प्रभाकर नानावटी -

अध्यात्माच्या व मनःशांतीच्या नावाखाली अनेक बुवा–बाबा उच्च वर्गातीलच नव्हे, तर मध्यमवर्गालाही फसवत आहेत. सत्संगाच्या प्रवचनातील गर्दी अशाच वर्गातील भक्तांनी भरलेली दिसेल. एक मात्र खरे की, बुवाबाजीचा हा अखंड स्रोत कितीही कमी झाल्यासारखा वाटत असला तरी, तो कुठे ना कुठे तरी डोके वर काढत आहे, याची प्रचिती या सदरातील लेख वाचताना वाचकांच्या लक्षात येईल. महर्षी महेश योगी, आसाराम बापू, सत्य साईबाबा, चंद्रास्वामी, बाबा रामदेव, श्रीश्री रवीशंकर, मोरारी बापू, सद्गुरुजग्गी वासुदेव, भय्यू महाराज, निर्मलादेवी, अमृतानंदमयी माँ यांच्यानंतरची बाबा–बुवांची पिढी कार्यरत होत आहे.
या सदरात राधेमाँवरील लेखाप्रमाणे फादर अंकुर (योसेफ) नरुला, बाबा भोलेनाथ, काश्मीरचे गुलाम रसूल, नित्यानंद, वीरेंद्र देव दीक्षित इत्यादी अलीकडील ‘गुरुं’च्या बद्दलचे लेख असतील. त्याच प्रमाणे पंजाबमधील डेरा, केरळमधील मारियन श्राइन याबद्दलही माहिती दिली जाईल. आपल्या कार्यकर्त्यांना व वाचकांना या सदरातील लेख नक्कीच आवडतील.
शनिवारच्या मध्यरात्रीची ती वेळ. सिंग हाउसच्या तळमजल्यावरील त्या खासगी ‘गुफा’चा (गुहेचा) भक्कम सोनेरी दरवाजा उघडला. सहा मजलीचा हा राजमहालसदृश बंगला बोरीवलीच्या चिकुवाडीत होता. या बंगल्याच्या प्रवेशद्वारातील माणसाच्या उंचीचे ग्रीक सैनिकांचे पुतळे बघूनच हे काहीतरी वेगळे, अमूर्त, अगम्य आहे याची जाणीव होत होती. त्या भव्य पुतळ्याच्या मध्ये दुर्गादेवीची एक छोटी मूर्ती दिसत होती.
त्या खोलीवजा व्हरांड्याच्या समोरच्या बाजूला एक मोठ्या टीव्ही स्क्रीनवर राधेमाँवरील व्हिडिओ प्रसारित केला जात होता. पंजाबमधील स्वयंघोषित दैवीशक्ती लाभलेल्या या ‘माँ’ला लाल रंगाचे वेड असल्यासारखा तिचा वेष होता. अंगावरील कपडे लालभडक, कपाळावर लाल कुंकू व ओठ लाले लाल. हे सर्व तिला ओळखण्याचे ट्रेडमार्क आहेत म्हणे. या सगळ्याबरोबर हातात एक त्रिशूळही आहे.
तिच्यावरील काही व्हिडिओंमध्ये तिला काही तरुण खांद्यावर घेऊन हिंदी चित्रपटातील गाण्याबरोबर हिडीस नाच करत होते, असे दाखविले होते. गुलाबी रंगाचा आखूड स्कर्ट, पायात गुडघाभर बूट व डोक्यावर बेरेट कॅप अशा पोशाखातील तिचे धुंद होऊन नाचणे तर असभ्यपणाचा कळस होता. हिंदू साधूंच्या अखिल भारतीय आखाडा परिषद या संघटनेने हिंदू धर्माला काळिमा फासणार्या व अंधश्रद्धेला (?) प्रोत्साहन देणार्या १४ बाबा-बुवांच्या (व माता-देवींच्या) यादीत राधेमाँचे नावही होते.
तिच्याभोवती असलेले गूढ असे वलय व कथाकथनाची शैली हे सर्व तिच्या दर्शनानुभवाचा भाग होते. कुणीही, केव्हाही जाऊन तिचे दर्शन घेणे वा मुलाखत घेणे सहजासहजी होण्यासारखी गोष्ट नव्हती. सकाळपासून रात्रीच्या दहा-अकरा वाजेपर्यंत ताटकळत वाट पाहिल्याशिवाय तिचे दर्शन शक्य नव्हते.
चौथ्या मजल्यावर लाल दिवा प्रकाश ओकत होता. तळमजल्यावर एका मूर्तीसमोर दोन महिला भजन करत होत्या. मूर्ती दुर्गेची असल्यासारखी दिसत होती; परंतु तिची केशभूषा मात्र आधुनिक काळातली- चमकणारे कुरळे केस, शांपूने धुतलेले व हेअरड्रायरने वाळविलेले अशी वाटत होती.
एक भडक लाल-सोनेरी गाउन अंगावर, डोक्याभोवती गुंडाळलेला स्कार्फ, दोन्ही खांद्यांवर लोंबकळत ठेवून व आताच कुठेतरी समाधीतून उठल्यासारखे चेहर्यावर भाव असलेली बाई दिसली. ओठावर जाड थराचे लाल लिपस्टिक, कपाळावर लाल टिक्का व त्यात मधोमध सोनेरी बिंदी, दोन्ही गालांवर गुलाबी पावडरचा थर व केस मागे घट्ट बांधलेले. हातात एक त्रिशूळ घेतलेली ५९ वर्षांची महिला पसरट अशा लाल-सोनेरी रंगाच्या बेडवर समाधीतून नुकतीच उठल्यासारखी दिसत होती. राधेमाँ दर्शन देण्यास सज्ज झाली होती. तळमजल्यावर जमलेल्या सर्व जणांमध्ये एकाएकी विद्युत संचार झाल्यासारखी स्थिती झाली. आप सब पे धेमाँकी (राधेमाँचे हृस्व नाव) कृपा होनेवाली है. तिचा प्रमुख भक्त, ताल्लीबाबा सांगत होता, ती आम्हाला प्रत्यक्ष देवी आहे. तिच्या भोवतीचे दैवी वलय व दिव्य प्रकाश बघितल्यावर ती साधीसुधी स्त्री नसून दैवीशक्ती लाभलेली देवता आहे याची प्रचिती येईल.
भगवी कफनी धारण केलेला माँचा सहकारी, ताल्लीबाबा स्वतःबद्दल सांगत होता, “मी पाच वर्षांचा असताना माझ्या आईचा मृत्यू झाला. पुढच्या सात महिन्यांनंतर पंजाबमधील फगवारा येथे एका सत्संगाच्या ठिकाणी मला राधेमाँचे दर्शन झाले. तिच्या चेहर्यावर मला माझी आई दिसत होती. अजूनही एवढ्या वर्षांनंतर त्यात काही बदल झाला नाही.” ताल्लीबाबाचे खरे नाव गौरव कुमार शर्मा. पंजाबीमध्ये ताल्लीचा अर्थ घंटा. खोलीतील दहा-बारा जण अशाच प्रकारच्या राधेमाँच्या कृपेचे, साक्षात्काराचे, त्यांना आलेल्या अनुभवांचे कथन करत होते.
राधेमाँने स्थापन केलेल्या एका ट्रस्टद्वारे तिचे दानकर्म चालते. तिने प्रायोजित केलेल्या वधूंच्या लग्नात भरजरी साड्या दिल्या जातात. “व्हॅक्यूम क्लीनर हवे की, रक्तदाब मोजण्याचे मापक?” यापैकी एकाच्या निवडीची मुभा असते, असे ताल्लीबाबा सांगत होता.
राधेमाँचे विश्रांतीस्थान व ध्यान करण्याच्या या जागेला गुफा (गुहा) असे म्हटले जाते. हिंदू पुराण कथेवर आधारित चित्रपटात वा टीव्ही सीरियलमध्ये दाखविलेल्या सेटसारखी ही गुफा सजवलेली होती. बाहेरच्यांना या गुहेत प्रवेश नव्हता. खोलीच्या भिंतींना सोनेरी पॅनेल्सनी सजविले होते. तेथील फर्निचर्स व बेडसुद्धा सोनेरी रंगाने चमकत होते. जमिनीवरील वेल्वेट गालिचे लाल रंगाचे, सगळे कर्टन्स लाल रंगाचे, बेडशिट्ससुद्धा लाल रंगाच्या. डोळ्यात खुपणारा तो लाल रंग तिचा ट्रेडमार्क होता. या बंगल्यात प्रवेश करणार्या सर्व जणांवर जय राधेमाँ असे सोनेरी अक्षरात लिहिलेली लाल पट्टी डोक्याभोवती बांधण्याची सक्ती होती. या स्वयंघोषित आध्यात्मिक देवीला तिचे भक्तगण माता व दुर्गेचा अवतार असे गौरवितात. येथे जमलेल्या सर्वांना माँचे दर्शन हवे असते. तिच्या कुठल्याही भानगडीची ते पर्वा करत नाहीत. तिच्यावरील आरोप-प्रत्यारोपाचा, बाबा-बुवांच्या फसवणुकीच्या बातम्यांचा येथे मागमूसही नव्हता.
प्रो. राम रोंकी याने, “तुम्ही आता एका मोहक, सुंदर व दैवीशक्तीला भेटणार आहात”, असे सांगितले. हा प्रोफेसर म्हणवून घेणारा पंजाबमधील डेरा व आश्रमांच्या सामाजिक भांडवली उत्पन्नावर चर्चा करत होता. त्याच्या मते डेरा व आश्रम चालविणारे स्मार्ट आहेत. पानिपतचा एक माणूस आपल्या कुटुंबासहित तेथे आला होता. “माझ्या वडिलांना तिने तीन वेळा वाचविले. माझे वडील आजारी असताना त्यांना रक्ताची गरज पडत होती. दरवेळी नेमके कुणी तरी त्याक्षणी हॉस्पिटलला येऊन रक्त देत होते. त्यामुळे माझ्या वडिलांचा जीव वाचला. येथे कुठेही योगायोग नाही,” तो सांगत होता. या बुवा-बाबा-माँ-देवी यांच्या संदिग्ध व अस्पष्ट जगातील त्यांचे भक्त कुठलाही पुरावा न देता विज्ञान व तर्क यांना तिलांजली देत आंधळेपणाने त्यांच्या दैवतावर विश्वास ठेवत असतात.
पंजाबमधील गुरुदासपूरच्या एका गरीब घरात १९६५ साली हिचा जन्म झाला. तिचे मूळ नाव सुखविंदर कौर. तिचे या माता पदापर्यंत पोचणे हे एखाद्या थर्ड रेट गल्लाभरू हिंदी चित्रपटकथेला व त्यातील action-packed प्रसंगांना शोभेल अशी होती. मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी लावलेल्या मोठ्या आकाराच्या कटआउट्स व होर्डिंग्समध्ये व शहरातील रेल्वे स्टेशनवरील पोस्टर्समध्ये झळकणारा हा चेहरा कुठलाही मुंबईकर विसरू शकत नाही. २०२०च्या १४व्या बिग बॉसच्या शोमध्ये तिने भाग घेतल्यानंतर तिला विसरणे शक्य होणार नाही.
कौरचा विवाह होशियारपूर जिल्ह्यातील एका खेडेगावातील मोहनसिंगसोबत झाला. वयाच्या विशीच्या आत तिला दोन मुले झाली. मोहनसिंग चरितार्थासाठी गल्फला बायको-मुलांना एकटेच सोडून गेला. कौर गावातच टेलरिंग करून उदरनिर्वाह करू लागली. ती तेथील महिला अनाथाश्रमातील विधवा व मुलींना टेलरिंगचे शिक्षण देऊ लागली. मी काही देव-धर्मावर विश्वास ठेवणारी महिला नव्हती; परंतु ‘या विधवा महिलांना पाहिल्यावर मला फारच कणव वाटायची.’ राधेमाँ सांगत होती. तिच्या वडिलांनी तिला शंभरच्या वर वय झालेल्या रामाधीन दास या महंताकडे एकदा नेले. त्यांनीच तिला अध्यात्माची वाट दाखविली म्हणे. या महंताला तिच्यातील सुप्त आकांक्षांचा प्रत्यय आला व त्याने तिला ‘तुझ्यातील सुप्त शक्तीला नीट वाट करून दे,’ असा सल्ला दिला.
“पुढील नऊ दिवस मी एका बंद खोलीत दुर्गादेवीची उपासना केली. मी बाहेर आल्यानंतर, सत्संगाच्या वेळी, मी काही लोकांना जे सांगत होते ते सर्व खरे होऊ लागले. लोकांना माझ्यातील दैवी (चमत्कार) शक्तीचा अनुभव येऊ लागला. मग माझ्या सत्संगाला मोठ्या प्रमाणात आणखी लोक येऊ लागले.” राधेमाँ सांगत होती. तिचा व गुरुनानक या शीखगुरुचा भक्त यांचा संबंध तिच्या माहेरच्या मुकेरिया गावातील डेरा परमहंसशी आला.
आता राधेमाँ बोरीवलीतील सिंग हाउस नावाच्या बंगल्यात स्वतःच्या कुटुंबासकट राहते. कुटुंबात तिचा पती मोहन सिंग, भूपेंदर सिंग (उर्फ बंटी) व हरजिंदर सिंग (उर्फ निशू) ही दोन मुलं व यांच्या पत्नी व मुलं हे सर्व जण आहेत; परंतु ती आता कुठलाही वैवाहिक संबंध ठेवत नाही. मोहन सिंग याचे दहिसरमध्ये RM मोटर्स (राधेमाँ मोटर्स) नावाचे शोरूम आहे. दोन्ही मुलांची BNH ट्रेडर्स नावाची कंपनी आहे. हरजिंदरने OTT प्लॅटफॉर्मवरील इन्स्पेक्टर अविनाश या चित्रपटात रणदीप हुडाबरोबर सहायक नटाचे काम केले आहे.
परमेश्वराची करणी अगाध. तिच्या दर्शनासाठी जमलेल्यांच्या खोलीत वेगवेगळ्या वयातील स्त्रिया, पुरुष, तरुण तरुणी या सगळ्यांच्या डोक्याभोवती सुवर्णाक्षरांनी जय राधेमाँ असे लिहिलेली लाल कपड्याची पट्टी होती. हे सर्व समजण्याच्या पलीकडचे होते. येथे जमलेल्या सर्वांना माँचे दर्शन हवे होते. तिच्या कुठल्याही भानगडीची त्यांना पर्वा नव्हती. २०१४ चे हुंडाबळीचे प्रकरण असो, की २०१५ ची खुद्द राधेमाँनी स्वतःच्या काही शिष्यांवर केलेल्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरण असो, त्यांचा येथे कुठेही पत्ता नव्हता.
माँचे दर्शनोत्सुक भक्त तिच्या आशीर्वादासाठी रांगेत उभे असतात. कुणाच्या हातात रंगी-बेरंगी दुपट्टा (चुन्नी), काहींच्याकडे फुलं असतात. बहुतेक जण रोख पैसेच देतात. काही जण तिच्या हाताला पिवळा दोरा बांधतात. राधेमाँ प्रत्येकाला एखादे नाणे भेट म्हणून देते. काही निवडक भक्तांना लाल-पिवळ्या रंगाचा दुपट्टा देऊन आशीर्वाद देते. तिच्या मृदुहास्यावर, प्रत्येक कृतीवर भक्त जयजयकार करू लागतात, जय कारा शेरेवाली, जय राधेमाँ…
हिंदी चित्रपटगीतांच्या चालीतील भजन म्हणताना व त्याचे पार्श्वसंगीत ऐकताना गर्दी हर्षोन्मादित होऊ लागते. गुलाबी-काळ्या रंगाचे कपडे घातलेली एक तरुणी उठून उभी राहते व गाण्याबरोबर ठेका धरत नाच करू लागते. ‘रंग चढ गया माँ दा लाल’ हे शब्द चहू बाजूंनी ऐकू येतात.
गुलाबधर गुप्ता हा रिक्षाचालक पहिल्यांदाच येथे आलेला असतो. कर्जात बुडालेला, पोटापुरती कमाई असलेला हा चालक काहीतरी चमत्कार घडेल व आपली चिंता दूर होईल या आशेने तिथे आलेला असतो. त्याच्या आयुष्यात काही घडतच नाही. प्रत्येक संधी वाया गेलेली असते. डोळ्यात पाणी आणून तो आपली व्यथा सांगतो. ‘राधेमाँच्या आशीर्वादाने सगळे काही ठीक झाल्यास मी आयुष्यभर तिची सेवा करेन.’ असे आश्वासनही देतो.
असले हजारो गुलाबधर राधेमाँ भवनाला दर आठवड्याला मातेच्या दर्शनासाठी, तिच्या आशीर्वादासाठी भेट देतात. तिच्याभोवतीच्या कित्येक भानगडीच्या कथा माहीत असल्या तरी, तिचा प्रभाव व लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही व होणारही नाही.
“परमेश्वराने माझ्यात दैवीशक्ती प्रदान केली आहे. जो कोणी मनापासून माझ्याकडून चमत्काराची अपेक्षा धरतो, त्याला माझा आशीर्वाद कामी येतो. त्यामुळेच माझ्या भक्तगणात वाढ होत जाते.” ती सांगते.
तिच्या चमत्काराच्या व दैवीशक्तीच्या अनेक कथा भक्तमंडळींमध्ये पुनःपुन्हा चघळल्या जातात. ग्लोबल अड्व्हर्टाइजिंग कंपनीचा विपीन अहुजा हा गेली वीस वर्षे तिचा भक्त आहे. त्याच्या बायकोला मूल होणार नाही, असे डॉक्टरांनी ठासून सांगितल्यावरसुद्धा राधेमाँच्या कृपेने तो आज दोन मुलींचा बाप आहे.
लुधियानाचा जस्सी हा शीख, स्वतःची कथा सांगत होता. अगदी लहानपणी शेजारच्या घरात माँचे दर्शन झाले. त्याचे कुटुंब आर्थिक अडचणीतून जात होते. बहिणीचे लग्न ठरले होते. राधेमाँची भेट झाल्यानंतर सगळे काही सुरळीत झाले. तो नंतर मुंबईला आला. राधेमाँची भेट घेतली. कुठलीही पदवी नसताना त्याला चांगली नोकरी मिळाली. आता त्याचे संपूर्ण कुटुंब माँच्या समारंभाच्या वेळच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करणार्या लंगराची देखरेख करते.
MM मिठाई या कंपनीचा मॅनेजर, जसदीप सिंग हा अत्यंत गरिबीतून आला होता. राधेमाँच्या कृपेमुळे तो आता चांगले जीवन जगत आहे. गुप्ता कुटुंबीयांचे निकटवर्ती असलेले राधेमाँचे हे शिष्य कुटुंबासकट सिंग हाउसमध्ये सेवेला हजर असतात.
बुवाबाजीच्या आध्यात्मिक जगातील पुरुषप्रधान वर्चस्वाला एक महिला सर्वांना पुरून उरते, हीच तिची आयडेंटिटी आहे. या जगातील काही महिला भगवे कपडे घालून पुरुषांच्या दबावाखाली वावरत असताना ही माँ उत्तर भारतातील वधूसारखे लाल व सोनेरी ड्रेस घालून कायम वावरत असते. कदाचित हेच तिला नारीशक्ती म्हणून अभिप्रेत असेल.
एका मुलाखतीत राधेमाँ व तिचे काही शिष्य तिच्या फॅशनेबल राहणीचे समर्थन करत आहेत. जे काही डिझाइनर ड्रेसेस ती परिधान करते ते सर्व तिच्या भक्तांनी प्रेमाने दिलेली भेट आहे. ती कधीच कुणाला काहीही मागत नाही. तिचे भक्त म्हणजे लहान लहान रोपं आहेत. तिच्या आशीर्वादाने ही रोपं वाढत जाऊन मोठे वृक्ष झाल्यावर त्याची फळं तिला मिळत असेल तर चुकते कुठे? ते सर्व जण तिच्या कृपेने लखपती, करोडपती झाले आहेत. त्याच्यातील थोडा हिस्सा ते माँच्या चरणी वाहत असल्यास बिघडले कुठे? यात काहीही चूक नाही. अशा प्रकारे ताल्लीबाबा तिचे समर्थन करत होता.
राधेमाँला भक्तगणांनी दिलेले लिपस्टिक, डिझायनर हँडबॅग्स, गाउन्स हे सर्व तिला आवडतात. अशा प्रकारे ड्रेस करूनसुद्धा परमेश्वराची आराधना करू शकत नाही असे कोण म्हणतो? व तसे कुठे लिहून ठेवले आहे? राधेमाँच्या फॅशनेबल राहणीबद्दलच्या टीकेवरील प्रतिवाद असा होता. “मी श्रृंगार का करू नये? मी काही साध्वी नाही, मी एक आई आहे, माता आहे, मी नीटनेटके राहिले तर का तक्रार असावी? हे सर्व शिष्य माझी लेकरं आहेत. ते माझ्यावर भेटीचा वर्षाव करतात. श्रृंगार हे स्त्रियांना शोभून दिसतो.” असे तिचे समर्थन होते.
२००३ साली मुंबईला आल्यापासून राधेमाँ मोठमोठे उद्योगपती, राजकीय पुढारी, पोलीस अधिकारी, चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रिटीजबरोबर चांगले संबंध ठेवून आहे. त्याच बरोबर ग्लोबल अॅड्वर्टाइजर्स व MM मिठाईवालेचे मालक, गुप्ता कुटुंबीयांशीसुद्धा तिचे घनिष्ठ संबंध आहेत.
“संजीव गुप्ता व त्याची पत्नी हे चांगले लोक आहेत. अगदी तळागाळातून आलेले आहेत. सर्व कुटुंबीय माझे भक्त व सेवादार आहेत. माझे त्यांच्यावर प्रेम आहे. तेसुद्धा माझ्यावर प्रेम करतात. ते माझ्या मुलासारखे आहेत.” राधेमाँ तिच्या परम शिष्याबद्दल सांगत होती.
“२५ वर्षांपूर्वी आम्ही एका मोठ्या संकटात सापडलो. त्या संकटकाळात आमच्या कुठल्याही नातेवाईक वा दोस्त मंडळींनी आमच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. फक्त राधेमाँच आमच्या पाठीशी गंभीरपणे उभी राहिली. आम्ही जे कोणी आज आहोत ते सर्व तिच्यामुळेच.” संजीव गुप्ता सांगत होते. संजीव गुप्ता ग्लोबल अॅड्व्हर्टाइजिंग एजन्सीचे मालक व ममतामयी श्री राधेमाँ चॅरिटेबल न्यासाचे ट्रस्टी आहेत.
दिल्ली येथील सत्संगच्या वेळी राधेमाँची भेट संजीव यांना झाली. त्यांनीच राधेमाँला मुंबईला येण्याचा आग्रह केला. संजीव यांचे कुटुंब त्या काळी मुंबईत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत होते. गुप्ता यांनी राधेमाँला भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली. शहरभर तिचे होर्डिंग्ज लावले. तिच्या सत्संग कार्यक्रमाला गर्दी होऊ लागली.
परंतु २०१४ मध्ये निक्की गुप्ता या त्यांच्या सुनेने हुंड्यासाठी छळ व कौटुंबिक हिंसाचार या कायद्याखाली राधेमाँवर केस टाकली. तिचे सासू-सासरे शारीरिक व मानसिक त्रास देतात असा आरोप तिने आरोपपत्रात केला होता. संजीवच्या मते हा कुटुंबाचा आंतरिक मामला असून यात राधेमाँचा अजिबात सहभाग नव्हता. पोलीस तपासात राधेमाँच्या विरोधात काहीही न आढळल्यामुळे प्रकरणात तथ्य नाही अशी शिफारस केली. त्यानुसार खालच्या ट्रायल कोर्टाने या प्रकरणात निक्की गुप्ता व राधेमाँ यांचा संबंध नाही असा निकाल देत केस नामंजूर केल्यावर निक्की गुप्ताने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात दाखल केले व त्यात आरोपी म्हणून राधेमाँला न्यायालयासमोर उभे केले. निक्की गुप्ता यांनी केलेले आरोप व माध्यमांनी तिला दिलेली प्रसिद्धी यामुळे तिची लोकप्रियता खालावत गेली. काही काळ राधेमाँ लोकांच्या नजरेसमोरून अदृश्य झाली. कुठलेही संकट हे टर्निंग पॉइंट असू शकते. मी तिला दोष देत नाही. शेवटी सत्याचाच विजय होतो. सत्यमेव जयते. हे राधेमाँचे या विषयावरील समर्थन. परंतु विवादाची व्याप्ती वाढतच गेली. हुंडाबळी प्रकरणानंतर गुप्ता कुटुंबातील एक वृद्ध, मनमोहन गुप्ता यांनी राधेमाँवर अजामीनपात्र खटला दाखल केला. त्या आरोपपत्रात राधेमाँने त्यांच्या मुलांवर काळ्या जादूचे प्रयोग करून सगळी मालमत्ता हडप करण्याचा कट रचला आहे असे नमूद केले. तिचीच एक पूर्वीची शिष्या व टीव्ही आणि चित्रपट कलाकार, डॉली बिंद्रा यांनी तिच्यावर अश्लीलतेची केस टाकली. राधेमाँवर तिने नग्नतेचे, चोरून लैंगिक क्रिया बघण्याचे व अनैतिक व्यवहारासारखे गंभीर आरोप केले होते. डॉली बिंद्रा हिने राधेमाँ तिच्या महिला शिष्यांच्या बरोबर लैंगिक व्यवहार करते व इतरांना तसे करण्यास प्रोत्साहित करते असाही आरोप केला.
माझ्यासारख्या सिनेक्षेत्रात वावरणार्या धैर्यशील महिलेबरोबर असे काही तरी करत असतील तर साधे, भोळे सामान्य स्त्री-पुरुषांची काय अवस्था झाली असती, याचा विचारही मी करू शकत नाही, बिंद्रा सांगत होती. तिने राधेमाँचा मुलगा बंटी व भक्त ताल्लीबाबावर सत्संगाच्या वेळी अश्लील चाळे केल्याचा आरोपही केला.
वासन अहिर या गुजरात भाजपाच्या आमदाराने राधेमाँने गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील एका कुटुंबाला सामूहिक आत्महत्या करण्यास भाग पाडले, असा आरोप केला. वृत्तपत्रातील बातमीनुसार रघु जारुने राधेमाँला एक कोटीची देणगी देऊन आपल्या कुटुंबीयांसकट आत्महत्या केली.
राधेमाँने या सर्व आरोपांचा इन्कार केला. तिच्या मते ती आपल्या भक्तांना आई-वडिलांची काळजी घ्यावी व माणुसकीवर प्रेम करावे असेच शिकविते; परंतु तिच्यावरील विवादास्पद विधान ऐकल्यावर ‘ये दुनिया प्यार के लायक नही है’ असे तिला वाटू लागले म्हणे.
फाल्गुनी ब्रह्मभट्ट या वकिलाने २०१५ साली मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका सादर केली. त्यात त्यांनी तिचे अश्लील वर्तन, सत्संगाच्या प्रवचनातून धार्मिक भावना दुखविणे, स्वतःला देवीचा अवतार म्हणवून घेत सामान्य भक्तांची फसवणूक इत्यादी आरोप केले होते. या महिलेचे घर म्हणजे बदमाशांचा अड्डा असून तेथे ती स्वतः व इतर लबाड मिळून धर्माच्या नावाखाली गरीब व भोळ्या लोकांची लुबाडणूक करत आहेत. राधेमाँ स्वतःला देवीचा अवतार म्हणून या भक्तगणात वावरते, असेही त्यांनी आरोपपत्रात नमूद केले होते.
काही जुजबी चौकशीनंतर ही जनयाचिका फेटाळली गेली. तर सर्व आरोप निराधार आहेत म्हणून तिच्यावरील सर्व FIR नामंजूर केले गेले व हिंदी चित्रपटातील भाषेप्रमाणे ‘राधेमाँ बाइज्जत बरी हो गयी.’
ब्रह्मभट्ट यांच्या मते राधेमाँच्याभोवती जमलेल्या लबाड मंडळींनी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम वा आसाराम बापूसारखी तिची दुरवस्था होऊ नये याची काळजी घेतली. त्यांच्या मते ही बाई अत्यंत प्रभावशाली, भरपूर पैसेवाली आहे. तिच्याकडचा हा पैसा कुठून आला हे कुणालाही माहीत नाही. कुठलीही तपासयंत्रणा यासंबंधी तपासही करत नाही. जर या यंत्रणांनी खोलात जाऊन तपास केल्यास झाकून ठेवलेले कित्येक सांगाडे बाहेर पडतील.
राधेमाँ मात्र “मी या कशालाही घाबरत नाही व इतर बाबा-बुवांशी माझे देणे घेणे नाही.” असे बिनदिक्कत सांगते. “मी इतर आध्यात्मिक गुरुंसारखे संपत्ती गोळा करत नाही की भव्य-दिव्य मंदिर वा आश्रम बांधत नाही. मी माझ्या या भक्तांबरोबर समाधानी आहे. माझ्या मुलांनी माझ्यासाठी हे प्रचंड घर बांधून ठेवलेले आहे व जे काही आहे त्यात मी सुखी आहे.” असेही सांगते.
-प्रभाकर नानावटी
(संदर्भ : ‘आऊट लूक’ साप्ताहिक)
एक अनोखी मुलाखत
मुलाखत घेणार्या पत्रकारांच्या गटाला माँ दर्शन देणार असे सांगितले गेले. त्या सर्वांनी डोक्याभोवती जय राधेमाँ असे लिहिलेली पट्टी बांधावी, आत गेल्या गेल्या तिच्या पाया पडावे, असे सांगितले गेले. मग त्या सर्वांना राधेमाँ बरोबर राहणार्या छोटीमाँने एका अंधारवजा गुहेसारख्या दिसणार्या खोलीत नेले. तेथे सर्व काही लालेलाल होते. सगळ्या भिंती, खुर्च्या, जमिनीवर अंथरलेले वेल्वेटचे गालिचे, सगळे काही भडक लाल रंगाचे. एका बेडवर ठेवलेल्या स्टूलवर ती बसली होती. तेथे जमलेल्या काही स्त्रिया टाळ्या वाजवत होत्या, पुरुष भजन म्हणत होते.

लुधियानाहून आलेल्या एकाला तिने समोर बोलाविले. त्याच्या मनगटावर एक गंडा बांधला. खोलीतील सर्व जण जयजयकार करू लागले. फोटोग्राफरचा हात हातात घेऊन तिने त्याला एक (पवित्र केलेले) नाणे दिले. मुलाखत घेणार्या महिलेच्या भोवती पिवळा दुपट्टा गुंडाळला. एक महिला उभे राहून नाचत होती. राधेमाँ प्रत्येकाच्या मनातलं ओळखू शकते, त्यामुळे ती काय काय सांगते ते फक्त ऐकणे अशी आज्ञा झाली. मुलाखत घेण्यासाठी सज्ज असलेल्यांचा कॅमेरा खोलीभर फिरून कुठेतरी माइक लपविल्याचा शोध घेऊ लागला. ती एक मुलाखत घेणार्यांची नेहमीचीच सवय असावी. प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी राधेमाँ एका सोनेरी रंगाच्या सिंहासनावर बसली.
“तू भावनावश झालेली आहेस. ते मला दिसत आहे.” त्या वेळच्या तेथील गूढ, कुंद वातावरण निर्मितीमुळे त्या पत्रकार महिलेला एक क्षणभर राधेमाँविषयी विश्वास वाटला असेल. प्रेम, आशा व संकट इत्यादीमुळे आपल्याला कुणी तरी समजून घेत काही चांगले शब्द बोलत आहे या चमत्काराची अपेक्षा ती करत असेल. भग्न हृदयाला विसावा देणारी ही जागा असेही वाटले असेल. राधेमाँ कुठल्याही वादविवादात पडू इच्छित नाही. अनेक पत्रकार मेकअप करून वावरणारी म्हणून तिचे वर्णन करतात. तिचे स्कर्टमधील फोटो व्हायरल केले जातात. अश्लील म्हणून नावं ठेवली जातात. ‘या बुवाबाजीत आकंठ बुडालेल्या बुवा-बाबा व माता-देवींचे जग फार कठीण अवस्थेतून जात आहे. येथेही मोठ्या प्रमाणात स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. जर या बुवा-बाबांच्या जगातील पुरुष आखूड पंचा व उघडी छाती दाखवत वावरत असताना ही माँ स्कर्टमध्ये असल्यास त्यात वावगे काय?’ ती स्मार्ट आहे.
“तू माझी परीक्षा घ्यायला आली आहेस,” ती म्हणाली. तिने त्या पत्रकर्तीच्या डोक्यावर हात ठेवले. “तू टीव्हीवरील महा शिव पुराण सीरियल बघत जा. तुला तिने शांती प्रदान केलेली आहे.” छोटीमाँ म्हणाली. येथे जमलेल्या प्रत्येकाच्या काही ना काही तरी समस्या आहेत. कौटुंबिक समस्या, आर्थिक समस्या, बदलामुळे उद्भवलेल्या समस्या…येथील अंधश्रद्धांना उपजतची बुद्धी वा शिक्षण थोपवू शकत नाही. कारण अनिश्चिततेला ते सामोरे जाऊ शकत नाहीत. त्यांना चमत्कार हवा असतो, चुटकीसरशी समस्या सुटल्या पाहिजेत अशी त्यांची अपेक्षा असते. या चमत्काराच्या बाजारात अशाच गिर्हाइकांची गर्दी आहे.
प्लासिबो परिणामावर येथील सर्वांचा भलताच विश्वास आहे. चमत्कारच त्यांच्या समस्यावरील उपाय आहे, अशी त्यांची खात्री असते. रोज पेपरमध्ये दर्शनासाठीच्या चेंगराचेंगरीचे, फसवणुकीचे, लैंगिक अत्याचाराचे जाड मथळ्याखाली रकानेच्या रकाने भरलेले वाचत असतात; परंतु या बाबा-बुवा, माता-देवी यांच्या रोजच्या सत्संग प्रवचन ऐकायला येणार्यांची गर्दी कमी झाली नाही. या सत्संगाच्या निरर्थकतेची कुणालाही कल्पना नाही.
ती पत्रकर्तीसुद्धा गोंधळलेल्या स्थितीत अंगावरील दुपट्टा नीट करत उभी होती. ‘तू पुन्हा येशील.’ राधेमाँ म्हणाली. मी कधीच परत येणार नाही. असे तिला ओरडून सांगावेसे वाटले असेल. ती फक्त या प्रसंगाचे वर्णन करणारी साक्षीदार होती, ती माँची (अंध) भक्त नव्हती. तिलाही चमत्कार आवडत असले तरीही….