भोंदू आवडे सर्वांना!

डॉ. हमीद दाभोलकर -

अनेक महिलांचे शोषण करणार्‍या आणि मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष ज्यांच्या भक्त परिवारात मोडतात अशा नाशिकच्या अशोक खरातचे प्रकरण नुकतेच बाहेर आले. महिलांचे लैंगिक शोषण, लैंगिक शतिवर्धक औषधे प्रसाद म्हणून देणे, बेनामी मालमता, उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकार्‍यांचा वरदहस्त अशा अनेक गोष्टी यामध्ये आहेत. देशातील आणि राज्यातील अनेक बड्या राजकीय नेत्यांचे या भोंदू खरात सोबतचे फोटो समोर येत आहेत. माध्यमातील सनसनाटी मथळ्याची गरज म्हणून ‘महाराष्ट्र हादरला’ ‘महाराष्ट्राचे एपस्टीन फाईल’ ‘मती गुंग करणारे प्रकरण’ असे उल्लेख केले जात आहेत. अत्यंत खेदाची गोष्ट अशी की, प्रत्यक्षात आसाराम, रामपाल, गुरमीत सिंग, रामरहीम असा गेल्या काही वर्षांतील प्रवास बघितला तर ‘खरात प्रकरणा’चे आश्चर्य वाटावे अशी फारशी परिस्थिती राहिलेली नाही! ज्याने महिलांचे शोषण केल्याचे असंख्य पुरावे आहेत आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात ज्याला शिक्षा झाली होती, तो गुरमीतसिंह उर्फ रामरहीम काही दिवसांपूर्वी खुनाच्या गुन्ह्यात कोर्टातून सुटला. प्रत्यक्षात शिक्षा भोगत असताना देखील हा गुरमीतसिंग बराच वेळ पॅरोलवर तुरुंगाच्या बाहेरच असायचा! पंजाब आणि हरियाणातील सात ते आठ मतदारसंघात गुरमीत सिंग राम रहीम याचा मतदारांवर अजून प्रभाव आहे. ज्या आसारामने लहान मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा सिद्ध होऊन त्याला सुप्रीम कोर्टाने शिक्षा दिली त्याच आसारामचे पोस्टर लावून महाराष्ट्रात नुकताच ‘मातृ-पितृ वंदन दिन’ साजरा केला गेला! हेच  सध्याचे समाज वास्तव आहे. सेक्स आणि क्राईम दोन्ही गोष्टी असलेली बातमी म्हणजे हमखास टीआरपी हे माध्यमांचे पूर्वापार गणित! या हिशोबाने  आणखी काही दिवस माध्यमांत खरात प्रकरण गाजत राहील हे निश्चित! त्यानंतर मात्र ‘सारे कसे सामसूम’ अशी परिस्थिती निर्माण झाली तर फारसे आश्चर्य वाटायला नको! ‘ऐसे कैसे  झाले भोंदू’ म्हणणार्‍या तुकाराम महाराजांपासून ते ‘भोंदू आवडे सर्वांना’ इथपर्यंत महाराष्ट्राची घसरण झालेली आहे!

ही परिस्थिती निर्माण होण्यात राजकारण आणि धर्मकारण यांची झालेली युती हे अत्यंत महत्त्वाचे कारण आहे. इंदिरा गांधी यांचे गुरु धीरेंद्र ब्रह्मचारी, नरसिंह राव यांच्या कालखंडातील चंद्रास्वामीच्या लीला किंवा महाराष्ट्रात अशोक चव्हाण, शिवाजी पाटील-चाकूरकर यांचे सत्य साईबाबाच्या भजनी लागणे या गोष्टी काँग्रेस सत्तेमध्ये असताना घडत होत्या. भाजपच्या कालखंडात याच्या अनेक पावले पुढे टाकून या सर्व प्रकारचे ‘संस्थीकरण’ केले गेले आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे आपल्या शपथविधीला शंभर-दीडशे बाबांना बोलवतात आणि पूर्वी जाहीरपणे चमत्काराचा दावा करणार्‍या एका बाबाकडे जाऊन ‘धर्मसत्तेने राज्यसत्तेला मार्गदर्शन करावे’, अशी अपेक्षा व्यक्त करतात, या गोष्टी फार जुन्या झालेल्या नाहीत.

गल्लोगल्लीचे बाबाबुवा तर आहेतच, पण राजकीय वरदहस्ताने मोठे झालेल्या बाबाबुवांची संख्या देखील काही कमी राहिली नाही! चमत्काराने आजार बरे करू शकत असल्याचा दावा करणारे धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम याचे अनेक व्हिडिओ आजदेखील सोशल मिडियावर उपलब्ध आहेत. त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही ! प्रदीप मिश्रा नावाचा एक बाबा रुद्राक्षाचा वापर करून आयुष्यातील सर्व प्रश्न सुटतील असे जाहीर प्रवचनात सांगतो आणि बहुतांश राजकीय पक्षांचे आमदार/खासदार यांचे कार्यक्रम आपल्या मतदारसंघात आयोजित करतात. इतकेच नव्हे, तर उच्चशिक्षित लोकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या ‘श्री श्री रविशंकर’यांच्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेच्या ऑफिशियल सोशल मिडिया अकाऊंटवर ‘अंतर्ज्ञान’ (खर्पीीींंळेप) कार्यक्रमाच्या अंतर्गत केवळ नजरेच्या सामर्थ्याने सफरचंद कापण्याचे सामर्थ्य येते, लहान मुलांना डोळ्यावर पट्टी बांधून वाचायला शिकवले जाण्याचे कोर्स दिले जातात अशा प्रकारचे दावे करणारे असंख्य व्हिडिओ आहेत.

आपल्या समाजात ‘सर्वधर्मसमभावा’ची परिस्थिती एकूण अडचणीची असली, तरी बाबाबुवागिरीच्या प्रांतात मात्र सर्वधर्मसमभाव भरपूर आहे! अपंग व्यक्तीला प्रार्थनेच्या माध्यमातून चालायला लावू शकतो, असा दावा करणार्‍या पाद्य्रांचे व्हिडिओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून त्यावर काहीही पोलीस कारवाई होत नाही. तीच स्थिती भोंदू मौलाना आणि बंगाली बाबांची आहे. रेल्वे आणि एसटीमध्ये थेट नंबर लिहून हे पोस्टर चिकटवतात, पण कारवाई क्वचितच होते. अशोक खरातने  केलेल्या गुन्ह्यांच्या तुलनेत या गोष्टी अगदीच क्षुल्लक वाटतील, पण अक्कल गहाण ठेवण्याची सुरुवात ही अशाच कार्यकारणभाव नसलेल्या गोष्टींमधून होते. वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टींवर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करता येऊ शकते. अंनिसने अनेक वेळा तक्रारी करून देखील पोलीस अशा लोकांची दखल घेत नाहीत. सत्ताधारी लोकांना त्यांच्याकडे बघायला वेळ नाही. यामधूनच पुढे जाऊन अशोक खरातसारखे भोंदू तयार होतात.

या पार्श्वभूमीवर अत्यंत गंभीर बाब अशी की, या भोंदू बाबाबुवांना विरोध करणे म्हणजे धर्मविरोध आहे आणि पुढे जाऊन ते करणारी व्यक्ती ही देशविरोधी देखील आहे, अशी हाकाटी न चुकता उठवली जाते. भोंदूची चिकित्सा करणार्‍या व्यक्तीला खोटेनाटे आरोप करून  दुसर्‍या धर्माची हस्तक ठरवले जाते. कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. धमक्या दिल्या जातात आणि प्रसंगी हल्ले देखील होतात. तुकाराम महाराजांपासून ते फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव उच्चरवाने घेतले जाते, पण त्यांनी सांगितलेला धर्मचिकित्सेचा विचार पूर्णपणे बासनात गुंडाळून ठेवला जातो. अशा परिस्थितीमध्ये ‘आपला तो सद्गुरू आणि दुसर्‍याचा तो भोंदू’ अशी एक धारणा मोठ्या समूहात पसरवण्यात आजचे राज्यकर्ते यशस्वी झाले आहेत, हे नकी. त्यामधून आपल्याच शोषकाच्या बाजूने मोठे जनसमूह उभे राहायला लागतात! भावनादुखीच्या व्यापक संसर्गामुळे बाबाबुवांच्या चिकित्सेचा परीघ पूर्णपणे आक्रसला गेला आहे.

राजकारणी आणि बुवाबाजी यांची युती बहुपदरी आहे. पहिले म्हणजे राजकीय जीवनात असलेली अनिश्चितता आणि त्यामधून निर्माण होणारे ताणतणाव हाताळण्यासाठी बाबा-बुवांनी दिलेला चमत्कारिक उपाय करणे राजकारण्यांना सोईचे वाटते. दुसर्‍या बाजूला बाबांचे भक्त म्हणून त्यांना मानणार्‍या लोकांचा समूह आपला मतदार म्हणून जोडता  येतो आणि तिसर्‍या बाजूला या बाबा-बुवांच्या माध्यमातून अनेक बेनामी धंदे राजकीय गणिते हे देखील जुळवता किंवा बिघडवता येतात. ‘धर्माची आणि राजकारणाची युती करून सत्तेचे पीक जोमाने काढता येते’ या राजकीय सूत्राच्या भोवती फिरू इच्छिणार्‍या समाजात यापेक्षा वेगळे काही होईल असे अपेक्षित करणे देखील भाबडेपणाच ठरू शकेल.

वर नमूद केलेल्या गोष्टी मान्य केल्या तरी सर्वत्र फोफावलेल्या भोंदूगिरीचे खापर हे पूर्णपणे राजकारण्यांवरती फोडणे देखील योग्य होणार नाही. माध्यमे, प्रशासन आणि आपण नागरिक हे सगळेच या संसर्गाला जबाबदार आहोत. आपल्या आजूबाजूच्या बहुतांश वृत्तपत्रांना ज्योतिष छापण्यातून मिळणार्‍या महसुलाचा मोह सुटत नाही. टीव्ही आणि डिजिटल मीडिया यांनी तर या बाबतीत कमरेचे सोडून डोक्याला बांधल्याची स्थिती आहे! प्रशासनाने कायद्याचे पालन करण्यासाठी स्वत:ची इच्छाशक्ती वापरण्याचे दिवस केव्हाच मागे गेले आहेत. अशोक खरात प्रकरणात देखील ‘राजा बोले आणि दल चाले’ अशीच स्थिती असल्याचे बोलले जात आहे. सत्तेतील भागीदार आणि विरोधक यांचे हात देखील दगडाच्या खाली असल्याने  केवळ तात्कालिक राजकारण साधण्याच्या पलीकडे अशोक खरात प्रकरणाच्या मुळाशी जाईल का? हे कोणीही खात्रीशीर रित्या सांगू शकत नाही! अशोक खरात प्रकरण सोडून जिथे थेटपणे जादूटोणा विरोधी कायद्याचे उल्लंघन करून आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा केला जात आहे, अशा अनेक प्रकरणांचे डिजिटल पुरावे ‘अंनिस’कडे आहेत. या मधील बहुतांश पुरावे हे अगदी उघडपणे सोशल मिडियावर उपलब्ध आहेत, पण या प्रकरणांमध्ये काही तात्कालिक राजकीय लाभ नसल्याने त्यांच्यामध्ये पोलीस करावाई होण्याची अपेक्षा नाही.

या सगळ्याच्या पलीकडे जाऊन लोक अशा भोंदू बाबाबुवांना का बळी पडतात हा एक लाखमोलाचा प्रश्न आहे. आधुनिक मेंदू विज्ञानाचा आधार घेतला तर आपल्याला हे लक्षात येते की, ‘मानवी मेंदूमध्ये जसे  चिकित्सा करण्याची प्रवृत्ती आहे तसेच चमत्कारिक दाव्यांना बळी पडण्याची अंगभूत प्रवृत्ती आहे!’ सातत्याने जाहिरातींचा मारा, बुवाबाजीला मिळणारी समाजमान्यता आणि राजाश्रय, शिक्षणातील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चिकित्सक मनोभावाची जोपासना या गोष्टींना फाटा  देणे  यामधून  ती  वाढते. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये आधीच दुय्यमतेचे जीवन जगणार्‍या महिला याला अधिक बळी पडत असतील, तर त्यामध्ये  नवल ते कोणते! जसे जीवनात अस्थिरता आणि मनावर तणाव निर्माण झाला की, बुवाबाजीला बळी पडणे  वाढते तसेच जास्तीच्या गोष्टींचा हव्यास सुटल्याने देखील ते वाढते. याला धर्मसत्तावादी राजकारण आणि कितीही मिळाले तरी  पुरे न पडणारी ‘चंगळवादी संस्कृती’ यांची जोड मिळाल्यावर ‘भोंदू आवडे सर्वांना’सारखी परिस्थिती निर्माण होते.

‘भोंदू आवडे सर्वांना’ अशी परिस्थिती का निर्माण झाली हे समजून घेताना आपण हे देखील मनाशी पक्के समजले पाहिजे की, आपण सर्वांनी ठरवले तर ही परिस्थिती बदलणे अवघड नाही. त्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सांगितलेली तीन सूत्रे ही आजही तितकीच उपयुक्त आहेत. त्यातले पहिले सूत्र म्हणजे, आपल्या संविधानाने सांगितल्या प्रमाणे प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार केला पाहिजे आणि शक्य तिथे त्याचा प्रचार आणि प्रसार देखील केला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा साधा अर्थ म्हणजे ‘जेवढा पुरावा तेवढा विश्वास.’ हा वैज्ञानिक दृष्टिकोन हा केवळ प्रयोगशाळेपुरता मर्यादित नाही, तर आपल्या जीवनाच्या सर्व अंगांमध्ये रुजणे आवश्यक आहे. यासाठी ‘प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, हे असेच का अन् हे तसेच का?’ ही संस्कृती आपल्याला शालेय वयापासून खूप गांभीर्याने रुजवली पाहिजे. जसे कोविडची लस देऊन कोविडपासून मुक्ती मिळू शकते त्याचप्रमाणे भोंदूगिरीपासून मुक्ती देणारी लस ही केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातच आहे. फरक एवढा की याचे डोस रोजचेच घ्यावे लागतात.

            दुसरा भाग आहे विधायक कृतिशील धर्मचिकित्सेचा : धर्मश्रद्धेला उन्नत करणारी चिकित्सा हे तुकाराम, ज्ञानेश्वर यांच्यापासून ते फुले, शाहू, आंबेडकर, गाडगेबाबा, प्रबोधनकार ठाकरे यांच्यापर्यंतचा महाराष्ट्राचा  अत्यंत महत्त्वाचा वैचारिक वारसा आहे. सर्व धर्मांतील बुवाबाजी ही धर्मश्रद्धेच्या आडूनच चालू असल्याने धर्म चिकित्सा ही भोंदूगिरी रोखण्यासाठी अत्यंत आवश्यक बाब आहे. चिकित्सेने कोणताही धर्म उन्नतच होत असतो. त्यामुळे सर्व धर्मातील चिकित्सक प्रवृत्तींना पाठबळ देणे आवश्यक आहे. धर्माच्या विधायक चिकित्सेचा आग्रह धरणारे मग ते कुठल्याही धर्मातील असोत, ते भोंदू बाबा-बुवांचे शत्रू आहेत आणि धर्मातील जीवन उन्नत करणार्‍या प्रवाहाचे ते मित्र आहेत, हे सर्वसामान्य नागरिकांनी समजून घेतले पाहिजे. तिसरा आणि शेवटचा मुद्दा आहे, शोषण करणार्‍या अंधश्रद्धांना विरोध करण्याचा… महाराष्ट्रातील जादूटोणाविरोधी कायद्याची निर्मिती हे त्याचे महत्त्वाचे रूप आहे. गेल्या बारा वर्षांत या कायद्यांतर्गत पंधराशेपेक्षा अधिक भोंदू बाबाबुवा यांना तुरुंगाची हवा खायला लागणे हा त्याचा दृश्य परिणाम आहे. स्वाभाविकच आहे की, या कायद्याच्या सध्याच्या रुपात अनेक चांगले बदल करणे आवश्यक आहे. गेल्या बारा वर्षांमध्ये रखडलेले या कायद्याचे नियम तातडीने करणे, कायद्यांतर्गत तरतूद असलेल्या दक्षता अधिकारी दर्जाच्या पोलीस अधिकार्‍यांना कार्यान्वित करणे, शासनानेच जीआर काढून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सुरू करणार म्हणून सांगितलेले अंधश्रद्धाविरोधी कक्ष कार्यान्वित करणे, सोशल मीडियामधील भोंदूगिरीविषयी औरंगाबाद हायकोर्ट बेंचने दिलेले आणि सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेश कार्यान्वित करणे अशा अनेक गोष्टी सहज करता येण्यासारख्या आहेत. या तीन सूत्रांना धरून आपण कार्यान्वित होणार की केवळ चार दिवस खरात प्रकरणाची चर्चा करून सोडून देणार यावर ‘भोंदू आवडे सर्वांना’ ही परिस्थिती बदलणार की नाही ते अवलंबून आहे.

-डॉ. हमीद दाभोलकर
कार्यकर्ता महा. अंनिस
hamid.dabholkar@gmail.com


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ]