समाजक्रांतिकारक संत : नारायण गुरु

भीमराव सरवदे -

नारायण गुरूंचे समाजसुधारणेचे तत्त्वज्ञान आजही तितकेच महत्त्वाचे आहे. जातीयता, धार्मिक तेढ आणि सामाजिक विषमता यांसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी त्यांच्या विचारांचा अवलंब केला जाऊ शकतो. त्यांची शिकवण मानवतेला एकत्र आणून शांतता, समता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी मार्गदर्शक ठरते. नारायण गुरु यांच्या तत्त्वज्ञानाने जगाला सामाजिक परिवर्तनाची नवीन दिशा दिली आणि एका आदर्श समाजाच्या निर्मितीसाठी मार्ग दाखवला आहे.

नारायण गुरु हे केवळ केरळ किंवा भारतापुरते मर्यादित न राहता, जागतिक स्तरावर मानवतावादी विचारांचे प्रतीक ठरले आहेत. त्यांनी दिलेला “एक जात, एक धर्म, एक देव” हा संदेश सामाजिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडून सार्वत्रिक सत्याला स्पर्श करतो. त्यांनी जातिव्यवस्थेच्या विघातक स्वरूपावर प्रखर टीका केली आणि सर्व मानवांना समानतेच्या तत्त्वावर एकत्र येण्याचे आवाहन केले होते.

नारायण गुरूंचे समाजसुधारणेचे तत्त्वज्ञान आजही तितकेच महत्त्वाचे आहे. जातीयता, धार्मिक तेढ आणि सामाजिक विषमता यांसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी त्यांच्या विचारांचा अवलंब केला जाऊ शकतो. त्यांची शिकवण मानवतेला एकत्र आणून शांतता, समता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी मार्गदर्शक ठरते. नारायण गुरु यांच्या तत्त्वज्ञानाने जगाला सामाजिक परिवर्तनाची नवीन दिशा दिली आणि एका आदर्श समाजाच्या निर्मितीसाठी मार्ग दाखवला आहे. नारायण गुरु हे केवळ केरळ किंवा भारतापुरते मर्यादित न राहता, जागतिक स्तरावर मानवतावादी विचारांचे प्रतीक ठरले आहेत. त्यांनी दिलेला “एक जात, एक धर्म, एक देव” हा संदेश सामाजिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडून सार्वत्रिक सत्याला स्पर्श करतो. त्यांचे विचार मानवतेच्या मूलभूत तत्त्वांवर आधारित होते. त्यांनी दिलेला समतेचा, बंधुत्वाचा आणि शांततेचा संदेश संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी जातिव्यवस्थेच्या विघातक स्वरूपावर प्रखर टीका केली आणि सर्व मानवांना समानतेच्या तत्त्वावर एकत्र येण्याचे आवाहन केले होते. आजच्या जागतिक समाजात वांशिक आणि धार्मिक भेदभावामुळे निर्माण होणार्‍या संघर्षांना सामोरे जाण्यासाठी त्यांच्या विचारांचा आधार घेणे उपयुत ठरते. त्यांनी व्यत केलेले धर्मनिरपेक्षतेचे तत्त्वज्ञान सर्व धर्मांचा आदर करताना शांततेचा मार्ग दाखवते. जागतिक शांततेसाठी आणि धार्मिक सलोख्यासाठी त्यांच्या विचारांना विशेष महत्त्व आहे. नारायण गुरु हे भारतातील प्रसिद्ध समाजसुधारकांपैकी एक आहेत. ते कवी, तत्त्वज्ञ, तात्त्विक संत आणि समाजक्रांतिकारक होते. त्यांचा जन्म २० ऑगस्ट १८५४ रोजी त्रिवेंद्रम शहराजवळील चेम्पाझंथी गावात झाला.

भारताच्या समाजजीवनात अंधश्रद्धा, अज्ञान आणि रूढी-परंपरा यांचे प्राबल्य शतकानुशतके राहिले आहे. धार्मिक कर्मकांड, जातिभेद आणि देवदत्त मानल्या गेलेल्या विषमता यामुळे समाजातील सामान्य माणूस ज्ञान, विज्ञान आणि आत्मसन्मानापासून वंचित राहिला. अशा काळात केरळच्या भूमीत जन्म घेऊन नारायण गुरु यांनी आपल्या जीवनकार्याद्वारे समाजाला अंधश्रद्धेच्या दलदलीतून बाहेर काढण्याचा धाडसी प्रयत्न केला. गुरुंनी अंधश्रद्धा ही केवळ वैयतिक भ्रम नसून सामाजिक शोषणाचे साधन आहे, हे स्पष्टपणे ओळखले. त्यांच्यासाठी धर्म म्हणजे शुद्ध आत्मानुभवावर आधारित साधना होती. विधी, कर्मकांड, आडाखे आणि बाह्य प्रदर्शन यात त्यांना काहीही मोल वाटत नव्हते. त्यांनी लोकांना शिकवले की देव शोधायचा असेल तर तो बाह्य प्रतीकांमध्ये नव्हे, तर आत्मज्ञानात आणि परस्परांतील प्रेमात सापडतो.

१८८८ साली अरुविप्पुरम येथे त्यांनी मंदिर स्थापले. ही घटना अंधश्रद्धेविरुद्धच्या लढ्याचा एक भकम टप्पा होती. परंपरेनुसार केवळ ब्राह्मणांनाच देवाची मूर्ती प्रतिष्ठापित करण्याचा अधिकार होता. पण गुरुंनी हा धार्मिक एकाधिकार मोडीत काढून स्वतः शिवमूर्तीची स्थापना केली. यामुळे समाजात खळबळ उडाली, पण अस्पृश्य समाजाला या कृतीतून आत्मसन्मानाची जाणीव झाली. ही कृती केवळ धार्मिक बंड नव्हे, तर अंधश्रद्धेचा भकम निषेध होता.

गुरुंनी धर्मातील ढोंग, आडाखे आणि कर्मकांडांना नेहमीच विरोध केला. त्यांचे प्रसिद्ध सूत्र होते, एक जात, एक धर्म, एक देव मानवजातीसाठी. या सूत्राचा गाभा असा की समाजात भेदभाव, जातपात आणि कर्मकांडांच्या नावाखाली केले जाणारे शोषण हे सर्व मानवनिर्मित आहे. ईश्वर सर्वांसाठी समान आहे; त्याला कोणत्याही जातीच्या, पुजार्‍याच्या किंवा ठरावीक विधींच्या परवानगीची गरज नाही. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी शिक्षणाला सर्वांत अधिक महत्त्व दिले. अज्ञान हे अंधश्रद्धेचे मूळ आहे, असे ते मानत. म्हणूनच त्यांनी शाळा, आश्रम स्थापन करून दुर्बल घटकांना आधुनिक शिक्षण देण्यावर भर दिला. त्यांनी विज्ञान, विवेक आणि समतेवर आधारित शिक्षणाची कल्पना मांडली. त्यांना वाटत होते की, ज्ञान मिळाले की माणूस आपोआप अंधश्रद्धा, जडवाद आणि अन्यायाविरुद्ध उभा राहतो.

 गुरुंच्या कवितांमधूनही अंधश्रद्धेविरोधी स्वर उमटतो. आत्मोपदेश शतक या ग्रंथातील अनेक श्लोकांत त्यांनी मानवाला विचार करण्याची, स्वतःला ओळखण्याची शिकवण दिली. त्यांनी सांगितले की जे देवाला बाहेर शोधतात ते भ्रमात आहेत; खरा देव म्हणजे अंतःकरणातील सत्य, करुणा आणि विवेक. देवासाठी प्राण्यांची हत्या करणार्‍या, बलिदान देणार्‍या प्रथांचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला होता. त्यांच्या ‘जाती मीमांसा’ या ग्रंथातून त्यांनी दाखवले की जाती, उच्च-नीचता या अंधश्रद्धेवर आधारित कल्पना आहेत. मनुष्यजात एकच आहे, सर्वांमध्ये एकच रक्त वाहते, हे त्यांनी तर्कशुद्ध पद्धतीने सांगितले. जातीच्या अंधश्रद्धेमुळे समाजात निर्माण झालेला अन्याय व विषमता त्यांनी उघडपणे टिपले. नारायण गुरुंचा अंधश्रद्धाविरोधी दृष्टिकोन केवळ टीकेपुरता मर्यादित नव्हता; त्यांनी सकारात्मक पर्यायही दिले. त्यांनी मंदिरं उघडी ठेवली, शिक्षणसंस्था उभारल्या, स्वावलंबनासाठी सहकारी संस्था स्थापन केल्या. त्यांना वाटत होते की, जर समाजाला योग्य मार्गदर्शन मिळाले, तर तो केवळ अंधश्रद्धा मोडून टाकणार नाही, तर ज्ञान, समानता आणि मानवतेच्या मार्गावर चालेल.

आजच्या काळात, जिथे विविध प्रकारच्या अंधश्रद्धा, धर्मांधता, चमत्कारवाद आणि अंधभती पुन्हा डोके वर काढताना दिसतात, तिथे नारायण गुरुंची शिकवण एक तेजस्वी दीपस्तंभ ठरते. विवेक, आत्मज्ञान आणि करुणा यांच्यावर आधारलेला त्यांचा संदेश आजही आपल्याला सांगतो, खरी पूजा म्हणजे सत्याचा स्वीकार, अहिंसेचा अंगीकार आणि माणसामाणसांत भेदभाव न करता प्रेमाने जगणे.

नारायण गुरुंचे नाव घेतले की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते एक साध्या जीवनातून आलेले, पण समाजाच्या इतिहासात खोलवर परिवर्तन घडवणारे व्यक्तिमत्त्व. केरळच्या मातीत जन्मलेल्या या संताचा वारसा केवळ धार्मिक अध्यात्मापुरता सीमित नव्हता; तो समाजजीवनाच्या प्रत्येक स्तराला भिडणारा होता. त्यांच्या जीवनकार्याचा सर्वांत महत्त्वाचा पैलू म्हणजे जातिभेदाविरुद्धची ठाम लढाई. भारताच्या समाजरचनेत जातिभेद ही इतकी प्राचीन आणि खोलवर रुजलेली व्यवस्था होती की, तिला आव्हान देणे हेच एक असामान्य साहस मानले जाई. पण नारायण गुरुंनी आपल्या विचारांनी, कृतींनी आणि लेखनाने या व्यवस्थेला प्रश्न विचारले, तिच्या पायाभूत आधारांना हादरे दिले आणि समानतेच्या दिशेने वाट मोकळी केली.

गुरुंच्या काळात केरळमधील सामाजिक परिस्थिती अत्यंत विषम आणि अन्यायकारक होती. उच्चवर्णीय ब्राह्मणांच्या मक्तेदारीमुळे धार्मिक अधिकार केवळ त्यांच्या हातात केंद्रित होते. अस्पृश्य समाजाला मंदिरात प्रवेश नव्हता, शिक्षणाच्या दारात अडथळे होते, सार्वजनिक विहिरीतून पाणी काढण्यास मनाई होती. रस्त्यांवरून जाताना उच्चवर्णीयांच्या सावलीत येण्यासही त्यांना परवानगी नव्हती. अशा वातावरणात मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्याचा हक्कच नाकारला गेला होता. या भीषण वास्तवाच्या पाठीशी अंधश्रद्धा, कर्मकांड आणि धर्माच्या नावाखाली टिकवून ठेवलेली जातिव्यवस्था होती. अशा काळात नारायण गुरुंनी ठामपणे जाहीर केले की, जाती या निसर्गनिर्मित नाहीत, तर माणसाने स्वतःच्या सोयीसाठी निर्माण केलेल्या खोट्या संकल्पना आहेत.

त्यांच्या जातीमीमांसा या ग्रंथात त्यांनी जातिव्यवस्थेवर प्रखर शब्दांत टीका केली. ब्राह्मण, शूद्र, परिया अशा संज्ञा आत्म्याशी वा मानवी गुणधर्मांशी संबंधित नाहीत, त्या केवळ मानवनिर्मित आहेत, असे ते म्हणाले. सर्व मानवजातीचे रक्त एकच आहे, सर्वांचे शरीर सारखे आहे, आणि सर्वांचा आत्मा एकाच चैतन्याचा अंश आहे. म्हणून एका माणसाला दुसर्‍यापेक्षा उच्च किंवा नीच मानण्याचे कारणच नाही. त्यांनी दाखवून दिले की जातिव्यवस्थेमुळे समाजात निर्माण झालेली विषमता आणि शोषण ही मानवतेविरुद्धची गुन्हेगारी आहे.

गुरुंच्या जातिभेदविरोधी भूमिकेचे एक ऐतिहासिक प्रतीक म्हणजे १८८८ मधील अरुविप्पुरम मंदिर प्रस्थापना. परंपरेनुसार केवळ ब्राह्मणांनाच देवमूर्ती प्रतिष्ठापित करण्याचा अधिकार होता. पण नारायण गुरुंनी तो अधिकार मोडून काढला आणि स्वतः शंकरमूर्तीची स्थापना केली. ही घटना त्या काळी समाजाला हादरवून टाकणारी ठरली. अस्पृश्य समाजासाठी हा आत्मसन्मानाचा एक नवा उगमबिंदू होता. या कृतीतून गुरुंनी स्पष्ट संदेश दिला की, देव हा सर्वांचा आहे; तो कोणत्याही जातीच्या, पंथाच्या किंवा पुजार्‍याच्या मतेदारीत नाही. मंदिरप्रवेशाचा अधिकार ही मानवी प्रतिष्ठेची मागणी आहे, तो कोणत्याही जातीने रोखू नये.

गुरुंच्या विचारांचा गाभा त्यांच्या प्रसिद्ध सूत्रात दिसतो, एक जात, एक धर्म, एक देव मानवजातीसाठी. या एका वाक्यात त्यांच्या संपूर्ण जातिभेदविरोधी भूमिकेचे सार आहे. त्यांच्या मते, समाजाला तोडून ठेवणार्‍या जातींच्या भिंती मोडल्या पाहिजेत आणि मानवजातीच्या ऐक्यावर विश्वास ठेवला पाहिजे. एकच जात म्हणजे मानवजात, एकच धर्म म्हणजे मानवधर्म आणि एकच देव म्हणजे सत्याचे चैतन्य, ही त्यांची कल्पना होती. हे सूत्र केवळ घोषवाक्य नव्हते; त्याचा व्यावहारिक अर्थ होता, समाजातील प्रत्येकाला समान हक, समान संधी आणि समान सन्मान मिळावा. नारायण गुरुंना ठाऊक होते की, जातिभेदाचे मूळ अज्ञान आणि अंधश्रद्धेत आहे. म्हणून त्यांनी शिक्षणाला सर्वांत मोठे शस्त्र मानले. त्यांनी अनेक शाळा आणि आश्रम उभारले. शिक्षणामुळे माणूस विवेकी होतो, स्वतःच्या हकांची जाणीव होते आणि तो भेदभावाविरुद्ध उभा राहतो. गुरुंनी धर्मशास्त्रांतील मिथक आणि रूढींचे अंधानुकरण नाकारले आणि विज्ञान, विवेक व आत्मज्ञानावर आधारित शिक्षणाचा प्रसार केला. त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांनी अस्पृश्य समाजाला नवजीवन दिले.

केवळ शिक्षण पुरेसे नाही, हेही त्यांना उमगले होते. गरीब आणि वंचित समाज जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल राहिला तर त्याला सामाजिक सन्मान कधीच मिळणार नाही. म्हणून गुरुंनी स्वावलंबनावर भर दिला. त्यांनी सहकारी चळवळींना चालना दिली, उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिले, शेतकर्‍यांना आधुनिक पद्धती अवलंबण्याचे आवाहन केले. समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला तर तो जातिभेदाविरुद्ध उभा राहण्यास समर्थ होईल, असा त्यांचा विश्वास होता. गुरुंच्या कवितांमध्येही जातिभेदविरोधी स्वर वारंवार उमटतो. आत्मोपदेश शतकमध्ये त्यांनी सांगितले की आत्मा सर्वांमध्ये समान आहे, तो ब्राह्मणात वेगळा आणि शूद्रात वेगळा नाही. एकाच दिव्यातील ज्योतीप्रमाणे सर्व आत्मे समान आहेत. म्हणून जातिनुसार श्रेष्ठ-कनिष्ठतेचा विचार करणे ही अज्ञानाची खूण आहे. जातीमीमांसामध्ये त्यांनी ठाम शब्दांत लिहिले की जात ही फक्त मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी उभारलेली भिंत आहे.

नारायण गुरुंची जातिभेदाविरुद्धची लढाई केवळ टीकेपुरती मर्यादित नव्हती. त्यांनी सकारात्मक पर्यायही दिला. त्यांनी स्वतः मंदिरं उभारली आणि ती सर्वांसाठी खुली ठेवली. त्यांनी शैक्षणिक संस्था निर्माण केल्या आणि त्यांत जात-पात न पाहता सर्वांना प्रवेश दिला. त्यांनी ‘एस. एन. डी. पी. (श्री. नारायण धर्म परिपालन) योगम’ या संघटनेची स्थापना केली, जी वंचित समाजाला संघटित करण्यासाठी आणि सामाजिक हकांसाठी संघर्ष करण्यासाठी व्यासपीठ ठरली. ही संघटना शिक्षण, आर्थिक प्रगती आणि सामाजिक एकतेसाठी एक मोठा आधार बनली. गुरुंच्या विचारांची ताकद इतकी होती की, अस्पृश्य समाजात आत्मसन्मानाची नवी जाणीव निर्माण झाली. त्यांच्या कार्यामुळे समाजातील वंचित वर्गाने डोकं वर काढलं, स्वतःचे हक मागायला सुरुवात केली. मंदिरप्रवेश, शिक्षणाचा अधिकार, समान संधी यांसाठी चळवळी उभ्या राहिल्या. गुरुंच्या विचारांनी केरळमध्ये सुरू झालेला हा बदल पुढे संपूर्ण देशासाठी प्रेरणा ठरला.

आज शंभर वर्षांहून अधिक काळ उलटून गेला आहे. संविधानाने अस्पृश्यता कायदेशीररीत्या संपवली असली तरी जातीच्या भिंती अनेक स्वरूपात अजूनही टिकून आहेत. शिक्षण, रोजगार, राजकारण या सर्व क्षेत्रांत जातीय विषमता आपल्याला दिसते. अशा वेळी नारायण गुरुंचा संदेश अधिकच प्रासंगिक ठरतो. त्यांच्या सूत्राची आठवण करून घ्यावीशी वाटते एक जात, एक धर्म, एक देव मानवजातीसाठी. हा संदेश आपल्याला सांगतो की, खरा धर्म म्हणजे मानवतेत ऐक्य आणणे. नारायण गुरुंची जातिभेदाविरुद्धची लढाई ही केवळ केरळच्या इतिहासापुरती मर्यादित नाही, तर ती संपूर्ण भारतीय समाजासाठी एक सार्वकालिक प्रेरणा आहे. त्यांच्या विचारांमधून आपण शिकतो की जाती हा एक भ्रम आहे आणि समता हेच मानवतेचे खरे स्वरूप आहे. त्यांनी दाखवून दिले की, समानतेवर आधारित समाज घडवणे हे केवळ शक्यच नाही, तर ते मानवी प्रगतीसाठी अपरिहार्य आहे.

गुरुंच्या जीवनकार्याचा सार असे की, त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. त्यांच्या शिकवणुकीतून अस्पृश्य समाजाला आत्मसन्मान मिळाला, शिक्षणाचा प्रकाश मिळाला आणि समानतेची वाट मिळाली. त्यांचा वारसा आजही आपल्याला सांगतो की समाजाचे खरे बळ हे जातीपलीकडील मानवतेत आहे. नारायण गुरु म्हणजे एक असा मानवशोधी योगी होता, ज्याने आपल्या जीवनातून आणि लेखनातून नैतिकतेचे नवे रूप साकारले. त्याची नैतिकता कोरडी आज्ञापाळणी नव्हे, तर आत्मज्ञानातून उमटलेली, अनुभवातून सिद्ध झालेली आणि व्यवहारात पडताळलेली होती. गुरु म्हणतात, स्वतःला ओळखा; मग जग ओळखेल; आणि जेव्हा आतला प्रकाश प्रकाशित होतो, तेव्हा बाह्य जगाशी दोषारोप न करता प्रेमाने वागण्याची शक्यता उभी राहते. आत्मज्ञान म्हणजे एक अशी दृष्टी जी व्यतीला स्वतःच्या आणि पराच्या दरम्यानचा नकळत उभा केलेला भेद मिटवण्यास प्रवृत्त करते. या ऐक्यभावातून नैतिकतेचे सर्व नियम सत्य, अहिंसा, अस्तेय, अव्यभिचार आणि मद्यत्याग फुलतात; हे नियम गुरुंनी केवळ तत्त्वरचना म्हणून मांडले नाहीत, तर त्यांचे भाव, कवितेचे स्वर आणि संस्थात्मक प्रयोग म्हणूनही जीवनात उतरवले.

गुरुंच्या नीतिशास्त्राचा मुख्य ठपका हा होता की, कर्म स्वतःमध्ये शुभ-अशुभ याने विभाजित केलेले नाही; कर्म म्हणजे प्रकृतीच्या गतिमानतेचे स्वरूप आहे आणि त्याला नैतिकता मानवी दृष्टीने प्राप्त होते. जो माणूस आपले सर्व कृत्य ‘मी केले’ असा अहंकार घेऊन बघतो, तो कर्माच्या फळात अडकतो; परंतु जो माणूस कर्तेपणाचा त्याग करतो, तो कर्मस्वरूपतेला मुक्तीचा मार्ग समजतो. हाच विचार त्यांच्या ‘आत्मोपदेश शतक’मधील श्लोकांमध्ये नियमबद्धपणे समोर येतो, जिथे सांगितले आहे की स्वतःच्या हिताचे समीकरण जर इतरांच्या हिताशी जोडले तरच खरे आचार मंत्र जगात रुजतील. यावर प्रभाताच्या स्वरूपात गुरुंची सूक्ष्म तर्कशास्त्रीय मांडणी कांटच्या अनिवार्य आदेशाशी निष्कर्षात्मक स्वरूपात जुळते; परंतु गुरुंचे आध्यात्मिक वातावरण हे तात्त्विक ऐक्यपरक असल्यामुळे त्याचा आधार आत्मसाक्षात्कारात रुजू असतो, कर्म आणि ज्ञान यातला पल्ला गाठला की नैतिक आचरण आपोआप घडते.

करुणा हे गुरुंचे नैतिक हृदय होते. त्यांनी ‘जीवकारुण्य पंचकम’ आणि ‘अनुकंपा दशकम’ या रचनांत करुणेच्या तत्त्वाचे वैचारिक व भावनिक सूत्र अचूकपणे मांडले. त्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या माणसाने देवाकडून करुणा मागितली आणि त्याच वेळी प्राण्यांवर अत्याचार केला, त्याची प्रार्थना निरर्थक ठरते. एकच आत्मा सर्व जीवात वास करतो, ही जाणीव करुणेला अणि करुणेवर आधारित नैतिकतेला परवानगी देते. गुरुंनी म्हटले आहे की, जर एखादा माणूस दुसर्‍याला वेदना देतो, तर तो केवळ त्या व्यतीला दुखावत नाही; तो सार्वत्रिक चेतनेला जखम देतो आणि त्या एका लहान स्पार्कने सुरुवातीला आगीत प्रज्वलित होऊन संपूर्ण समाजाला अग्नीत लोटू शकतो, हाच चेतावणीचा ठसा त्यांच्या आत्मोपदेश शतक मधील श्लोकांमधून स्पष्ट होतो. करुणा केवळ भावनात्मक प्रतिक्रिया नसून, तिचा तर्कशास्त्रीय व आध्यात्मिक आधारही गुरु स्पष्ट करतात.

जातिव्यवस्थेविरुद्ध गुरुंची भूमिका ठाम आणि निर्भीड होती. त्यांनी जातिमीमांसामध्ये सांगितले की, जातीची कल्पना मानवनिर्मित आहे; तिचा आत्म्याशी काही संबंध नाही. इतिहास आणि धर्मग्रंथ यांच्याही संदर्भात त्यांनी दाखवून दिले की अनेक महान ऋषी किंवा महापुरुष यांची उत्पत्ती समाजाच्या नीच स्तरातूनही झाली आहे; त्यांची विद्वत्ता आणि आध्यात्मिक उंची यांना जातिमान्ये काहीच अर्थ देत नाही. म्हणूनच जातीय मनोवृत्ती बदलण्यासाठी गुरुंनी कायद्यापेक्षा अधिक महत्त्वाचे मानलेले माध्यम होते, शिक्षण, आत्मजागृती आणि वैचारिक चळवळी. त्यांचा तर्क स्पष्ट होता: जेव्हा माणूस आत्मज्ञान प्राप्त करतो, तेव्हा तो स्वतःचा आणि इतरांचं आत्ममूल्य ओळखतो; तेव्हाच जातीय भिंती आपोआप कुडकुडतात. या विचारसरणीने त्यांनी केवळ तात्त्विक समालोचनाचे काम केले नाही, तर व्यवहारात ती सिद्ध करण्यासाठी त्यांनी संस्थात्मक पावले देखील उचलली.

ही संस्थात्मक कृती त्यांच्या प्रयोगशीलतेचा एक ठोस पैलू आहे. त्यांनी शाळा, आश्रम सुरू केले, ‘एस.एन.डी.पी. योगम’ सारख्या संस्थांद्वारे समाजाला संघटित केले, आर्थिक स्वावलंबनासाठी सहकारी व व्यावसायिक प्रशिक्षणाला चालना दिली. गुरु म्हणाला की सन्मान भीक मागून मिळत नाही; तो आत्मनिर्भरतेतून मिळतो. म्हणून आर्थिक सक्षमतेवर त्यांनी नेहमीच भर दिला. हे धोरण केवळ आर्थिक उदारतेसाठी नव्हते; त्यामागे सामाजिक प्रतिष्ठा, राजकीय सहभाग आणि आत्मसन्मानाचे दृष्टिकोन होते. अशा प्रकारे, त्यांच्या नैतिक तत्त्वांचा व्यावहारिक आराखडा केवळ वैचारिक नव्हता; तो लोकांना प्रत्यक्षपणे सुधारण्याचा आणि सामर्थ्य देण्याचा प्रकल्प होता.

अरुविप्पुरममधील मंदिरप्रस्थापना ही घटना त्यांच्या संघर्षाची प्रतिमा बनली. त्या काळी अस्पृश्य समाजाला मंदिरप्रवेश नाकारला जात असे. गुरुंनी या बंधनाला तोडून स्वतः मंदिर स्थापण्याचा धाडसी निर्णय घेतला. हा निर्णय धार्मिक चळवळीचा वापर करून सामाजिक अन्यायाला प्रत्यक्ष आव्हान होता; यामुळे अस्पृश्य समाजातील लोकांमध्ये आत्मविश्वास जागृत झाला आणि सामाजिक पहिल्या ओळीतील संघर्षाला नवे आयाम मिळाले. मंदिरप्रवेश हे केवळ धार्मिक अधिकार नव्हते, तर ती समतेची आणि मानवी प्रतिष्ठेची मागणी होती, ज्यात गुरुंनी नेतृत्व केले. गुरुंची नैतिक विचारधारा केवळ आंतरवैयतिक नात्यांनी मर्यादित नाही; ती सामाजिक-सांसारिक प्रश्नांवरही तितकीच उतावीळ उतरते. त्यांनी माणसाला विचारलेले प्रश्न सोपे पण करणे कठीण होते: तुम्ही जे स्वतःसाठी हवे ते इतरांसाठी का नको? ही विनंती बनून त्यांचे तत्त्वज्ञान मनाला मार्मिकपणे भिडते. त्यांनी सांगितले की, जर प्रत्येकाने स्वतःच्या कल्याणासोबत इतरांच्या कल्याणाचा विचार केला तर द्वेष, स्वार्थ, हिंसा यांचे मूळ नष्ट करता येऊ शकते. त्यांच्या या तर्काची तात्त्विक गाठी अद्याप पिढ्यान्पिढ्यांपर्यंत पोहोचत आहे आणि आधुनिक नीतिशास्त्रीय चर्चांमध्येही याचे महत्त्व लक्षात येते.

आजच्या आधुनिक जगामध्ये, जिथे उपभोतावाद, व्यतिवाद, आर्थिक विषमता आणि राजकीय ध्रुवीकरण सामान्य झाले आहे. गुरुंच्या शिकवणुकीची उपयुतता अधिक तीव्रपणे भासते. त्यांच्या नैतिक तत्त्वांनी दिलेले मार्ग स्पष्ट, व्यावहारिक आणि पुनरारंभक्षम आहेत: सत्याच्या मार्गाचा अवलंब करा; अहिंसेचे जीवन जगणारे बना; करुणेने वागा; शिक्षण व स्वावलंबनावर भर द्या. हे तत्त्व केवळ वैयतिक बळ देत नाहीत, तर समाजावर दीर्घकालीन, टिकाऊ परिणाम घडवतात. त्यांच्या शब्दात, जो परोपकारी आहे तोच खरा सुखी आहे, हा विचार आजच्या काळातही समाजात शांतता निर्माण करण्यास समर्थ आहे.

गुरुंचे साहित्य; त्यांची कविता, लघुकथा आणि तात्त्विक ग्रंथ या सर्वांनी नैतिक संदेश दिला आणि जनमानसाला स्पर्श केला. कवी म्हणून त्यांच्या शब्दांत एक मृदुता आणि तीव्रता एकत्र असते; तत्त्वज्ञ म्हणून त्यांच्या विवेचनात काटेकोर तर्क आणि आध्यात्मिक आराखडा दिसतो. ते म्हणालेले अनेक छोटे-छोटे श्लोक आणि ओव्या आजही लोकांना प्रभावित करतात. कारण ते रोजच्या जीवनाशी थेट जोडलेले असतात. त्यांच्या रचनांमध्ये दिसणारी गर्दी आणि करुणा वाचकाच्या अंतर्मनाला हलवून टाकते आणि आचरणाची एक अंतर्निहित प्रेरणा जागृत करते.

गुरुंचा वारसा केवळ तात्त्विक वारसा नाही; तो समाजरचना, शैक्षणिक उपक्रम, संस्थात्मक बदल आणि लोकसामाजिक चळवळींमध्ये आढळतो. त्यांनी जे आराखडे आणि तत्त्वे दिली ती आजच्या सामाजिक-राजकीय संदर्भात अंमलात आणता येतील. शिक्षकांपासून सुरू करून शहरी धोरणकारांपर्यंत, ग्रामविकास कार्यकर्त्यांपासून सामूहिक नेत्यांपर्यंत सर्वांना त्यातून धडा घेता येईल. त्यांच्या शिकवणुकीतून आपल्याला धारणा मिळते की, नैतिक बदल हा एक साधेपणाचा प्रवास असू शकतो, मोठे घोषवाक्य नव्हे; परंतु दैनंदिन आचरणातून घसरत जाणारे बदल. जर समाजातील प्रत्येक व्यतीने थोडा-थोडा बदल घडवला तर तो बदल सामाजिक संवहनीयतेकडे वळू शकतो. नारायण गुरुंचे विचार हे केवळ ऐतिहासिक स्मरण करून ठेवण्यायोग्य नाहीत; ते अविरतपणे अमलात आणण्याजोगे आहेत. त्यांच्या शिकवणुकीचे मूलभूत संदेश सत्य, अहिंसा, करुणा, समता आणि स्वावलंबन हे चिरंतन आहेत, कारण ही मूल्ये मानवतेच्या मूलतत्त्वाशी निगडित आहेत. जर आपण या मूल्यांना अंगीकारले तर वैयतिक सुख, सामाजिक समता आणि जागतिक शांतता या तिन्ही गोष्टी प्राप्त करण्यास आपण सक्षम होऊ. या दृष्टीने नारायण गुरु केवळ एका प्रदेशाचे किंवा काळाचे विचारवंत नव्हते; ते एक सार्वत्रिक मानवतावादी विचारसरणीचे वाहक होते.

नारायण गुरुंची नीतिशास्त्र संकल्पना ही एका मानवीय, आध्यात्मिक आणि व्यवहारिक त्रिवेणीची जोड आहे. ती शिकवते की, आध्यात्मिकता आणि समाजसुधारणा हे एकमेकांपासून विभत नसून परस्परपूरक आहेत; मनाच्या उन्नतीशिवाय समाजाचा उन्नतीचा मार्ग नसतो आणि समाजाची न्यायव्यवस्था नसती तर व्यतीचा आत्मसाक्षात्कारही अपूर्ण राहतो. गुरुंचे हे तत्त्व आजच्या काळात आपल्याला हवे तसेच कठोर, पण करुणामय आणि अतूट आशेच्या किरणाने भरलेले मार्गदर्शन करते. त्यांच्या शिकवणीचे अनुसरण केल्यास आपण केवळ स्वतःला सुधारू शकतो असे नाही, तर एक अधिक समतामूलक, शांततामय आणि मानवीय समाजही घडवू शकतो. गुरुजींनी शेवटच्या क्षणांपर्यंत शांततेचा संदेश दिला आणि आपल्या अनुयायांना सांगितले, “मी या शरीराच्या मर्यादेतून मुत होतो आहे; परंतु माझा विचार आणि शिकवण युगानुयुगे टिकून राहील.” नारायण गुरु यांचे निधन २० सप्टेंबर १९२८ रोजी झाले.

- भीमराव सरवदे, छ. संभाजीनगर

(लेखक सार्वजनिक क्षेत्रातील निवृत्त वरिष्ठ अधिकारी आणि फुले-शाहू-आंबेडकर व पेरियार चळवळीचे अभ्यासक आहेत.)

लेखक संपर्क : ९४०५४ ६६४४१

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ]