फारुक गवंडी -

घर, माणसं पेटवण्यासाठीच असतात, असं पटवून देणार्या काळात. आपण बोलत राहू. दोस्ता बोलत जा.- सोलोकोरोस.
सुशिक्षित मराठी मुस्लीम तरुणाची घुसमट म्हणजे सोलोकोरोस. एक तास वीस मिनिटांचे ‘सोलोकोरोस’ हे नाटक म्हणजे शिकल्या अब्दुल्याची स्वगते आहेत. हा मुस्लीम तरुण पुरोगामी मोर्चा, आंदोलनात आहे. तो स्वतःला बुद्ध, शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचा अनुयायी मानतो आणि ज्याचं भावनिक नाते कबीर, गालिब, खुसरो, मंटो, सफदर, धूमील, दुष्यंत यांचेशी आहे. सोलो म्हणजे एकट्याचे गाणे आणि कोरोस म्हणजे समूहगान. मग सोलो कोरोस हा तर विरोधाभासच आहे. समाजातील विरोधाभास मांडण्याचा प्रयत्न या नाटकात आहे. ‘सोलाकोरस’मध्ये गाणारा साहिल कबीर, त्याचा करुण – वेदनादायी स्वर स्वतःला माणूस समजणार्या प्रत्येकाचे काळीज चिरत जातो. अब्दुल्लाचे हेच स्वगत, स्वर बनून टिपेला पोहोचते, तेव्हा शरीरातील प्रत्येक कण आणि कण तो झिंजाडून टाकतो. अनामिक भीती, वेदनेने आणि बुद्धाच्या करुणेने सुद्धा. साहिर आणि साहिल असे दोन उर्दू शब्द आहेत. साहिरचा उर्दू अर्थ म्हणजे जादूगार आणि साहिल म्हणजे समुद्राचा किनारा, तट. लेखक साहिल, साहिर बनून शब्दांशी खेळतो. प्रमाण मराठी, हिंदी, इंग्रजी, ग्रामीण मराठी, दख्खनी मुसलमानी, हायब्रीड हिंदी, आसपासच्या ग्लोबल ते लोकल, कोणत्याही भाषेचा दंभ किंवा न्यूनगंड न बाळगता, बिनधास्त धटिंग डिंग व्यक्त होतो. त्याला प्रमाण भाषा महत्त्वाची नसतेच. त्याला फक्त महत्त्वाचे असतात राबणार्या बहुजन, कष्टकरी माणसांची वेदना, दुःखे आणि त्या अथांग दुःखाच्या समुद्रात वाहात न जाता, माणसांना माणूस म्हणून पैलतीरी नेणे.
“अपना गम लेके कही और जाया ना जाये,
घरमें बिखरी हुई चीजों को सजाया जाये”
आवाजातील आर्जव जाऊ दे. अजून थोडा अंधार राहील. ब्लँक आहे मी. कोरसमध्ये तारस्वर लागलाय. दुःखाची सिंफनी सिंपली ग्रेट. उजेडा लवकर भेट. भेटशील? अंधाराला भेदून उजेडाला भेटायला आतुरलेला साहिल सिंपली ग्रेट आहे. ‘महापुरात माणसांचा संसार वाहून गेला आणि महामारीत माणसांचे मृतदेह नदीवर तरंगत राहिले.’ हे दुःख व्यक्त करीत असताना दांभिकपणा उघडा पडतो. “कावळ्यासाठी दार न उघडणारी चिमणी. खडे टाकून हंड्यातलं पाणी पिणारा कावळा. कुठल्याही मोर्चात पाणी वाटणारा तौसिफ. पाण्यासाठी मार खाणारा आसिफ. पाण्यात घरं वाहून गेल्यावर रडणारा अस्लम. पाण्यात जीव देणारी आयेशा बेगम” ही धडपडणारी, संघर्ष करणार्या गरीब माणसांच्या प्राथमिक गरजांबाबत संवादाच्या माध्यमातून हे नाटक सटीक टिप्पणी करते.
“रोटी पे लिखे गझल, हमने उन्हे भेजी है।
देखते है गरीब, इसे पढते है या खाते है।”
सहजपणे माणसांच्या कत्तलीचे राजकारण करणार्या, त्यात सामील असणार्याबद्दल दोन वाक्येच पुरेशी होतात. “चिमण्यांच्या पाण्याची सोय व्हर्च्युअली करणारी भूतदयाळू माणसं मोठीमोठी होतायत.” पण सामान्य माणसांना इतक्या भीतीत दडपून टाकले आहे की, “जी बहुत चाहता है की सच बोलू. क्या करें हौसला नहीं होता.” हा नाटकातील नवरा- बायकोतील संवाद चिमटा काढीत सत्य परिस्थितीचे भान करून देतो. हा संवाद पहा.
ती – मार्केटातून भाजीपाला आण.
तो – त्यो रफ्या गाड्यावर आणून देतो ना गल्लीत?
ती – नाही. ठरलंय नाही घ्यायचं म्हणून.
तो – कुणी ठरवलं?
ती – व्हॉट्सअपवर मेसेज आलेत, ठरावाचे!
ती – कांदा वगैरे महाग झालाय, काय होईल पुढं?
तो – दलाल हसेल, सामान्य चिंतित होईल, शेतकरी रडेल.
ती – मग आपण काय करायचं?
तो – शेतीधोरणाचे समर्थन.
ती – त्याने काय होईल?
तो – त्यामुळे प्रमाणपत्राची पुष्टी केली जाईल.
ती – कशाचं?
तो – आपण देशभक्त असल्याची!
तो – कांदा चिरायला घेतलाय.
ती – दुःख विळीवर चिरता येतं?
सीएए, एनआरसीच्या शाहीनबाग आंदोलनात सहभागी होण्याविषयी सांगितले तेव्हा अब्दुल म्हणतो “हम यांकैच” म्हणजे आम्ही इथलेच.
“मी नै गोळा करणार कसली कागदपत्रं… मी कवितांच्या कागदाची वाट पाहीन. किंवा समूह प्रार्थनेत गाणी गात राहीन “सारे जहाँ से अच्छा” किंवा पाश सध्या नसेल तर टागोर आहे हातात भयमुक्त देशाची ग्वाही देत. नाही जमलं तर संविधान प्रास्ताविकाची पहिली ओळ कोरीत राहील वारंवार ‘आम्ही भारताचे लोक’ त्याच्या लेखी रहिवासी प्रमाणपत्राइतकीच किंवा त्याहूनही जास्त अधिकृत गालिबची कविता किंवा इकबालचं “सारे जहाँ से अच्छा” हे आहे. मात्र त्याच वेळी आज देशातलं वातावरण इतकं गढूळ झालं आहे की गालीब जरी आला तरी त्यालाही सर्टिफाईड व्हावं लागेल याची खेदकारक जाणीव त्याला आहे.
“आग लागलीय एक बाग बहरली पाहिजे,
गाव गाव शाहीन बाग झालं पाहिजे.”
हे त्याचं स्वप्न आहे. पूर्वी सण साजरे व्हायचे आनंदाने, सलोख्याने, एकमेकांना सहभागी करून घेऊन. आज सामान्य गावगाड्यातील मुस्लीम आईची, बहिणीची, पत्नीची वेदना या आनंदात सहभागी होताना कशी असते? रस्त्यावर जीव आहे, घराघरात अभिमान आहे, दीपावलीमुळे आज जमीन आभाळ आहे. “पाठीमागच्या गल्लीतून जमीला बूने दिवाळीत दिवा लावला. गल्लीतल्या बायकांचा गलबला. फटाके, रांगोळी, आवाज, धूर, गाड्यांची ये-जा, फुलं, संगीत, सगळं बघून तिने आपल्या छोट्या भावाला घट्ट धरून ठेवलंय. कुणाच्या रांगोळीवर पाय लागला तर, उगाच भांडण नको. फैजान अशाच भांडणाच्या निमित्ताने गेला. किल्ला बसवन्याच्या अदुगरच. माती आणायला गेलेला तेवीसचा फैजान मातीत गेला, पुरला गेला.” हे वाक्य स्वतःला माणूस समजणार्या प्रत्येकाच्या पोटात खड्डा पाडते.
“डोळ्यातील अश्रू दिव्यातील तेल असू शकत नाही.”
“दिवा पेटवला की अंधार दिवा सुखद वाटतो. घरं पेटतात तेव्हा उजेड घातकी असतो.”
गावगाड्यातील अब्दुलचे दुःख मांडीत असताना, त्याची हतबलता देखील हे नाटक मांडते. “अब्दुलला अगुदर अब्दुल्या म्हणलं की आपलेपणा वाटायचा. गेल्या काही वर्षात अब्दुल्या असं कुणी म्हणलं तर ह्याला अजीब वाटायला लागतं. त्या हाक मारण्यात लपलेली टवाळकी, टिंगल समजते त्याला, पण चिडून काय उपेग?” सर्वसामान्य भारतीय मुस्लीम समाज हा दलित, कष्टकरी आहे. तो याच मातीचा भाग आहे. त्याची भाषा, खानपान, संस्कृती ही प्रादेशिक आहे. कर्नाटकात कन्नड, बंगालमध्ये तो बंगाली, तमिळनाडूमध्ये तमिळ, तर महाराष्ट्रात मराठीत बोलतो. महाराष्ट्रातील मुसलमानांचे जन्मापासून बारसे, हळदी, मेहंदी, लग्ने, मयती यातील परंपरा, कर्मकांडे या प्रादेशिक समाजाशी कितीतरी मिळत्याजुळत्या आहेत. शेकडो वर्षे आपल्याच शेजारी असणार्या, आपल्यासारख्याच समस्याने नाडला जात असणार्या मुसलमानांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन वेगळा का झाला आहे? एकतर्फी द्वेषाच्या आणि भ्रमाच्या जाळ्यात अडकून आपण आंधळे होत चालले आहोत का? फक्त वेशभूषा आणि धार्मिक श्रद्धा वेगळी आहे. म्हणून मुस्लिमांचे भारतीयत्वच नाकारणे योग्य आहे का? या नाटकाचा शेवट पुढील वाक्यात आहे. “घरं, माणसं पेटवण्यासाठीच असतात. असे पटवून देणार्या काळात. आपण बोलत राहू. दोस्ता बोलत जा.” इथे नाटक संपते.

‘सोलोकोरस – शिकल्या अब्दुल्याची स्वगतं’ या लेखक, कवी साहिल कबीर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन ललित पब्लिकेशनकडून मे २०२२ रोजी माल्कम एक्सच्या जयंती दिवशी झालं. आता मे २०२३ रोजी या पुस्तकातील काही तुकडे घेऊन, त्याचे नाट्यरूपांतर करण्यात आले आहे. पुण्याच्या राहुल लामखेडेने दिग्दर्शन आणि नेपथ्याची जबाबदारी जबरदस्त पेलली आहे. गौतमी, डॉ. श्रीकांत, पवन, ओंकार, निखिल, हर्ष, राजेश, अक्षय आणि स्वतः राहुल कलाकार म्हणून कधी प्रेक्षकांना हसवत, कधी रडवत, तर कधी थेट त्यांच्या काळजात घुसत विचारप्रवण करतात हे कळतही नाही. काही ठिकाणी उत्साहात तर काही ठिकाणी विरोधात तर बर्याच ठिकाणी आर्थिक गणिते जुळवून ‘सोलो कोरोस’ हे नाटक या उन्मादी वातावरणात तरुणांनी सुरू ठेवले आहे. या सर्व तरुण कलाकारांची भावना सोलो कोरोस मध्ये साहिल कबीरने लिहिल्याप्रमाणे आपण म्हणू शकतो. “फुलपाखरे उडून जाऊ नयेत संवेदनांची! माणूस नावाच्या फुलझाडाला धक्का लागलाय.” आणि “ये आँखे है तुम्हारी, तकलीफ का उमडता हुआ समंदर. इस दुनिया को जितनी जल्दी हो बदल देना चाहिये.”
लोकांना, लोकांच्या भाषेत, लोकांच्या वेदनेचे नाटक, कमीत कमी साहित्य, ड्रेपरी वापरून त्यांच्याच दारात, सडकेवर करणे म्हणजे सडक नाटक. सोलो कोरस हे साहिल कबीरचं नाटक सडक नाटकाचा हाच फॉर्म वापरते. म्हणूनच हे पुस्तक, साहिल सडक नाटकाचा हा फॉर्म लोकप्रिय करणारा जनकलाकार शहीद सफदर हाश्मी आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर यांना सविनय सादर करतात. ‘झुंडीची मानसिकता’ प्रबळ झाली असताना सोलो कोरोस येणे आश्वासक आहे.
प्रोजेक्टर, पडदा, प्रकाशयोजना, ध्वनी योजना, संगीत, ड्रेपरी, नेपथ्य इत्यादी तंत्रज्ञानाचा कमीत कमी किंवा गरजेपुरता वापर करून पण उपलब्ध तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त प्रभावी वापर करीत, सोलो कोरोसचे महाराष्ट्रात २० प्रयोग यशस्वीपणे पार पडलेले आहेत. लोककलेचा फॉर्म वापरून, कमीत कमी यंत्रणा, भांडवल वापरून जास्तीत जास्त श्रम हावभाव, आवाज आणि संदेश पोहचवण्यावर भर देऊन हे नाटक कलाकार सादर करतात. अगदी पन्नास माणसे बसू शकतील अशा शांत एका कोणत्याही कोपर्यात किंवा अगदी सुसज्ज अशा आधुनिक नाट्यगृहात.
बर्टोल्ट ब्रेख्त हिटलरच्या काळात म्हणाला होता, In the dark times, Will there also be singing? Yes, there will also be singing. About the dark times. आपल्या काळात बिलकीस, प्रियांका, सुरेखा, श्रद्धा, मोहसीन, नजीब, अखलाक, पेहलू, रोहित आणि अक्षय यांना संपवणार्या व्यवस्थेविरुद्ध आपण बोलत आणि गात राहू. संघर्ष करत राहू. ‘सोलो कोरोस’ मधील वेदना या अब्दुल्याच्या असल्या, तरी त्या प्रतिनिधिक आहेत. व्यवस्थेने नाडलेल्या समस्त माणसांच्या. राहून राहून सोलो कोरोस माझ्या मनात प्रश्न उपस्थित करतो. जब्या अन्यायी व्यवस्थेविरुद्ध दगड उचलून, भिरकावू शकतो. पण हाच दगड, याच अन्यायी व्यवस्थेविरुद्ध अब्दुल्या उचलू तरी शकतो का?
प्रयोगासाठी संपर्क : साहील कबीर
मो. ९९२३०३०६६८