डॉ. प्रवीण बनसोड -
बालमित्र–मैत्रिणींनो!
आज तुम्हाला मी दोन गोष्टी सांगणार आहे. गोष्टी आपल्या सर्वांना खूप आवडतात. मी लहान असताना माझी आजी मला खूपदा गोष्टी सांगायची. गोष्ट ऐकता-ऐकता आपण त्या गोष्टीचा एक भाग होऊ रमतो. शिवाय आपल्या मनावर संस्कारसुद्धा आपोआपच होत जातात. आजपासून साडेसातशे-आठशे वर्षांपूर्वी महान तत्त्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी आपला उपदेश सामान्य लोकांना सहजपणे समजण्यासाठी विविध कथा सांगितल्या, त्यांना ‘लीळा’ असे म्हटले जाते. त्यापैकी ‘ससीकरक्षण’ ही कथा आधी तुम्हाला सांगतो, त्यानंतर दुसरी कथा सुद्धा सांगेन.
शिकार्यांचे मतपरिवर्तन
एकदा एका गावी एका वृक्षाखाली श्री चक्रधर स्वामी हे आसनावर बसले होते. तेवढ्यात काही शिकार्यांना एक ससा दिसला. त्याला पकडण्यासाठी त्याच्या पाठीमागे त्यांनी कुत्री सोडली. कुत्र्यांच्या भीतीने ससा पळू लागला, तशी कुत्रीही त्याला पकडण्यासाठी पळत होती. जीवाच्या आकांताने ससा पळत-पळत स्वामींच्या मांडीखाली येऊन लपला. थोड्या वेळात कुत्री व शिकारीसुद्धा स्वामींच्या पुढे येऊन उभा राहिला. त्यांनी स्वामींना विनंती केली, “स्वामी, ससा सोडीजो जी:” स्वामींनी म्हटले, “तो येथे शरण आला आहे.” पुन्हा शिकार्यांनी विनंती केली की, “हा ससा होंडेचा म्हणजे आमच्या शर्यतीचा ससा आहे. ज्याची कुत्री या सशाला पकडतील तो जिंकतो. जर तुम्ही हा ससा सोडला नाही, तर आमच्यामध्ये भांडणे होतील.” त्यावर स्वामी शांतपणे त्यांना समजावून सांगतात. “हा गा हे रानी असती, तृण खाती, जंगलाचे पाणी पिती. तुमचे काय जाते? तर्ही याला कां गा मारा?” (हा गरीब ससा जंगलात राहून गवत खातो, पाणी पितो. कोणाला त्रास देत नाही. तरी तुम्हाला त्याला का मारता?) असे म्हणून स्वामींनी शिकार्यांना निरुपण केले. त्यामुळे त्यांचे मतपरिवर्तन झाले. शिकार्यांना आपल्या कृतीबद्दल पश्चात्ताप वाटू लागला, म्हणून स्वामींची क्षमा मागून ते निघून गेले. त्यानंतर स्वामींनी मांडी उचलून सशला “महात्मेहो, आता जा गा,” असे म्हटले. ससा निर्भयपणे जंगलात निघून गेला.
…तर बालमित्रांनो! या कथेतून स्वामींनी कोणता बोध दिला आहे? विचार करून सांगा!
अद्रकाची साल
आता आपण दुसरी कथा ऐकू! ही कथासुद्धा तुम्हाला नक्की आवडेल.
– एके दिवशी श्री चक्रधर स्वामी यांच्या शिष्या ‘बाईसा’ यांनी ‘देमाईसा’ यांना अद्रक देऊन धुऊन आणायला पाठविले. अद्रक जेव्हा आपण विकत आणतो, तेव्हा त्याला माती लागलेली असते. कारण अद्रक जमिनीखाली लागत असते. त्यामुळे त्याला स्वच्छ धुऊन घ्यावे लागते. देमाईसा जवळच्या ओढ्याजवळ जाऊन अद्रक धुतात. अद्रक धुताना त्यावरील साल निघताना आपण पाहतो. ही साल कोणतीही उपयोगाची नसते. देमाईसा अद्रक स्वच्छ करत असताना त्यावरील सालीचा कोंडा जमा करून गाठीस बांधून घेतात. थोड्या वेळाने अद्रक स्वच्छ करून देमाईसा परत येतात व स्वच्छ अद्रक बाईसांकडे देतात. श्री चक्रधर स्वामी यांचे आसन बाहेर ओसरीवर असते. त्यांना पाहून देमाईसा स्वामींना दंडवत करते. तेव्हा स्वामी विचारतात, “देमती गाठीशी काय आहे?” ती म्हणाली, “जी बाईसी आले धुवविले, त्याचा कोंडा वाया जाईल म्हणून मी तो गाठीस बांधून ठेवला. होईल अन्नासोबत खावयास जी.”
त्यावर स्वामी देमाईसांना विचारतात,
“बाईसाते पुसिले,” म्हणजे बाईसांना विचारले का? त्यावर देमाईसा म्हणते, “इतक्यासाठी काय विचारावे जी?” त्यावर स्वामी देमाईसांना निरुपण करतात. देमाईसाला आपली चूक लक्षात येते. अद्रकाच्या सालीसारखी क्षुल्लक वस्तूसुद्धा न विचारता घेऊ नये, असा बोध या कथेतून स्वामींनी दिला.
…तर बालमित्रांनो! आजपासून आठशे वर्षांपूर्वी श्री चक्रधर स्वामी यांनी जीवनव्यवहाराचे निरुपण छोट्या-छोट्या लीळांमधून केले. दया, क्षमा, शांती यासोबतच दैनंदिन जीवनातील व्यवहारसुद्धा त्यांनी शिकविला. या कथा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील.