उत्क्रांतीवाद विरुद्ध निर्मितीवाद

प्रभाकर नानावटी -

परमेश्वराच्या इच्छेविना या जगातील एक पानही हलणार नाही, या पारमार्थिक (गैर) समजावर आधारलेल्या आपल्या देशातील समाजव्यवस्थेमध्ये ऐहिकतेला प्राधान्य देणारे १९ व्या शतकातील डार्विन, मार्क्स वा फ्रॉईड या दिग्गज विचारवंतांचे स्थान फक्त पाठ्यपुस्तकापुरतेच मर्यादित होते/आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. खासगीकरण, जागतिकीकरण व उदारीकरण यांच्या झंझावातासमोर मार्क्सची या देशातून हकालपट्टी झाली. फ्रॉईडचे क्षेत्र होते ते व्यक्तिनिष्ठ घटितांचे, मानसशास्त्राचे. आज तसली घटिते जास्त नेमकेपणाने तपासायच्या अनेक पद्धती उपलब्ध होत आहेत, म्हणून फ्रॉईड फक्त मनोवैज्ञानिकांच्या प्राथमिक अभ्यासाचा विषय राहिला. व आता तर जगाचा चेहरामोहरा बदलून टाकणार्‍या डार्विनच्या सिद्धांताची उचलबांगडी पाठ्यपुस्तकामधूनही करण्याचा घाट पाठ्यपुस्तकांचे नियमन व नियंत्रण करणारी एनसीइआरटी ही शिखर संस्था घालत आहे. सुसूत्रिकरण व अद्ययावतीकरणाचे निमित्त करून सत्ताधार्‍यांना हवे तसे सर्व विषयांचे पुनर्लेखन करत जात आहे. कदाचित, भविष्यकाळात विज्ञानाधारित उत्क्रांती सिद्धांताऐवजी जगन्नियामक (अर्थात परमेश्वरनिर्मित) निमितीवाद शिकविण्याची सक्ती केल्यास आश्चर्य वाटायला नको.

खरे पाहता पारमार्थिकतेची कास धरलेल्या भारतीय समाजाला डार्विनच्या सिद्धांताशी काही देणे-घेणे नव्हते. १९ व्या शतकातील पश्चिमी देशांना हादरवून टाकणार्‍या या सिद्धांताच्या विरोधात मोठ्या प्रमाणात अटीतटीचे वादविवाद झाले. कोर्ट-खटले झाले. अमेरिकेतील शाळा-कॉलेजमध्ये हा विषय शिकविला जाऊ नये म्हणून कायदे पास झाले. परंतु शेवटी त्या देशात उत्क्रांतीवादाची सरशी झाली. तरीही अधूनमधून क्रिएशनिजमची कोल्हेकुई ऐकू येतेच. अजूनही क्रिएशनिजमचे उदात्तीकरण करणारी पुस्तकं लिहिली जात आहेत; टीव्ही शोज असतात व या विषयावर अनेक वेबसाईट आहेत. मात्र आपल्या येथे हा विषय पुन्हा उकरून काढण्यात आला असून ख्रिश्चियन जगतातील क्रिएशनिजम् (निर्मितीवाद वा परमेश्वरनिर्मित सृष्टिवाद) व बुद्धिमान डिझाईन या संकल्पना अधूनमधून येथेही डोके वर काढत आहेत.

परमेश्वरनिर्मित सृष्टिवाद (क्रिएशनिजम्)

बायबलप्रणीत परमेश्वरनिर्मित सृष्टिवादानुसार (क्रिएशनिजम्) परमेश्वराने या विश्वाची व सृष्टीची निर्मिती सात दिवसात केली होती. पहिल्या दिवशी प्रकाश; दुसर्‍या दिवशी आकाश; तिसर्‍या दिवशी जमीन, समुद्र, वनस्पती; चौथ्या दिवशी सूर्य चंद्र व तारे; पाचव्या दिवशी जलचर प्राणी आणि पक्षी; सहाव्या दिवशी भूचर प्राणी, पुरुष आणि स्त्री निर्माण करून सातव्या दिवशी त्याने विश्रांती घेतली. चौथ्या दिवशी सूर्य, चंद्र, तारे इत्यादींची उत्पत्ती झाली असल्यास पहिले तीन दिवस प्रकाश कुठून आला या प्रश्नाचे उत्तर क्रिएशनिस्ट्सकडे नव्हते (व आजही नाही.)

डार्विनचा उत्क्रांतिसिद्धांत त्या वेळच्या ख्रिस्ती-इस्लामिक जगताला आव्हानास्पद वाटला तसाच तो हिंदू धर्मासही आव्हान देणारा ठरला. ख्रिस्ती आणि इस्लामी धर्ममताने ज्याप्रमाणे मानवोत्पत्तीत ईश्वराचे स्थान केंद्रवर्ती मानले होते तसेच ते हिंदू धर्मानेही मानले होते. सर्वच ईश्वरवादी धर्मसंप्रदाय एकमुखाने संपूर्ण चराचर सृष्टी व मानवजात ही ईश्वराची निर्मिती असल्याचे मानतात. हिंदू धर्मशास्त्रांनी तर वेगवेगळ्या मिथ्यकथा प्रसृत करून मानवोत्पत्तीचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. त्यात काही ठिकाणी मनू, काही ठिकाणी ब्रह्म तर अन्य ठिकाणी विराटपुरुषांच्या दशावतारावरून मानवी समाज उत्पन्न झाला व विकास पावला असे म्हटले गेले. आधुनिक ज्ञान-विज्ञानाविरुद्धच्या संघर्षात जेव्हा जेव्हा पारंपरिक वैचारिक हत्यारे कुचकामी ठरली, तेव्हा तेव्हा इथल्या परंपरावाद्यांनी आपल्या बचावाखातर आधुनिक ज्ञानाचा उपयोग आपल्या बाजूने करून घेण्याचा खटाटोप केला. यातून डार्विन आणि त्याचा उत्क्रांतिसिद्धांतही सुटला नाही. कुठल्याही वैज्ञानिकाने प्राणी उत्क्रांत होत असताना पाहिला नाही. त्यामुळे हा सिद्धांतच खोटा आहे, या युक्तिवादाची सरशी होत गेली.

किंबहुना, सर्व धर्मशास्त्रे थोड्या फार फरकाने असेच सांगत होत्या. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती, असे हिंदू पुराणे सांगत होत्या. एकदा निर्माण झालेली ही सृष्टी व तीमधील जीवजाती अपरिवर्तनीय आहेत. निर्माण झाल्यावर त्या जशा होत्या तशाच आज आहेत व पुढेही त्या तशाच राहणार आहेत, असेच हे निर्मितिवादी सांगत होते. डार्विनचा उत्क्रांतिवाद नेमकी याच्या उलट मांडणी करीत होता. सृष्टी एका दमात निर्माण झाली नसून ती क्रमाक्रमाने विकसित झाली. जीव अपरिवर्तनीय नसून ते परिवर्तनीय आहेत. हे परिवर्तन मंदगतीने होत आलेले असून कोट्यवधी वर्षाच्या कालावधीतून घडून आलेले आहे. आता ज्या जीवजाती अस्तित्वात आहेत त्या पूर्वीच्या नाहीशा झालेल्या जीवजातीचे वंशज आहेत. त्या टिकल्या याचे कारण त्यांच्यातील तत्कालीन परिस्थितीशी जुळवून घेणारे गुण परिवर्तनाने निर्माण झाले व निसर्गाने त्याची निवड करून ते टिकवून धरले. जीवसृष्टीच्या निर्मितीसंबंधात शतकानुशतके ज्या कथा व भाकडकथा प्रचलित होऊन समाजमन अंधश्रद्धांच्या गर्तेत रुतून बसले होते. त्यातून त्याला बाहेर काढण्याचे काम डार्विन यांनी केले.

डार्विनचा उत्क्रांतिसिद्धांत

एका सुप्रसिद्ध वैज्ञानिकाच्या मते, डार्विन यांनी लिहिलेल्या ‘ओरिजिन ऑफ स्पीसीज’ (१८५९) हे शोधनिबंधवजा पुस्तक प्रसिद्ध होण्यापूर्वीच्या मानवाबद्दलच्या सर्व कल्पना अत्यंत चुकीच्या असून त्याबद्दल विचार न करणे इष्ट ठरेल. मानवाविषयीच्या सर्व पारंपरिक व रूढ कल्पनांना उभा छेद देणारा डार्विनचा उत्क्रांतिसिद्धांत आपण कोण आहोत, कसे आहोत, असे का आहोत, या प्रकारच्या अनेक प्रश्नांना स्पष्ट उत्तरे देणारा होता. डार्विनच्या स्पष्टीकरणात मानवाबद्दलच्या या पूर्वीच्या सर्व कल्पना, अंदाज, अनुमाने व विचारांना अव्हेरणारा व सर्वस्वी वेगळाच असा विचार होता. इतक्या वर्षांनंतरसुद्धा या विचाराची जादू अजून ओसरली नाही. डार्विनच्या सिद्धांताने त्या काळी वैचारिक विस्फोट घडवून आणला. उत्क्रांतिवाद ही काही सहज सुचलेली कल्पना नव्हती. बारीक निरीक्षण, विश्लेषण, पुराव्यांची सांगड, चिंतन व मनन या प्रदीर्घ प्रक्रियेतून साकार सुचलेली कल्पना होती. नंतर तो एक जगाला हादरवून टाकणारा सिद्धांत ठरला.

डार्विनने ‘दि ओरिजिन’ हा ग्रंथ लिहिला, त्या काळी युरोप-अमेरिकेतील बहुतेक शास्त्रज्ञ आणि शिकले-सवरलेले लोक विश्वनिर्मातावादी होते. भले त्यांना बायबलमधील जेनेसिसच्या (जुन्या करारातील सृष्टी व मानवाच्या निर्मितीच्या) कथेचा प्रत्येक तपशील मान्य नसेल; परंतु जीवसृष्टीची निर्मिती जवळपास आजच्या स्वरूपात आहे तशी झाली, असे त्यांना मनोमन वाटायचे. जीवसृष्टीची योजना सर्वशतिमान विश्वनिर्मात्याने आखली; त्यात प्राण फुंकले आणि तेव्हापासून आजतागायत तिचे अस्तित्व अपरिवर्तनीय स्वरूपात आहे. ‘दि ओरिजिन’ या ग्रंथात डार्विनने जीवसृष्टीचा आराखडा, विकास आणि वैविध्य यांचे स्पष्टीकरण देणारे पर्यायी गृहीतक मांडले आहेत त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

त्या ग्रंथात त्याने केवळ जीवसृष्टीच्या उत्क्रांतीचे पुरावे दिले आहेत असे नसून, विश्वनिर्मातावाद निःसंदिग्धपणे फेटाळला आहे. डार्विनच्या काळात उपलब्ध पुरावा त्याच्या सिद्धांताबद्दल विश्वसनीयता निर्माण करू शकत होता; परंतु संपूर्णपणे निर्णायक नव्हता. त्यामुळे डार्विनने प्रथम प्रतिपादले तेव्हा उत्क्रांती हा केवळ सिद्धांत होता, असे आपण म्हणू शकतो. (भले भरभकम पुराव्यांवर आधारित होता तरीसुद्धा!) सन १८५९ पासून पुराव्यांचे ढीग साचू लागले, तसतसे पायरीपायरीने उत्क्रांती हा सिद्धांत सत्यपदाला पोहोचला. आजही आपण ज्याप्रमाणे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत असे म्हणतो, तसेच उत्क्रांतीलाही सिद्धांतच म्हणतो. हा सिद्धांत तर आहेच; पण वास्तवाचे प्रतिबिंब आहे, हे विशेष.

डार्विनने केलेली भाकिते

कुणा विश्वनिर्मात्याने जीवसृष्टी निर्माण केली आहे; तसेच तिच्या जन्मापासून आजतागायत ती अपरिवर्तनीय स्वरूपात आहे, हा पर्यायी दृष्टिकोन आजही लोकप्रिय आहे. या पार्श्वभूमीवर उत्क्रांती सिद्धांताची सत्यता कशी पडताळून पाहणार? तसे पाहता प्रत्यक्षात दोन प्रकारचे पुरावे देता येतात. पहिल्या प्रकारात उत्क्रांती सिद्धांताच्या काही तत्त्वांचा समावेश होतो. त्या तत्त्वांच्या आधारे केलेली भाकिते पडताळून पाहाता येतात. जीवसृष्टी कशी उत्क्रांत होईल, याचे भाकीत उत्क्रांती सिद्धांताच्या आधारे करता येत नाही. सध्याच्या सजीव व नामशेष प्राचीन जातींमध्ये काय आढळेल, याबद्दलची भाकिते डार्विनने केली. पुढील काळात या भाकितांचा पडताळा पाहण्यात आला. यातील काही भाकिते व पुरावे :

१. प्राचीन जीवसृष्टी जीवाश्माच्या रूपाने अभ्यासासाठी उपलब्ध आहे. त्या जीवाश्मांच्या नोंदीमध्ये उत्क्रांतीबदलाचा पुरावा सापडला पाहिजे, असे एक भाकीत करता येते.

पुरातन काळातील, सर्वांत जास्त खोलवर असलेल्या खडकांच्या थरात आदिजीव मोठ्या संख्येने आढळले. त्याहून तरुण असलेल्या वरच्या थरात अधिक गुंतागुंतीच्या रचना असलेले जीवाश्म आढळले. सर्वांत वरच्या थरात वर्तमान सजीवांशी साधर्म्य असलेले जीवाश्म सापडले. तसेच कालौघात काही जातींत बदल झाल्याचे आढळले. या बदलातून अनुकूलन प्राप्त झालेले आढळले.

२. जीवाश्मांच्या नमुन्यांमध्ये किमान काही जातीउद्भवनाची उदाहरणे सापडली पाहिजेत.

एका वंशापासून दोन किंवा अधिक शाखा निर्माण झाल्याचा पुरावा सापडला. वन्य जगतात नवीन जातींचा उद्भव पाहावयास मिळाला.

३. सजीवांच्या मुख्य वर्गांमधील दुवा असतील, अशा प्रकारच्या जातींची उदाहरणे सापडली पाहिजेत.

उदा. पक्षी, सरपटणारे जीव, मत्स्यवर्ग आणि उभयचर वर्ग. हे हरवलेले दुवे (अधिक सयुक्तिक : संक्रमणावस्थेतील नमुने) खडकांच्या विशिष्ट थरातच सापडले. ज्यांचा कालखंड त्या वर्गांच्या विभाजन काळाच्या संभवतेशी जुळत होता.

४. जातींमध्ये जनुकीय भिन्नता अनेक गुणधर्मात आढळावी, ही अपेक्षा आपण बाळगली पाहिजे. (अन्यथा, उत्क्रांती घडण्याची तिळमात्र शक्यता नाही.)

जाती-प्रजातींच्या अभ्यासातून ही गोष्ट ठळकपणे आढळली.

५. सदोष असणे ही उत्क्रांतीची खूण आहे; बुद्धिमान डिझाईनची नव्हे. या निष्कर्षाला दुजोरा देणारी सदोष अनुकूलनांची उदाहरणे सापडली पाहिजेत.

उत्क्रांती कधीच सर्वोत्तम दर्जाची निर्मिती साध्य करू शकत नाही, हे अनेक उदाहरणांवरून निदर्शनास आणता येईल. सर्वोत्तम निर्मितीची अपेक्षा आपण केवळ एखाद्या अत्युत्कृष्ट निर्मात्याकडून करू शकतो, उत्क्रांतीकडून नव्हे.

६. वन्य जगतात नैसर्गिक निवड सक्रिय असल्याचे प्रमाण मिळणे अपेक्षित आहे.

निवड सक्रिय असल्याची अनेक उदाहरणे सापडतील.

‘दि ओरिजिन’ प्रकाशित करण्यापूर्वी डार्विनने सुमारे वीस वर्षे मोठ्या प्रमाणात पुरावे गोळा केले. या घटनेला दीडशे वर्षे होऊन गेली. आता तर या विषयाचे ज्ञानभांडार तुडुंब भरले आहे. मोजदाद कशाकशाची करायची? कितीतरी अधिक जीवाश्म सापडले आहेत. कितीतरी अधिक जातींचा संग्रह झाला आहे आणि त्यांच्या वितरणाचा जागतिक नकाशा तयार झाला आहे. भिन्न जातींच्या उत्क्रांती संबंधाबाबत बरेच संशोधन झाले आहे. डार्विनने स्वप्नातसुद्धा कल्पना केली नसेल, अशा नवीन विज्ञानशाखांचा उदय झाला आहे. रेण्वीय जीवशास्त्र व जीवजाती वर्गीकरणशास्त्र ही त्याची महत्त्वपूर्ण उदाहरणे आहेत.

निर्मितीवाद (क्रिएशनिजम्) व उत्क्रांतिवाद यातील काही फरक

गेली दीडशे वर्षे उत्क्रांतीचा अभ्यास केला जात आहे. अनेक संशोधकांनी याविषयी प्रबंध सादर केले आहेत. काही संशोधकांच्या मते, जनुकामुळे जैविक उत्क्रांती झाली तर काहींच्या मते, पालनपोषण व भोवतालच्या परिस्थितीने जैविक परिवर्तन घडून आले. याबद्दल साधक-बाधक चर्चा झाली. भौगोलिक परिस्थितीनुसार, एका प्रजातीत भेद दिसणार्‍या डायव्हर्जंट उत्क्रांतीचे समर्थक वा एकाच प्रकारच्या वातावरणात वाढलेले अनेक प्रजातीचे समांतर उत्क्रांतीचे समर्थक असे पोटभेद असले तरी ते सर्व डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांताचेच पंथ ठरतात. एकीकडे विल्सन-डॉकिन्सपंथी, दुसरीकडे लेवाँटिन आणि स्टीफन जे गूल्ड अशामध्ये जीवदत्त स्वभाव की पालनपोषण असे वाद घडू लागले. आजही वाद आहेत, पण ते पंथभेद आहेत. आणि दोन्ही पक्ष डार्विनची मांडणीच मानतात. ख्रिस्तीधर्मप्रेमींचा निर्मितिवाद आणि त्याची नव्याने फॅशनेबल केलेली इंटेलिजंट डिझाईन ही मांडणी दोन्ही पक्ष नाकारतात. या दीडशे वर्षांच्या प्रवासात जुन्या व नव्या सर्व पुराव्यांचा रोख एकाच निष्कर्षाप्रत पोहोचतो. तो म्हणजे, उत्क्रांती हे बावनकशी वैज्ञानिक सत्य आहे.

परमेश्वरच सृष्टिकर्ता आहे. याच्याभोवतीच फिरणार्‍या क्रिएशनिजमच्या मांडणीतही विविध प्रकार आहेत. परमेश्वर निर्मित मानव वंश दहा हजार वर्षांपेक्षा कमी कालखंडात निर्माण झाला असे तरुण पृथ्वी निर्मितीवाद्यांचे मत आहे. या कालखंडातच महापूर, ज्वालामुखी या नैसर्गिक आपत्तीतून हे जग बदलत गेले असे त्यांना वाटते. प्रगतीशील निर्मितीवाद्यांच्या मते परमेश्वराने प्रायमेट प्राण्यांच्या सुलभ शरीररचनेवरून हिंस्र प्राणी, आकाशात उडणारे पक्षी व मेंदूचा वापर करणारा माणूस यांच्यातील अत्यंत क्लिष्ट शरीररचना केली. तोच बुद्धिमान डिझाईनचा कर्ता करविता आहे, असेही त्यांना वाटते.

निर्मितीवाद (क्रिएशनिजम्) व उत्क्रांतीसिद्धांत यातील काही ठळक फरक असे आहेत :

निर्मितीवाद

संकल्पना ः

संपूर्ण विश्व, ही पृथ्वी व त्यावरील सर्व जीवजंतू इत्यादींची निर्मिती एका अलौकिक शक्तीने केली आहे, यावर हा निर्मितीवाद भर देतो.

पुरावे : याचा एकही पुरावा नाही.

कालखंड : दहा हजार वर्षे वा कमी काळ

वैज्ञानिक निकष : विज्ञानाच्या निकषात हा सिद्धांत बसत नाही.

विविध प्रकार : यातील काही प्रकार ः तरुण पृथ्वी निर्मितीवाद, प्रगतीशील निर्मितीवाद, बुद्धिमान डिझाईन, ईश्वराधारित निर्मितीवाद इ. उल्लेख : याचा उल्लेख बायबलसारख्या धर्मग्रंथात सापडतो.

उत्क्रांतीवाद

संकल्पना ः सृष्टी एका दमात निर्माण झाली नसून ती क्रमाक्रमाने विकसित झाली. जीव अपरिवर्तनीय नसून ते परिवर्तनीय आहेत. हे परिवर्तन मंदगतीने होत आलेले असून कोट्यवधी वर्षांच्या कालावधीतून घडून आलेले आहे. आता ज्या जीवजाती अस्तित्वात आहेत त्या पूर्वीच्या नाहीशा झालेल्या जीवजातीच्या वंशज आहेत.

पुरावे : याचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पुरावे जनुक विज्ञान, जीवाष्म विज्ञान, रेण्वीय विज्ञान, मानववंशशास्त्र, जीवजाती वर्गीकरण शास्त्र इ. प्रगत विज्ञानविषयात सापडतात.

कालखंड : विश्वनिर्मितीसाठी १३०० कोटी वर्षांहून अधिक काळ, पृथ्वीसाठी ३५० कोटी वर्षांहून अधिक काळ, मानव निर्मितीसाठी ७०-८० लाख वर्षांचा काळ

वैज्ञानिक निकष : विज्ञानाच्या निकषात या सिद्धांताला बसविता येते.

विविध प्रकार : यात वेगळे प्रकार नाहीत. परंतु अभ्यासकांच्या सोईनुसार, लॅमार्किजम्, विल्सन-डॉकिन्सपंथी, लेवाँटिन आणि स्टीफन जे गूल्डपंथी असे प्रकार आहेत. परंतु सर्व जण डार्विनची मांडणीच मानतात.

उल्लेख : याची मांडणी चार्ल्स डार्विन व आल्फ्रेड वालेस या तत्त्वज्ञांनी केली.

निर्मितीवाद्यांचा प्रतिवाद

गेल्या ५० वर्षांत क्रिएशनिजमच्या समर्थनार्थ व उत्क्रांतीच्या विरोधात ऐतिहासिक, कायदेविषयक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक व वैज्ञानिक अंगाने चर्चा होत आहे. परंतु प्रत्येक वेळी क्रिएशनिस्ट्स स्वतःची बाजू न मांडता उत्क्रांतीवाद कसा चुकीचा आहे यावर भर देत असतात. त्यातील काही नमुने ः

. उत्क्रांती हा फक्त सिद्धांत आहे, वस्तुस्थिती वा वैज्ञानिक नियम नव्हे.

सामान्यांच्या दृष्टीने वस्तुस्थिती, गृहीतक, नियम व शेवटी सिद्धांत असा क्रम असतो. वैज्ञानिक मात्र याच्या उलट सिद्धान्त, नियम, गृहीतक व शेवटी वस्तुस्थिती असा क्रम लावतात. सिद्धांताची पडताळणी वस्तुस्थितीच्या निरीक्षणातून होते, निरीक्षणातून सिद्धांत नव्हे. आधार नसलेली वस्तू जमिनीवर पडते हे सिद्ध करण्यासाठी दरवेळी प्रयोग करत बसण्याची गरज नाही. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत त्याची प्रचिती देते. त्यामुळे जेव्हा वैज्ञानिक सिद्धांताची मांडणी करतात. उत्क्रांती सिद्धांत असो वा अणुशक्ती सिद्धांत असो वा शरीराची रचना पेशीतून होते हा सिद्धांत असो. — तेव्हा वस्तुस्थितीच्या निरीक्षणावरून गृहीतक, नियम व सिद्धांत या स्वरूपात असतात. त्यामुळे उत्क्रांतिसिद्धांताच्या संदर्भात दरवेळी प्राण्याची रचना कशी बदलत जाते याचे प्रत्यक्ष प्रमाण नसले, तरी जीवाष्माच्या पुराव्यातून हा सिद्धांत सिद्ध होऊ शकतो. वैज्ञानिकांना पदार्थाच्या अणूगर्भात प्रोटॉन, न्यूट्रॉन वा इलेक्ट्रॉन सहजासहजी डोळ्यांना दिसत नाहीत म्हणून अणुशक्तीचा सिद्धांत खोटा ठरत नाही.

. उत्क्रांतिसिद्धांतातील नैसर्गिक निवड ही वर्तुळाकार युक्तिवादासारखी वाटते. परिस्थितीशी अनुरूप असते म्हणून सजीव रचना टिकून राहते व सजीव रचना टिकून राहते. कारण ती परिस्थितीशी अनुरूप असते.

उत्क्रांतीचे हे त्रोटक वर्णन फसवे आहे, हे अनेक उदाहरणानी सिद्ध करता येते. वेगवेगळ्या प्रजातींची शरीररचना प्राण्यांच्या आयुष्यक्रमाशी अनुरूप असते. त्याचबरोबर उत्क्रांतीची प्रक्रिया आनुवंशिकतेतल्या स्वैर गुणावर चाळण्या लावत नवनव्या शरीरक्रियांना जन्म देते. उत्क्रांतीच्या संदर्भात बळी तो कान पिळी, उत्क्रांती म्हणजे स्पर्धा, डार्विनप्रणीत जीवनकलहाचा सिद्धांत आणि सुप्रजननशास्त्राचा दाखला यासारखे त्रोटक वर्णन करून दिशाभूल केली जाते. परंतु अभ्यासानंतर आज या गोष्टी खर्‍या मानल्या जात नाहीत, हेही तितकेच खरे.

. उत्क्रांती ही संकल्पना अवैज्ञानिक असून त्यांनी केलेल्या दाव्यांची/भाकितांची चाचणी करता येत नाही वा प्रत्यक्ष प्रयोग करून सिद्ध करता येत नाही.

उत्क्रांतिवादालाच संपूर्णपणे नकार देणारा हा युक्तिवाद उत्क्रांतिबद्दलच्या अज्ञानातून आला आहे असे म्हणता येईल. हा युक्तिवाद उत्क्रांतीतील अति-सूक्ष्म जीवजंतूमधील बदल घडविणारी उत्क्रांती (Micro Evolution) आणि दुसरीकडे ठळकपणे दिसणार्‍या जाती-प्रजातीतील उत्क्रांती (Micro Evolution) या प्रकारांकडे दुर्लक्ष करते. जनुक व जीवाष्मांच्या अभ्यासातून यांचे प्रारूप तयार करणे शक्य झाले आहे.

. माणूस प्राणी माकडापासून उत्क्रांत झालेला असल्यास या जगात अजून एवढी माकडं का आहेत?

अशा प्रकारचा युक्तिवाद उत्क्रांतीबद्दलच्या गैरसमजुतीतून विचारला जातो. मुलं मोठी होऊन प्रौढावस्थेत जात असल्यास अजून मुलं का दिसतात, असा प्रश्न विचारल्यासारखा हा युक्तिवाद आहे. उत्क्रांती सिद्धांताने माणूस हा माकडाचा वंशज आहे असे कधीच दावा केला नव्हता; फक्त माकड व माणूस एकाच पूर्वजांचे वंशज आहेत. प्रजातीतील काही गुणविशेषांमुळे तगून राहण्याची शक्यता वाढल्यास ते वेगळ्या जातीतले म्हणून ओळखले जातात व ज्यांना योग्य संधी मिळत नाही ते नामशेष होतात.

. पृथ्वीवर पहिला जीव कसा आला हे उत्क्रांती स्पष्ट करू शकत नाही.

जीवाची उत्पत्ती हे अजूनही न सुटलेले कोडे आहे. न्यूक्लिक अ‍ॅसिड, अमिनो अ‍ॅसिड व इतर काही रसायनांतून पेशी व या पेशीतून शरीररचना कशी झाली असेल व त्या पेशी पुन्हा पुन्हा पुनरुत्पादन कसे करू लागल्या याविषयी जैव रसायनशास्त्रज्ञच सांगू शकतील. काहींच्या मते, दुसर्‍या ग्रहावरून धूमकेतूद्वारे त्या आल्या असतील किंवा समुद्राच्या तळाशी प्रिमॉर्डियल रसायनातून ही रासायनिक क्रिया घडली असेल. काहीही असले, तरी कुणी तरी परग्रहावरील बुद्धिमान माणूस वा तथाकथित परमेश्वराचा यात हात नाही हे मात्र नकी.

. प्रजाती उत्क्रांत होत असताना कुणीही पाहिले नाही.

उत्क्रांतीची प्रक्रिया वर्ष-दोन वर्षाची नसून त्यासाठी शेकडो-हजारो वर्षे लागतात. एखादी प्रजाती उत्क्रांत झाली तरी ती उत्क्रांत झाली आहे याची खात्री करून घेण्याससुद्धा दीर्घ काळ लागू शकतो. परंतु काही सूक्ष्म जीवाणू वा वनस्पती यांच्या उत्क्रांतीविषयी व परिस्थितीनुसार बदल घडत गेल्याची भरपूर माहिती उपलब्ध आहे.

क्रिएशनिजमची संपूर्ण भिस्त परमेश्वरांच्या (व त्याच्या नावे चालणार्‍या धार्मिक व्यवहाराच्या) अस्तित्वावर अवलंबून आहे. या विश्वाची, सृष्टीची व या सृष्टीतील सर्व सजीवांची उत्पत्ती या जगन्नियामक परमेश्वरानेच केली आहे, याबद्दल निर्मिकाच्या पुरस्कर्त्यांच्या मनात तिळमात्र शंका नाही. या संदर्भात ही मंडळी अनेक (मिथ्य) कथांचा संदर्भ देतात. या विश्वाची उत्पत्ती कशी झाली असेल? याबद्दल तर त्यांच्याकडे पोतीभर कथा आहेत. आफ्रिकेच्या दंतकथेनुसार माणसं मध्य आफ्रिकेतून आली. मानवी अस्तित्वापूर्वी येथे फक्त अंधार होता व सर्व पृथ्वी जलमय होती. बुंबा नावाचा देव होता. एके दिवशी बुंबाचे पोट अचानकपणे दुखू लागले. वेदना थांबेनात. शेवटी त्याला उलट्या होऊ लागल्या. वांतीतून सूर्य बाहेर पडला. सूर्याच्या तापमानामुळे पाण्याचे वाफेत रूपांतर झाले. त्यामुळे जमिनीचा काही भाग दिसू लागला. तरीसुद्धा बुंबाची पोटदुखी थांबली नाही. पुन्हा एकदा उलटी झाली. त्यातून चंद्र, नक्षत्र, तारे बाहेर पडले. त्यानंतरच्या उलटीतून वाघ, सिंह, मगर, कासव व शेवटी माणूस असे बाहेर पडले आणि सर्व भूभागावर व जलमय प्रदेशात विविध प्रकारचे प्राणी, वनस्पती, झाडे दिसू लागली.

विश्वनिर्मितीच्या दंतकथा

विश्व कसे निर्माण झाले याबद्दलची एक पुराणकथासुद्धा आहे. एक प्रजापती होता. त्याला एक मुलगी होती. प्रजापतीच्या मनात मुलीबद्दल वासना उत्पन्न झाली व तो तिच्या मागे धावू लागला. स्वतःचे शील वाचवायला तिने मृगीचे रूप घेतले. प्रजापतीचे वीर्य जमीनीवर सांडले आणि त्यातूनच सारे विश्व निर्माण झाले. अजून एका कथेप्रमाणे घटक न पडलेल्या पदार्थाच्या पुंजक्यात चेतना उत्पन्न झाली. त्याला आपण एकाचे अनेक व्हावे असे वाटले. त्या विभागणीतून विश्वाची उत्पत्ती झाली.

जगातील अनेक संस्कृतीत याच प्रकारचे वा याहून अद्भुत, कल्पनारम्य अशा विश्वोत्पत्तीच्या, सजीवाच्या उत्पत्तीच्या संदर्भातील दंतकथा असतील. आपल्या येथील उपनिषदात वा जैन ग्रंथातही यासंबंधीचे उल्लेख सापडतील. त्यांची पिढ्यान्पिढ्या उजळणी होत असेल. भर घातली जात असेल. त्याचप्रमाणे इतर अनेक धर्मग्रंथांतसुद्धा विश्वोत्पत्तीबद्दल, सजीवांच्या उत्पत्तीबद्दल भरपूर प्रमाणात उल्लेख आढळतात. बहुतांश उल्लेख ईश्वरी शक्तीचे उदात्तीकरणाच्या स्वरूपात असल्यामुळे त्यांनाही दंतकथाच म्हणावे लागेल. परंतु या दंतकथांना कुठेतरी थोपवून धरले पाहिजे व जे सत्य आहे ते बाहेर पडले पाहिजे असे वाटणार्‍यांना विज्ञान वाटाड्या म्हणून नकीच मदत करू शकेल, हे नाकारता येत नाही.

परमेश्वराने या सृष्टीची निर्मिती केली याचे मूल्यांकन विज्ञान करू शकत नाही. धार्मिकांच्या मते (त्यांचा) परमेश्वर काहीही करू शकतो; प्रत्येक जीवजंतूच्या शरीरात जाऊन बदल करू शकतो वा घड्याळाला चावी दिल्यासारखे एकदा चावी देऊन प्राणी, पक्षी, वनस्पती वा माणूसजीवी यांना पृथ्वीतलावर पाठवू शकतो; किंवा एखाद्या परग्रहातील बुद्धिमान माणसाकडून हे काम करून घेऊ शकतो; परमेश्वर हा बुद्धिमान डिझायनर असू शकतो व त्याला हवे तसे हवे तितके जाती-प्रजातींची उत्पत्ती करू शकतो. अशा प्रकारच्या वितंडवादाला वैज्ञानिकांपाशी उत्तर नाही. परंतु युवाल नोहा हरारी या अभ्यासकांच्या मते, परमेश्वरापेक्षा आधुनिक मानव प्राणीच बुद्धिमान डिझायनर असून त्याने डिझाईन केलेले जनुक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्रमानव खर्‍या अर्थाने उत्कृष्ट डिझाईन आहेत.

परंतु परमेश्वराचे अस्तित्वच नाकारल्यास क्रिएशनिस्ट्सनी उभारलेला हा मनोरा कोसळून पडेल. तरीसुद्धा डार्विनच्या उत्क्रांतिवादाला नाकारण्याचा दुराग्रह ते धरत आहेत. त्यामुळे विज्ञानाबद्दल विद्यार्थ्यांची मने कलुषित होऊन विज्ञानविषयक संशोधनालाच फटका बसून भावी पिढीवर व मानवी प्रगतीवरच प्रतिकूल परिणाम होण्याची भीती विचारवंतांना वाटते.

८ डिसेंबर २००१ रोजी डॉकिन्सने गूल्डला एक पत्र लिहिले. तुझे मत आहे की, निर्मिकवाद्यांशी जाहीर वादविवाद करू नये. तसा वादविवाद झाल्याने काही तरी वाद घालण्याजोगे आहे असा भ्रम (अडाणी, बघ्या) लोकांमध्ये उपजेल.

यावरूनच यांच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही हे सूचित होते. सुज्ञास जास्त सांगणे न लगे.

प्रभाकर नानावटी

लेखक संपर्क : ९५०३३ ३४८९५


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]