वायू प्रदूषण आणि लहान मुलांचे आरोग्य

राजीव देशपांडे -

भारतात वायू प्रदूषणामुळे होणार्‍या आजारांमुळे लहान मुलांच्या आरोग्यावर खूपच गंभीर परिणाम होत आहेत. इतर कोणत्याही वयाच्या माणसांपेक्षा लहान मुले या दूषित होणार्‍या हवेचे शिकार बनत आहेत. (नुकत्याच दुबईत झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक जागतिक हवामान परिषदेच्या (COP 28) चर्चेत हवामान व आरोग्य हा मुद्दा अग्रक्रमाने घेतला पाहिजे, कारण हवामान बदलाचे सार्वजनिक आरोग्यावर भयावह परिणाम होत आहेत आणि त्यात गरीब जनता, लहान मुले, महिला भरडून निघत आहेत, अशी भूमिका जगातील हजारो आरोग्य तज्ज्ञांचा हवाला देत जागतिक आरोग्य संघटनेने मांडली होती. देशाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थैर्यावर याचे नकीच गंभीर परिणाम होत आहेत. अगदी आईच्या पोटात वाढणारा गर्भही यातून सुटू शकत नाही. या विषारी हवेच्या प्रभावामुळे मुलांमध्ये जन्मत: विकृती येत आहेत ज्याचे परिणाम पुढे त्या मुलाला आयुष्यभर सोसावे लागत आहेत. ‘डाऊन टू अर्थ’ या मासिकाने या विषयावर पाच भागांची मालिका आपल्या मासिकातून प्रकाशित केलेली आहे. त्या लेखांचा संक्षिप्त परिचय आम्ही ‘डाऊन टू अर्थ’च्या सौजन्याने अनिवाच्या वाचकांसाठी देत आहोत.

लॅन्सेट प्लॅनेट हेल्थ आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या अतिशय विश्वासू मानल्या गेलेल्या संस्थांनी ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज (जीबीडी) नावाचा अहवाल पाच वर्षांपूर्वी २०१९ मध्ये प्रकाशित केला होता. त्यात त्यांनी केवळ वायू प्रदूषणामुळे भारतात १६.५ लाख मृत्यू झाल्याचा दावा केला होता. हा दावा अगदीच अविश्वसनीय मानता येणार नाही. कारण वायू प्रदूषण भारतासह विकसनशील देशात ज्यांना हल्ली ‘ग्लोबल साऊथ’ म्हटले जाते अशा देशात भयानक स्तराला पोहोचले आहे. २०२३च्याच मेमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने प्रसारित केलेल्या माहितीनुसार, जगातील सर्वांत प्रदूषित ५० शहरांपैकी २४ शहरे भारतात आहेत. २०१९ पासून प्रत्येक वर्षी वायू प्रदूषणात भरच पडत आहे. हल्ली तर लहान मुलांच्या मृत्यूचे वायू प्रदूषण हे एक प्रमुख कारण बनलेले आहे.

वायू प्रदूषण हे सहजपणे न जाणवणारे, शांतपणे धिम्या गतीने भिनणारे विष आहे. हे विष सुरुवातीला सततच्या खोकल्याला चालना देते आणि मग डोळे, नाकाच्या तक्रारी चालू होतात, ज्यामुळे श्वासोच्छ्वासास अडथळा होऊ लागतो आणि मग कालांतराने फुप्फुसाचा कॅन्सर, दमा, हृदयविकार यांसारखे आजार होऊ लागतात. हे विष शरीरात ज्या प्रदूषकांच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करते त्यांना वैज्ञानिक भाषेत NOx (ऑक्साईड ऑफ नायट्रोजन), SOx (ऑक्साईड ऑफ सल्फर), CO, O, PM2.5, PM10 वगैरे. हे PM सर्वांत घातक. PM म्हणजे Particulate Matter (घनरूपी कण) असे संबोधले जाते. हे प्रदूषक हवेत तरंगणार्‍या द्रव आणि घनरूपी छोट्या छोट्या सूक्ष्म कणांच्या मिश्रणात असतात. उदाहरणार्थ धूळ, धूर, कचरा, सूत. पण बहुतेक वेळा पीएम आपल्यासाठी अदृश्यच असते. अत्यंत सूक्ष्म कणात असणारा PM 10 आपल्या फुप्फुसामध्ये प्रवेश करतो, तर PM 2.5 आपल्या रक्तपेशीत. PM 2.5 हा प्रदूषक कॅन्सरसाठी सर्वात घातक असल्याचे कॅन्सरवर संशोधन करणार्‍या आंतरराष्ट्रीय संस्थेने सांगितले आहे. भारतात या प्रदूषकाचे प्रमाण हवेतील सुरक्षित पातळीपेक्षा कितीतरी जास्त आहे.

भारतीय शहरात हवा प्रदूषित करण्याची कारणे ही सर्वसाधारणपणे सारखीच आहेत. शुद्ध हवेचा सर्वांत मोठा शत्रू वाहनांमधून सोडले जाणारे वायू. त्यात प्रामुख्याने CO, NOx, PM2.5 आणि इतरही विषारी वायू आहेत. हे वायू आपण रस्त्यावर थेटपणे आपल्या श्वासोच्छ्वासावाटे शरीरात घेत असतो. त्यामुळे वाहनांमुळे होणारे प्रदूषित वायूंचे उत्सर्जन अतिशय प्राणघातक ठरत आहे. राष्ट्रीय पर्यावरणीय इंजिनिअरिंग संशोधन संस्था आणि आय. आय. टी., मुंबई यांनी केलेल्या अभ्यासानुसार मुंबईत २८ टके NOx रस्त्यावरील वाहतुकीवाटे सोडला जातो. भारतातील कोणत्याही औद्योगिक शहरात सकाळच्या काळात क्षितिजावर धूसर पट्टा दिसत असतो, तो या उद्योगांनी उत्सर्जित केलेल्या वायूंचाच परिणाम असतो. भंगार, प्लॅस्टिक इ. विविध प्रकारच्या निरुपयोगी वस्तू जाळण्यातून CO, NOx, So2, PM2.5 यांचे घातक मिश्रणच तयार होते.

वायू प्रदूषणाचा हा विषारी प्रवास गर्भावस्थेपासूनच सुरू होतो. गर्भावस्थेत आई जेव्हा प्रदूषित हवेच्या संपर्कात येते तेव्हा गर्भात वाढणार्‍या मुलाच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो. वेळेआधी जन्म, जन्माच्या वेळेस कमी वजन, मृत मुलांचा जन्म, अशा घटनांना तोंड द्यावे लागते. वायू प्रदूषण आईच्या श्वसनव्यवस्थेवर परिणाम करत असेल तर गर्भाला ऑसिजन आणि पोषक तत्त्वांचा पुरवठाही कमी मिळण्याचा धोका संभवतो. गर्भाशयात जर फुप्फुसाचा विकास योग्य पद्धतीने झाला नाही तर श्वासमार्गातील आजारांचा धोका वाढतो. पीएममुळे मातांची रोगप्रतिकारक शती कमी होते. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो, मेंदूचा विकास होण्यात अडथळा निर्माण होतो. जन्माला येणारी कमकुवत मुले अधिकच संवेदनशील असतात. त्यामुळे बाहेरच्या परिस्थितीशी ते जुळवून घेणे त्यांना अवघड जाते. मग सांसर्गिक, अपचनाचे रोग, रक्ताचे विकार, कावीळ यांना ते सहजपणे बळी पडतात.

पाच वर्षांखालील मुले जर प्रदूषित हवेच्या संपर्कात आली तर त्यांच्यासाठी धोका अधिकच वाढतो. मेंदूवर परिणाम होऊन मेंदूचा विकास कुंठणे, फुप्फुसाच्या कार्यप्रणालीवर परिणाम होणे आणि जाडेपणाचा रोग जडण्याचा धोका निर्माण होतो. त्याशिवाय लक्ष न लागणे, मंद बुद्धी अशा प्रकारचे मानसिक आजारही जडतात. याच परिणाम या टोकाला जातात की फुप्फुसाची कार्यक्षमता कायमची कमी होतो आणि परिणामी मोठेपणीचे संपूर्ण आयुष्य फुप्फुसाचे कायमचे आजार घेऊन काढावे लागते.

शिशू मृत्यू, मृत म्हणून जन्म, वेळेपूर्वी जन्म, गंभीर श्वसन रोग, अ‍ॅनिमिया, मेंदूच्या विकासात अडथळा वगैरेसारखे आजार वायूप्रदूषणामुळे वाढत असल्याचे भकम पुरावे मिळत आहेत. वायूप्रदूषणामुळे लहान मुलाच्या आरोग्यदायी जीवन जगण्याच्या आणि भवितव्य उज्ज्वल बनविण्याच्या अधिकाराचेच उल्लंघन होत आहे. अशा वेळी आपल्या शासनकर्त्यांना जाग आणणे गरजेचे आहे. राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत असे कार्यक्रम सामील केले पाहिजेत जे वायू प्रदूषणामुळे होणार्‍या नुकसानीला रोखेल. निसर्गाच्या सर्वच स्रोतातील प्रदूषणात कमी होईल असे ठोस उपाय योजणे गरजेचे आहे, थंडीच्या दिवसांत दाट धुक्यामुळे शाळांना सुट्टी देणे हा काही प्रश्न सोडविण्याचा उपाय नाही. घरांसाठी आणि उद्योगासाठी स्वच्छ इंधन, शून्य उत्सर्जन करणारी वाहने, सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन, कचर्‍याचे योग्य व्यवस्थापन, कचरा जाळण्यापासून रोखण्याच्या दृष्टीने चक्राकार अर्थव्यवस्थेचे नियोजन असे उपाय योजले तरच हवेची गुणवत्ता सुधारून मुलांवरील आजारपणाचं ओझं हलकं होईल.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]