सुमन ओक -

स्टिफन हॉकिंग या थोर, विख्यात शास्त्रज्ञाचा १४ मार्च २०१८ रोजी वयाच्या ७६ व्या वर्षी एका दुर्धर आजाराने मृत्यू झाला. १९६३ सालीच त्यांना लाउ गेरिंग्ज या रोगाने पछाडल्याचे निदान झाले होते. या आजारात शरीराचे सर्व अवयव हळूहळू शिथिल होऊन काही दशकात पूर्ण निकामी होतात. हॉकिंग यांनाही बोलता येईनासे झाले. तरीही ते (विचारांचे ऐकू येतील अशा शब्दांमधे रूपांतर करणार्या) एका कृत्रिम यंत्राद्वारे इतरांशी एका बोटाने संवाद साधू शकत होते. कालांतराने या बोटाचेही स्नायू निकामी झाले. तरीही ते गालातल्या एका स्नायूच्या मदतीने आपले विचार प्रकट करीतच राहिले. अखेरीस १४ मार्च २०१८ला डॉक्टर्सनी भाकित केल्याप्रमाणे २५ व्या वर्षी न जाता तब्बल ७६वर्षे सक्रिय राहून ५० वर्षे मृत्यूशी झुंज देणारा हा शात्रज्ञ काळाच्या पडद्याआड गेला.
१९८१ साली व्हॅटिकन कॉन्फरन्समध्ये आपल्या संशोधनातून प्राप्त झालेला एक प्रस्ताव त्यांनी मांडला. विश्वाला आदि किंवा अंत असत नसावा. त्यानंतर त्यांनी जिम हर्टले यांच्या बरोबर काम करून विश्वाचे हर्टल-हॉकिंग्ज हे मॉडेल बनविले. प्लँक या शास्त्रज्ञाचे पर्व सुरू होण्यापूर्वी अवकाशकाल या संकल्पनेनुसार विश्वाला सीमा (बाउंडरी) नाहीत आणि बिग बँग सिद्धान्तापूर्वी काळही नव्हता आणि म्हणून विश्वाचा आरंभ ही संकल्पना निरर्थक ठरते. बिग बँग मॉडेलमधील संपूर्ण एकात्म विश्वाच्या जागी धृवाचा प्रदेश कल्पिला तर कोणालाही उत्तर धृवाच्या उत्तरेस जाणे अशक्य आहे; पण तिथे म्हणजे उत्तर धृवावर कोणतीही सीमा अगर सरहद्द असणार नाही. उतर धृव हा केवळ एक बिंदू आहे जिथे उत्तरेकडे जाणार्या सर्व रेषा एकत्र येतात व संपतात. सुरुवातीच्या सीमा नसलेल्या विश्वाच्या संकल्पनेनुसार मर्यादित विश्व कल्पिले गेले होते व त्यामधे ईश्वराच्या अस्तित्वाची शक्यता होती. हॉकिंग यांच्या मते विश्व जर अमर्याद व स्वयंसिद्ध असेल तर हे विश्व कसे निर्माण व्हावे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य देवाला नाही.
‘अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम’ या आपल्या पुस्तकात हॉकिंग म्हणतात, ‘आपल्याला जर एक परिपूर्ण असा सिद्धान्त सिद्ध करता आला तर तो मानवाच्या तर्कबुद्धीचा अंतिम विजय ठरेल. असं झालं तर आपण देवाचं मनच जाणून घेऊ शकू. याच पुस्तकात त्यांनी असंही सुचविलं आहे की, विश्वाची उत्पत्ती समजण्यासाठी ईश्वराचे अस्तित्व मानण्याची गरज नाही; परंतु त्यानंतर नील ट्युरॉकशी झालेल्या संवादामुळे हॉकिंग्जना असे वाटू लागले की, ओपन युनिव्हर्स या संकल्पनेशी देवाचे अस्तित्व सुसंगत वाटते.
या सर्व संशोधन कार्यासोबतच हॉकिंग्ज यांनी १९९० सालापासून दिव्यांग माणसांच्या पुढे एक आदर्श ठेवण्याचे मान्य केले आणि त्यासाठी ते भाषणे आणि निधी गोळा करण्याच्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय होऊ लागले. २०वे शतक संपण्यापूर्वीच इतर अकरा श्रेष्ठ व्यक्तींच्या सोबत चार्टर फॉर द थर्ड मिलेनियम ऑन डिसअॅबिलिटी या जाहीरनाम्यावर त्यांनी स्वाक्षरी केली. हॉकिंग्ज यांना त्यांच्या या कार्याबद्दल जुलियस एड्गर लिलियनफील्ड हे पारितोषिक देण्यात आले.
हॉकिंग्ज यांना मानवाच्या भविष्याबाबत काळजी वाटत असे. २००६ मधे त्यांनी इंटरनेटवर एक सर्वांना खुला प्रश्न विचारला होता. समाजकारण, राजकारण व पर्यावरणातील बिघाड, यामुळे गोंधळ माजलेल्या या जगात मानवजात आणखी १०० वर्षे कशी जगू शकेल? नंतर त्यांनी खुलासा केला, मला उत्तर माहीत नाही म्हणून तर मी हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे लोकांनी जागं व्हावं आणि आपण कुठल्या कठीण समस्यांना सामोरे जाणार आहोत याचा विचार करावा.
पृथ्वीवरील जीवनाला धोकादायक असलेल्या -एकाएकी उद्भवणारे अणुयुद्ध, जनुकशास्त्रीय बदलाच्या प्रयोगांतून निर्माण होणारे अतिसूक्ष्म रोगांचे जंतू, जागतिक तापमानातील वाढ आणि इतर अकल्पित धोके- इत्यादींमुळे हॉकिंग यांना काळजी वाटत असे. पुढच्या हजार वर्षांमध्ये पृथ्वीवरील जीवांना एखाद्या लघुग्रहावर आदळण्याचा किंवा आकस्मिक अणुयुद्धाचा धोका अटळ आहे असे त्यांचे मत होते. त्या आधीच जर मानवाने इतर ग्रहांवर वस्ती केली तरच मानव वंश टिकू शकेल, असे त्यांना वाटत होते. या अमर्याद जगात एलियन्स असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते पृथ्वीवरील नैसर्गिक संपत्ती लुबाडतील. असे एलियन्स इथे आले तर कोलम्बसने अमेरिकेच्या धरतीवर पाय ठेवले आणि तेथील मूळ रहिवाशांनाच हुसकून लावले तशीच स्थिती एलियन्स इथे आल्यास उद्भवेल.
मानवनिर्मित अतीव बुद्धिमान मेंदूच मानवाचे भवितव्य ठरवेल. याचे संभाव्य फायदे बरेच आहेत. मानवनिर्मित बुद्धी निर्माण करण्यात जर माणूस यशस्वी झाला, तर ती घटना मोठीच ऐतिहासिक ठरेल; पण त्यातील धोके टाळणे आपल्याला जमायला हवे, नाहीतर तो मानवाचा अंत ठरेल; परंतु यापेक्षाही भांडवलशाही आणि त्यामुळे निर्माण होणारी विषमता जास्त धोकादायक आहे. भविष्यात सुपरह्युमन मानववंश निर्माण होण्याची शक्यता आहे. हा मानव आपल्या वंशाची उत्क्रान्ती कशी व्हावी हे स्वत:च ठरवेल. कॉम्प्यूटर व्हायरसलाही एक नवीन प्रकारचा सजीव मानायला हवे. तो कदाचित मानवी स्वभावाबाबत काही सांगत असेल, जसे आतापर्यंत मानव केवळ विध्वंसक सजीवच बनवू शकला. त्याऐवजी बनवायला हवा स्वत:सारखाच सजीव.
२०११ च्या गूगलच्या कॉन्फरन्समध्ये हॉकिंग म्हणाले, ‘तत्त्वज्ञानाचा अंत झाला आहे. तत्त्वज्ञानी विज्ञानातील अद्ययावत प्रगतीशी सुसंबद्ध राहू शकले नाहीत.’ ज्ञानाचा शोध घेण्यामध्ये वैज्ञानिक सतत आघाडीवर राहतात. तत्त्वज्ञानातील समस्यांची उत्तरेही विज्ञानातून मिळतात. विशेषत: अशा वैज्ञानिक सिद्धान्तांमधून जे आपल्या समोर विश्वाचे एक नवे व वेगळे चित्र उभे करून त्यातील मानवाचे स्थान दाखवू शकतात.
हॉकिंग निरीश्वरवादी होते आणि हे विश्व वैज्ञानिक सिद्धान्तांनुसार चालते या तत्त्वावर त्यांचा पक्का विश्वास होता. तत्त्वज्ञान आणि विज्ञान यात मूलभूत फरक आहे. अधिकारवाणी हा तत्त्वज्ञाचा पाया आहे त्याउलट निरीक्षण आणि तर्कशुद्धता हा विज्ञानाचा पया आहे. अंतत: विज्ञानाचाच विजय होईल, कारण विज्ञान केवळ बडबड करीत नाही तर प्रत्यक्षात करून दाखवते. आपला मेंदू एखाद्या कॉम्प्युटरप्रमाणे असतो. त्यातील काही घटक निकामी झाले की, तो कॉम्प्युटरसारखाच काम करेनासा होतो. क्युरिऑसिटी या मालिकेत पहिल्याच एपिसोडमध्ये हॉकिंग म्हणतात, ‘ज्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा असेल त्यावर ठेवावा. माझ्या मते ईश्वर अशी कोणतीही चीज असत नाही. (ईश्वराबाबत) हे सर्वात सोपे स्पष्टीकरण आहे. या विश्वाची निर्मितीही कोणी केलेली नाही आणि आपले भवितव्यही कोणी घडवीत नाही. यावरून माझ्या हे लक्षात आले स्वर्गही नसावा आणि मरणोत्तर अस्तित्वही नसावे. हे एकच आयुष्य आपल्याला मिळाले आहे ज्यामध्ये आपण या विश्वाचे हे भव्य अप्रतिम स्वरूप वाखाणू शकतो आणि त्यासाठी मी अत्यंत आभारी आहे.’
२०१४ च्या सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या सुरुवातीच्या बीजभाषणात (की नोट भाषणात) आपण निरीश्वरवादी असल्याचे त्यांनी जाहीर केले. एल मुंडोला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ‘देवाने हे विश्व निर्माण केले असे मानणे आपल्याला विज्ञान अवगत होण्याआधी नैसर्गिक होते; परंतु आता विज्ञानाने या विश्वाच्या निर्मितीबाबत एक समाधानकारक स्पष्टीकरण दिलेले आहे. मी जे म्हणालो होतो की, आपल्याला देवाचे मनच उमगेल. म्हणजे जे जे देव जाणतो ते सर्व आपणही जाणू शकू. अर्थात देव अस्तित्वात असता तर! पण तो अस्तित्वातच नाही. विज्ञानाच्या नियमांना तुम्ही ईश्वर मानू शकता; परंतु हा विज्ञान नियमरूपी ईश्वर ज्याला तुम्ही प्रश्न विचारू शकाल असा तुमचा वैयक्तिक ईश्वर असणार नाही.’
हॉकिंग नेहमी लेबर पार्टीलाच पाठिंबा देत. २००३ मध्ये अमेरिकेने इराकवर केलेल्या आक्रमणाला त्यांनी युद्धखोरीचा गुन्हा म्हटले. अणुचाचण्या व अण्वस्त्रांवर बंदी आणावी यासाठी त्यांनी खूप प्रचार केला, तसेच स्टेम सेल वर होत असलेल्या संशोधनाला व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला पाठिंबा दिला आणि पर्यावरणातील बदल रोखण्यावरील उपायासही पाठिंबा दिला. ऑगस्ट २०१४ मधे २०० प्रसिद्ध व्यक्तींनी सह्या करून ‘द गार्डियन’ मध्ये एक पत्र छापले; त्यात सप्टेंबरमधे घेण्यात येणार्या सार्वमतात स्कॉटलंडने युनायटेड किंगडममध्येच राहण्याचा कौल द्यावा असे म्हटले होते. या २००पैकी एक सही हॉकिंग यांची होती. तसेच ब्रेक्सिट म्हणजे यूकेने जर युरोपियन युनियनमधून अंग काढून घेतले तर तेथील वैज्ञानिक संशोधनाचे नुकसान होईल. कारण आधुनिक संशोधनात आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांनी एकत्र येण्याची गरज असते. तसेच कोणत्याही देशात संचार मुक्तपणे झाल्यास कल्पनांची देवाणघेवाण होऊ शकते. ब्रेक्सिटने हॉकिंगला निराश केले तेव्हा त्यांनी मत्सर आणि अलगपणापासून आपलेच नुकसान होईल असा धोक्याचा इशारा दिला होता.
हॉकिंग यांना देशाच्या शरीरस्वास्थ्याबाबत फार काळजी वाटत असे. तेथे नॅशनल हेल्थ सर्व्हिस असल्यामुळेच ते योग्य तो औषधोपचार घेऊ शकले. अन्यथा एवढा खर्च परवडण्यासारखा नव्हता आणि ते सत्तरीपर्यंत जगलेच नसते. ते म्हणत, ‘ब्रिटनमध्ये मला उत्तम वैद्यकीय सेवा मिळाली आहे. तेव्हा मला हे स्पष्ट सांगायलाच हवे की, सरकारी सार्वजनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे.’
हॉकिंगना खासगीकरण म्हणजे मोठा धोका वाटे. जितक्या जास्त खासगी मक्तेदारी वाढतील तेवढी आरोग्यसेवा जास्त महाग होत जाईल. म्हणून सरकारी आरोग्य सेवा या खासगी मक्तेदारांपासून व खासगी दवाखान्यांपासून वाचविली पाहिजे. त्यांनी असाही दावा केला होता की, यामध्ये काही मंत्र्यांचेही हितसंबंध गुंतलेले असावेत. राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या फन्डामधे कपात करणे, काही सोयींचे खासगीकरण करणे, वेळेवर पगार न देणे, इत्यादीतून सरकारी दवाखान्यातील कर्मचार्यांचे मनोबल खच्ची करण्याचे काम हे पुराणमतवादी मंत्री करतात. एखादा फालतु पुरावा घेऊन विज्ञानाला ते बदनाम करू पाहतात. सरकारी आरोग्यसेवेत आधीच पुरेसे डॉक्टर्स व नर्सेस नाहीत आणि दिवसेंदिवस परिस्थिती आणखीनच बिघडत चालली आहे.
कॉन्झरवेटिव्ज आरोग्यसेवेच्या फंडामध्ये कपात करतात म्हणून हॉकिंग यांनी २०१७ च्या निवडणुकीमध्ये लेबर पार्टीला पाठिंबा दिला. पण त्याचवेळी त्यांनी जेरेमी कॉर्बिन यांच्यावर टीकाही केली आणि लेबर पार्टीच्या निवडणूक जिंकण्याबाबत शंकाही व्यक्त केली.
डोनाल्ड ट्रम्पच्या राजकारणाने जागतिक तापमान वाढेल व नियंत्रणाबाहेर जाऊन पृथ्वी धोक्यात येईल अशी भीती त्यांना वाटत होती. वातावरण बदल हा फार मोठा धोका आहे. आपण वेळीच सावध होऊन हा बदल रोकू शकतो. पॅरिस अग्रीमेन्टमधून डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या या सुंदर ग्रहाचे अतोनात नुकसान केले आहे. अशाने पृथ्वीच शुक्र तारा बनेल जिथे २५० डिग्री तापमान असते आणि पाऊस सल्फ्युरिक अॅसिडचा असतो.
हॉकिंगच्या वडिलांनी त्यांच्याकडून फार मोठी अपेक्षा केली होती. वेस्टमिनिस्टर या नावाजलेल्या शाळेत त्यांना प्रवेश मिळावा असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. शिष्यवृत्ती मिळाली तरच ते शक्य होते; परंतु तेराव्या वर्षी हॉकिंग आजारी पडल्यामुळे ते परीक्षेला बसू शकले नाहीत. त्यामुळे सेन्ट अलबान्समध्येच राहिल्याने ते आपल्या सर्जनशील मित्रांबरोबर राहिले आणि त्यांना टाकावू वस्तूंपासून शोभेचे दारूकाम, विमाने, जहाजे यांच्या प्रतिकृती करणे, तसेच जुन्या घड्याळाच्या, टेलिफोनच्या स्विचबोर्डचे भाग वापरून त्याचा कॉम्प्युटर बनविणे व ख्रिश्चॅनिटी व परामानस कृती यांच्यावर चर्चा इत्यादी गोष्टी करू शकले.
हॉकिंगना शाळेमध्ये आईनस्टाईन म्हणत असत. तरी शालेय अभ्यासात ते फारसे चमकले नाहीत. कालांतराने त्यांच्यातील वैज्ञानिक विषयांची ग्रहणशक्ती, नैसर्गिक कल इत्यादी प्रकर्षाने दिसू लागले. गणिताच्या शिक्षकाच्या प्रोत्साहनाने त्यांनी कॉलेजमध्ये गणित हाच विषय घेण्याचे ठरविले. त्यांच्या वडिलांना त्यांनी डॉक्टर व्हावे असे वाटत होते. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये गणित विषय त्यावळेस नसल्याने त्यांनी फिजिक्स व रसायनशास्त्र निवडले. मार्च १९५९ मध्ये त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. त्यानंतर हॉकिंग यांचे विश्वविद्यालयीन शिक्षण वयाच्या १७व्या वर्षी ऑक्सफोर्डमध्ये सुरू झाले. सुरुवातीच्या काळात त्यांना कॉलेजचा अभ्यास नको एवढा सोपा आणि त्यामुळे अगदी कंटाळवाणा वाटायचा. एखादी गोष्ट करणे शक्य आहे एवढे समजताच हॉकिंग ती करू लागायचे. इतरांनी ती कशी केली हे बघण्याची त्यांना कधी गरज वाटली नाही. हॉकिंग यांनी ऑक्सफोर्ड येथील आपल्या तीन वर्षांच्या काळात केवळ १०००तासच अभ्यास केला. त्यामुळे अंतिम परीक्षेमध्ये त्यांना जड गेले. त्यांनी प्रश्नपत्रिकेतील केवळ सैद्धांतिक फिजिक्सचे प्रश्नच सोडविले. त्यामुळे त्यांना तोंडी परीक्षा द्यावी लागली. परीक्षक म्हणून बसलेल्या प्राध्यापकांपेक्षा हॉकिंग बरेच जास्त बुद्धिवंत असल्याचे परीक्षकांनाच जाणवले त्यामुळे हॉकिंगना प्रथम श्रेणीमध्ये बी.ए.(ऑनर्स) ही पदवी मिळाली आणि ते ट्रिनिटी हॉल, केंब्रिजमध्ये ऑक्टोबर १९६२ मध्ये दाखल झाले. केंब्रिजमधूनच त्यांनी पीएच.डी. डिग्री मिळविली. त्यांच्या एका निबंधाला पेन्रोझ या सहाध्यायासोबत अत्यंत महत्त्वाचे अॅडॅम्स प्राइझ मिळाले. १९७४ मध्ये त्यांची पॅसाडोना येथील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एक वर्षासाठी नेमणूक झाली. या काळात त्यांना बर्नार्ड कार नावाचा एक संशोधक-विद्यार्थीही मदतनीस म्हणून मिळाला. अमेरिकेतील हे वर्ष या कुटुंबाला सुखाचे व उत्साहवर्धक ठरले.१९७५मध्ये हॉकिंग केंब्रिजमधे नव्या जागेत व नव्या पदावर म्हणजे रीडर म्हणून रुजू झाले. लवकरच त्यांच्याबरोबर डॉन पेज विद्यार्थी मदतनीस म्हणून राहू लागले. त्यामुळे जेनचे काम थोडे हलके झाले आणि ती आपल्या प्रबंधावर जास्त लक्ष देऊ शकली. कालांतराने जेन यांचे हेलरजोन्स या नामवंत गायकाशी प्रेमसंबंध निर्माण झाले; परंतु त्यांनी लग्न केले नाही.
हॉकिंग आणि जेन यांचे संबंध बरीच वर्षे बिघडलेलेच राहिले. त्यांच्या कुटुंबातील परिचारिका व इतर मदतनीस यांची लुडबुड जेन यांना आवडली नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या सहकारी मंडळींना तसेच जेन यांना त्यांच्या अमाप प्रसिद्धीशी व एखाद्या परिकथेतील अमाप यश मिळवलेल्या पात्राशी जुळवून घेणे जमले नाही. हॉकिंग यांचे धर्माविषयीचे मतही जेनला पटण्यासारखे नव्हते. त्यातून हॉकिंग यांना त्यांच्या एलेन मेसन या परिचारिकेशी जवळीक वाटू लागली. जून १९९५ मधे जेनला घटस्फोट दिल्यानंतर त्यांनी मेसनशी लग्न केले. २००६ मध्ये हॉकिंग व मेसन यांचा घटस्फोटही झाला.
जेन वाईल्ड या मैत्रिणीशी त्यांचे घनिष्ट संबंध ते केंब्रिजमध्ये असतानाच जुळून आलेले होते आणि १४ जुलै १९६५ला ते दोघे विवाहबद्धही झाले होते. त्यामुळे जगण्यासाठी काहीतरी मिळाल्यासारखे वाटते असे हॉकिंग नंतर म्हणाले होते. त्या दोघांनी पदार्थविज्ञानविषयक अनेक परिषदांसाठी अमेरिकेला भेटी दिल्या. त्यांचा पहिला मुलगा रॉबर्ट मे १९६७ मधे जन्मला. मुलगी ल्युसी १९७० मध्ये व टिमोथी हे तिसरे अपत्य १९७९ मध्ये जन्मले. ते आपल्या आजाराबाबत व त्यांना होणार्या शारीरिक त्रासाबद्दल कधीच बोलत नसत. मेसन यांना घटस्फोट दिल्यानंतर हॉकिंग जेन व त्यांची मुले यांच्या जवळ परत आले. मध्यंतरीच्या काळात जेनने आपले ‘ट्रॅवलिंग टु इन्फिनिटी’ हे पुस्तक सुधारून ‘माय लाइफ विथ स्टिफन’ या नावाने प्रसिद्ध केले. २०१४ साली त्यावर ‘अ थिअरी ऑफ एव्हरिथिंग’ हा सिनेमाही पडद्यावर दाखवण्यात आला.
या महान शास्त्रज्ञाचा स्मृतिदिन १४ मार्च रोजी आहे. त्या निमित्त त्यांना आदरांजली.
– सुमन ओक
(संदर्भ : विकिपीडिया)