राजा कांदळकर -
राहुल थोरातांचा सांगावा आला, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रासाठी लिहावे काही. डॉ. नरेंद्र दाभोलकर विशेषांक आहे ऑगस्टचा. डॉक्टर गेले, त्यानंतर बर्याच ठिकाणी लिहीत राहिलो त्यांच्याबद्दल. आता नव्याने काय लिहावे? तेच-तेच पुन्हा येण्याची शक्यता. काय लिहावे?
पुण्यात कॉलेजला होतो. गणपती उत्सवात पुण्यातल्या पेठांत मित्रांबरोबर फिरणं होई. त्यावेळी काही स्टॉलवर महात्मा फुले यांच्यावर खोटेनाटे आरोप करणार्या पुस्तिका सनातनी मंडळींनी ठेवलेल्या असत. टॅबलॉईड साप्ताहिकाचे अंकही असत. त्यातही फुलेंची बदनामी करणारा मजकूर असे.
बहुजनांना गुलामगिरीतून मुक्त करू पाहणार्या फुल्यांबद्दल या लोकांना एवढा राग का, असा प्रश्न मनात घोंगावत जाई. त्यातून फुल्यांचं वाङ्मय वाचायचा नाद लागला. पुढे डॉ. दाभोलकरांसोबत ‘साधना’ साप्ताहिकात लिहायला मिळालं. सनातनी लोक दाभोलकरांचाही राग करतात, हे कळलं.
फुल्यांचा द्वेष करणारे लोक दाभोलकरांचाही तिरस्कार करतात तर… फुले सांस्कृतिक गुलामगिरीतून सुटायचं, मुक्त व्हायचं सूत्र सांगत होते. दाभोलकर अंधश्रद्धेच्या गुलामगिरीतून मुक्त व्हायचं तत्त्व मांडत होते. मग दाभोलकर आणखी ‘अपील’ होऊ लागले.
फुल्यांनी ‘गुलामगिरी’ पुस्तक लिहिलं. दोनशे वर्षे होतील त्याला. सनातनी वर्ग गुलामगिरीचे नवनवे सापळे फेकत राहतो, बहुजन समाजावर. त्यातला एक सापळा अंधश्रद्धांचा. डॉ. दाभोलकर तो सापळा मोडायचं काम झपाटल्यासारखं करत होते. महात्मा फुल्यांनी जसं खडतर काळात महान काम केलं, तसं डॉक्टरांनी ज्या काळात काम केलं, तेही सोपं नव्हतं. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम रुजवण्यासाठी डॉक्टरांनी अहोरात्र ध्यास घेतला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यांनी अक्षरश: गावोगाव नेली. आज ‘अंनिस’ माहीत नाही, असा गाव सापडणार नाही. त्यामागे डॉक्टरांचे कठोर परिश्रम आहेत.
डॉक्टर काय-काय होते? त्यांच्यापासून काय-काय शिकता येऊ शकतं? वैचारिक स्पष्टता हे डॉक्टरांचं सर्वांत मोठं वैशिष्ट्यं. अंधश्रद्धा निर्मूलनाचं सूत्र त्यांनी चार गोष्टींत बांधलं
1. शोषण करणार्या अंधश्रद्धांना विरोध
2. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार आणि अंगीकार
3. धर्माची विधायक आणि कृतिशील चिकित्सा
4. व्यापक समाजपरिवर्तनासाठी संघटनांबरोबर सहयोग
छात्रभारती, राष्ट्रसेवा दलात काम करताना आम्ही तरुण डॉ. दाभोलकरांकडे आकर्षित झालो. पण आम्ही काही मोजकेजण नव्हतो. डॉ. दाभोलकरांचं व्यक्तिमत्त्वच इतकं ‘डायनामिक’ होतं की, तरुण-तरुणींचे घोळके त्यांच्याभोवती जमत. जिथे जाई तिथं हीच कथा. डॉक्टरांचं काम समजून घेता-घेता कधी तरुण, विद्यार्थी, कार्यकर्ते त्यांच्या नादी लागत, हे कळतही नसे. डॉक्टरही प्रत्येकामागे काही ना काही काम लावून देत.
नकारात्मकता हा भाग डॉक्टरांच्या व्यक्तिमत्त्वात नव्हताच. ते कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करत. त्याला झेपेल ते काम देत. कुणाची निंदानालस्ती करणं त्यांच्या स्वभावात नव्हतं. कुणाला कमी लेखणं तर नाहीच. स्वत:ची टिमकी ते वाजवत नसत. मी खूप मोठा चळवळीचा नेता वगैरे आहे, असा अहंगंडी स्वभाव नव्हता त्यांचा. कार्यकर्ते कब्जात ठेवण्याची वृत्ती नव्हती. स्वत:चा पंथ तयार व्हावा, असा खटाटोप नव्हता त्यांचा. बरोबर न आलेल्या कार्यकर्त्यांची हेटाळणी ते करत नसत. तुच्छतावादी नव्हते ते.
डॉ. दाभोलकर, महात्मा फुले यांच्यासारखे महासमन्वयक होते. सर्वांना बरोबर घेऊन चळवळ, उपक्रम पुढे नेण्याची त्यांची हातोटी होती. निळू फुले, श्रीराम लागू, बाबा आढाव, एन. डी. पाटील, गोविंद पानसरे, पुष्पा भावे अशी दिग्गजांची मांदियाळी त्यांनी ‘अंनिस’च्या उपक्रमात सहभागी करून घेतली. शास्त्रज्ञ, अभिनेते, अभिनेत्री, शिक्षक, उद्योजक, पत्रकार अशा विविध क्षेत्रातले लोक त्यांनी जोडले. चळवळीच्या वाढीला त्याचा उपयोग झाला.
वेळेचं नियोजन शिकावं ते डॉ. दाभोलकरांकडून. ते मोजकं, कामाचं बोलत, फाफट पसारा, चर्चा नको असे त्यांना. चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी दाभोलकरांकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. ते स्वत: आदर्श कार्यकर्ते होते. नंतर चळवळीचा आदर्श नेताही झाले.
एकाच माणसात किती गुण असू शकतात! ते सत्यशोधक संपादक होते, प्रभावी वक्ते होते, चतुर संघटक होते. बुवा-बाबांना पकडणारी संघटना होऊ नये म्हणून त्यांनी ‘अंनिस’ला सतत कल्पक कार्यक्रम दिले. ‘शोध भुताचा- बोध मनाचा’, चमत्कार घडवा – यात्रा अडवा’, ‘वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प’, ‘विज्ञान वाहिनी’ हे आणि यांसारखे अभिनव उपक्रम त्यांनी दिले. एवढे कल्पक उपक्रम देणारी संघटना देशात कोणती नसेल. म्हणून ‘अंनिस’चा बोलबाला वाढला. प्रत्येक पिढीतला तरुण या उपक्रमांनी ‘अंनिस’कडे ओढला. जात, धर्म, वर्ग, लिंग, भेदाच्या पलिकडे जात ‘अंनिस’कडे कार्यकर्त्यांचं मोहोळ जमा झालं.
‘अंनिस’ला नवनवे कल्पक उपक्रम देत लेखन, साहित्याच्या माध्यमातून दाभोलकरांनी प्रबोधनाचा झंझावात तयार केला. ‘तिमिरातुनी तेजाकडे’ घेऊन जाण्यासाठी त्यांची पुस्तकं उपयुक्त ठरणारी आहेत. त्यांच्या हयातीतच डॉ. नरेंद्र दाभोलकर हे एक ‘सेलिब्रिटी’ लेखक झाले होते. मराठीतले सर्वांत जास्त वाचले जाणार्या लेखकांमध्ये त्यांचे नाव समाविष्ट झाले होते. त्यांच्या लेखनात वैचारिक भूमिकेची स्पष्टता आणि सोपेपणा, थेटपणा होता. त्यामुळे त्यांची पुस्तकं अल्पावधितच ‘बेस्ट सेलर’ झाली.
संपादक म्हणून दाभोलकर कसे होते, हा स्वतंत्र लेखनाचा विषय होईल, इतकं त्यांचं काम थोर आहे. 1998 साली ते ‘साधना’चे संपादक झाले. शेवटपर्यंत संपादक होते. ते संपादक म्हणून आले, तेव्हा ‘साधना’ची आर्थिक परिस्थिती बरी नव्हती. दाभोलकरांनी वर्गणीदार वाढवले, जाहिरातदार वाढवले. ‘साधना’ आर्थिदृकष्ट्या सक्षम केली. ‘साधने’च्या आयुष्यात दाभोलकर आले नसते तर… कल्पना करवत नाही. संपादक दाभोलकरांना जवळून बघायला मिळालं. त्यांनी अनेक नवे लेखक लिहिते केले. रिपोर्टिंगसाठी नव्या पत्रकारांना ते विविध ठिकाणी पाठवत. त्यासाठी पैसे खर्च करत. नवे-जुने लेखक यांचा मेळ घातला. दर्जेदार बनवलं साधना साप्ताहिक.
दाभोलकरांचं व्यवस्थापन खूप प्रभावी असायचं. त्यांना एखादा बंद पडलेला आजारी साखर कारखाना चालवायला दिला असता, तर त्यांनी तो अल्पावधीत फायद्यात आणला असता. अशी अजब क्षमता होती त्यांच्यात. ‘साधना’चे वेगवेगळे विशेषांक निघत. त्याचं ‘मार्केटिंग’ करावं, तर ते फक्त दाभोलकरांनी. भाषा ‘कार्पोरेटी’ नाही; चळवळीचीच, प्रबोधनाचीच; पण समोरचा प्रभावित झाला पाहिजे आणि ‘कन्व्हिन्स’ होऊन खिशात हात घालून किमान ‘साधने’चा वर्गणीदार तर झालाच पाहिजे. ‘साधने’चा वर्गणीदार होणं, ‘अंनिस’ वार्तापत्राचा वर्गणीदार होणं, ही सुरुवात असे. पुढे ती व्यक्ती दाभोलकरांच्या नाना उपक्रमांत कधी सामील होई, तिचे तिलाही कळत नसे. पुन्हा ती व्यक्ती एकटी येत नसे. त्या कुटुंबाला दाभोलकरांची ‘चळवळ बाधा’ होई. अशी हजारो कुटुंबं दाभोलकरांच्या चळवळीत आलेली आपल्याला पाहायला मिळतात.
अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, जातपंचायत कायदा हे दाभोलकरांनी महाराष्ट्रालाच नव्हे, तर भारताला दिलेलं मोठं योगदान आहे. हा कायदा सहजासहजी झाला नाही. दाभोलकरांना शहीद व्हावं लागलं. या कायद्याचा पाठपुरावा मंत्रालयात, विधिमंडळच्या अधिवेशनात त्यांनी किती चिकाटीने केला, हे जवळून पाहिलंय. मुख्यमंत्री, मंत्री यांच्या केबीनमध्ये वाट पाहत थांबणं, त्याच्या वेळा मिळवणं, बैठकांच्या तारखांचा पाठपुरावा करणं मोठं कठीण काम; पण दाभोलकर कबड्डीपटू होते, ‘कॅचर’ होते. हातात धरलेलं काम सोडत नसत. गडी आऊट करत. ‘हनुमान उडी’ घेत. हा कायदा बनवताना दाभोलकरांनी किती बारीक अभ्यास करून शोषण करणार्यांना कायद्याच्या कचाट्यात आणलंय, हे कळतं.
पुढच्या वर्षी दाभोलकरांना जाऊन दशक होईल. महात्मा फुले यांनी ‘गुलामगिरी’ लिहिली. फुले-दाभोलकर गुलामगिरीच्या बेड्या तुटाव्यात म्हणून झगडले; पण गुलामगिरी नव्या रुपात सावरून उभी आहेच. नव्या गुलामीचा सामना कसा करणार? फुले-दाभोलकरांनी दिशा दाखवलीच; वाट तर आपल्याला चालावी लागेल. एन. डी. पाटील, डॉ. दाभोलकरांना ‘पृथ्वीमोलाचा माणूस’ म्हणाले. पृथ्वीमोलाच्या डॉ. दाभोलकरांची विचारांची शिदोरी आपल्याजवळ आहे. आपल्याला ती उभारी देणारी आहे, वाट दाखवणारी आहे.
लेखक संपर्क ः 99871 21300