अतुल बाळकृष्ण सवाखंडे - 9921976277
साधा साप दिसला की तो मारायचा..हे सर्वसामान्य लोकांच्या मनावर बिंबवलं गेलं आहे..साप म्हणजे शत्रू, हीच शिकवण पिढ्यान्पिढ्या मिळाली आहे…साप ही जमात मानवी अप्रचाराने बदनाम झाली आहे.. विषारी साप कुठला आणि बिनविषारी कुठला, हे ओळखता न आल्याने माणूस घाबरतो..त्याच्या या अज्ञानातूनच सापांवर वार केले जातात..सापांच्या जाती ओळखता न आल्याने सुद्धा अनेक जणांचा जीव जातो..
साप म्हटलं की त्या पाठोपाठ येते भीती आणि अंधश्रद्धा. या कारणांमुळेच साप दिसला की ठेचला जातो…असे हजारो साप भारतात रोज मारले जातात..हे पाहून असं वाटतं की आपण आपल्याच पायावर कुर्हाड मारायचे काम करतो…
साप जेवढा शेतकर्यांचा मित्र आहे, त्याहून ज्यादा तो सबंध पृथ्वीवरील मानवजातीचा मित्र आहे. कारण जवळ जवळ 30 टक्के औषधांमध्ये सर्पविष हे औषध म्हणून वापरले जाते…उदाहरण घ्यायचं म्हटलं तर…अंगदुखी, कॅन्सर; तसेच भूल देण्याच्या इंजेक्शनमध्ये या विषाचा वापर होतो..म्हणूनच साप हा मानवाचा मित्र आहे..
साधा साप दिसला की तो मारायचा..हे सर्वसामान्य लोकांच्या मनावर बिंबवलं गेलं आहे..साप म्हणजे शत्रू, हीच शिकवण पिढ्यान्पिढ्या मिळाली आहे…साप ही जमात मानवी अप्रचाराने बदनाम झाली आहे.. विषारी साप कुठला आणि बिनविषारी कुठला, हे ओळखता न आल्याने माणूस घाबरतो..त्याच्या या अज्ञानातूनच सापांवर वार केले जातात..सापांच्या जाती ओळखता न आल्याने सुद्धा अनेक जणांचा जीव जातो..साप चावला की मांत्रिकाकडे जायचे, हे आजही खेडोपाड्यात लोकांच्या मनावर ठासले गेले आहे. बर्याचदा साप बिनविषारी असतो; मग तातडीने मांत्रिकाकडे धाव घेतल्यानेच आपला जीव वाचला, अशी समजूत व्हायची..लोकांचा मांत्रिकावरचा विश्वास त्यामुळे वाढला..सापावर पाय पडला किंवा त्याला त्रास झाला तरच तो चावतो..आपला पाय स्थिर असला, तर तो पायावरून जाईल; पण चावणार नाही. मुळात दंश करणे हा सापाचा गुणधर्म नाही..ते त्याचे स्वसंरक्षण आहे. त्याबद्दल अनेक दंतकथा आहेत..या अशा कथांमुळे लोकांच्या गैरसमजुती अधिक अधिक दृढ होत गेल्या…
“जोपर्यंत तुम्ही एखाद्या प्राण्याला दुखवत नाही किंवा मारण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत तो प्राणी तुमच्यावर हल्ला करीत नाही.”
त्याला साप सुद्धा अपवाद नाही. मात्र या जीवसृष्टीत माणूस हा एकमेव प्राणी आहे, जो विनाकारण स्वतः बरोबर इतरांनाही त्रास देतो आणि स्वतःवर नको ती संकटं ओढवून घेतो.
जगामध्ये सुमारे 2700 प्रकारचे साप आढळतात. भारतात त्यापैकी 278 जाती सापडतात..त्यात काही विषारी आहेत, काही सौम्य विषारी; तर बहुसंख्य बिनविषारी आहेत. आपण एकदा जर हे विषारी साप ओळखायला शिकलो आणि स्वतः त्यांच्यापासून सुरक्षित अंतरावर राहिलो तर स्वतःला सहज वाचवता येतं..
सापाच्या विषावरून प्रकार
(विषारी, निमविषारी,बिनविषारी)
महाराष्ट्रात एकूण 52 जातीचे साप आढळतात. त्यात हाताच्या बोटांवर मोजण्याइतके साप विषारी आहेत.
नाग, मण्यार, घोणस, फुरसे व चापड्या हे पाच विषारी साप प्रामुख्याने आपल्या सभोवती आढळतात..यानंतर राहिलेले सगळेच बिनविषारी म्हणजे ज्यांच्या चाव्यानंतर आपल्याला मृत्यू येत नाही. या सापांना आपण बिनविषारी म्हणतो. उदाहरणार्थ धामण, गवत्या, तस्कर, अजगर, मांडूळ, दिवड, पट्टेरी पान सर्प, कुकरी इत्यादी.
यानंतर विषारी आणि बिनविषारी यामध्ये मोडणारा सापांचा एक गट आहे त्याला निमविषारी साप म्हणतात… की जे चावले असता आपल्याला फक्त झोप येते 5 ते 6 तास. यांना निमविषारी असे म्हणतात. उदा. हरणटोळ व मांजर्या हे दोन साप या प्रकारात मोडतात..
विषारी साप
1. नाग– (cobra) – डिवचताच किंवा धोका वाटताच फणा काढून उभे राहतात, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच सगळ्या सापांपेक्षा या सापाच्या बद्दल जास्त अंधश्रद्धा आहेत. त्याचे विष हे मज्जासंस्था म्हणजेच आपल्या ज्ञानेंद्रियावर परिणाम करणारे आहे. भारतातील दोन नंबरचा विषारी साप आहे..याची मादी एक वेळेस 8 ते 10 अंडी घालते.
2. मण्यार– (krait) – हा साप भारतातील एक नंबरचा विषारी आहे. याचे विष मज्जासंस्थेवर परिणाम करणारे आहे. हा रात्रीचा बाहेर पडतो. निळसर काळ्या अंगावर पांढरे आडवे पट्टे किंवा ठिपके असतात. ते शेपटीकडे गर्द होत जातात. हा साप नागपेक्षा 15 टक्के जास्त विषारी आहे. याची मादी एका वेळेस 6 ते 8 अंडी घालते.
3. घोणस (Russel’s viper) – भारतातील सर्वांत जास्त मृत्यूस कारणीभूत ठरणारा हा साप. धोका जाणवताच कुकरच्या शिट्टी सारखा आवाज काढून स्वतःचे अस्तित्व दाखवतो..अंगावर रुद्राक्षाच्या माळेची डोळ्यापासून शेपटीपर्यंतची रचना..शेपटी आखूड व तोंड त्रिकोणी मोठे..रक्तावर परिणाम करणारे विष..या सापाची साधारण 4 फुटांपर्यंत वाढ होते. बर्याचदा लोक त्याला अजगर समजतात. याची मादी एक वेळेस 60 ते 65 पिल्लांना जन्म देते. सगळी पिल्ले जन्मल्यावर दोन तासात त्यांना विषाची तीव्रता जास्त असते. त्यांचे विष हे रक्तावर परिणाम करणारे आहे.
4. फुरसे-(saw scaled viper) – हा सर्प लांबीला जास्तीत जास्त एक फूट, अंगावर खवले, डोक्यावर बाणाचे चिन्ह. डिवचला असता किंवा धोक्याची चाहूल लागताच हा शरीर एकमेकांवर घासून आवाजाची निर्मिती करतो व एक प्रकारे आपल्याला सूचना देत असतो. जवळ येऊ नये अशी..याचे विष हे रक्तविष आहे. साधारण माळरानावर, दगडाखाली राहणे याला आवडते. विंचू, पाली, सरडे हे याचे खाद्य आहे. एक वेळेस 6 ते 10 पिल्लांना हे जन्म देतो. हा भारतात सर्वत्र आढळतो.
निमविषारी साप–
1.हरणटोळ (wine snake) –
पोपटी हिरव्या रंगाचा हा साप झाडावर वास्तव्य करतो. तोंड निमुळते; तसेच शरीराच्या मानाने शेपटी लांब व सडपातळ असते. यालाच काही भागामध्ये टाळूफोड्या साप असे म्हणतात. कारण हा झाडावरून जर माणसाला चावला तर प्रथम माणसाचे डोकेच त्याला दिसते व धक्का लागला तर शरीराच्या डोक्याला म्हणून हा डोक्याला चावतो हा टाळू फोडतो, ही एक अंधश्रध्दा आहे. झाडावरील पाली, सरडे, पक्षी खाणारा हा साप आहे. मानवाला चावल्यास माणूस 6 ते 8 तास शांत झोपतो.
2. मांजर्या साप–
पडकी घरं, वाडे, झाडी यामध्ये वास्तव्य पाली, उंदीर, पक्षी खाऊन हा साप राहतो. शरीरभर v आकाराची नक्षी असते. डिवचल्यास आक्रमकपणे चावतो. शेपटीची हालचाल सारखी ठेवतो. भक्ष्याच्या शोधात बहुधा तो रात्री बाहेर पडतो. हा साप अंडी घालतो. चावला असता माणूस 4 ते 6 तास झोपतो. याच्या डोळ्यांची रचना ही मांजर्याच्या डोळ्यांसारखी आहे. त्यामुळेच याला ‘मांजर्या’ हे नाव देण्यात आले आहे.
बिनविषारी साप–
भारतात 278 जातीचे साप आढळतात. त्यापैकी फक्त हाताच्या बोटांवर मोजण्याइतके म्हणजे 3 टक्के साप हे विषारी आहेत; बाकीचे राहिलेले सर्व साप हे बिनविषारी आहेत. 15 सेंटिमीटर लांबीचा लहानात लहान वाळा साप ते 11 मीटर लांबीचा अजगर साप…
ठराविक बिनविषारी सापाची नावे पाहा. वाळा, विंचू वाळा, खापरखवल्या अजगर, डुरक्या घोणस, मांडूळ, तस्कर, धामण, धूळनागीण, चिगांग नायकुळ, कुकरी साप, कवड्या, काळतोंड्या, नानेटी, गवत्या, पानदिवड इत्यादी.
वरील सर्व सर्प हे मानवापासून दूर राहणे पसंत करतात. चुकून धक्का लागून पाय पडला असता हे साप आपल्याला चावतात. विशेषतः पावसाळ्याच्या सुरुवातीस सर्प चावण्याचे प्रमाण हे अधिक दिसून येते. कारण या वातावरणात झालेल्या बदलामुळे साप नवीन जागांचा शोधात असतो; तसेच बर्याचशा सापांची; प्रामुख्याने घोणस सापाची मादी जून महिन्याच्या सुरुवातीस 45 ते 60 पिलांना जन्म देत असते. ही सर्व पिल्ली भक्ष्याच्या शोधात इतरत्र फिरत असतात. अशा वेळेस साप निघाण्याचे व शेतीच्या पेरणीची व इतर कामांची सुरुवात यामुळे या दिवसात सर्पचाव्याच्या दुर्घटनेचे प्रमाण अधिक आहे.
नागपंचमीनिमित्त
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली 15 वर्षे ‘सर्प ः समज गैरसमज’ या विषयावर शाळा, कॉलेज, खेडोपाडी जाऊन प्रबोधन करत आहे. शेकडो कार्यकर्ते या पंधरवड्यात विविध ठिकाणी जाऊन पोस्टर्स प्रदर्शनाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम करतात. यामध्ये प्रामुख्याने साप हा पर्यावरणाचा प्रमुख घटक, त्याच्या विषाचे औषधामधील स्थान, अन्नसाखळीतील महत्त्व; तसेच त्याच्याबद्दल असलेल्या अंधश्रद्धांचे निर्मूलन हे विषय घेऊन लाखो विद्यार्थी हे समाजापर्यंत पोचले आहेत. प्रामुख्याने का हा सण म्हणून साजरा करतो, याकडे पाहूया. आपली संस्कृती ही शेतीप्रधान आहे. आपल्याला जे-जे उपयोगी पडतात, त्यांचे आपण आभार मानतो, त्यांचा गौरव करतो.
उदा. झाडांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना वटपौर्णिमा, बैलांसाठी बैलपोळा, साप उंदराचा नायनाट करतात व शेतकर्यांच्या पिकांचे संरक्षण करतात म्हणून सापांचा एक प्रतिनिधी म्हणून नागाची पूजा म्हणजेच नागपंचमी हा सण साजरा केला जातो.
परंतु जिवंत नागाची पूजा करणे हे धोक्याचे आहे. एक तर साप दूध पित नाही. प्यायला दिलेच तर ते त्याला विषासारखे आहे. दुसरी गोष्ट सापाच्या अंगावर आपण हळदी-कुंकू टाकतो. त्यामुळे कालांतराने त्याच्या अंगावरची स्किन गळायला लागते. त्यामुळे खर्या अर्थाने आपण प्रतीकात्मक जर पूजा करायची असेल तर मूर्तीची किंवा प्रतिमेची करावी. निसर्गातील प्रमुख घटकांना जीवदान द्यावे.
सर्प ः समज व गैरसमज
सापाबाबत बर्याचशा अंधश्रद्धा या ऐकीव, पुरातन काळापासून चालत आलेल्या; तसेच प्रसारमाध्यम, चित्रपट यातूनच जास्त पसरल्या आहेत. खरे तर अत्यंत शांत, खाणे-पिणे व झोप काढणे एवढंच माहीत असलेला साप आपण मोठ्या प्रमाणात बदनाम केला आहे. लक्षात ठेवणे, स्मरणात राहणे या गोष्टी सापाकडे बिलकुल नाहीत. त्यामुळे बदला घेणे हा प्रकार सापाच्या बाबतीत घडत नाही. मात्र चित्रपटांमुळे या अफवांचा जास्त प्रसार झाला आहे. शाळा, कॉलेज, खेड्यांमध्ये प्रसार करताना आलेले काही प्रश्न, समस्या, त्या त्या भागातल्या अंधश्रद्धा पाहू…
1. साप डूक धरतो का?
सापाचा मेंदू विकसित झालेला नाही. त्यामुळे साप डूक धरणे व बदला घेणे. ही गोष्ट अशास्त्रीय आहे. भूक लागली असता भक्ष्य पकडणे, तहान लागल्यावर पाणी पिणे आणि झोपा काढणे या पलिकडे साप विचार करू शकत नाही. त्यामुळे त्रास देणारी व्यक्ती लक्षात ठेवू शकत नाही म्हणजेच साप डूक धरत नाही.
2. सर्पविषावर मंत्रपचार चालतो का?
सर्पदंश झाल्यावर सर्पप्रतिबंधक इंजेक्शन (ASVS) दिल्यानेच रुग्ण बरा होऊ शकतो. विषारी साप चावला असता कोणतेही मंत्रतंत्र, जाडीबुटीचे औषध, अंगारे-धुपारे, भस्म आयुर्वेदिक व तत्सम औषधे यांचा उपयोग होत नाही.
3. रातराणी या वनस्पतीमुळे साप येतात का?
रातराणी फुलांच्या सुगंधामुळे त्या ठिकाणी अनेक प्रकारचे कीटक आकर्षित होतात. त्यांना खाण्यासाठी बेडूक, पाल, सरडे येतात. यांना खाण्यासाठी साप त्या ठिकाणी येतात.
4.सर्पदंश होऊ नये म्हणून रात्री शेतकरी काठी आपटत चालतात, ते का?
काठी आपटल्याने उत्पन्न होणार्या ध्वनिलहरींची संवेदना सापांना जाणवते. ही संवेदना सुमारे 50 फूट अंतरावरून सापांना जाणवते. त्यामुळे वाटेत असलेला साप बाजूला निघून जाऊ शकतो. त्यामुळे आडवाटेत साप येणे किंवा सापावर पाय पडणे अशा घटना टाळू शकतो.
5. मेलेल्या सापावर रॉकेल टाकले असता तो पुन्हा जिवंत होतो का?
नुकत्याच मारलेल्या सापावर जर रॉकेल टाकले तर जखमेस प्रचंड वेदना होतात. त्यामुळे साप वळवळू लागतो. परंतु ही हालचाल काही क्षणापुरती असते. साप जिवंत होत नाही.
6. साप दूध पितो का?
सर्व साप हे मांसाहारी आहेत. उंदीर, घुशी, बेडूक, सरडे, पाली, छोटे पक्षी आदी सापाचे अन्न आहे. साप दूध पित नाही. सापाला दूध पाजल्यास सापांच्या अन्ननलिका, श्वसनसंस्थेतील अवयवांवर परिणाम होऊन सापांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. दूध हे सापांना विषासारखे आहे. गारुडी लोक सापाला अनेक दिवस तहानलेला ठेवतात, समोर दुधाची वाटी ठेवली असता, तो पाणी समजून पितो.
7. नागमणी असतो हे खरे आहे का?
कोणत्याही नागाच्या डोक्यावर नागमणी नसतो. गारुडी नागमणी म्हणून जे दाखवतात तो काचेचा, असबेस्टसचा खडा असतो.
8. मुंगूस जखमी झाल्यास ते विशिष्ट झाडाचे मूळ खाऊन स्वतःचा बचाव करतात, हे खरे आहे काय?
साप हे मुंगसाचे भक्ष्य आहे. त्यामुळे आपले भक्ष्य पकडण्यासाठी मुंगूस अतिशय चपळतेने हल्ला करतो. त्यामुळे मुंगूस सहसा मरत नाही. तरीसुद्धा मुंगसाच्या शरीरावर वार केला नसलेल्या ठिकाणी (पाय किंवा तोंड, नाकाच्या शेंडा) नागाने चावा घेतल्यास मुंगूस मरू शकतो.
9. मांडूळ सापाची किंमत (तस्करी) का केली जाते?
जमिनीखाली आढळणारा अत्यंत शांत स्वभावाचा हा साप. शेपटीकडील बाजू ही तोंडासारखी आकाराने असते. त्यामुळे या सापाला ‘दुतोंड्या’ असेही म्हटले जाते. परंतु हल्ली या पंधरा वर्षांत मांत्रिक-तांत्रिक लोकांकडून या सापांना पकडून मंत्रविधी केल्याने पैशांचा पाऊस पडतो. घरात ठेवल्याने धनलाभ होतो, तर बुटक्या माणसांची उंची वाढते. कॅन्सरवर रामबाण इलाज या अशा अफवांमुळे हा साप बदनाम झाला आहे. बर्याचदा तस्करी करताना हा साप पकडला आहे. परंतु रोखीने व्यवहार एकदाही झाला नाही. या सार्या अफवा आहेत.
10. जुना किंवा देवाचा नाग असल्यास त्याच्या अंगावर केस असतात का?
सरपटणार्या प्राण्यांच्या अंगावर केस असतात, गारुडी किंवा मदारी लोक मेंढीच्या किंवा शेळीच्या शेपटीच्या केसांचा पुजका मोठ्या सुईमध्ये ओवून टाकतात आणि त्याला मिशीसारखा आकार प्राप्त होतो. काही दिवसांनी ही जखम भरल्यास केस घट्ट बसतात. आणि गारुडी लोक यालाच देवाचा नाग म्हणून लोकांना फसवतात.
सापांबद्दलच्या अंधश्रद्धा कोणत्या?
सापांबद्दल वेगवेगळ्या ठिकाणी अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा, गैरसमज आहेत, त्या पुढीलप्रमाणे :
1) साप दूध पितो.
2) साप पुंगीच्या तालावर डोलतो
3) सापांना सुगंधाची आवड असते. तो केवड्याच्या बनात राहतो.
4) साप ‘डूक’ धरतो, त्याला चिडविणार्या किंवा त्रास देणार्या व्यक्तीचा बदला घेतो.
5) साप काही वर्षांनी मानवी अवतार घेतात.
6) साप चावला असता उलटा होतो. त्यामुळे विष शरीरात जाते.
7) धामणीच्या शेपटीत काटा असतो. ती गायी-म्हशीच्या नाकात शेपटी घालून त्यांना मारते. धामण गायी-म्हशीच्या पायाला विळखा घालून दूध पिते
8) जुनाट सापांच्या शरीरावर केस असतात.
9) साप धनसंपत्तीचे रक्षण करतो.
10) सर्पविष मंत्रोपचाराने उतरवता येते.
11) नागाच्या डोक्यावर नागमणी असतो.
12) हरणटोळ सर्प माणसाच्या डोक्यावर उडी मारून टाळू खातो.
13) अजगर माणसाला गिळतो.
14) गरोदर स्त्री आणि साप यांची नजरानजर झाल्यास सापाचे डोळे जातात.
15) गरोदर स्त्रीने सापाला पाहिल्यास जन्मणारे मुलास जीभ चाटण्याची सवय लागते.
16) वापरलेले सॅनेटरी नॅपकीन जर सापाने खाल्लं तर गर्भ धरत नाही.
17) साप पकडणार्यांकडे मंत्र असतो.
18) सापांच्या जुळ्यामधला एखादा मारला तर दुसरा साप बदला घेतो. या अशा अनेक अंधश्रद्धा सर्रास बोलल्या जातात.
सर्पदंश होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी?
1.सर्वप्रथम हे लक्षात घेऊयात की, जिथे उंदीर, पाल, सरडे, बेडूक, घुशी हे असतील, तिथे साप हा हमखास येणारच. म्हणून आपणही दक्षता घेऊयात की, वरील कोणताही जीव आपल्या आसपास नसावा, जेणेकरून सापाचा व आपला मुकाबलाच होणार नाही.
2. बरेच दिवस पडलेले विटांचे ढीग, अडगळ या ठिकाणी हात घालताना पहिल्यांदा काठी जमिनीवर आपटावी, मगच हात घालावा.
3. शेतात रात्री-अपरात्री जाताना काठी आपटत चालावे. कारण सापांना आवाज नाही; पण जमिनीची कंपने जास्त लवकर जाणवतात व ते रस्ता सोडून दूर जातात.
4. अडगळीच्या ठिकाणी, शेतात किंवा जंगलभ्रमंती करताना नेहमी डोक्यावर टोपी आणि पायात बूट असायला हवेत
5.शेतातील घरात झोपण्याची वेळ आल्यास; नेहमी खोलीच्या मधोमध झोपावे, जमल्यास कॉटही मधोमध ठेवूनच झोपावे. कारण साप जर घरात आला तरी भिंतीच्या कडेनेच तो फिरत असतो.
6. घराबाहेरील रात्रीचा बल्ब हा नेहमी दरवाजा सोडून बसवावा. कारण जळता बल्ब हा रानातील किडे आकर्षित करतो व किड्यांना खायला पाल किंवा बेडूक व त्यांना खायला साप येण्याची शक्यता अधिक असते म्हणून बल्ब नेहमी कडेला बसवावा.
7. घरातील पाळीव पशु-पक्षी घरात न ठेवता काही अंतरावर सुरक्षित पिंजर्यात ठेवावेत.
सर्पदंशानंतर घ्यावयाची काळजी (प्रथमोपचार)
* रुग्णास कोणत्याही प्रकारची हालचाल करू देऊ नका.
* दंश झालेल्या ठिकाणी रुमालाने, दोरीने 3/4 रुंदीचे कापड किंवा शक्य झाल्यास ‘क्रेप बॅन्डेज’ने बोट किंवा पेन राहील, अशा अंतराने मध्यम दाब देत बांधावे.
* दंश झालेला भाग जंतुनाशकाच्या सहाय्याने स्वच्छ करावा.
* कोणत्याही प्रकारच्या शस्त्राने जखम कापू नये/खराब करू नये.
* मानसिक संतुलनही स्थिर ठेवावे, जास्त चिंताजनक वातावरण करू नये.
* रुग्णास काहीही खाण्यास किंवा पिण्यास देऊ नये.
* विनाविलंब दवाखान्यात घेऊन जावे.
सर्पदंशामुळे मनुष्य मृत्युमुखी पडण्याची प्रमुख कारणे
* दंशाच्या ठिकाणाहून दवाखान्यापर्यंत पोचायला केलेला विलंब
* रुग्णामध्ये भीती निर्माण होणे.
* चुकीचे प्रथमोपचार – नस/शीर कापून घेणे.
* रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती (Immunity) कमी असणे.
* रुग्णाच्या शरीरात विषाची मात्रा जास्त जाणे.
आज हजारो सर्पमित्र महाराष्ट्रात प्रत्येक खेडोपाड्यापर्यंत काम करत आहेत. कोणताही मोबदला न घेता पर्यावरण संरक्षणाचे काम करत आहेत. जीवाची पर्वा न करता वारंवार शासनाकडे पाठपुरावा करूनही अजूनपर्यंत या सर्पमित्रांना विमा संरक्षण शासनाकडून मिळाले नाही बर्याच वेळा स्वयंघोषित सर्पमित्राकडून साप पकडून स्टंटबाजी केली जाते. फोटो काढून सोशल मीडियावर प्रसारित केले जातात. दरवर्षी महाराष्ट्रात शेकडो सर्पमित्र हे ‘स्नेक बाईट’मुळे मृत्युमुखी पडतात. सर्वांनी कायद्याचे पालन करून यावेळेची पर्यावरणपूरक नागपंचमी साजरी करूया.
-अतुल बाळकृष्ण सवाखंडे (शासनमान्य सर्पमित्र, चाकण) संपर्क – 99219 76277