सुबोध मोरे - 9819996029
“जिवंत राष्ट्र म्हणून काही एखादी सामान्य व्यक्ती नव्हे; जसे एकच माणूस म्हणजे कुटुंब किंवा एकच घर म्हणजे समाज किंवा गाव अगर प्रांत किंवा देश होऊ शकत नाही, तद्वत एका राष्ट्रातील एकच विवक्षित जात अगर समाज म्हणजेच एक राष्ट्र होऊ शकत नाही, तर एकापेक्षा अधिक माणसे मिळून एक कुटुंब, अशी अनेक कुटुंबे मिळून एक समाज, समाज मिळून गाव व गाव मिळून प्रांत व राष्ट्र होऊ शकते. एकाच कुटुंबातील माणसांमध्ये एकमेकांविषयी जशी आपलेपणाची भावना असते, तशीच ती प्रत्येक समाजात असल्याशिवाय राष्ट्राचा जिवंतपणा दिसणे शक्य नाही आणि ज्या ठिकाणी हा जिवंतपणा नसेल, त्याठिकाणी इतरांच्या चढाओढीत अपयशच असणार!”
भारतीय समाजातील जातीय विषमतेवर व फसव्या तथाकथित ‘राष्ट्र’ संकल्पनेवर नेमके बोट ठेवणारा वरील परिच्छेद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढाकाराने प्रसिद्ध झालेल्या ‘मूकनायक’ पाक्षिकातील आहे. आज देशात खोट्या राष्ट्रवादाचा, राष्ट्रभक्तीचा व तथाकथित ‘हिंदू राष्ट्रा’चा जो ढंढोरा पिटण्यात येत आहे, त्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्र’ संकल्पनेचा वास्तवातील फोलपणा पाहायला मिळतो आणि जातिव्यवस्थेने बरबटलेल्या या देशात राष्ट्रातील जिवंतपणा का नाही व खर्या अर्थाने ऐक्याची भावना नसल्याने देशाची प्रगती का खुंटली आहे, हे सुद्धा समजते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मूकनायक’ हे पाक्षिक अस्पृश्य जनतेमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी 31 जानेवारी 1920 साली मुंबईतून सुरू केले. त्या ऐतिहासिक घटनेचे यंदा शताब्दी वर्ष आहे.
‘काय करू आता धरुनिया भीड। नि:शंक हे तोंड वाजविले॥
नव्हे जगी कोणी मुकीयांचा जाण। सार्थक लाजून नव्हे हित॥
संत तुकारामांचा वरील अभंग ‘मूकनायका’च्या पहिल्या पानावर अग्रभागी छापून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन वृत्तपत्रांवरील आपले भाष्य करताना म्हटले आहे की, या देशातील उच्चवर्ग-वर्णियांच्या वृत्तपत्रांना अस्पृश्यांच्या समस्यांची जाण नाही आणि म्हणून आम्ही आता कुठलीही भीड न बाळगता ’मूकनायक’ द्वारे जाहीर वाचा फोडणार आहोत, अशी रोखठोक भूमिका घेतली होती. ’मूकनायक’ हे पाक्षिक सुरू करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोल्हापूरचे छत्रपती व आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांनी मोलाची आर्थिक मदत दिली होती. एवढीच मदत देऊन शाहू महाराज थांबले नाहीत, तर नंतर त्यांनी कोल्हापूरच्या माणगावमध्ये अस्पृश्यांची परिषद घेतली व डॉ. बाबासाहेबांना तिचे अध्यक्षही केले आणि अस्पृश्यांना आता स्वत:चा नेता मिळाला आहे, असे डॉ. बाबासाहेबांविषयी गौरवोद्गारही काढले होते. सदर परिषदेचा सविस्तर वृत्तांतही ‘मूकनायक’मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. तत्कालीन अस्पृश्य समाजाच्या समस्यांना वाचा फोडण्याचे ऐतिहासिक कार्य ‘मूकनायक’ने केले होते; परंतु टिळकांच्या ‘केसरी’सारख्या ब्राह्मण्यवादी वर्तमानपत्राचा दृष्टिकोन ‘मूकनायक’ला अनुल्लेखाने मारण्याचाच होता. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’च्या जाहिरातीचा मजकूर रोख रक्कम भरून ‘केसरी’ला पाठविला होता; पण ती जाहिरात छापण्याचे सौजन्यही टिळकांच्या ’केसरी’ने दाखविले नव्हते आणि ’मूकनायक’ची दखल घेणेही टाळले होते. या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नंतर आपल्या ‘बहिष्कृत भारत’ या पत्रात खंतही व्यक्त केली होती आणि तथाकथित राष्ट्रीय नेत्याच्या वृत्तपत्रातील चुकीच्या गोष्टींचा समाचारही त्यांनी ‘मूकनायक’मध्ये घेतला होता. सदर पाक्षिकाचे संपादकपद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ते सिडनॅदम कॉलेजमध्ये प्राध्यापक असल्याने उघडपणे घेता आले नव्हते, त्यामुळे त्यांनी त्यांचे सहकारी पांडुरंग भटकर यांना संपादक केले होते; परंतु तरी डॉ. बाबासाहेब हे ’मूकनायक’चे अग्रलेख लिहित असत. नंतर डॉ. बाबासाहेबांना जुलै 1920 मध्ये आपले उरलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडनला जावे लागले, त्यामुळे ते पाक्षिकाची दैनंदिन जबाबदारी पार पाडू शकले नाहीत व आर्थिक अडचणीही वाढल्याने ’मूकनायक’ हे 14 व्या अंकानंतर अकाली बंद पडले. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचा प्रारंभ ‘मूकनायक’पासून सुरू झाला, याची ऐतिहासिक नोंद झाली.
नंतर 20 मार्च 1927 च्या ऐतिहासिक महाड चवदार तळे सत्याग्रहानंतर लगेचच, म्हणजे दि. 3 एप्रिल 1927 ला स्वत:च्या संपादकत्वाखाली डॉ. बाबासाहेबांनी ‘बहिष्कृत भारत’ नावाचे पत्र सुरू केले. या पत्रातील त्यांचे ‘महाड येथील धर्मसंगर व वरिष्ठ हिंदूंची जबाबदारी,’ ‘धर्मसंगर व इंग्रज सरकारची जबाबदारी’ हे त्यांचे अग्रलेख खूप महत्त्वाचे होते. याच ‘बहिष्कृत भारत’मध्ये त्यांनी सनातनी विचारांची तळी उचलणार्या तत्कालीन ब्राह्मणी वृत्तपत्रांचाही सडेतोड समाचार घेतला होता. ‘महार आणि त्यांचे वतन,’ ‘अस्पृश्यता निवारणाचा पोरखेळ’ आदी बाबासाहेबांचे अग्रलेखही गाजले होते; परंतु खेदाने नोंदवावे वाटते की, हे पत्रही जवळपास 22 महिने चालले व 1929 साली आर्थिक कारणास्तव बंद पडले. याच दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली ‘समाज समता संघा’ची स्थापना झाली होती, ज्यात डॉ. बाबासाहेबांचे अनेक स्पृश्य कायस्थ ब्राह्मण समाजातील सहकारी सक्रिय होते. त्यांच्या पुढाकाराने ‘समता’ नावाचे पत्र सुरू झाले होते, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब नियमित लेखन करीत असत.
महाड चवदार तळे सत्याग्रहानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांचे प्रमुख नेते म्हणून उदयाला आले आणि त्यांच्या दैनंदिन कामाचा व्यापही वाढला होता. ते अस्पृश्यांच्या प्रश्नांसोबत शेतकरी, कष्टकर्यांच्या प्रश्नांवरही कार्य करू लागले होते. त्यामुळे त्यांना व्यापक जनसमूहांना भावेल, असे नवे पत्र काढण्याची गरज भासू लागली व त्यांनी आपल्या स्पृश्य सहकार्यांच्या मदतीने नोव्हेंबर 1930 ला ‘जनता’ या नव्या पत्राची सुरुवात केली. जनता पत्राच्या निवेदनात डॉ. बाबासाहेब म्हणतात, बहिष्कृत भारत’ असे आपल्या पत्राचे नाव असल्यामुळे अस्पृश्यांशिवाय दुसरे कोणी वाचत नाहीत, म्हणून पत्राचे नाव ‘जनता’ केले आहे. या पत्राचे संपादक देवराव नाईक व व्यवस्थापक भास्करराव कद्रेकर होते; परंतु या पत्राचे अनेक अग्रलेख डॉ. बाबासाहेब लिहित असत. त्यांच्या अग्रलेखाच्या खाली ‘ए’ असे अक्षर लिहिलेले असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे पत्र 1930 ते 1955 असे सर्वाधिक काळ सुरू होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला काळाराम मंदिर सत्याग्रह, येवले येथील धर्मांतराची घोषणा, कोकणातील खोतीविरोधी लढा, स्वतंत्र मजूर पक्षाने विधानसभेत व बाहेर लढलेले लढे, त्यापूर्वीचा महात्मा गांधींसोबत केलेला पुणे करार, राखीव मतदार संघ, अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडरेशन, कामगारांच्या काळ्या कायद्याविरोधात कम्युनिस्टांसोबत संयुक्तपणे लढलेले लढे, ब्रिटीश सरकारमध्ये कामगार व खाणमंत्री म्हणून केलेले कार्य, भारतीय संविधाननिर्मितीमध्ये केलेले कार्य, मुंबई व मराठवाड्यात व देशाच्या अन्य भागांत केलेले शैक्षणिक कार्य, सर्व स्त्रियांच्या हक्कांसाठी हिंदू कोड बिल अंमलबजावणीसाठी केलेला संघर्ष आणि 1956 च्या बौद्धकाम परिवर्तनासाठी केलेली वैचारिक जागृती, या वरील महत्त्वाच्या विषयांवरील विपुल लेखन, वृत्तांत ‘जनता’ पाक्षिकात वेळोवेळी प्रसिद्ध झाला आहे. त्याकाळी बहुसंख्य अस्पृश्य समाज हा निरक्षर होता. परंतु जे थोडेबहुत शिकले ते तरुण शिक्षक होते. ते मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता पाक्षिकाचे खेडोपाड्यात व शहरातील कामगारांच्या चाळीत व वाचनालयात सार्वजनिक वाचन करावयाचे व परिवर्तनाचा, समतेचा विचार जनमानसांत रुजवायचे. याच सार्वजनिक वाचनातून प्रेरणा घेऊन निरक्षर आंबेडकरी, समतावादी गायक, कलावंत, ‘जलसा’कार, कलापथके पुढे आली व त्यांनी आंबेडकरी विचार सर्वसामान्य लोकांमध्ये पसरविण्याचे व प्रबोधनाचे मोठे कार्य केले. डॉ. आंबेडकरांच्या पत्रातील हा ‘जनता’ चा जो मोठा कालखंड आहे, तो शासन जाणीवपूर्वक ‘जनता’चे अंक पुनःप्रकाशित न करता दडपण्याचा प्रयत्न करून डॉ. बाबासाहेबांची व्यापक प्रतिमा संकुचित करण्याचा प्रयत्न करीत आहे. अत्यंत साधनहीन व प्रतिकूल परिस्थितीत डॉ. बाबासाहेबांनी विना वैचारिक तडजोड करता जी व्यापक पत्रकारिता केली, तिची योग्य नोंद प्रस्थापित भांडवली-ब्राह्मणी पत्रकार व संपादकांनी केली नाही, हे शल्य आहे.
डॉ. बाबासाहेबांच्या वरील व्यापक पत्रकारितेसमोर आजची तथाकथित आंबेडकरी पत्रकारिता अत्यंत खुजी, भडक आहे. देशातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय समस्यांवरील, दलित समस्यांच्या पलिकडच्या व्यापक राजकीय-आर्थिक प्रश्नांवर लेखन होत नाही. दलित चळवळीतील उघड जातीय-धर्मांधांची बाजू घेणार्या नेत्यांवर कठोर वैचारिक टीका करणे टाळले जाते व त्यांच्याच जाहिराती पैशांसाठी छापल्या जातात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुलेंचा विचार खुंटीला टांगला जातो. (अर्थात, काही सन्माननीय अपवाद वगळता) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेची सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळली होती. आताची पत्रकारिता ही सत्ताधार्यांकडून सोयी-सवलती घेणारी व भावनिक प्रश्नांत गुंतवून दलित-शोषितांच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नांना बगल देणारी व संपादकांचे खिसे भरणारी आहे. या आंबेडकरी म्हणविणार्या संपादक-पत्रकारांची वैचारिक कुवतही तोकडी आहे, त्यांचे वाचन, चिंतन, मनन, स्वाध्यायही नाही. त्यामुळे जनप्रबोधनाकडे पाठ फिरवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे केवळ नाव वापरून पत्रकारितेचा धंदा करून अनभिषिक्त सम्राट बनण्याचा प्रयत्न करीत आहेत.
दुसरीकडे, देशातील प्रस्थापित ब्राह्मणी-भांडवली पत्रकारिताही मक्तेदार देशी-विदेशी भांडवलदारांची व सत्ताधार्यांची दलाल बनली आहे. इंग्रजीमधील काही सन्माननीय अपवाद व एन.डी.टी.व्ही. व काही वेब चॅनेल्स सोडले, तर बहुसंख्य प्रसारमाध्यमे जातीय-धर्मांध, पुरुषत्ववादी श्रीमंती मूल्यांचा प्रसार करण्यात गुंतली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानमूल्यांच्या विरोधात गरळ ओकणार्या सत्ताधार्यांना अमाप प्रसिद्धी देत आहेत. दलित-शोषितांनी, आदिवासींनी, स्त्रियांनी आपल्यावरील अन्यायाविरोधात आवाज उठविल्यास त्यांना विकृत करून बदनाम करण्याचे कारस्थान वरील प्रसारमाध्यमे करीत आहेत. पण आज दलित-शोषित जात-वर्ग समूहातील शिक्षित समतावादी, आंबेडकरवादी, पुरोगामी तरुण, पत्रकार विविध चॅनेल्स, वेब पोर्टल व सोशल मीडियातून ’मूकनायक’ ते ’जनता’मधील आंबेडकरी, समतावादी विचारांचा वारसा वैचारिक तडजोड न करता समर्थपणे जे पुढे नेत आहेत, त्यांना ’मूकनायक’च्या शताब्दीनिमित्ताने सलाम!