प्रा. अनिकेत सुळे -
राजकारण्यांकडून केल्या जाणार्या छद्मविज्ञानी दाव्यांचे वर्गीकरण करायला गेले तर खालील गट पडतात. पहिला गट म्हणजे पुराणकाळात प्रगत विज्ञान असल्याचे दावे; दुसरा गट म्हणजे सरळ–सरळ धर्माधारित श्रद्धांना मारून–मुटकून वैज्ञानिक स्पष्टीकरण चिकटवणे. यात बर्याचदा वरकरणी वैज्ञानिक वाटणार्या एखाद्या अभ्यासाचा दाखला दिला जातो. या राजकारण्यांचे देशी गायींवरचे प्रेम सर्वश्रुत आहेच. तिसर्या गटात आपण त्या दाव्यांना टाकू, जे काही यादृच्छिक संशोधन अहवालांच्या कुबड्या घेऊन सवंग प्रसिद्धी मिळवतात. अनेकदा ते उध्द़ृत करीत असलेले संशोधन सदोष असते किंवा काही वेळा ठीकठाक असते. राजकारणी त्यांत शब्दच्छल करून चुकीचे निष्कर्ष काढतात.
BBC वरून 1980 च्या दशकात प्रसारित झालेल्या ‘Yes, Minister!’ या हास्यमालिकेतला एक संवाद आहे- “धोरण हे पुढच्या शतकापर्यंत कसे टिकून राहता येईल, याचा विचार करते, (तर) राजकारण हे येत्या शुक्रवार दुपारपर्यंत कसे टिकून राहता येईल, याचा विचार करते.” हे वाक्य त्या मालिकेत परराष्ट्र धोरणासंदर्भात आले असले, तरी ते वैज्ञानिक धोरणाबाबतही तितकेच चपखल लागू पडते. विज्ञानाची प्रगती ही वर्षानुवर्षे चालत राहणार्या संशोधनातून होत असते. ‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ असे उच्छृंखल वर्तन वैज्ञानिकांकडून क्वचितच घडते. मात्र राजकारणात ‘बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ’ असा दृष्टिकोन ठेवणारेच बहुसंख्य असतात. म्हणूनच राजकारण्यांकडून केल्या जाणार्या छद्मविज्ञानी विधानांचा मला राग येतो; मात्र धक्का बसत नाही.
राजकारण्यांकडून केल्या जाणार्या छद्मविज्ञानी दाव्यांचे वर्गीकरण करायला गेले तर खालील गट पडतात. पहिला गट म्हणजे पुराणकाळात प्रगत विज्ञान असल्याचे दावे; म्हणजे त्यांत पुराणकाळातली विमाने आली (डॉ. सत्यपाल सिंग, माजी शिक्षण राज्यमंत्री), गणपतीचे डोके म्हणजे प्लास्टिक सर्जरीचा पुरावा असे म्हणणे आले (खुद्द पंतप्रधान), महाभारत काळातले इंटरनेट आणि उपग्रहीय संदेशवहन आले (विप्लब देव, त्रिपुराचे मुख्यमंत्री), E=mc2 चे मूळ वेदांत शोधणे आले (डॉ. हर्षवर्धन, आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री) किंवा कणादाच्या तत्त्वज्ञानाला आधुनिक अणुविज्ञानाच्या पंगतीत बसविणे आले (डॉ. रमेश पोखरियाल ‘निःशंक’, शिक्षणमंत्री). यांच्या विचारधारेनुसार मतदारांना संस्कृतीची नशा चढविणे भाग असते. गेल्या काही शतकांत पाश्चात्य देशांनी केलेली वैज्ञानिक प्रगती अमान्य करणे अशक्य असल्याने त्या रेघेपेक्षा आमच्या संस्कृतीची रेघ मोठी हे दाखविण्याचा हा खटाटोप असतो. मग कुठल्यातरी श्लोकाचे चुकीचे भाषांतर करून किंवा पुराणातल्या कुठल्या तरी वर्णनातल्या काही विधानांशी एखाद्या आधुनिक विज्ञानातल्या गोष्टीचे वरवरचे साम्य दाखवून असे दावे केले जातात. थोडक्यात काय, तर हा म्हणजे आधी अंदाधुंद गोळीबार करून नंतर गोळ्या लागलेल्या ठिकाणी नेमबाजीची वर्तुळे रंगविण्यासारखा हा प्रकार असतो.
दुसरा गट म्हणजे सरळ-सरळ धर्माधारित श्रद्धांना मारून-मुटकून वैज्ञानिक स्पष्टीकरण चिकटवणे. यात बर्याचदा वरकरणी वैज्ञानिक वाटणार्या एखाद्या अभ्यासाचा दाखला दिला जातो. या राजकारण्यांचे देशी गायींवरचे प्रेम सर्वश्रुत आहेच. कधी म्हणतात, गायीजवळ नुसते उभे राहिले की सर्व रोग बरे होतात, कधी म्हणतात की देशी गायींच्या मुत्रात सोन्याचा अंश असतो; कधी म्हणतात गायीच्या वाशिंडातली एक विशिष्ट नाडी सौरऊर्जेचे रुपांतर स्नायुऊर्जेत करत असते; तर कधी गायीच्या शेणाच्या गोवर्या या मोबाईल फोनच्या radiation ला अटकाव करतात. रमेश पोखरियाल हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री असताना फलज्योतिषाची खुलेआम भलावण करत असत. वीस वर्षांपूर्वी डॉ. मुरली मनोहर जोशींनीही फलज्योतिषाचा अभ्यासक्रम विद्यापीठांत घुसवला होता. या राजकारण्यांची मतपेढी ही धर्माच्या धाग्याने बांधलेली असते; मात्र यांचे अनेक मतदार शहरी व उच्चशिक्षित असल्याने आपले विचार बुरसटलेले आहेत, आपण धर्माधारित दाव्यांची सत्यासत्यता तपासून पाहत नाही, हे कबूल करायची या मतदारांना लाज वाटते, म्हणूनच हे राजकारणी असले छद्मविज्ञानी दावे त्यांच्या मतदारांच्या सांत्वनासाठी करत असतात.
तिसर्या गटात आपण त्या दाव्यांना टाकू, जे काही यादृच्छिक संशोधन अहवालांच्या कुबड्या घेऊन सवंग प्रसिद्धी मिळवतात. अनेकदा ते उध्द़ृत करीत असलेले संशोधन सदोष असते किंवा काही वेळा ठीकठाक असते. राजकारणी त्यांत शब्दच्छल करून चुकीचे निष्कर्ष काढतात. राजकारण्यांना असा दावा करणे आवडते की, गंगेमध्ये आंघोळ करून तुमची पापं वाहून जातात आणि ते गंगेमध्ये आढळणारी विशेष बुरशी आणि त्यांच्या जंतुनाशक गुणधर्मांबद्दलच्या अभ्यासाचा अनेकदा उल्लेख करतात; पण ते हे सांगत नाहीत की, ही गंगेतली बुरशी सर्व शहरी स्थळांपासून दूर आढळली आहे आणि गंगा नदीचे पाणी सर्व शहरी केंद्रांजवळ अत्यंत प्रदूषित आहे. त्याचप्रमाणे ग्रहणानंतर शिजवलेले अन्न फेकून देण्याच्या पद्धतीच्या समर्थनार्थ एक संशोधन पुढे केले जाते; ज्यात दाखवले होते की, ग्रहणकाळात प्रयोगशाळेत एका पेट्री डिशमध्ये जिवाणूंची वेगवान वाढ होते. मात्र हे विशिष्ट संशोधन चुकीच्या पद्धतीने केले होते, जिथे प्रयोगातील निरीक्षणे लेखकांनी सादर केलेल्या निष्कर्षांशी सहमत नव्हती, हे कुणीच सांगत नाही. त्या निबंधातील निरीक्षणांच्या आकडेवारीनुसार ग्रहण असो किंवा नसो; जिवाणूंची वाढ जवळपास सारखीच होती. परंतु लेखक पक्षपाती असल्याने त्यांनी ग्रहणकाळात उच्च वाढ दिसून आली, असे धादांत खोटे ठोकून दिले आणि हा कागद निम्न प्रतीच्या संशोधन प्रसिध्द करणार्या नियतकालिकाला पाठविला.
आपण विचार केला तर लक्षात येईल की, गेल्या दोन दशकांत अशा छद्मविज्ञानी दाव्यांचे प्रमाण खूप वाढले आहे; फक्त राजकारणातच नव्हे तर समाजातही! खरं तर आपण असही म्हणू शकतो की, आपले राजकारणी त्यांच्या मतदारांना जे ऐकावेसे वाटे तेच बोलत असतात. आता समाजात असा बदल का घडतोय, याचा विचार करायचा असेल तर थोडे मागे जावे लागेल. गेल्या शतकात सामान्य माणसाला माहिती मिळण्याचे स्रोत मर्यादित होते. कोणाला काही नवीन शिकायचे असल्यास एखादे पुस्तक, वृत्तपत्र किंवा मासिक वाचावे लागायचे अथवा विषयतज्ज्ञांचे भाषण ऐकावे लागायचे किंवा रेडिओ किंवा टीव्हीवरील कार्यक्रम ऐकावे लागायचे. या सर्व स्रोतांमध्ये अंतर्गत गुणवत्ता तपासणी होत असे. यापैकी कोणत्याही स्रोताद्वारे छद्मविज्ञान लोकांपर्यंत पोेचण्याची शक्यता फारच कमी होती. तेथे धार्मिक अंधश्रद्धा नव्हत्या का? निश्चितच होत्या. परंतु त्या सहसा विज्ञानामध्ये मिसळत नसत. शिक्षित लोकांना याची जाणीव होती की, त्यांचे धार्मिक विधी आणि अंधश्रद्धा विज्ञानाशी विसंगत आहेत आणि विज्ञान वापरून त्यांचे औचित्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे अयोग्य आहे. गेल्या दोन दशकांतील डिजिटल क्रांतीने हे सारे समीकरण बदलले. प्रथम आंतरजाल, त्यावरील शोध आणि ई-मेल, त्यानंतर स्मार्टफोन आणि सोशल मीडियाने जनतेपर्यंत माहिती (आणि चुकीची माहिती) पोचविण्यासाठी आणखी बरेच मार्ग उघडले. या नवीन वाटांवर कोणतेही बंधन नसल्याने गुणवत्ता तपासणीचा प्रश्नच नव्हता. ज्या क्षणी एखाद्याच्या मनात काही विचार आले की, तडकाफडकी ते लिहून लक्षावधींना वाचनासाठी पाठविणे या नवीन माध्यमांमुळे शक्य झाले. त्याच वेळी, आपल्याकडे भारतीयांचा एक नवीन गट उदयास येत होता, जे विज्ञान / तंत्रज्ञानाच्या पदव्या घेऊन महाविद्यालयांमधून बाहेर पडत होते आणि नवीन उद्योगांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकर्या मिळवत होते. मी याला एक ‘नवा गट’ म्हणतो. कारण उच्चशिक्षित भारतीयांच्या पूर्वीच्या पिढीपेक्षा तो वेगळा होता. त्यांच्यापैकी बरेच जण त्यांच्या कुटुंबातील पहिले पदवीधर / पहिले अभियंता / पहिले डॉक्टर होते आणि ते अशा महाविद्यालयांत शिक्षण घेत होते की, त्या महाविद्यालयांचे वयोमान त्यांच्यात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांपेक्षाही कमी होते. भारताला नव्या युगात नेण्यासाठी शैक्षणिक संधींचा विस्तार आवश्यकच होता; परंतु दुर्दैवाने आपल्या बाबतीत ही उच्च शिक्षणातली वाढ कमी आणि सूज जास्त होती. शिक्षणाकडे व्यवसाय म्हणून पाहणारी बरीच नवीन महाविद्यालये त्यांच्या छताखालील शिक्षणाच्या गुणवत्तेची काळजी घेण्यास असमर्थ होती आणि या महाविद्यालयांतल्या अपुर्या शिक्षणाची या विद्यार्थ्यांना जाणीव करून देणारे वैयक्तिक मार्गदर्शकही कोणी नव्हते. अशा प्रकारे अचानक आपल्याकडे उच्चशिक्षित; परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असलेली एक मोठी लोकसंख्या होती. सर्व प्रकारच्या माहितीचे समाजातले अनियंत्रित अभिसरण आणि ‘अनेक वैज्ञानिक संज्ञा कानावरून गेल्यात; मात्र त्यांचा अर्थ फारसा कळलेला नाही,’ अशा अवस्थेतले उच्चशिक्षित तरुण हे एक घातक रसायन समाजात पसरत गेले.
गेल्या काही वर्षांत उदयास आलेल्या राजकारण्यांची नवीन पिढी या भारतीयांचे प्रतिनिधित्व करते. त्यांचे मतदार उच्चशिक्षित प्रकारात मोडतात; परंतु त्यांच्यात सारासार विचारशक्तीचा अभाव असतो. हे मतदार नवीन तंत्रज्ञान जाणणारे असतात आणि आपल्याला माहीत करून घेता येणार नाही, असे या जगात काहीच नाही, असा त्यांना एक फुकाचा विश्वास असतो. या मतदारांचे असे ठाम मत असते की, सर्व माणसांना माहिती ही समान प्रमाणात मिळणे शक्य असेल, तर प्रत्येकजण हा प्रत्येक विषयात समान तज्ज्ञ असला पाहिजे. आपल्या सध्याच्या सत्ताधारी पक्षाची प्रतिमा या मतदारांना आकर्षित करण्यासाठी काळजीपूर्वक तयार केली गेली आहे. हेच कारण आहे की, सत्ताधारी पक्षाचे राजकारणी नियमितपणे खरे विज्ञान नाकारतात आणि ज्याला ते raw wisdom म्हणतात, त्याचा डांगोरा पिटत असतात. ढगांमुळे लढाऊ विमाने रडारपासून लपली, असे म्हणताना विज्ञानाशी हे सुसंगत आहे का, याने त्यांना काहीच फरक पडत नाही. त्यांना माहिती आहे की, त्यांचे मतदारांचे विज्ञानविषयक आकलन तितकेच अर्धेकच्चे आहे आणि अशा चुकीच्या गोष्टी बोलण्यामुळे मतदारांना असे वाटते की, हा राजकारणी आपल्यापैकीच एक आहे. या मतदारांना तज्ज्ञ आपलेसे न वाटता परके वाटतात आणि त्याचा गैरफायदा सत्ताधारी पक्ष घेत आहे.
अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्याला हाच प्रकार काही वेगळ्या स्वरुपात दिसतो. ट्रम्प आणि विज्ञान यांचा 36 चा आकडा आहे, हे तर सर्वांनाच माहीत आहे आणि COVID-19 साथीच्या वेळी अमेरिकेने त्याची मोठी किंमत मोजली. पण एर्दोगान (तुर्की), बोल्सनारो (ब्राझील) किंवा पोलंडची लॉ अँड जस्टिस पार्टी हे देखील त्याच माळेचे मणी आहेत. जसे आपल्याकडे मतांसाठी हिंदू कर्मकाडांना विज्ञानाची चौकट देण्याचा प्रयत्न केला जातो, तसाच तिथे मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्माबाबत होतो; आणि गंमत म्हणजे एका देशात राजकारण्यांकडून केल्या जाणार्या छद्मविज्ञानी दाव्यांना उचलून धरणारे दुसर्या देशातल्या छद्मविज्ञानी दाव्यांवर मात्र हसत असतात. राजकारणातून छद्मविज्ञान हद्दपार करणे कठीण आहे; मात्र अशक्य नाही. छद्मविज्ञानाची राजकारणातली चलती ही राजकारण्यांच्या मूर्खपणामुळे नसून त्यांच्या बनेलपणामुळे आहे, हे आपल्याला लक्षात ठेवावे लागेल. त्यामुळेच राजकारणातून छद्मविज्ञान हद्दपार करण्यासाठी मतदारांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.
–प्रा. अनिकेत सुळे
होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई
लेखक संपर्क ः aniket.sule@gmail.com