्या दोन व्यक्तींमध्ये कुठलाच भेद मान्य करत नाही. मग ते कुठल्याही धर्माचे, पंथाचे, जातीचे असोत. समानतेचा, बंधुतेचा व अनमोल स्वातंत्र्याचा संदेश देणारे व तशी समानता व बंधुता निर्माण करणारे संविधान आपला ग्रंथ होणे मानवतावादी दृष्टिकोनातून गरजेचे नव्हे, तर आवश्यक. म्हणूनच आपले पंतप्रधान मोदी म्हणतात, “आपले संविधान आपला पवित्र ग्रंथ आहे.” अशा या मानवतावादी संविधानाचा उत्सव व आपण कधी साजरा करणार? माझा असा विश्वास आहे की, घटनेतील तरतुदीचा जर भारतीयांनी जागृतपणे, विवेकाने पालन केले, तर नीतिमान होण्यासाठी त्याला इतर कुठल्याही ग्रंथाची व देवाची गरज भासणार नाही. मी एक भारतीय नागरिक म्हणून जीवन जगणे श्रेष्ठ मानतो. त्यामुळे जरी मी जन्माने ख्रिस्ती असलो, तरी मरताना भारतीय नागरिक म्हणून मरण्यात मला गौरव आहे. कारण, भारतीय संस्कृती मानवतावादी आहे. वरील सर्व बाबींवरून आता वेळ आली आहे विचार करण्याची. आदर्श धर्म कोणता व आदर्श धर्मग्रंथ कोणता आणि याचे उत्तर पंतप्रधानांनी स्पष्टपणे दिलेले आहे, जे सुरुवातीलाच नोंदविले आहे. आपले संविधान पाप-पुण्य, पवित्र-अपवित्र संकल्पना मानत नाही. धर्म सांगते तो मानवता, तर न्याय (Just) अन्याय (Unjust) यावर आधारलेले आहे. आपले संविधान आध्यात्मिक आहे. संविधान राष्ट्रवादी नाही, तर मानवतावादी आहे. आपल्या संविधानात धर्म आहे; पण तो मानवतावादी. इतर धर्मात सौदा आहे, तर आध्यात्मिक हा मानवतेकडे जाणारा प्रवास आहे.
८. आम्हा भारतीयांचा आदर्श धर्मग्रंथ म्हणजे आपल्या देशाची घटना किंवा संविधान जगातल्या सर्व मानवतावादी राष्ट्राच्या घटना अभ्यासून, भारतीय विविधतेचे सखोल अवलोकन करून स्वातंत्र्यानंतर आपण स्वत:हून विवेकपूर्ण विचार करून आपली घटना स्वीकारली आहे. माजी मुख्य न्यायमूर्ती एस. आर. दास यांनी असे नमूद केले आहे की, ‘भारतीय लोकांनी संविधान स्वत: प्रत अर्पण केलंय. ते काही एखाद्या विशिष्ट समूह, गटाला दिलेले नाही. आपल्या सर्वांना ते दिलंय म्हणून संविधान सर्व अल्पसंख्याकांना सुरक्षा देते, तसे बहुसंख्याकांनाही संरक्षण प्रदान करते. मूलभूत हकानुसार आपण आपल्या विवेकी जबाबदारीचा सन्मान केला पाहिजे. जी जबाबदारी आहे, अल्पसंख्याक समुदायांच्या संरक्षणाची, न्यायालयाचीही ती जबाबदारी आहे.’
९. आपल्या घटनेने नागरिक म्हणून आपल्याला बहाल केलेल्या धार्मिक हकांचा सारांश पुढीलप्रमाणे –
(१) भारतातील कोणत्याही व्यक्तीला तिला योग्य वाटणार्या उपासनेचा, धर्मपालनाच्या आध्यात्मिक उन्नतीचा पूर्ण हक आहे.
(२) व्यक्तीव्यक्तींमध्ये धर्माच्या नावावर राजकीय व सामाजिक जीवनात भेदभाव केला जाणार नाही.
(३) शासन धर्माचरणाला मदत करणार नाही, विरोध करणार नाही व हस्तक्षेप करणार नाही.
(४) संविधानाने जनतेला हक दिले आहेत आणि कर्तव्यही दिले आहेत. तसेच राज्यकर्त्याची कर्तव्ये आणि जबाबदारी स्पष्टपणे सांगितली आहेत. याची माहिती घेतली, अभ्यास केला तर राज्यकर्त्यांना धारेवर धरता येईल. राज्यघटनेचा १०० मार्कांचा अभ्यास इयत्ता ११ वी १२ वी तील विद्यार्थ्यांसाठी ठेवला, तर विश्वबंधुत्वाकडे राष्ट्राची वाटचाल होईल, असे मला वाटते.
(५) सार्वजनिक नीतिमत्ता, कायदा, सुव्यवस्था, सार्वजनिक आरोग्य, राष्ट्रीय एकात्मता या बाबींना न्याय देताना धर्म अडचणी निर्माण करत असेल, तर धर्माचे स्वातंत्र्य नियंत्रण करण्याचा अधिकार शासनाचा आहे. आपल्या घटनेने आपल्याला नागरिक म्हणून दिलेले हक जागतिक मानवतावादी दृष्टिकोनाचा परिणाम आहे. ‘विश्वचि माझे घर’ या भारतीय शिकवणुकीचा तो परिपाक आहे. आपली घटना व्यक्तीला नीतिमान बनविण्यास मार्गदर्शक आहे. नव्हे, माणसाने नीतिमान व्हावे म्हणून घटना आपल्यावर बंधनकारक आहे.
१०. आपल्या घटनेचा सारांश घटनेच्या प्रस्तावनेत आहे तो येणेप्रमाणे –
आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वतंत्र दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दि. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वत: प्रत अर्पण करत आहोत. हे संविधान किंवा घटना आपण म्हणजेच आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधी आपल्या वतीने केले आहे. ती आपली आहे. आपणहून स्वीकारली आहे. जॉन एफ. केनेडींनी (ते रोमन कॅथलिक होते) अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविली. तेव्हा सार्या देशातील नागरिकांनी त्यांना विचारलेला प्रश्न होता, ‘तू घटनेनुसार राज्यकारभार करणार की पोपच्या आदेशानुसारच?’ केनेडींचे उत्तर होते, ‘घटनेनुसार!’ जगाला लोकशाही देणार्या इंग्लंडमध्ये देशाच्या राजकारणात धर्माची लुडबूड चालत नाही हा इतिहास आहे. मला वाटते, त्यानुसार आपल्या घटनेत सर्व नागरिकांचे कल्याण योजिले आहे. तोच आपला धर्मग्रंथ होऊ शकतो. डोनाल्ड युजीन स्मिथ ‘इंडिया इज ए सेक्युलर स्टेट’ या ग्रंथात सांगतात, भारतातील लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता हे एकमेकांवर एवढे आधारलेले आहेत की, त्यातील कोणत्याही एकाचा अंत दुसर्याचा अंत असेल. आपल्या देशात सध्या काय चालू आहे?
११. आपण एक निर्धार केला पाहिजे, आपली घटना टिकविण्याचा. घटनेने आपल्याला जगण्याचे सामर्थ्य दिले आहे. अर्थपूर्ण जगण्याचा मार्ग दाखविला आहे. म्हणून ती टिकविण्याची जबाबदारीही आपली आहे. विचार स्वातंत्र्यासाठी किंमत मोजावी लागेल असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक सांगतात. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी म्हणतात, हल्ली जे चालले आहे ते पातळी सोडून चालले आहे. आपल्याला जगण्याच्या स्वातंत्र्याचे मोलही राहिलेले नाही.
१२. खरं तर आपल्या सर्वांचे प्रबोधन होणे हे अत्यंत आवश्यक आहे; पण हे प्रबोधन हे आपणच करू शकतो. धर्म, जात, कूळ, स्वदेश या श्रद्धा जन्मापासून किंवा जन्मामुळे प्राप्त होतात. त्या आपण स्वत:हून स्वीकारलेल्या नसतात. त्या आपल्यावर कुटुंबाने आणि समाजाने लादलेल्या असतात. त्या बरोबर की चूक याच्यावर आपण कधीच विचारही केलेला नसतो; परंतु विचार केल्यावर आपणास जाणवेल की, जन्मजात श्रद्धा, जात, पंथ, धर्म इत्यादींपेक्षा न्याय, नीती, समता, बंधुता, स्वतंत्रता या श्रद्धा श्रेष्ठ व उच्च दर्जाच्या आहेत, त्या स्वीकारणे म्हणजे मानवतावादी होणे. मात्र त्या स्वीकारण्यासाठी प्रबोधन आवश्यक आहे. विचार करायला शिकणे गरजेचे आहे.