मुंज्याचं जेवण

सुभाष किन्होळकर -

लॉकडाऊननंतर ऋषभची शाळा नव्याने सुरू झाली. सुरुवातीला हवी तशी मुलं वर्गात येत नव्हती, हेही खरे; मात्र पंधरा-वीस दिवसांनंतर कोरोनाचं वातावरण निवळू लागलं. पुन्हा शाळेचं आवार मुलांनी भरून आलं. सात-आठ महिने बंद असलेल्या परिसराला आनंदाचं उधाण आलं. पुन्हा नव्याने मित्र-मैत्रिणींचे घोळके जमू लागले. तोच पूर्वीसारखा आनंद शाळाभर दिसू लागला. तासिकाही नियमित सुरू झाल्या होत्या. ऋषभही आनंदात बुडाला होता.

शाळेचे दिवस भराभर पुढे सरकत होते. महिनाभरात आधीसारखं वातावरण तयार झालं. मुलंही अभ्यासाला लागली होती. ऋषभनंही अभ्यासाचा जोर धरला होता. तो वर्गात हुशार होता. पाठांतर चांगलं होतं. सांगितलेला गृहपाठ रोज करायचा. जिज्ञासूही होता. विज्ञान विषयाची त्याला फार गोडी होती. उगीच घरी राहणं त्याला मुळीच पसंत नसायचं.

शनिवारचा दिवस उजाडला होता. नेहमीप्रमाणे सकाळची शाळा होती. ऋषभनं शाळेची तयारी चालविली. गणवेष चढवला.

दप्तरही पाठीला टांगलं. आपण चाललो हे आईला सांगावं, म्हणून तो आईकडे वळला. आई उडदाच्या दाळीचं वाटण मिक्सरमधून काढत होती. ते पाहून त्याला आनंद झाला. आज वड्यांची मज्जाच मज्जा म्हणून त्याला खुशी झाली; तशातच त्याचा चेहरा उजाळलाही. एवढ्यात त्याची आई त्याला म्हणाली,

“जाताना कपिलीच्या घराकडून जाय?”

“काहून? काई काम हाये काय त्याच्याशी?”

“त्याले मुंज्याचं जेवण सांग आपल्या घरी. आज मुंजे घालणं हाये आपल्याले. त्याच्यासाठीच तं एव्हळा कुटाना चालला पहाटंपासून.”

ऋषभला मुंजे घालणं म्हणजे वड्याचं जेवण बनवणं इतकंच ठाऊक होतं. मुंजे म्हटलं की, दरवर्षी खाण्याची मज्जा असते, एवढंच त्याच्या डोक्यात होतं. नेमकं मुंजे म्हणजे काय, याविषयी तो अज्ञान होता; पण आता त्याचं वयही वाढलं होतं. जेमतेम बारा-तेरा वर्षांचा झाला होता. त्याच्या आचार-विचारांत बदल झाला होता, वागणं-बोलणंही बदललं होतं. आधीच तो जिज्ञासू होता. म्हणून त्यानं आईला विचारलं, “मी कधीपासून मुंजे ऐकून राह्यलो, पन मले त्याचा उकल काई कळून राह्यला नाई. नेमके मुंजे म्हंजे काय, मले एकदा सांग बरं मा. अन् ते दरवर्सी काहून घालना पळता?”

“आपल्या घराण्यातलं कोनी बिनालगनाचं मरेल असलं की, त्याचे मुंजे घालनं पळता. त्याले जेऊ नाई घातलं की, लेकराले तरास देत आस्तो. त्याले सतावत आस्तो. त्याले आजारीबी पाळतो. असं व्हवू नाई म्हनून त्याले पोटभर जेऊ घालनं पळते. तो पोयभर जेवला की, वरीसभर मंग तरास देत नाई.”

“मंग त्याचा अन् कपीलचा काय संबंध?” ऋषभ ठासून म्हणाला. आई बिचारी त्याच्या शब्दांवर जरा आकसलीच, तरीही ती म्हणाली,

“कपील जेवनं म्हंजेच मुंजा जेवनं. त्याचं पोट भरलं की, मुंज्याचं पोट भरलं, असं माननं पळते.”

“कायबी सांगून राह्यली मा तू, असं कुठी हाये काय?”

“मुंज्याच्या बाबतीत असं काईमाई बोलू नको. उगीच हुशारी दाखवू नको परं. मुंज्यानं धरलं कदी तं आठ दिवस उठनार नाई तू बिस्तर्‍यावरून.”

“मले नी पटत मा असं काई.”

“तुले पटो की ना पटो, पन खरं हाये ते. तुले सांगलं तेव्हळं कर. त्या कपीलले जेवनाचं सांगून दे. बरोबर बारा वाजता ये म्हनं.”

ऋषभचा मुंज्यावर जराही विश्वास नव्हता. वर्षातून त्याला एकदा जेऊ घातलं म्हणजे चिंता हटली. मग तो कुणालाही धरत नाही, हेही त्याला पटत नव्हतं. लहान असताना त्यानं यावर विश्वास ठेवला हे खरं, तेव्हा तो अज्ञान होता; पण आता त्याला हे थोतांड वाटत होतं. कपील जेवला म्हणजे मुंज्या जेवला, असं कुठे असते काय! या गोष्टीनं त्याच्या मेंदूचा चुरा चालवला होता.

अखेर त्यानं घरातून पाय काढला. रस्त्यानं चालू लागला. जराशा अंतरावर कपीलचं घर होतं. त्याला मात्र तो जेवण सांगायला विसरला नाही. लगेच तिथून शाळेच्या दिशेनं आपली पावलं वळवली. डोक्यात मात्र मुंज्यानं घर केलं होतं. काय खरं? काय खोटं? हे त्याला जाणून घ्यायचं होतं. विचारातच तो शाळेच्या आवारात पोचला, तोपर्यंत प्रार्थना होऊन पहिला तासही सुरू झाला होता.

“येऊ काय आत गुर्जी?” तो संकोचल्यासारखं म्हणाला.

तायडे गुुरुजींनी दरवाजाकडे पाहिलं, तर तिथं ऋषभ उभा. तो नेहमीच्या वेळेच्या आत यायचा. आता मात्र त्याला काहीसा उशीर झाला होता.

“ये, आत ये. आज का बरे उशीर? काही समस्या वगैरे?”

“हाव सर.” तो बाकड्यावर बसत म्हणाला.

“काय आहे सांग बगू?” तायडे सरांनी आस्थेनं विचारलं. मुलंही अचंब्यानं त्याच्याकडे पाहायला लागली.

“गुर्जी, मुंजे घालनं ठाऊक हाये तुम्हाले?”

“हो तर! का बरं विचारतोय तू.”

“माही माय म्हंते की, नाई घातले तं ते धरतात. आठ दिवस बिस्तर्‍यावर पळून राहनं पळते. खरंच असं काई आस्तं काय?”

“तुला काय वाटतं?”

“थोतांड वाट्टे मले सगळं हे.”

“बरोबर आहे तुझं ऋषभ. सगळ्या भ्रामक कल्पना आहेत या. यात काहीही तथ्य नाही. त्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. नुसते कल्पनेचे मनोरे आहेत ते. खोटं आहे. या जगात कुठलाही मुंजा नाही. त्यामुळे त्याचं कुणालाही धरणं नाही. अंधश्रद्धा आहे ही.”

“काय म्हंता गुर्जी!” ऋषभ अचंब्यानं म्हणाला.

“होय खरं तेच म्हणतोय. आता असल्या खुळ्या गोष्टी आपल्या डोक्यातून काढून टाकल्या पाहिजेत. आपण विज्ञानचे पाईक आहोत. तिकडे शास्त्रज्ञ चंद्रावर जाऊन आले, नवे शोध लावून आले; आपण अजून मुंज्यालाच धरून बसलोय. अशानं आपल्या विचारांची कशी काय वृद्धी होईल. सगळ्या भ्रामक कल्पना आहेत. आपण डोक्यातून बाहेर टाकायला हवंच हे सगळं.”

तायडे गुरुजी एक तास अंधश्रद्धेवर बोलले. विद्यार्थ्यांच्या डोक्यातील अशा विचारांना त्यांनी साफ पुसून टाकलं. “मुंजा म्हणजे नुसतं कल्पनेचं थूट आहे. त्यामध्ये काहीही तथ्य नाही. त्याचं अस्तित्वच नाही. त्यामुळे त्याच्या धरण्याचा प्रश्नच येत नाही. लोकं धाक दाखवतात. खोटं-नाटं सांगतात की, पिंपळाच्या झाडावर मुंज्याचा रहिवास असतो. यापुढे कुणीही यावर विश्वास ठेवायचा नाही.”

तायडे गुरुजींचा प्रत्येक शब्द मुलं कान देऊन ऐकत होती.

वेळ पुढे-पुढे सरकत होती. तासिका संपल्या. अशातच शाळा सुटली. ऋषभ घरी गेला. शाळेत गुरुजींनी सांगितलेला सगळा प्रकार त्यानं आईला सांगितला. तिचा त्या मुंज्यावर भलताच विश्वास. तिनं आधीच पिंपळाची पाच पानंही पूजेसाठी आणून ठेवली होती. आपल्या मुलाला मुंज्यानं धरलं, तर खूप अनर्थ होईल, असं तिला वाटत होतं. ती ऋषभची चिंता करत होती. त्याला समजावत होती. मात्र गुरुजींनी सांगितल्यापासून त्याचा मुंज्यावर जराही विश्वास राहिला नव्हता. हे सगळं खोटं आहे, यावर तो ठाम होता. अखेर आई नमली. तीही शिकलेली होती, बारावी झालेली होती. तिलाही हे सगळं थोतांड आहे, हे पटलं. एवढ्यात कपीलही आला. लगेच त्या दोघांची आईनं ताटं लावली. आता त्यांचा जेवण मुंज्याचं जेवण नसून ‘स्नेहभोजन’ होतं.

सुभाष किन्होळकर


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ]