नॉस्ट्रडॅमसची भविष्यवाणी आणि कोरोना

डॉ. नितीन शिंदे - 9860438208

कोरोनाची भविष्यवाणी नॉस्ट्रडॅमसने पाचशे वर्षांपूर्वी केलेली होती, अशा आशयाची ‘पोस्ट’ नुकतीच सोशल मीडिया आणि ‘फेसबुक’वर फिरत होती. ही ‘पोस्ट’ नॉस्ट्रडॅमसला मोठं करण्यासाठी निश्चितच नव्हती, तर फलज्योतिषावरचा समाजाचा विश्वास ढळू नये, यासाठीची ही धडपड. या ‘पोस्ट’चा लेखक अनामिक होता. महत्त्वपूर्ण व्यक्तीच्या नावे जबाबदारी घ्यायचं सुध्दा धाडस संबंधिताकडे नव्हतं. या ‘पोस्ट’ लिहिणार्‍याने किंवा गूढ कादंबरीकाराने नॉस्ट्रडॅमसवरच पुस्तक सध्या तरी बाजारात आणलेले नाही, हे विशेष. अशा प्रकारची पुस्तकं खपण्याचं हेच अचूक टायमिंग असतं. समाजाची दुभंगलेली मानसिकता आणि अराजकसद़ृश परिस्थिती अशा प्रवृत्तींना साद घालत असते. कोरोनाची भविष्यवाणी कोणीही केलेली नाही, हे वास्तव आजच्या पिढीला माहीत झालेलं आहे. परंतु समाजाची स्मरणशक्ती विचारात घेता, आणखी वीस वर्षांनी कोरोनाच्या भविष्यवाणीवर नॉस्ट्रडॅमसच्या नावे एखादं पुस्तक आलं, तर आश्चर्य वाटू नये.

नोव्हेंबर 2019 मध्ये ‘कोरोना’ विषाणूच्या माध्यमातून आलेल्या ‘कोविड-19’ हा आजार आजही ठाण मांडून आहे. जगभर या आजाराने थैमान घातलेलं आहे. अत्यंत सूक्ष्म असलेल्या या विषाणूने सर्वांनाच विचार करायला लावलेलं आहे. कोरोनामुळे सध्या जगात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. अर्थव्यवस्था कोलमडणे, शेअर बाजार ढासळणे, तेलाचे दर कोसळणे आणि ॠणमध्ये जाणे; तसेच चीनच्या अनुषंगाने अमेरिका, भारत, नेपाळ, पाकिस्तान यांच्या सीमेवर सुरू असलेल्या घडामोडी युध्दसद़ृश परिस्थिती निर्माण करत आहेत. समुद्रामध्ये ‘निसर्ग’, ‘अम्फान’ आदी चक्रीवादळांचा उच्छाद सुरू आहे. कोरोनासारख्याच इतर विषाणूंचा येत्या काळामध्ये वावर होण्याची शक्यता संशोधक वर्तवत आहेत. प्रसिध्द व्यक्तींचे मृत्यू नेहमी होत आलेलेच आहेत. चित्रपट कलावंत आणि राजकीय नेते यांचे मृत्यूसुध्दा नुकतेच झालेले आहेत. प्रत्येक देशातील उद्योगधंदे आणि रोजगार कोलमडलेल्या अवस्थेत आहेत. कोरोनाने प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी केलेली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. जोपर्यंत लस द़ृष्टिपथात येत नाही, तोपर्यंत या आजारावर नियंत्रण मिळवता येणार नाही, याची कल्पना सर्वांनाच आलेली आहे. सर्वच देशांतील वैद्यकीय यंत्रणा कोरोनावरील लस निर्मितीसाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. हे एका बाजूला सुरू असताना कोरोनाची भविष्यवाणी आणि तो केव्हा जाणार, याबद्दल ज्योतिषवाले आपआपली मते प्रसारमाध्यमांव्दारे पसरवत आहेत.

कोरोना 21 मे 2020 नंतर निघून जाईल, अशी दर्पोक्ती करणार्‍या बैजान दारूवाला या ज्येातिषाचा मृत्यूदेखील कोरोनामुळेच झालेला आहे. प्रसारमाध्यमांनी महान ज्योतिषी म्हणून मोठं केलेल्या दारूवालांवर कोरोनाचा ‘बूमरँग’च दि. 29 मे 2020 रोजी उलटलं, असंच म्हणावं लागेल. इंटरनेटच्या माध्यमातून वरील सर्व माहिती घरबसल्या सर्वांना विनासायास मिळत आहे. वरील सर्व घडामोडींचा विचार करून केलेलं वक्तव्य ही भविष्यवाणी नव्हे; वृत्तपत्र वाचणारी आणि इंटरनेटचा वापर करणारी कोणतीही सर्वसामान्य व्यक्ती अशा प्रकारचे वक्तव्य करू शकते.

‘कोविड-19’ या आजाराची भविष्यवाणी कोणत्याही भविष्यवेत्त्याने नोव्हेंबर 2019 पूर्वी वर्तवलेली नव्हती; किंबहूना प्रसारमाध्यमांतून तसा कोणताही संदेश पसरवलेला नव्हता, हे निर्विवाद सत्य आहे. महान ज्योतिषी म्हणून ज्योतिषवाल्यांनीच उचलून धरलेले आणि बरीच वर्षेअडगळीत पडलेला नॉस्ट्रडॅमस मात्र भविष्यवेत्त्यांच्या मदतीला धावून आला. कोरोनाची भविष्यवाणी नॉस्ट्रडॅमसने पाचशे वर्षांपूर्वी केलेली होती, अशा आशयाची ‘पोस्ट’ नुकतीच सोशल मीडिया आणि ‘फेसबुक’वर फिरत होती. ही ‘पोस्ट’ नॉस्ट्रडॅमसला मोठं करण्यासाठी निश्चितच नव्हती, तर फलज्योतिषावरचा समाजाचा विश्वास ढळू नये, यासाठीची ही धडपड. या ‘पोस्ट’चा लेखक अनामिक होता. महत्त्वपूर्ण व्यक्तीच्या नावे जबाबदारी घ्यायचं सुध्दा धाडस संबंधिताकडे नव्हतं. या ‘पोस्ट’ लिहिणार्‍याने किंवा गूढ कादंबरीकाराने नॉस्ट्रडॅमसवरच पुस्तक सध्या तरी बाजारात आणलेले नाही, हे विशेष. अशा प्रकारची पुस्तकं खपण्याचं हेच अचूक टायमिंग असतं. समाजाची दुभंगलेली मानसिकता आणि अराजकसद़ृश परिस्थिती अशा प्रवृत्तींना साद घालत असते. कोरोनाची भविष्यवाणी कोणीही केलेली नाही, हे वास्तव आजच्या पिढीला माहीत झालेलं आहे. परंतु समाजाची स्मरणशक्ती विचारात घेता, आणखी वीस वर्षांनी कोरोनाच्या भविष्यवाणीवर नॉस्ट्रडॅमसच्या नावे एखादं पुस्तक आलं, तर आश्चर्य वाटू नये. नॉस्ट्रडॅमसने कोरोनाच्या भविष्यवाणीसाठी जी चारोळी (चार ओळींचं लिखाण) लिहिलेली होती, ती चारोळी या ‘पोस्ट’मध्ये उधृत करण्यात आलेली आहे. ती अशी –

There will a twin year from which will arise a queen

Who will come from the east and will spread a plague

In the darkness of night on a country with seven hills

And will transform the twilight of men into dust to detstroy and ruin the world

याचा मराठी अनुवाद असा होतो –

असं एक जुळं वर्ष असेल की, त्यावर्षी एका राणीचा उदय होईल

ती राणी पूर्वेकडून येईल आणि प्लेगचा प्रसार करेल

रात्रीच्या अंधारात, सात टेकड्यांच्या प्रदेशात

माणसांच्या संधिप्रकाशाचे कचर्‍यामध्ये रूपांतर करत जगाचा विनाश करेल

ही चारोळी वाचल्यानंतर कोरोनाने निर्माण केलेल्या परिस्थितीला चपखल बसणारी अशीच वाटते. त्यामुळे नॉस्ट्रडॅमस भविष्यवेत्ता म्हणून महान होता, असा समज द़ृढ होण्यास मदत होते. या चारोळीमध्ये जे शब्दप्रयोग वापरलेले आहेत, ते कोणत्या अर्थाने घ्यायचे, याचंसुध्दा विवेचन या ‘पोस्ट’मध्ये करण्यात आलेलं आहे. ‘जुळ वर्ष’ असा जो दाखला देण्यात आलेला आहे, तो 2020 या वर्षासाठी आहे. ज्या राणीचा उदय होणार आहे, ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ‘कोरोना’ होय. ही राणी पूर्वेकडून म्हणजे चीनकडून येणार. ही राणी सात टेकड्यांच्या प्रदेशात प्लेगचा प्रसार करेल. हे वाक्य इटलीसाठी आहे, असं विवेचन करण्यात आलेले आहे. इटलीमध्ये कोरोनाने हाहाःकार माजवलेला होता, हे आपण सर्वांनी वाचलेलं आहेच; किंबहूना पाहिलेलं सुध्दा आहे – टीव्हीवर! चारोळीचा जो अर्थ दिलेला आहे, तो पाहिल्यास ही चारोळी भविष्यवाणीच्या सदरात मोडायलाच पाहिजे, यावर सर्वसामान्यांचा विश्वास बसतो आणि नॉस्ट्रडॅमस ‘महान’ असल्याचा भास होतो. या चारोळीची चिकित्सा करूया म्हणजे ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होऊन जाईल.

जुळं वर्ष कशाला म्हणतात? हे यांच्याकडून शिकलं पाहिजे. वर्ष 2020 हे जुळं वर्ष असतं, असं यांचं मत. 20-20 क्रिकेट सामन्यालासुध्दा जुळं क्रिकेट म्हणायला काहीच हरकत नसावी. खरं म्हणजे कोरोनाचा उदय नोव्हेंबर 2019 मध्ये झालेला आहे, हे सोयीस्कररित्या विसरलेलं दिसतंय.

कोरोना विषाणू हा पृथ्वीवासीयांना चांगल्या अर्थाने नक्कीच फायदेशीर ठरलेला नाही. त्यामुळे ‘कोरोना’ या विषाणूला ‘राणी’चा दर्जा देणारा नॉस्ट्रडॅमस ‘महान’च म्हणायला पाहिजे. राणी प्रजेची रक्षणकर्ती असते, या धारणेला ‘कोरोना राणी’ने केराची टोपलीच दाखवली म्हणायचं! महामारी पसरवणार्‍या विषाणूला राणी म्हणून नॉस्ट्रडॅमस समजत असेल तर राजाला काय म्हणून लेखत असावा, याचा अंदाज सुध्दा करता येत नाही.

राणी पूर्वेकडून येणार असल्यामुळे ती चीनकडून आली हे बरोबर आहे; पण चीनची सध्याची राजवट पाहता तिथे ‘राणी’ अथवा ‘राजा’ या सन्मानीय पदांना कोणताच अर्थ नाही. त्यामुळे चीनची राणी ‘कोरोना’ हे थोडं विचित्रच वाटतंय. नॉस्ट्रडॅमसला सध्या कोणत्या प्रकारची राजवट चीनमध्ये असणार, याची भविष्यवाणी करता येऊ नये, याचं आश्चर्य वाटतंय. त्याच्या चाहत्यांनी चीनमधील राजवटीविषयी एखादी चारोळी सापडते का, याचा शोध घ्यायला काहीच हरकत नाही.

सात टेकड्यांचा प्रदेश म्हणून इटलीची गणना करणारा नॉस्ट्रडॅमस टेकड्या मोजायला कधी गेला होता? इटली हा सात टेकड्यांचा प्रदेश आहे, हे जनरल नॉलेज देणार्‍याच्या बौध्दिकतेचं काय करायचं, हे वाचकांनीच ठरवावं. स्पर्धा परीक्षेमध्ये अशा उत्तराला मार्क मिळण्याची शक्यताच नाही.

चीननंतर इटलीमध्ये कोरोनाने हाहाःकार माजवलेला होता, हे वास्तव आहे. त्यामुळे चीनमध्ये कोरोनाचा प्रवेश झालेला होता. सुरुवातीला तेथे हाहाःकार उडालेला होता, हे वास्तव आहे. परंतु चारोळीचा अर्थ काढणार्‍याने इटलीला त्यात गोवलेलं आहे. इटलीमध्ये मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करायलासुध्दा कोणीही तयार होत नव्हतं; जवळचे नातेवाईकसुध्दा नव्हते. एवढंच काय, रस्त्यावर माणसं किड्या-मुंगीसारखी मृत्युमुखी पडत होती, हे त्यावेळच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरून ‘व्हायरल’ होत असलेल्या व्हिडिओतून दिसत होतं. वास्तव काय होतं, हे ‘व्हायरल’ करणारेच जाणोत! अर्थात, हा कोरोनाच्या सुरुवातीचा मार्च, एप्रिलचा काळ होता. या प्रकाराची मीठमसाला लावून आपल्याकडे चर्चा होत होती. पाश्चात्यांच्या संस्कृतीला नावंसुध्दा ठेवली जात होती. माणुसकीच नसल्याचं वारंवार बिंबवलं जात होतं! मे-जून 2020 मध्ये आपणाकडे कोरोनाने ज्या वेळी धुमाकूळ घातला, त्या वेळी आपल्या इथली परिस्थिती यापेक्षा वेगळी नव्हती. कोणताही नातेवाईक अंत्यसंस्कारात सहभाग घेत नव्हता. माणुसकीचा विसर आपल्यालाही पडलेला होताच ना! हे मात्र आपण सोयीस्करपणे विसरलो. वेळ आली की संस्कृतीसुध्दा फिकी पडते. कोरोनाचा कहर फक्त इटलीमध्येच झालेला नाही, तर सर्व जगभर पसरलेला आहे. त्यामुळे फक्त सात टेकड्यांचा प्रदेश हा चारोळीतला उल्लेख चुकीचा ठरतो.

कोरोनाने सध्या तर अक्षरश: धुमाकूळ घातलेला आहे, प्रचंड हानी पोहोचलेली आहे. त्यामुळे वरील चारोळी प्रत्यक्षात उतरल्याचा दावा तंतोतत खरा असल्यासारखं वाटतं. त्यामुळं नॉस्ट्रडॅमस कोरोनाच्या भविष्यवाणीसाठी सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाला. काही हितसंबंधी व्यक्तींकडून किंवा ज्यांचा ज्योतिषावर विश्वास आहे, त्यांच्याकडून भविष्य वर्तवता येते, असा दावा ‘व्हायरल’ करण्यात आला.

ही सर्व भविष्यवाणी कोरोना आल्यानंतरची आणि विनाश केल्यानंतरची बरं का; येण्यापूर्वी ही चारोळी झोपली होती की नॉस्ट्रडॅमस? पोस्ट ‘व्हायरल’ करणार्‍याची वाचा गेलेली होती की काय कोणास ठाऊक! एखादी घटना घडून गेल्यांनतरच पाचशे वर्षांपूर्वीचं लिखाण शोधण्यासाठी हे का धडपडतात? जरा लवकर जागे झाले, तर समाजाच भलं तरी होईल ना?

चारोळीचं अवलोकन केलं, तर चारोळीत जी भाषा वापरलेली आहे, ती संदिग्ध आहे, हे स्पष्ट होते. चारोळीमध्ये कोठेही कोरोना, चीन, इटली असे शब्दप्रयोग नाहीत. खरं म्हणजे ‘खोटं बोल; पण रेटून बोल’ असं म्हणणार्‍यांची हीच तर खासीयत असते. चारोळीचा अर्थ आजच्या परिस्थितीशी जुळवण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे. सर्वसामान्य चारोळीच्या खोलात न जाता ‘फॉरवर्ड’ करण्यातच धन्यता मानतात.

मुख्य म्हणजे या चारोळीची सत्यता तपासली असता महत्त्वपूर्ण पुरावा समोर आलेला आहे. वर उल्लेख केलेली चारोळी नॉस्ट्रडॅमसच्या लिखाणामध्ये नाहीच. नॉस्ट्रडॅमसचा एकच ग्रंथ ‘द प्रॉफेसीज’ (The Prophecies) अर्थात ‘भविष्यवाणी’ या नावाने प्रकाशित आहे. त्यातील चारोळ्या आजही अधिकृतरित्या उपलब्ध आहेत. अमेरिकेतील न्यू यॉर्क विद्यापीठातील ‘फ्रेंच अभ्यास आणि इतिहास संशोधन’ संस्थेचे संचालक, प्रा. स्टीफन गेरसन यांनी, अशी कोणतीही चारोळी नॉस्ट्रडॅमसच्या लिखाणामध्ये नसल्याचे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. नॉस्ट्रडॅमसची भविष्यवाणी आणि तिचा फोलपणा यावर गेरसन यांची दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. नॉस्ट्रडॅमसच्या सध्याच्या भविष्यवाणीवर गेरसन यांनी केलेलं मत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि विचारात घेण्यासारखं आहे. ते म्हणतात की, ‘कोरोनासारख्या महामारीच्या प्रसंगी नॉस्ट्रडॅमसच्या भविष्यवाणीचं उपटणं आश्चर्यकारक नाहीच. कोरोनाच्या प्रतिबंधावर येत असलेलं अपयश झाकण्यासाठी आणि समाजाचं लक्ष विचलित करण्यासाठीची ही खेळी आहे; तसेच ज्योतिषवाल्यांनी आपला ‘बिझनेस’ अबाधित राहावा, यासाठीची केलेली ही मखलाशी आहे.’

कायमस्वरुपी आपलं अस्तित्व टिकवून ठेवणार्‍या; तसेच प्रसारमाध्यमं आणि काही रहस्यमय कादंबरीकारांनी विनाकारण महान केलेल्या नॉस्ट्रडॅमसच्या चारोळ्यांची आणि भविष्यवाणीची पोलखोल करूया.

सोळाव्या शतकातील मायकेल नॉस्ट्रडॅमस हा फ्रेंच ज्योतिषी 1566 साली निधन पावला. वयाच्या पन्नाशीनंतर त्याने आपली भाकीते ‘द प्रॉफेसीज’ (The Prophecies) अर्थात ‘भविष्यवाणी’ या ग्रंथाव्दारे प्रसिध्द केली. 1555 साली प्रसिध्द झालेली ही भाकिते काव्यस्वरुपात आणि किचकट अशा लॅटीन फ्रेंच भाषेत आहेत. प्रत्येक भाकीत चार ओळींचे; ज्याला आपण ‘चारोळी’ अथवा कडवे म्हणतो. शंभर चारोळ्यांचे एक शतक, अशी दहा शतके त्याने प्रसिध्द केली. आठव्या शतकात शंभर चारोळ्यांऐवजी बेचाळीस चारोळ्या आहेत. त्यामुळे एकूण 942 चारोळ्या त्याने प्रसिध्द केल्या. या भाकितांना खूप प्रसिध्दी मिळाली. त्यामुळे तो राजदरबारी प्रिय झाला. संपूर्ण युरोपमधील राजघराण्यातील मंडळी त्याच्यावर स्तुतिसुमनांचा आणि भेटींचा वर्षाव करत; पण हेही खरे की, त्याच्या गावातील लोक त्याची कुचेष्टा करत. खरे तर जवळच्याच व्यक्तीला खरी माहिती असते; इतरांच्या बाबतीत ‘दुरून डोंगर साजरे.’

आर्सन वॉलेस याने नॉस्ट्रडॅमसवर लघुपट काढला होता. याच कारणामुळे तो सर्वदूर माहीत झाला. अणुबाँब, विमान, पाणबुड्या, केनेडी बंधूंची हत्या आदी भाकिते खरी ठरल्याचा दावा त्याचे चाहते करतात. फॉन्टब्रुने या भविष्यवेत्त्याने त्याच्यावर लिहिलेल्या पुस्तकाच्या सात लाख प्रती खपल्या. पुस्तकाच्या प्रती खपणे स्वाभाविक आहे. कारण समाजाला चमत्कारिक, मनोरंजक, गूढ, रहस्यमय, कल्पनाविलासक गोष्टींमध्ये रस असतो. त्याच्या काही चारोळ्यांचा समाचार घेऊया – शतक 9, चारोळी 14

The sudden death of the leading personage

Will make change and put another to rule

Soon, but to late come to high position of young age

By land and sea it will be necessary to fear him

या चारोळीमध्ये कोठेही केनेडी, आयसेन हॉवर, इंदिरा गांधी, राजीव गांधी, हिंदू अथवा शीख शब्द नाहीत, हे स्पष्ट होते; मात्र एरिका चिथम या इंग्रजी लेखिकेला ही चारोळी जॉन केनेडी यांना उद्देशून आहे, असं वाटलं. त्यांनी ते पुस्तकरुपाने लिहिलं. हॉवरच्या कारकिर्दीत जागतिक राजकारणातील ताणतणाव कमी झाले नाहीत. आयसेन हॉवरनंतर केनेडी अध्यक्ष झाले होते. त्यांनी क्यूबाच्या पेचप्रसंगावेळी केलेली कृती निर्णायक ठरली; म्हणजे Kenedy’s power was to be feared by land and sea ( i.e. Cuba) असं चिथम लिहून मोकळ्या झाल्या.

भारतीय लेखक हिरण्यप्पा यांना त्याच चारोळीत राजीव गांधींचे भविष्य दिसते. The sudden death of leading personage म्हणजे इंदिरा गांधी. इंदिरा गांधीच्या मृत्यूनंतर भारतात गोंधळ माजेल. 1992 मध्ये हिंदू शीख राष्ट्र उदयास येईल. त्यानंतर भारतात महान राजकीय नेत्याचा उदय होईल, जो समुद्र आणि जमिनीवर अजिंक्य ठरेल.

एरिका चिथम अथवा हिरण्यप्पा यांनी चारोळीचा लावलेला अर्थ आणि प्रत्यक्षातील चारोळी यांचा काहीतरी संबंध आहे का? परंतु ओढून -ताणून तो संबंध जोडण्याचा प्रयत्न ही चमत्कारिक आणि रहस्यमय कादंबर्‍या लिहिणारी लेखक मंडळी करतात. त्यांना वस्तुस्थितीशी काहीही देणे घेणे नसते; फक्त आपले पुस्तक खपणे आणि प्रसिध्दी मिळवणे, हे हेतू त्यांना साध्य करायचे असतात. आपला स्वार्थ साधवून घेण्यात मात्र ते यशस्वी होतात.

आणखी एका चारोळीचा समाचार घेऊया – शतक 1, चारोळी 50

From the three water sings will be born a man

Who will celebrate Thursday as his feast day

His renown praise, rule and power will grow by land and sea

Bringing trouble to the east

एरिका चिथमच्या द़ृष्टीने मेष, कर्क किंवा कुंभ राशीचा राजा जगावर राज्य करेल. तो ख्रिश्चन किंवा वर्तमानकाळातील कोणत्याही इतर मोठ्या धर्माचा अनुयायी नसेल. त्याचे सामर्थ्य एवढे असेल की, तो पूर्वेकडे युध्द घडवून आणेल आणि तो ख्रिश्चनविरोधी असेल.

चारोळी आणि एरिका चिथम यांनी काढलेला अर्थ याचा अर्थाअर्थी संबंध? चारोळीत कुठेही कोणत्याही राशीचा उल्लेख नाही. ख्रिश्चन धर्माचा उल्लेखसुध्दा नाही; पण चिथम यांनी तो केला. हे संगळे जाणीवपूर्वक केलेले असते. समाजातील काही गटांना या कपोलकल्पित मायाजालात रममाण व्हायला आवडते. त्या गटांमध्येच मोडणारे चिथम, हिरण्यप्पा आणि त्यांचे अनुयायी आहेत.

हिरण्यप्पाच्या द़ृष्टीने Three water signs म्हणजे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर यांनी वेढलेला भाग म्हणजे दक्षिण भारत. तेव्हा जग जिंकणारा विसाव्या शतकाच्या अखेरीचा राजा हा दक्षिण भारतीय असेल आणि तो हिंदू असेल. याचं कारण म्हणजे गुरुवारी देवपूजा फक्त हिंदूच करतात आणि त्याचे नाव किरण असेल. सध्या एकविसावे शतक सुरू आहे; पण हिरण्यप्पाच्या अर्थाची प्रचिती आलेली नाही. मात्र नॉस्ट्रडॅमसच्या चाहत्यांनी चकार शब्द काढलेला नाही. हिंदू, दक्षिण भारत, किरण असा कोणताही उल्लेख चारोळीत नसताना या नसत्या उचापती लोक का करत असतात, ही न समजण्यासारखी गोष्ट आहे. फसवणार्‍या व्यक्ती फक्त भारतातच आहेत, असे नाही, तर हा धंदा जगात सगळीकडे कमी-अधिक फरकाने सुरू आहे.

चारोळी एकच; पण दोन भाषांतरकारांची त्यावरील दोन वेगवेगळी भाष्ये. आपले पुस्तक खपवायला आपलाच देश उपयोगी पडू शकतो. त्यामुळे ते भाष्य आपल्या देशाशी, देशातील प्रसिध्द व्यक्तींशी अथवा धर्माशी संबंधित असायला पाहिजे, हे गमक या भुरट्या लेखकांनी बरोबर ओळखलेलं आहे.

एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, नॉस्ट्रडॅमसची मूळ भाकिते काव्यस्वरुपात, किचकट अशा लॅटीन आणि फ्रेंच भाषेत. त्याचे भाषांतर इंग्रजीमध्ये नंतर मराठी, हिंदीसहित इतर भाषांमध्ये. त्यामुळे एखादी गोष्ट मीठमसाला लावून सांगणे हे पण त्याबरोबर आलेच. भाषांतरकार फसवाफसवीमध्ये महत्त्वाची भूमिका वठवू शकतात, याचे ‘नॉस्ट्रडॅमसचे भविष्य’ हे उत्तम उदाहरण आहे.

ग्रहस्थितीचा थेट परिणाम होतो, असं म्हणणार्‍या ज्योतिषांनी सहा कोटी किलोमीटर अंतरावरील बुध आणि सहाशे कोटी किलोमीटर अंतरावरील प्लूटो उघड्या डोळ्यांनी पाहिलेत का, याचीच शंका येते. प्लूटो, युरेनस आणि नेपच्युन पाहण्यासाठी दुर्बिणीचा वापर करावा लागतो. विज्ञानाने शोध लावलेल्या दुर्बिणीचा वापर ग्रहस्थितीचा अभ्यास करण्यासाठी ज्योतिषांनी केलेल्याचे ऐकवित नाही. एका फुटावरील व्यक्ती काय करत असते, याची कल्पना आपल्याला येत नाही, तिथे हे ज्योतिषी कोट्यवधी किलोमीटर अंतरावरील ग्रहांचा हवाला कशाच्या आधारे घेतात, हेच समजत नाही. ‘इस्त्रो’ किंवा ‘नासा’पेक्षाही अतिप्रगत संशोधन यंत्रणा यांच्याकडे उपलब्ध आहे की काय?

ज्योतिषवाले नेहमी राशींचा उल्लेख करतात. मे महिन्यामध्ये सूर्य कुंभ राशीत प्रवेश करणार. बुध, धनु राशीत वक्री होणार. शनी आणि बुधाची युती होणार. मंगळ पंचमात असणार. असले शब्दप्रयोग वापरले की, सर्वसामान्यांना यातलं काहीच कळत नाही. हेच ज्योतिषांच्या प्रसाराचं महत्त्वाचं गुपित आहे. रास म्हणजे काय? ती कुठे असते? ती किती अंतरावर असते, याची काही कल्पना यांना नसते आणि सर्वसामान्यांनासुध्दा नसते. रास म्हणजे आकाशातील तार्‍यांचा समूह. तारे म्हणजे दुसरे सूर्य, प्रचंड अंतरावर असलेले. रात्रीच्या वेळी आपण पाहत असलेले तारे, हे दुसरे सूर्य असून त्यांच्यापासून प्रकाश आपल्यापर्यंत यायला हजारो वर्षेलागतात. रात्रीच्या वेळी आपण जे तारे पाहतो, ते हजारो वर्षांपूर्वीचे असतात. हजारो वर्षांपूर्वीची रास आणि तारे आपल्या विविधतेने नटलेल्या पृथ्वीवर संकट निर्माण करायला मोकळे आहेत काय? मुख्य म्हणजे रास ही संकल्पना ग्रीकांची आहे, तर नक्षत्र ही भारतीयांची. भारतीय ज्योतिषी संस्कृतीचा आणि परंपरेचा ठेवा म्हणून पाश्चात्यांच्या; आणि त्यातही ग्रीकांच्या रास या संकल्पनेचा गैरवापर का करतात, हेच समजत नाही.

भविष्यामध्ये काय होणार, हे ज्योतिषी बिलकूल सांगू शकत नाहीत, हे वास्तव आहे. कोणालाही भविष्यामध्ये काय होणार, हे सांगताच येत नाही. असा दावा करणारे समाजाची फसवणूक करतात आणि स्वत:चा स्वार्थ साधतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने काही गोष्टींचा अभ्यासाव्दारे अंदाज बांधता येतो. अंदाज व्यक्त करण्यासाठी प्रचंड मेहनत आणि संशोधक वृत्तीची गरज असते. संबंधित बाबींचा अभ्यास करावा लागतो. दिव्यद़ृष्टी अथवा पूर्वी लिहून ठेवलेलं आहे, असं म्हणून किंवा संस्कृती अथवा परंपरेचा उदो-उदो करून चालत नाही. सत्य शोधत राहणं हेच आपल्या हातात आहे.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]