-
कोरोनाचा सार्वत्रिक प्रसार नियंत्रणात आणण्याच्या उद्देशाने संपूर्ण देशाला अवघ्या चार तासांचा अवधी देत पंतप्रधानांनी रात्री आठ वाजता केलेल्या टाळेबंदीच्या घोषणेला 24 मार्चला एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात सर्व अर्थव्यवहारांवर लादलेल्या कडक टाळेबंदीबरोबरच थाळ्या वाजवून झाल्या, दिवे पेटवून झाले, पुष्पवृष्टी करून झाली, शंखनाद करून झाला, यज्ञयाग, ‘गो करोना गो’पासून गायत्री मंत्रापर्यंत सर्व मंत्रांचे पठन, गोमूत्र प्राशन, गोशेण फासून झाले, रामदेवबाबाची कोरोनावर हमखास मात करणारी तथाकथित आयुर्वेदिक औषधे आली; पण कशाचाच काहीच उपयोग झाला नाही; उलट याच्या परिणामी देशभरात एक प्रकारचे अवैज्ञानिक असुशिक्षत अंधश्रद्धाळू वातावरण निर्माण होत योग्य उपचारांबाबत संभ्रमच निर्माण झाला. दुसर्या बाजूला, कोणत्याही नियोजनाअभावी लादलेल्या कडक टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्था ठप्प होऊन हातावर पोट असणार्या कोट्यवधी गरिबांची ससेहोलपट झाली, जी आजही चालूच आहे. त्यांना शेकडो मैलांचा प्रवास पायी, सायकलने करीत आपापल्या गावी परतावे लागले. यात अनेकांना प्राण गमवावे लागले. ‘त्या’ काळातील स्थलांतरित कामगारांच्या विदारक स्थितीची दृश्ये कोणत्याही संवेदनशील माणसाचे मन हेलावून सोडणारीच होती. आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही; उलट त्यांची स्थिती अधिकच विदारक बनत चालली आहे.
ही वर्षपूर्ती होत असताना आज कोरोनाच्या बाबतची परिस्थिती काय आहे? फेब्रुवारी महिन्यात उतरणीला लागलेला कोरोनाचा आलेख मार्चच्या सुरुवातीपासून पुन्हा वेगाने चढणीला लागला आहे. महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, पंजाब, कर्नाटक, हरियाणा, गुजरात आणि मध्य प्रदेश या आठ राज्यांत नव्या रुग्णांची पडत असलेली दैनंदिन भर चिंता वाढविणारी निश्चितच आहे. त्यामुळे अनेक राज्यांत कोरोनासंदर्भातील निर्बंध वाढवणे किंवा अधिक व्यापक करत त्यांची कडक अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न चालू झाले आहेत.
पण विविध राज्यांत याकडे पूर्ण दुर्लक्ष होताना दिसत आहे. उत्तराखंडमधील हरिद्वारला 1 एप्रिलपासून होणारा महाकुंभ 28 दिवस चालणार आहे. कोरोनाचे संकट असताना गंगाकिनारी काही दिवस या महाकुंभनिमित्त देशभरातील लाखो भाविक एकत्र जमणार आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी गंगेत हजारभर साधूंनी डुबकी घेतली. महाराष्ट्रातही सरकारी निर्बंधांना पायदळी तुडवत आपल्या उत्सव, यात्रा टिकविण्यासाठी लाखोंनी एकत्र येण्याची चिथावणी दिली जात आहे. पाच राज्यांत चालू असलेल्या निवडणुका, त्यानिमित्ताने चालू असलेल्या लाखांच्या सभा, मोर्चे, मिरवणुका, क्रिकेटचे सामने या सर्वांचा कोरोनाच्या रुग्णवाढीवर निश्चितच परिणाम होत आहे.
दुसर्या बाजूला, लोक ज्या प्रतिबंधक लसीची आतुरतेने वाट बघत होते, ती लस उपलब्ध झाली आहे. सुरुवातीला लस घेण्याबाबत लोक साशंक होते; पण आता लसीकरणाचे गाडे हळूहळू सुरळीत होत असले तरी जास्तीत जास्त जनतेचे कमीत कमी वेळात सार्वत्रिकरित्या लसीकरण करणे गरजेचे आहे; पण त्याची परिणामकता समजण्यास काही काळ जावा लागणारच. तोपर्यंत विषाणूंच्या या लाटांना रोखण्यात यशस्वी होण्यासाठी कोणत्याही अवैज्ञानिक कृत्याला, अंधश्रद्धांना थारा न देता विज्ञान आणि जनतेच्या सामूहिक विवेकी शक्तीला बळकट करत राहण्याचा निर्धार 14 एप्रिलच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना आम्ही व्यक्त करतो.
