डॉ.राम पुनियानी -
भारतासारख्या देशासाठीही ही कसोटीची वेळ आहे. अनेक उपाययोजना केल्या जात आहेत; पण या साथीच्या इलाजाबाबत देशातील सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या सहकारी संघटना जे तर्हेतर्हेचे अजब, अवैज्ञानिक आणि अविवेकी दावे करत आहेत व या लढाईला अधिकाधिक कठीण बनवत आहेत. अशा दाव्यांबाबत त्यांची श्रद्धा इतकी टोकाची आहे की, त्यांच्या दाव्यांना तार्किकतेच्या कसोटीवर घासणार्यांना ते आपले शत्रूच मानत आहेत.
आज अवघी मानवजात ‘कोविड-19’च्या साथीविरोधात संघर्ष करण्यात गुंतलेली आहे. चीनमधून सुरू झालेली ही जीवघेणी साथ आता जवळजवळ सार्या जगात पोचलेली आहे. भारतासारख्या देशासाठीही ही कसोटीची वेळ आहे. अनेक उपाययोजना केल्या जात आहेत; पण या साथीच्या इलाजाबाबत देशातील सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या सहकारी संघटना जे तर्हेतर्हेचे अजब, अवैज्ञानिक आणि अविवेकी दावे करत आहेत व या लढाईला अधिकाधिक कठीण बनवत आहेत. अशा दाव्यांबाबत त्यांची श्रद्धा इतकी टोकाची आहे की, त्यांच्या दाव्यांना तार्किकतेच्या कसोटीवर घासणार्यांना ते आपले शत्रूच मानत आहेत. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे खून याचेच पुरावे आहेत. अशा तत्त्वांना धार्मिक राष्ट्रवादाच्या उदयामुळे जास्तच जोर चढला आहे.
22 मार्च 2020 ला प्रधानमंत्री मोदींनी ‘जनता संचारबंदी’च्या आवाहनाबरोबरच त्यांनी कोरोनाच्या विरोधात आघाडीवर लढणारे डॉक्टर आणि नर्सेस वगैरे इतर आरोग्यसेवक यांच्या सन्मानार्थ घरच्या बाल्कनीतून टाळ्या-ताटल्या वाजविण्याचे आवाहन केले होते. यात काहीच चूक नव्हती; पण याला काही ठिकाणी वेगळाच रंग दिला गेला. ‘जनता संचारबंदी’चा मूळ उद्देशच बाजूला ठेवत मिरवणुका काढल्या, शंख फुंकले, नाचले. अशा आवाजांमुळे विषाणू मरून जातील, अशी समजूत यामागे होती. महाराष्ट्र भाजपच्या एक नेत्या शायना एनसी यांनी पुराणाचा हवाला देत शंखध्वनी विषाणूंसाठी ‘काळ’ असल्याचा दावा केला.
याचप्रमाणे स्वामी चक्रपाणी महाराजांनी गोमूत्र परतीचे आयोजन करून पाहुण्यांना गोमूत्र पाजले, पाहुण्यांनी ते पिलेसुद्धा. कारण त्यांना खात्री होती, त्यामुळे कोरोनापासून त्यांचे रक्षण होईल. भाजप नेत्याने आयोजित केलेल्या अशाच एका पार्टीत गोमूत्र पिल्याने एकजण आजारीच पडला. आसामचे भाजप आमदार सुमन हरिप्रिया यांनी कोरोनाविरोधातील लढाईतील गोबरचे महत्त्व तपशिलाने सांगितले आहे. यात काहीच आश्चर्य नाही की, गोमूत्र, गोबर याचे औषधाच्या रुपात वापर करण्याबाबतची वकिली करणारे सर्वजण भाजपशी जोडलेले आहेत. गोमूत्रातील अद्भुत औषधी गुणांचा शोध 1998 मध्ये ‘एनडीए’ची सत्ता आल्यावरच लागला. प्रधानमंत्र्यांचे निकटवर्ती गुजरातचे शंकरभाई वेगड यांचा दावा आहे की, गोमूत्रप्राशनामुळेच मी 76 व्या वर्षीही तंदुरुस्त आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दावा आहे की, त्यांच्या स्तनाचा कर्करोग गोमूत्रप्राशनानेच बरा झाला आहे. त्यांच्या डॉक्टरांच्या अनुसार त्यांच्यावर तीन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली होती, ही बाब बाजूला ठेवू.
गोमूत्राने आजार ठीक होतात, यासाठी काही तर्कशुद्ध आधार आहेत? भारत सरकारने गोमूत्र आणि पंचगव्य (गोबर, गोमूत्र, दूूध, दही आणि तुपाचे मिश्रण) यावरील संशोधनासाठी भलीमोठी रक्कम दिली आहे. अनेक केंद्रीय शोध संस्था गौ उत्पादने आणि भारतीय गाय यांच्या वैशिष्ट्यांवर संशोधन करीत आहेत.
वैज्ञानिक चिकित्सेत कोणत्याही औषधाचा प्रभाव जोखण्यासाठी जैवरासायनिक अभ्यास केला जातो, त्या औषधाच्या प्रयोग शाळेत चाचण्या घेतल्या जातात आणि औषध बाजारात आल्यावरही त्या औषधाबाबतचा अभ्यास चालूच असतो. गोमूत्राबाबत जे दावे केले जात आहेत, ते केवळ श्रद्धेवर आधारित आहेत. त्या पाठी ना कोणता वैज्ञानिक आधार आहे, ना काही वैज्ञानिक अभ्यास. गोमूत्रात इतर जनावरांच्या मूत्रासारखेच घटक आहेत, जे त्यांच्या शरीराला हानिकारक आणि निरुपयोगी म्हणून बाहेर टाकले जातात. गोमूत्रात जवळपास 90 टक्के पाणीच असते, आणि त्याशिवाय युरिया, क्रिएटेनिन, सल्फेट आणि फोस्फेट हे घटक असतात. गोमूत्रातील उपयुक्त घटक सिद्ध करण्यासाठी प्रयोगशाळेतील कोणत्याही चाचण्या घेण्यात आलेल्या नाहीत. हे सगळे दावे श्रद्धेवर आधारित आहेत. केवळ आपली विचारधारा दुसर्यावर लादण्यासाठी असे अवैज्ञानिक दावे काही शक्ती करीत आहेत.
खरे तर गोमूत्र, गोबर हे सर्व हिंदू राष्ट्रवादाच्या रचनेच्या योजनेचा भाग आहे. हिंदू राष्ट्रवादी देशावर लैंगिक आणि जातीयवादी उच्च-नीचतेवर आधारित विचारसरणी लादू पाहत आहेत. म्हणूनच त्यांचा दावा आहे, आधुनिक जगणे गेल्या शंभर-दोनशे वर्षांत जे वैज्ञानिक शोध लावले आहेत, ते सारे हजारो वर्षांपूर्वीच प्राचीन भारतीयांनी लावलेले आहेत. प्राचीन भारतात विमाने, टेलिव्हिजन, इंटरनेट, प्लास्टिक सर्जरी सर्वच होते. संघाशी संलग्न ‘विज्ञान भारती’ पौराणिक साहित्यात आधुनिक विज्ञान शोधण्याचेच काम करत असते. या कार्यक्रमाचा उद्देश प्राचीन भारताला सुवर्ण युगाच्या रुपात दाखवणे आणि पारंपरिक हिंदू मूल्यांची सर्वोच्चता प्रस्थापित करणे, हाच आहे.
हिंदुत्ववादी गायीचा वापर दोन प्रकारे करत आहेत, एका बाजूला ‘लीचिंग’ केली जात आहे, तर दुसर्या बाजूला गोमूत्र आणि गायीचे शेण औषधाच्या स्वरुपात आणले जात आहे. बाबा रामदेवची ‘पतंजलि’ गाय उत्पादनावर आधारित अनेक औषधे बाजारात आणत आहे आणि नागपुरात गोविज्ञान संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे.
कोरोनासारख्या भयंकर साथीला तोंड देण्यासाठी प्रचंड प्रयत्न करावे लागणार आहेत. या लढाईत अवैज्ञानिकता आणि अंधश्रद्धाना काहीही स्थान असणार नाही.
(राम पुनियानी यांच्या मूळ इंग्रजी लेखाच्या अमरीश हरदेनिया यांनी केलेल्या हिंदी रूपांतरावरून राजीव देशपांडे यांनी मराठीत केलेला अनुवाद)