सारे भारतीय माझे बांधव आहेत!

कृष्णात स्वाती - 8600230660

कोरोनानंतरच्या काळात समाजात वाढणारी बेरोजगारी, त्यामुळे येणारे दारिद्य्र आणि अस्थिरता यामुळे हे वातावरण अधिक संवेदनशील होण्याची शक्यता आहे. काही संधिसाधू या अस्थिर आणि संवेदनशील परिस्थितीचा गैरफायदा घेणार. विशिष्ट जातसमूह आणि धर्मसमूहांबद्दल विद्वेषाची बीजे रुजवणार. त्याला खतपाणी घालण्याचा अधिक मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या या ‘शालेय’ प्रार्थनेकडे पुन्हा एकदा जाणीवपूर्वक वळण्याची गरज निर्माण झाली आहे.

‘तबलिगीत सहभागी झाल्याच्या संशयावरून मुस्लिम तरुणाला मारहाण’, ‘मुसलमानांच्या दुकानात किंवा गाड्यांवर कोणत्याही वस्तू, भाजी खरेदी करू नका, असे मेसेज व्हायरल’ ‘धारावीतील कोरोना आटोक्यात आणता येत नसेल तर बॉम्ब टाकून धारावी उडवून टाका’,‘बरे होऊन घरी परतलेल्या कोरोना रुग्णांना कॉलनीत घेण्यास नागरिकांचा नकार’ ‘कोरोनाग्रस्त रुग्णांसोबत काम करत असल्यामुळे परिचारिकांना त्यांच्या राहत्या वस्तीत प्रवेश नाकारला’, ‘अन्य राज्यातून कामासाठी आलेल्या भाडेकरूंना घरमालकांनी घराबाहेर काढले’, ‘उच्च शिक्षणासाठी शहरात भाड्याच्या खोल्यांमध्ये राहणार्‍या तरुणांना घरमालकांनी ताबडतोब खोल्या सोडायला सांगितल्या’, ‘कोरोना पसरवायला आल्याचा संशयावरून अनोळखी व्यक्तींना समूहाची मारहाण’, ‘मास्क घातला नाही म्हणून विकलांग मुलाला ठार मारलं…’ आपली इच्छा असो वा नसो, या आणि अशा अनेक बातम्या आता आपल्या सवयीच्या झाल्या आहेत.

संकटे आल्यावर माणसांमध्ये ऐक्याची भावना वाढते, असे म्हणतात. हे खरे असले तरीही संकटकाळी स्वार्थापोटी माणसांमधील काही दोषही वर येत असावेत. या दोन्ही प्रकारची उदाहरणे आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. वर उल्लेख केलेल्या माणसामाणसांत भेद निर्माण करणार्‍या बातम्या जशा आहेत, तशाच ‘सारेच दीप विझलेले नाहीत’ अशी आशा निर्माण करणार्‍या बातम्याही आहेत. ‘मुलीला जन्म देऊन डॉक्टर आई रुग्णांच्या सेवेत हजर’, ‘आठ वर्षांच्या मुलीने आपल्या वाढदिवसाचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला’, ‘तळ्यात पडलेल्या मुलीला वाचवल्यावर मिळालेली 10 हजार रुपये बक्षिसाची संविधान नावाच्या मुलाने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली’, ‘कोणत्याही अफवा किंवा दिशाभूल करणार्‍या मेसेजेसना बळी न पडता सामाजिक सद्भाव राखत एकोप्याने राहण्याचे सर्व धर्मियांचे आवाहन’, ‘दूर असलेली मुले श्रेलज्ञवेुप मुळे दूर असलेली मुले येऊ न शकलेल्या मयत हिंदू महिलेचा मुस्लिम शेजार्‍यांनी केला अंत्यविधी…’ अशा बातम्या माणुसकीवरचा आपला विश्वास नक्कीच वाढवतात.

आपण शाळेच्या पहिल्या वर्गात दाखल झाल्यापासून ते शालेय शिक्षण संपेपर्यंत शाळेत दररोज प्रतिज्ञा म्हणायचो. “भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. …..माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे.”

गेल्या दशकभरात आपल्या देशात (खरं तर जगभरातच) राजकीय, सामाजिक वातावरण जातीय, धार्मिक आणि वांशिक दृष्टीने संवेदनशील झाले आहे. त्यामुळे जातीय, धार्मिक आणि वांशिक अस्मिता टोकदार झाल्या आहेत. या टोकदार अस्मितांतून परस्परांत संशयाचे आणि द्वेषाचे वातावरण तयार झाले आहे. कोरोनानंतरच्या काळात समाजात वाढणारी बेरोजगारी, त्यामुळे येणारे दारिद्य्र आणि अस्थिरता यामुळे हे वातावरण अधिक संवेदनशील होण्याची शक्यता आहे. काही संधिसाधू विभाजनवादी घटक या अस्थिर आणि संवेदनशील परिस्थितीचा गैरफायदा घेणार. विशिष्ट जातसमूह आणि धर्मसमूहांबद्दल विद्वेषाची बीजे रुजवणार. त्याला खतपाणी घालण्याचा अधिक मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या या ‘शालेय’ प्रार्थनेकडे पुन्हा एकदा जाणीवपूर्वक वळण्याची गरज निर्माण झाली आहे. देशावर खरंखुरं प्रेम करणार्‍यांनी ती अमलात आणण्यासाठी निष्ठापूर्वक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

आपण जेव्हा ‘भारत माझा देश आहे,’ म्हणतो तेव्हा देश म्हणजे केवळ एक भौगोलिक भूमी नाही. या भौगोलिक सीमांच्या आतमध्ये असलेली सर्व माणसं, प्राणी-पक्षी, निसर्गसंपत्ती, भौतिक संपत्ती या सर्वांचा या देशात समावेश होतो. अर्थात, इथे राहणार्‍या सर्व माणसांचा ज्या अर्थी देशात समावेश होतो, त्याअर्थी त्यांच्यात असणारी राहण्या-वागण्यात, प्रथा-परंपरांत, त्या साजर्‍या करण्यात असलेली विविधताही या देशाचा अविभाज्य भाग आहे. इतकेच नव्हे, तर या विविधतेत एकता हेच आपल्या देशाचे खरे सौंदर्य आहे. एकसारखेपणा म्हणजे ‘समता नव्हे’ हे आपण समजून घेतले पाहिजे. ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत‘ हे प्रतिज्ञेतील दुसरे वाक्य म्हणण्यापूर्वी ‘भारतीय’ असण्याचे वरील वास्तव आपल्याला मान्य असले पाहिजे. या विविध जाती-धर्मांतील सर्व माणसांना आपण बांधव मानतो का? त्यांच्यातले गुण-दोष समजून घेत आणि त्यांत सुधारणा करण्यासाठी आपण स्वतः कृतिशील राहतो का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आपण तसे मनात असू आणि प्रयत्न करत असू, तर आणि तरच माझ्या देशावर माझे प्रेम आहे, असे म्हणण्याचा आपल्याला अधिकार आहे.

‘माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.’ हे वाक्य उच्चारताना आपण कोणत्या परंपरांचा विचार करतो, हे देखील महत्त्वाचे आहे. केवळ आपल्या देशातच नव्हे, तर एकूणच मानवजातीच्या विकासाच्या टप्प्यात दोन परंपरा आलटून-पालटून, कमी-जास्त प्रमाणात क्रियाशील राहिल्या आहेत. एक काही मूठभरांच्या स्वार्थासाठी बहुसंख्याकांना गुलाम बनवून त्यांच्यावर राज्य गाजवू पाहणार्‍या धर्ममार्तंडांची विषमतावादी आणि शोषण करणारी परंपरा आणि दुसरी या शोषण व विषमतेच्या विरोधात न्याय आणि समतेचा लढा उभारणारी मानवतावादी परंपरा. भारतात परंपरेची चिकित्सा करायला शिकवणारे चार्वाक, सत्याच्या शोधाचा मार्ग दाखवणारे बुद्ध, जात आणि लिंगभेद ओलांडून समता आणू पाहणारे बसवण्णा, वारकरी संप्रदायात समतेची वैचारिक पायाभरणी करणारे नामदेव-जनाई, ‘ढाई आखर प्रेम के पढे सो पंडित होय।’ अशी प्रेमाची शिकवण देणारे कबीर, ‘सत्य-असत्याशी मन केले ग्वाही। मानियले नाही बहुमता।’ म्हणत एकप्रकारे जेवढा पुरावा तेवढा विश्वास ठेवायला शिकवणारे तुकोबा, अन्याय्य राजवटीला उलथवून टाकत न्यायाचे सर्वसमावेशक राज्य आणणारे शिवाजी, देशात बहुजनांसाठी आधुनिक शिक्षणाचा पाया घालणारे जोतिबा-सावित्री-फातिमा, आरक्षण आणि शिक्षणाची सक्ती करून छत्रपतींची गादी रयतेच्या कल्याणासाठी झिजवणारे शाहू, ‘मनुस्मृती’च्या रुपाने विषमतेचे दहन आणि संविधनाच्या रूपाने समतेची रुजवण करणारे बाबासाहेब, निःशस्त्र राहून अहिंसक मार्गाने सत्याचा आग्रह धरायला शिकवणारे गांधी, ‘जयाला देव तो प्यारा जयाला। धर्म तो प्यारा तयाने प्रेमरूप व्हावे।’ अशी आळवणी करणारे सानेगुरुजी, हातात झाडू आणि गाडगे घेऊन कीर्तनातून कार्यकारणभाव शोधायला सांगणारे गाडगेबाबा, स्वातंत्र्योत्तर भारतात सर्वोच्च लोकप्रियता आणि वलय लाभलेले असताना देशात लोकशाही, समाजवाद, विज्ञानवाद रुजवण्यासाठी झटणारे नेहरू हे आणि यांच्यासारखे अनेकजण या दुसर्‍या परंपरेचे वाहक आहेत. या दुसर्‍या प्रकारच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता आपल्या अंगी यावी, म्हणून आपण सदैव प्रयत्नशील राहिले पाहिजे.

आपण सर्वांनी भारताच्या या समृद्ध परंपरेची फक्त आठवण आणि उच्चारण करणे पुरसे नाही. त्या आपल्या जगण्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करूया. तसे, काही अपवाद वगळता आपल्या नेहमीच्या जगण्यात ही बांधवता जोपासत आणि जपत असतो. आजही अनेकजण आपल्या बांधवांच्या सहकार्यासाठी पुढे येत आहेत. गरजू बांधवांसाठी कुणी आर्थिक, कुणी वस्तुरूप देणग्या देत आहेत; तर कुणी तोंडाला मास्क लावून ही आवश्यक खबरदारी घेत ही मदत गरजूंपर्यंत पोचवत आहेत.

कोरोनानंतरच्या काळात या कृती अधिक जाणीवपूर्वक कराव्या लागतील. कोरोनामुळे बेरोजगारी, त्यातून दारिद्य्र आणि त्यामुळे ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ वर्गातील दरी अधिक रुंदावेल. दिल्ली निवडणुका, दिल्ली दंगली आणि आता तबलिगींच्या निमित्ताने रुजवलेले मुस्लिम द्वेषाचे पीक एव्हाना चांगलेच भरात आलेले असेल. कोरोनामुक्त होऊन आलेले रुग्ण, त्यांच्यासाठी आरोग्यसेवा देणारा नर्सिंग आणि इतर स्टाफ यांच्याविषयी अज्ञानातून निर्माण झालेली भीती अजून गेलेली नसेल. त्यामुळे यांना कुठे-कुठे अलिखित अस्पृश्यतेचा अनुभव येत असेल. गावात, गल्लीत येणार्‍या विक्रेत्यांकडे साशंकतेने पाहिले जात असेल. अशा काळात वरील प्रतिज्ञा आणि त्यामधील बांधवतेची भावना अधिक सजगतेने कृतीत आणल्या पाहिजेत.