ख्रिस्ती धर्मातील धर्मसुधारणा

डॅनिअल मस्करणीस - 9158986022

तब्बल 2.3 अब्ज लोकसंख्या असलेला ख्रिश्चन धर्म ज्याच्या नावाने जगभर पसरला आहे, तो येशू तसं पाहिलं तर ज्यूधर्मीय. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे शिष्य ज्यू धर्मातीलच नवीन सुधारित पंथ म्हणून येशूच्या शिकवणुकीचा परिसरातील ज्यूधर्मियांत प्रचार करत होते. काही वर्षांनंतर पॉल नावाचा एक विद्वान येशूच्या शिष्यांना भेटला व त्याने ख्रिस्ती धर्माची स्थापना केली. धर्माला आवश्यक असलेले घटक; जसे – धर्मग्रंथ, धर्ममंदिर, धर्मगुरू यांची त्याने ख्रिस्ती धर्म म्हणून मांडणी केली आणि हे करत असताना त्याने एक महत्त्वाचा बदल केला. असा बदल जो संपूर्ण जगावर दूरगामी परिणाम घडवून आणणार होता. तो बदल म्हणजे ‘जे ज्यू नाहीत असे इतर लोकही (Gentile) ख्रिस्ती धर्म स्वीकारू शकतात,’ असे विचार त्याने मांडले. त्यामुळे सुरुवातीच्या काळात समूहापणाची भावना वाढीस लावणार्‍या या धर्माचा बर्‍याच शोषितांत, कष्टकर्‍यांत प्रसार करणे येशूच्या शिष्यांना सोपे गेले. पुढे, 300 वर्षांनी रोमन राजा कॉन्स्टंटाइन याने जेव्हा ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला, तेव्हा अधिकृतरित्या रोमन कॅथॉलिक चर्चची स्थापना झाली. राजाश्रय मिळाल्याने रोमनबहुल युरोपमध्ये या धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार होऊ लागला.

मध्ययुगापर्यंत रोमन कॅथलिक चर्च युरोपमध्ये घट्टपणे पाय रोवून उभे होते. मानवजातीचा तारणकर्ता येशू ख्रिस्त याने हे चर्च स्थापन केले आहे. ‘माणसाला स्वर्गात जाण्यासाठी मोक्ष केवळ चर्चद्वारेच प्राप्त होऊ शकतो,’ अशी चर्चची मांडणी होती. ‘माणसाचे तारण होण्यात त्याचे जास्त हित असल्यामुळे माणसाचे केवळ ऐहिक हित साधणार्‍या राज्यसंस्थेपेक्षा चर्च ही धर्मसंस्था श्रेष्ठ आहे,’ असाही चर्चचा दावा होता. चर्चच्या हातात धार्मिक सत्ता एकवटलेली असल्यामुळे सत्तेबरोबर जे दुर्गुण येतात, त्यांनी चर्चचा व्यवहार भ्रष्ट झाला होता. चर्चने युरोपमध्ये अमाप संपत्ती गोळा केली होती. चर्चचे वरिष्ठ धर्मगुरू ख्याली-खुशालीचे आणि रंगेल जीवन जगत. पोपचेही राजसत्तेवर नियंत्रण होते. ‘येशूचे उत्तराधिकारी’ म्हणवणार्‍या पोपच्या सुखासीन आणि विलासी आयुष्यातील विरोधाभास सर्वसामान्य जनतेलाही जाणवत होता.

पीटर वॉल्डो (Peter waldo) हा बाराव्या शतकातील जर्मनी येथील एक श्रीमंत व्यापारी. त्याने धर्माच्या प्रभावाखाली आपली सर्व संपत्ती गरिबांना दान केली होती. पण धर्मसत्तेचे विरोधाभासी आचरण पाहून त्याने बायबलचा स्वतः अभ्यास केला व त्याने त्याच्या निष्कर्षाचा जाहीररित्या प्रचार करण्यास सुरुवात केली. ‘पापांची कबुली देण्यासाठी धर्मगुरूंची गरज नाही’, ‘लहान नवजात बालकांना ‘बाप्तिस्मा’ देऊ नये’, ‘प्रार्थना करण्यासाठी चर्चच्या इमारतीची गरज नाही,’ असे बरेच क्रांतिकारी विचार त्याने तेव्हा मांडले. त्याला बरेच अनुयायीही मिळाले. आजूबाजूच्या स्पेन, जर्मनी आणि उत्तर इटली या देशांतही त्याच्या विचारांचा प्रसार झाला. त्याच्या अनुयायांना ‘वॉल्डनसेस’ असे संबोधण्यात येत असे. अर्थात, तत्कालीन पोपने त्याला धर्मबहिष्कृत केले.

पुढे, तेराव्या शतकात इटली येथील असिसी येथील एक तरुण, फ्रान्सिस यालाही चर्चमधील ही विसंगती जाणवली. सेंट पीटर बेसिलिकाला तो एकदा भेट देण्यासाठी गेला असता त्या वास्तूसमोर भीक मागण्यास बसलेले भिकारी त्याने पाहिले आणि गोठ्यात जन्मलेल्या येशूवर हक्क सांगणारे ‘व्हॅटिकन’च्या भव्य प्रासादात कसे राहू शकतात, असा त्याला प्रश्न पडला. ‘फ्रान्सिस जा, आणि माझे चर्च दुरुस्त कर, ते भग्नावस्थेत आहेत,’ (Go Francis, and repair my house which, as you see, is in ruins.) अशी येशूचीच जणू त्याला हाक ऐकू येत होती. त्याने मग येशूच्या गरीब राहणीमानाप्रमाणे राहून लोकांची सेवा करण्यासाठी ‘फ्रान्सिस्कन’ या धर्मगुरूंच्या संघाची स्थापना केली. चर्चच्या तेव्हा काहीशा फिक्या पडलेल्या मानवतावादी प्रतिमेला गडद करण्यासाठी या नवीन धर्मगुरूंच्या संघाला मात्र तत्कालीन पोप यांनी मान्यता दिली.

पीटर वॉल्डो असो वा फ्रान्सिस असिसीकर, युरोपमध्ये असे विविध विचारवंत व धर्मगुरू चर्चबाहेरून आणि चर्चमधून आपापल्या परीने धर्मसुधारकाची भूमिका बजावत होते. वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या परिसरात धर्मसुधारकांची जणू एक अदृश्य साखळीच कार्यरत होती. काहींचा आवाज त्या काळात ऐकला गेला, तर काहींचा दडपून टाकण्यात आला, एवढंच! पण त्यामुळे हळूहळू का होईना युरोपमध्ये चर्चविरोधात एक वातावरण तयार होत होते. राजसत्तेत हस्तक्षेप करणार्‍या विविध राजसत्तांचाही त्याला छुपा पाठिंबा होता; आणि त्याचीच परिणती म्हणजे सोळाव्या शतकात झालेली व संपूर्ण युरोपमध्ये फोफावलेली धर्मसुधारणा ही चळवळ.

याला कारणीभूत ठरली, ‘ती’ 1520 मधील एक सामान्य घटना. रोमच्या पोपने सेंट पीटर बेसिलिकाची पुनर्बांधणी करण्यासाठी निधी उभा करण्यास सुरुवात केली आणि ‘तुम्ही इतके पैसे दिले तर तुमची इतकी पापे माफ केली जातील,’ म्हणून सर्वसामान्य लोकांकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. पण जर्मनी येथील मार्टिन ल्युथर या ख्रिस्ती धर्मगुरूने ‘पापांची क्षमा करणे हे देवाचे काम आहे,’ या बायबलमधीलच वाक्याचा संदर्भ देऊन पोपना आव्हान दिले. त्याने बंडखोरी केली, त्याने ‘प्रोटेस्ट’ केला व याच रोमन कॅथॉलिक पंथातून ‘प्रोटेस्टंट’ हा नवीन पंथ उदयास आला.

मार्टिन ल्युथरचे वैशिष्ट्य म्हणजे चर्चच्या अवस्थेस फक्त चर्चमधील भ्रष्टाचारच नाही, तर चर्चच्या धर्माचरणातही समस्या आहेत, हे त्याने प्रथम मांडले आणि हे सिद्ध करण्यासाठी त्याने बायबल हा ग्रंथ प्रमाण मानला. त्याने लिहिलेले ‘पंच्याण्णव सिद्धांत’ (95 Theses) हे पुस्तक प्रकाशित होणे, ही धर्मसुधारणा चळवळीची सुरुवात मानली जाते. युरोपमध्ये या पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या उदंड वाचक प्रतिसादाचे आणखी एक कारण म्हणजे तेव्हा नुकताच छपाई यंत्राचा लागलेला शोध. या शोधाचा फायदा हे विचार जोमाने पसरविण्यात झाला. पुढे यात फ्रेंच धर्मसुधारक जॉन केल्व्हिन याने अजूनच भर घातली व या नवीन उदयास आलेल्या प्रोटेस्टंट पंथाला एक ठोस वैचारिक अधिष्ठान लाभले.

व्यक्ती आणि ईश्वर यांच्यात व्यक्तिगत नाते असते. त्यासाठी धर्मगुरू वा धार्मिक कर्मकांडे यांची गरज नाही, धर्मगुरूंना लग्न करण्यास परवानगी देणे, चर्चमधील भ्रष्टाचारास पूरक ठरणारी पोप-बिशप-धर्मगुरू अशी सत्तेची उतरंड नाकारणे व सर्वांना खर्‍या अर्थाने समानता बहाल करणारी ‘इन्व्हिसिबल चर्च’ ही संकल्पना अंगीकारणे, आपापल्या परीने बायबलचे अर्थ लावण्याचे वैयक्तिक स्वातंत्र्य लोकांना देणे ही प्रमुख वैशिष्ट्ये या नवीन पंथाची सांगता येतील. या पंथाने बायबलही सर्वसामान्य भाषेत छापण्यास सुरुवात केली. तोपर्यंत बायबल फक्त लॅटिन भाषेत होते.

हे धर्मसुधारणा आंदोलन एका शतकाहून अधिक काळ टिकले. अर्थात, ही क्रांती बरीच रक्तरंजित झाली. कॅथॉलिक चर्च हादरून गेले. रोममध्ये पोप पॉल तिसरे यांनी चर्चमध्ये अंतर्गत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. पण त्याबरोबरच ‘विनाश काले विपरीत बुद्धी;’अर्थात 1542 मध्ये त्याने ‘रोमन इन्क्विझिशन’ची स्थापना केली. ‘इन्क्विझिशन’ म्हणजे धर्माने ख्रिस्ती असलेल्या; पण ख्रिस्ती सिद्धांतांपासून भ्रष्ट झाल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीवर खटले चालविण्यासाठी चर्चने नेमलेले न्यायमंडळ. अर्थात, त्यामुळे कॅथॉलिक चर्चची अधिकच नाचक्की झाली. या सर्व घटनांमुळे प्रथमच कॅथॉलिक चर्चने 1545 मध्ये ‘ट्रेंट’ येथे धर्मपरिषद बोलावली आणि त्यात कॅथलिक धर्मसिद्धांतांची नेमकेपणे परत मांडणी केली. प्रॉटेस्टंटांनी स्वीकारलेला सिद्धांत, बायबलच्या काही वचनांचा त्यांनी लावलेला अर्थ आणि धर्मगुरूंना विवाह करण्याची त्यांनी दिलेली परवानगी या गोष्टींचा पाखंडी म्हणून परिषदेने धिक्कार केला. कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट या दोन पंथीयांमधील तेढ 1560 च्या सुमाराला विकोपाला गेली.

पण कॅथॉलिक चर्चच्या एकाधिकारशाहीला कंटाळलेल्या युरोपमध्ये प्रोटेस्टंट पंथाचा प्रसार एवढ्या लवकर थांबणार नव्हता. जर्मनी, इंग्लंड आणि स्कॉटलंड, स्वित्झर्लंड, फ्रान्स, हॉलंड, डेन्मार्क आणि स्वीडन अशा युरोपमधील सर्व देशांत ही धर्मसुधारणा चळवळ पसरली. मोठ्या संख्येने लोक प्रोटेस्टंट होऊ लागले. इटली, स्पेन आणि पोर्तुगाल या देशांत मात्र प्रॉटेस्टंट पंथीयांना राज्यकर्त्यांचा तेवढा पाठिंबा मिळाला नाही. मुळात प्रोटेस्ट करणे हा मूलभूत विचार असल्याने या प्रोटेस्टंट पंथातूनही शेकडो नवीन पंथ उदयास आले आणि ते युरोप व अमेरिकेत वेगाने पसरले. त्यामुळे कॅथॉलिक पंथीयांची संख्या झपाट्याने घटली.

या धर्मसुधारणांमुळे फक्त युरोपवरच नाही, तर सबंध जगावर परिणाम झाला. ‘प्रत्येक व्यक्तीला बायबलचा त्याच्या परीने अर्थ लावण्याचे स्वातंत्र्य आहे,’ हा सिद्धांत प्रॉटेस्टंट पंथीय देशांत प्रस्थापित झाला. सुरुवातीला मर्यादित धार्मिक स्वरुपात मान्य झालेल्या या व्यक्तिस्वातंत्र्याच्या हक्काच्या मूल्याचा विकास जीवनाच्या सर्व क्षेत्रांत झाला व ‘व्यक्तिस्वांतत्र्य’ हे महत्त्वाचे मूल्य प्रस्थापित झाले. चर्चचे एकछत्री आध्यात्मिक साम्राज्य फुटून अनेक भिन्न धर्मपंथ स्थापन झाल्यामुळे ऐहिक जीवनाचे महत्त्व हळूहळू मान्य करावे लागले. धर्म हा समाजाचा अविभाज्य घटक असल्याने या धर्मसुधारणांमुळे समाजसुधारणेलाही पुढील कित्येक वर्षेचालना मिळत राहिली. तसेच राजकीय बाबतीत हस्तक्षेप करण्याच्या धर्मसंस्थेच्या अधिकाराला मर्यादा घालणे हे सर्वांच्याच हिताचे ठरते, हेही युरोपीय जनतेला उमजले. नवीन धार्मिक मत हे भांडवलशाहीला अनुकूल असल्याने ही नवीन विचारसरणी अंगीकारलेल्या प्रदेशांची झपाट्याने प्रगतीही होऊ लागली. पुढे, 18 व्या शतकात फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि याअंतर्गत कॅथॉलिक फ्रेंच देशाचे अख्रिस्तीकरण केले गेले आणि कॅथॉलिक चर्चची संख्या अधिकच रोडावली.

शतकभर चाललेल्या या धर्मसुधारणा चळवळीने संपूर्ण युरोपचे धार्मिक, वैचारिक आणि राजकीय जीवन ढवळून काढले. या आंदोलनाने युरोपचा कायापालट झाला. राजकीय व धार्मिक संस्थावरील पोपचे प्रभुत्व नाहीसे झाले. व्यक्तिस्वातंत्र्य, समता, उदारमतवाद आणि ऐहिक जीवनाची स्वायत्तता, ही आधुनिक मूल्ये युरोपीय संस्कृतीत या धर्मसुधारणेदरम्यान रुजली आणि त्यांना अनुसरून पुढील काही शतकांत राजकीय, सामाजिक आणि आर्थिक जीवनाची फेरमांडणी करण्याच्या प्रक्रियेला जोमाने सुरुवात झाली. आधुनिक संस्कृतीच्या उभारणीत या धर्मसुधारणेचा वाटा मोठा आहे.

भारतापुरता विचार करायचा तर युरोपमध्ये प्रोटेस्टंट चळवळ ऐन भरात असताना कॅथॉलिक चर्चने आपले सदस्य वाढविण्यासाठी बर्‍याच धर्मगुरूंना युरोपबाहेर पाठविले. त्यातूनच बरेच पोर्तुगीज मिशनरी भारतात आले व त्यांनी इथे धर्मांतर केले. या नवख्रिस्तींना युरोपमधील प्रोटेस्टंट चळवळीची तेव्हा माहिती असण्याची शक्यता नव्हती. त्यात धर्मप्रिय भारतात नवीन ख्रिस्ती धर्म रुजण्यास बरीच वर्षे निघून जावी लागली. त्यामुळे ‘धर्मप्रचार’ या टप्प्यातच येथील ख्रिस्तीकार्य सीमित राहिले. पुढे, ब्रिटिश आल्यानंतर अँग्लिकल चर्च, मेथॉडिस्ट, बॅप्टिस्ट चर्च अशा प्रोटेस्टंट विचारसरणीवर आधारित विविध पंथांचाही भारतात प्रवेश झाला.

भारतीय कॅथॉलिक पंथातील धर्मसुधारणा होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले ते 1960 च्या दशकात आणि ते खुद्द चर्चनेच तयार केले. 1960 च्या दशकात ‘व्हॅटिकन’मध्ये दुसरी जागतिक धर्मपरिषद भरविण्यात आली. 1962 ते 1965 अशी तीन वर्षेती परिषद चालली. चर्चच्या बर्‍याच मुद्द्यांवर त्यात चर्चा झाली आणि बरेच क्रांतिकारक, दूरगामी निर्णय घेतले गेले. त्यापैकी पहिला निर्णय म्हणजे, ‘चर्चचे प्रादेशिकीकरण’ करण्यास दिलेली परवानगी. या अगोदर भारतातील कॅथॉलिक चर्चेसमध्ये प्रार्थना लॅटिन भाषेत होत असत. पण या निर्णयामुळे स्थानिक भाषेत प्रार्थना होऊ लागल्या आणि सामान्य लोकांना प्रथमच धर्म आपल्या भाषेत अधिक जवळून अनुभवण्यास मिळू लागला. दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे ‘प्रार्थना करा, दान द्या आणि आज्ञा पाळा’ (pray, pay, obey) एवढेच महत्त्व असलेल्या सामान्य भाविकांना/प्रापंचिकांना (laity) या दुसर्‍या ‘व्हॅटिकन परिषदे’मध्ये चर्चमध्ये सक्रियपणे सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला गेला. प्रापंचिकांना चर्चमध्ये महत्त्वाचे स्थान दिले गेल्यामुळे चर्चचा अंतर्गत कारभारही लोकांना जवळून पाहण्यास मिळू लागला.

आपल्याला उमजणार्‍या भाषेत बायबल वाचण्यास मिळाल्यामुळे किंवा चर्चच्या संघटनेत अधिक जवळून काम केल्यामुळे भाविकांनांही नवीन प्रश्न पडू लागले. सुरुवातीला या प्रश्नांचा दबक्या सुरात उच्चार झाला असला तरी हळूहळू त्याचा आवाज वाढत जात आहे. एकूणच, ख्रिस्ती धर्म जरी इस्राईलमध्ये उदयास आला तरी प्रगतिशील युरोपमध्ये त्याने खरे मूळ धरले. पाश्चात्य देशांतील चळवळीमुळे सुरुवातीपासून तो प्रवाही राहिला आहे. आज कॅथॉलिक चर्चसमोर बर्‍याच समस्या उभ्या आहेत. काळानुरूप धर्मसुधारणेची गरज आजही आहे. प्रश्न आहे तो फक्त ‘फ्रान्सिस जा, आणि माझे चर्च दुरुस्त कर, ते भग्नावस्थेत आहे,’या हाकेला साद देण्याचा !

ई मेल : danifm2001@gmail.com

संपर्क : 91589 86022


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]