वाघेश साळुंखे -
“आपल्याला इथून जो सूर्य दिसतो, त्या सूर्याच्या मागे आपल्या सूर्यापेक्षा अजून एक दहा पट मोठा सूर्य आहे, मी तिथे गेलो होतो. त्या सूर्याच्या मागे गेल्यावर मग मी खाली उतरलो, ती एक वेगळीच दुनिया होती. तिथे मी दोन-तीन वेळा गेलो आहे. मी अनेकदा एलियन्सच्या जगात गेलो आहे आणि ते लोक इतके ताकदवान आहेत की, कोणीतरी आले आहे, हे ते आत्म्याची ऊर्जा पाहूनही ओळखू शकतात.”
ही वाक्ये आहेत योगी हरी ओम दास नावाच्या माणसाच्या तोंडची. आतापर्यंत मानवजात फक्त चंद्रावर उतरली आहे. सूर्यमालेतील पृथ्वीच्या जवळील ग्रह असलेल्या मंगळावर सुद्धा अजून माणसाला प्रत्यक्षपणे उतरता आले नाही. असे असताना हा माणूस सूर्यमाला ओलांडून सूर्याच्याही पलीकडे गेल्याचा दावा करतोय. हा दावा त्याने एका पॉडकास्टमध्ये केला आहे. गेल्या दोन-चार वर्षांपासून अशा काही पॉडकास्ट्सचे तुकडे अधूनमधून फीडवर येत होते. या हरी ओम दासच्या व्हायरल व्हिडिओ क्लिपच्या निमित्ताने अंधश्रद्धा पसरवणार्या पॉडकास्ट्सचा धांडोळा घ्यायचे ठरवले.
मुख्य प्रवाहातील इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये बाबा-बुवांना स्थान मिळू लागले. या गोष्टीलाही आता वीसेक वर्षे झालीत. पण कितीही झाले तरी इलेक्ट्रॉनिक मीडियावर काही बंधने होतीच. तिथे काही नियम, मर्यादा पाळणे भागच होते. पण सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर कितीही फेकाफेकी करता येते, हे त्यांच्या लक्षात आले आणि याचा प्रचंड प्रमाणात वापर केला जाऊ लागला. त्यातलाच अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा प्रकार म्हणजे पॉडकास्ट. पॉडकास्ट म्हणजे एक प्रकारे मुलाखतच. मुलाखतीमध्ये औपचारिकपणे गप्पा मारलेल्या असतात. पॉडकास्टमध्ये औपचारिकता फारशी नसते. त्यात मनमोकळ्या गप्पा मारण्यावर भर दिलेला असतो. त्यामुळे बहुतांश पॉडकास्ट्स प्रभावी व श्रवणीय असतात. लोक केवळ मनोरंजन म्हणून सुद्धा पॉडकास्ट ऐकत असतात. पॉडकास्ट्स ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपातही असतात. मुलाखत असो की पॉडकास्ट असो, तज्ज्ञ व्यक्तींकडून सत्य माहिती घेणे अपेक्षित असते. ऐकणारा माणूस त्याच गंभीरतेने ऐकत असतो. अंधश्रद्धा पसरवणार्या लोकांनी या गंभीरतेचा गैरफायदा घेतल्याचे दिसते. Content creators ना व्ह्यूज मिळवण्यासाठी काहीतरी कंटेंट हवाच असतो. असे पॉडकास्ट करणार्या लोकांना सत्य-असत्याशी काही देणे-घेणे नसते. त्यामुळे ते लोक कोणालाही आणून त्याचा पॉडकास्ट करतात. या माध्यमाचा उपयोग केवळ गैरसमज पसरवण्यापुरता केला जात नाही; तर यातून बुवाबाजीचा धंदाही वाढवला जात आहे.
डॉ. यशश्री नावाच्या एका जनरल फिजिशियनचा एक पॉडकास्ट आहे. त्यात तिने तिला शिक्षण घेत असताना आलेले अनुभव सांगितले आहेत. वेगवेगळ्या रूपात भूत दिसणे, विचित्र आकृत्या दिसणे, घाण वास येणे, विचित्र घटना अनुभवास येणे अशा वेगवेगळ्या गोष्टी तिने सांगितल्या आहेत. ती बोलत असताना तिच्या बोलण्याला अनुसरून एआय जनरेटेड भयकारी फोटो सुद्धा दाखवले जात होते, जेणेकरून दर्शकांच्या मनात भीती निर्माण होईल. खरे तर अशा व्यक्तींना मानसिक उपचारांची गरज असते. पण ही तरुणी उच्चशिक्षित आहे. तसेच डॉक्टरही आहे. बोलतेही छान. त्यामुळे लोकांचा तिच्या बोलण्यावर विश्वास बसू शकतो. एखाद्या अडाणी व्यक्तीने काही कहाण्या सांगितल्या तर बहुतांश लोक विश्वास ठेवणार नाहीत. पण एक उच्चशिक्षित तरुणी तिचे अनुभव सांगत असेल; तर लोकांचा तिच्यावर सहज विश्वास बसतो. डॉक्टर असणार्या व्यक्तीलाही मानसिक उपचारांची गरज असू शकते, डॉक्टर असणारी व्यक्ती खोटेही बोलू शकते, या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. ज्या चॅनेलवरून तिचा पॉडकास्ट प्रसारित केला गेला, त्या चॅनेलवरील बहुतांश व्हिडिओ असेच अंधश्रद्धा पसरवणारे आहेत.
एक हिंदी पॉडकास्ट पाहण्यात आला. त्यामध्ये तर चक्क एका तांत्रिकाला बोलावण्यात आले होते. मुलाखत घेणारा गंभीर होऊन प्रश्न विचारत होता आणि डोक्याला काळी कफनी बांधलेला, गळ्यामध्ये तीन-चार प्रकारच्या माळा घातलेला, चेहर्यावर आणि अंगावर पांढरे पट्टे ओढलेला उघडाबंब तांत्रिक पॉडकास्टमध्ये मस्त फेकाफेकी करत होता. तांत्रिकाचे नाव गुरु काली चरणजी. (नावाच्या शेवटी आवर्जून ‘जी’ लावणे – म्हणजे लोकांकडून जबरदस्तीने आदर वसूल करणे आहे. असो.) त्याने दावा केला आहे की, मंत्रविद्येच्या जोरावर तुम्ही जगातील कोणत्याही व्यक्तीला स्वतःच्या प्रेमात पाडू शकता किंवा तिला वश करू शकता. जर तुम्हाला एखादी मुलगी आवडत असेल, तर फक्त तिचा फोटो आणि काही पैसे घेऊन या, मी तिचे तुमच्याशी लग्न लावून देईन. अगदी करीना कपूरचा फोटो घेऊन आलात तरी हे शक्य आहे. खरे तर अशी विधाने करणार्या बाबाची जागा तुरुंगात असायला हवी. पण इथे त्याचा पॉडकास्ट केला जात आहे. प्रेम जुळवण्याबरोबरच तंत्रविद्येच्या साह्याने दुसर्याचा चांगला सुरू असणारा संसार मोडताही येतो, व्यक्तीच्या अन्नात काही पदार्थ घालून वशीकरण करता येते, असेही दावे हा बाबा पुढे करतो. पॉडकास्टच्या शेवटी प्रेमविवाह, घरातील कटकटी, व्यवसाय किंवा मुलांच्या समस्या यांवर ‘१०१% गॅरंटी’ देऊन उपाय करण्याचे आश्वासन दिले आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बाबाचा संपर्क क्रमांक आणि त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटच्या लिंक्स सुद्धा आवर्जून दिलेल्या आहेत. त्याचा व्हिडिओ देशभरात पाहिला जातोय. हा बाबा लोकांना किती लुबाडत असेल, याचा विचार करा. इथे देश पातळीवरील अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची गरज अधोरेखित होते.
इप्सिता रॉय चक्रवर्ती या स्त्रीने १९८६ मध्ये स्वतःला अभिमानाने चेटकीण (witch) म्हणून घोषित केले. तिने कॅनडामध्ये असताना पाश्चात्त्य गूढ विद्या आणि विशेषतः ‘विक्का’ (Wicca) या परंपरेचा अभ्यास केला. गूढविद्येचा अभ्यास करण्यासाठी तिने Wiccan Brigade नावाची संस्था काढली आहे. स्वतःला चेटकीण म्हणवणार्या स्त्रीची मुलाखत कुणी घेईल का? पण सोशल मिडीयाच्या जमान्यात हे शक्य आहे. ही स्त्री बौद्धिक अंधश्रद्धा पसरवण्याचे काम करते. जसे काही आध्यात्मिक बाबा चमत्काराचे दावे करत नाहीत; पण अध्यात्माच्या नावाखाली अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवत असतात, तसाच हा प्रकार आहे. ‘विक्का (Wicca) हा कोणताही जादूटोणा नसून ते एक प्रगत प्राचीन विज्ञान आहे. मृत व्यक्तींचे आत्मे आपल्या आजूबाजूला असतात आणि ते विशिष्ट लोकांशी संवाद साधू शकतात. माझा पूर्वजन्म प्राचीन इजिप्तमध्ये झाला होता आणि मला त्या काळातील अनेक गुप्त विद्यांची माहिती आहे. औषधांपेक्षा मनाची शक्ती आणि विक्कामधील विधी अधिक प्रभावी ठरू शकतात.’ अशी अनेक मुक्ताफळे या बाईने उधळली आहेत. एखाद्या व्यक्तीला ‘शाप’ दिला जाऊ शकतो किंवा त्याच्यावर ‘नकारात्मक शक्ती’ सोडली जाऊ शकते, असे तिचे मत आहे. ती वैज्ञानिक शब्द वापरते, इंग्रजीत अस्खलित बोलते आणि स्वतःला ‘अभ्यासक’ म्हणून सादर करते. यामुळे तिच्या बोलण्यातील अतार्किकता लोकांच्या पटकन लक्षात येत नाही.
असे शेकडो पॉडकास्ट्स वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहेत. आणि ते मोठ्या संख्येने ऐकलेही जात आहेत. त्या सर्वांचाच इथे ऊहापोह करणे शक्य नाही. पण चार-पाच पॉडकास्ट्स पाहिले तर याची काही वैशिष्ट्ये लक्षात येतात.
उच्चशिक्षित वक्ते : पॉडकास्टमध्ये बोलण्यासाठी बर्याच वेळा उच्चशिक्षित व्यक्तींना बोलावले जाते. ते उच्चशिक्षित असल्यामुळे आणि त्यांच्याकडे बोलण्याचे चांगले कौशल्य असल्यामुळे त्यांच्या बोलण्याला एक प्रकारे वजन प्राप्त होते. श्रोत्यांचा त्यांच्यावर विश्वास बसतो.
प्रसिद्ध व्यक्तींची नावे घेणे : पॉडकास्टमध्ये बोलताना बरेचजण प्रसिद्ध व्यक्तींची नावे घेतात. करीना कपूर, प्रणव मुखर्जी वगैरे प्रसिद्ध व्यक्तींची नावे घेतली की ऐकणार्यांची उत्सुकता ताणली जाते. तसेच व्ह्यूज वाढण्यासाठीही त्याची मदत होते. बोलण्याला वजन प्राप्त होते.
पेड (paid) पॉडकास्ट्स : साधारणपणे प्रसारमाध्यमे त्यांच्यासाठी साहित्य (content) देणार्या व्यक्तीला मानधन देत असतात. सोशल मीडियावर अनेक चांगले पॉडकास्ट्स आहेत. त्यांमध्ये सुद्धा ज्या व्यक्तीची मुलाखत घेतली जाते त्या व्यक्तीला मानधन दिले जाते. पण असाही एक ट्रेंड आहे ज्यात मुलाखत देणार्या व्यक्तीच स्वतः पैसे देऊन स्वतःचा पॉडकास्ट घडवून आणतात. यामध्ये साधारणपणे व्यावसायिक लोक येतात. ते लोक स्वतःच्या व्यवसायाची जाहिरात व्हावी म्हणून स्वतःच पैसे देऊन स्वतःचे पॉडकास्ट्स घडवून आणतात. ज्योतिषी, मांत्रिक, तांत्रिक यांचे पॉडकास्ट सुद्धा याच कॅटेगरीत येतात. पैशांचे व्यवहार न होता जे पॉडकास्ट्स होतात ते केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी केलेले पॉडकास्ट आहेत.
पॉडकास्टच्या रील्स : पूर्ण पॉडकास्ट ऐकणे हे वेळखाऊ काम आहे. त्यामुळे तो पूर्ण ऐकला जाईल याची खात्री नाही. म्हणून त्या पॉडकास्टचे छोटे छोटे तुकडे करून रिल्स/शॉर्ट व्हिडिओज बनवले जातात. आणि ते इंस्टाग्राम, यू ट्यूब, फेसबुक यांसारख्या प्रचंड व्ह्यूज मिळण्याची शक्यता असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकले जातात. मुलाखत देणार्या बाबाची प्रचंड जाहिरात या रिल्स मधून होत असते.
खोटे अस्वीकरण : पॉडकास्टच्या सुरुवातीला किंवा मध्येच कुठेतरी अस्वीकरण (disclaimer) दिलेले असते. काही वेळा व्हिडिओच्या वर्णनामध्ये (description मध्ये) अस्वीकरण दिलेले असते. त्यामध्ये अंधश्रद्धा पसरवणे हा पॉडकास्टचा हेतू नसल्याचे सांगितले जाते. पण प्रत्यक्षात मात्र अंधश्रद्धा पसरवण्याचेच काम केले जाते.
कारवाईची गरज : हे पॉडकास्ट समाजात गैरसमज तर पसरवत आहेतच; पण त्याचबरोबर अनेकांची लुबाडणूक होण्याला कारणीभूत ठरत आहेत. अशा पॉडकास्ट्सचा बारकाईने अभ्यास करून त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. जादूटोणाविरोधी कायदा सगळ्याच पॉडकास्ट्सना लागू होईल असे नाही. परंतु इतर राज्यांतील अंधश्रद्धा विरोधी कायदे, ग्राहक संरक्षण कायदे, Drugs Magic Remedies Act 1954 अशा इतर कायद्यांच्या आधारेही कारवाई करता येणे शक्य आहे. त्याबाबत सरकार आणि पोलीस यंत्रणेने इच्छाशक्ती दाखवणे आवश्यक आहे.
