-
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विज्ञान आणि संविधान यांचा जागर
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रशिक्षण विभाग अंतर्गत ऑनलाइन बैठकीत ठरल्याप्रमाणे दिनांक चार आणि पाच जुलै २०२६ ला, आईनस्टाईन हॉल, एमजीएम कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवसीय शिबिर पार पडले. शिबिराच्या प्रथम सत्रात ‘एमजीएम’चे प्रबंधक आशिष गाडेकर यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले. अध्यक्ष स्थानी डॉक्टर श्याम महाजन होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सम्राट हटकर, नीता सामंत, जगदीश परदेशी उपस्थित होते. प्रास्ताविक श्री. व्यंकट भोसले यांनी केले. प्रास्ताविकात व्यंकट भोसले यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा छत्रपती संभाजीनगर यांचा सहा महिन्यांचा आढावा घेतला. हे कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण शिबिर कशासाठी आहे त्याचा ऊहापोह केला. कार्यक्रमाच्या संचलनाचे कार्य छाया भोसले आणि मानसी भोसले यांनी केले. दोन वक्त्यांमधील अवकाश त्यांनी कविता, संतांचे दोहे आणि गाणी याचा सुंदर मिलाफ करून कार्यक्रम रंगतदार केले. प्रशिक्षणाचं पहिलं पुष्प जगदीश परदेशी यांनी गुंफले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची देव आणि धर्माविषयीची भूमिका विशद करत असताना त्यांनी अनेक उदाहरणे देत संतांचे दोहे, कविता इत्यादी सादर करून हसत खेळत प्रशिक्षणार्थ्यांना कळेल अशा साध्या आणि सोप्या भाषेत, प्रशिक्षणार्थ्यांना चर्चेत सहभागी करून मार्गदर्शन केले. तदनंतर सम्राट हटकर यांनी बुवाबाजी या विषयाचे पीपीटीद्वारे कंगोरे स्पष्ट केले. भोजन अवकाश यानंतर दुसर्या सत्रात बळीराम किनाळकर यांनी बहात्तर वर्षांच्या वयात ‘हम भी कुछ कम नही’ याचा प्रत्यय दाखवत आपले मनोगत व्यक्त केले. पहिल्या दिवशीच्या दुसर्या सत्रात अंधश्रद्धा आणि महिला या विषयावर चर्चा झाली. वैज्ञानिक दृष्टिकोन या रूक्ष विषयावर नीता सामंत यांनी सोप्या भाषेत प्रकाशझोत टाकला. तदनंतर ‘व्यसनमुक्ती’ या विषयावर सम्राट हटकर यांनी सखोल मार्गदर्शन केले. चहापानानंतर पहिल्या दिवसाची सांगता झाली.
दुसर्या दिवशी पहिल्या सत्रात चळवळीची गाणी, काही गीते सादर करण्यात आली. अमळनेरच्या कापडणे यांनी गिटारवर गीत सादर केले, तसेच पाटणी व मानसी भोसले यांनीही एक-एक गीत सादर केले. पहिल्या सत्राच्या व्याख्यानाची सुरुवात मानस विकार तज्ज्ञ डॉ. देशमुख यांनी केली. ‘मन आणि मनाचे आजार’ या किचकट विषयावर त्यांनी पीपीटीद्वारे दोन तास सोप्या भाषेत विश्लेषण केले.. तद्नंतर जगदीश परदेशी यांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयावर आदिम काळापासून ते आधुनिक काळापर्यंतचे उदाहरणे देत सखोल परंतु हसत खेळत मार्गदर्शन केले. डॉ. श्याम महाजन यांनी लैंगिकता आणि अंधश्रद्धा या विषयावर पीपीटीद्वारे सुलभ मार्गदर्शन केले. सम्राट हटकर यांनी ‘जादूटोणाविरोधी कायदा’ या विषयावर पीपीटीद्वारे सखोल मार्गदर्शन केले. कन्नडचे श्री. लहाने सर यांनी संत आणि समाजसुधारक यांची अंधश्रद्धेबाबतची भूमिका दोहे, अभंग यांच्या माध्यमातून सादर केली. चमत्कार व त्या मागचे विज्ञान, हातचलाखी हे प्रात्यक्षिकासहित जगदीश परदेशी, सम्राट हटकर आणि शिंदे मॅडम यांनी सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व प्रशिक्षणार्थ्यांची प्रश्न उत्तरे झालीत.
