थोर समाज क्रांतिकारक संत शिरोमणी गुरू रविदास

अनिल चव्हाण -

२४ फेब्रुवारी संत रविदास जयंती निमित्त विशेष लेख

आपल्या देशात संत होऊन गेले. समाजक्रांतिकारकही झाले. काही जण संत असून समाज क्रांतिकारकही होते; ईश्वराची भक्ती करत असतानाच, समाजातल्या दोषांवर, भोंदूगिरीवर, लबाडीवर त्यांनी कोरडे ओढले. त्यामध्ये महत्त्वाचे नाव म्हणजे संत रविदास.

जीवन परिचय

संत रविदास यांचा जन्म आजपासून सव्वासहाशे वर्षांपूर्वी म्हणजे १५ फेब्रुवारी १३९८ रोजी झाला. काशी जवळचे गोवर्धनपूर हे त्यांचे जन्मगाव. काहींच्या मते मांडूर किंवा मांडूगडि हे त्यांचे जन्मगाव आहे. जन्मतारीख आणि जन्मगाव दोन्ही बद्दल मतमतांतरे आहेत. माघ पौर्णिमेच्या रविवारी जन्म झाला, म्हणून ते रविदास. त्यांच्या वडिलांचे नाव रघुराम आणि आईचे नाव रघुराणी होते. आई-वडिलांच्या नावाबद्दलही मतभेद आहेत. रविदासांना लोणाबाई नावाची पत्नी होती. रविदासांनी संपूर्ण देशात भ्रमण केले आणि आपल्या कार्याचा प्रचार प्रसार सर्वत्र केला. प्रत्येक राज्यातल्या भाषेच्या उच्चारातील विविधतेमुळे त्यांची नावे रविदास, रैदास किंवा रियादास, रोहितदास अशी विविध प्रसिद्ध आहेत. बारा वर्षांचे असताना ते साधुसंतांशी संवाद करू लागले. त्याचबरोबर वर्षानुवर्षे चालत आलेल्या अन्याय, अत्याचार आणि शोषणाविरुद्ध उभे राहिले. कामावरील निष्ठा, अविरत परिश्रम आणि सदाचाराच्या बळावर त्यांनी सर्वोच्च स्थान आणि सन्मान, प्राप्त केला. ते देशातील सामाजिक क्रांतीचे प्रणेते बनले.

उपजीविकेसाठी ते काम करत. मेलेल्या ढोरापासून कातडे कमावून त्यापासून चप्पल तयार करणे हा त्यांचा उद्योग. ते उरलेला वेळ समाज जागृतीसाठी द्यायचे. त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. आपल्या अमृतवाणीने त्यांनी संपूर्ण भारत जागृत केला. जाती-जातींमध्ये विभागलेल्या समाजाला ऐक्याच्या सूत्रात बांधून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांचे विचार ऐकून अनेक लोक त्यांचे शिष्य बनले. त्यात चितोडची राणी मीराबाई, पिपाजी महाराज, सपना वीर, दिल्लीचा सुलतान सिकंदर शाह लोधी, राणी आणि अनेक स्त्री-पुरुष त्यांचे शिष्य बनले.

त्यांच्या रविदास पंथाला आरंभ झाला. हा पंथही अनेक जाती आणि उपजातींच्या नावाने ओळखला जातो. गुरु कबीर त्यांचे समकालीन; ते रविदासांना मोठे बंधू म्हणायचे! गुरु गोरखनाथ रविदासांची कीर्ती ऐकून त्यांच्या भेटीस आले. गुरु नानक रविदासांचे गीत गात आणि भजन म्हणत. शीख धर्मामध्ये मूर्तिपूजेला स्थान नाही. संतांनी रचना केलेल्या दोह्यांना, गुरुवाणी म्हणून ग्रंथांमध्ये स्थान देऊन, गुरु वचनांनाच श्रद्धास्थानी ठेवलेले आहे. शीख धर्माच्या ‘गुरु ग्रंथसाहेब’ या धर्मग्रंथामध्ये गुरु रविदासांची चाळीस पदे आहेत. संत सेना, संत धन्ना, संत तुकाराम, गुरु नानक, गुरु कबीर, संत एकनाथ यांसारखे संपूर्ण भारतातील संत, रविदासांच्या विचाराने प्रभावित झालेले दिसून येतात. त्यांच्या दोहे किंवा अभंगांमध्ये रविदासांचा आदराने उल्लेख झालेला दिसतो.

चमत्कारांची रेलचेल

एखादी व्यक्ती लोकप्रिय बनली की तिच्या नावावर अनेक चमत्कार खपवले जातात. ती व्यक्ती आध्यात्मिक क्षेत्रातील असेल तर, या चमत्कारांना आणखी बहर येतो. रविदास यांच्या जीवनात चमत्कारांची सुरुवात जन्माच्या आधीपासूनच केलेली आहे. मूल होत नाही म्हटल्यावर आईबापांनी व्रत केले. रविवारी व्रत करून मूल जन्मले म्हणून त्याचे नाव रविदास ठेवले. इतर जातीतल्या थोर पुरुषाला बदनाम करून झाले. छळून झाले, तरी तो ऐकत नाही, तेव्हा त्याला आपल्या पंखाखाली घेण्याचे प्रयत्न ब्राह्मण्यवादी करत असतात. जन्मल्यानंतर रविदास आईचे स्तन तोंडात न घेता जोरजोरात रडू लागले; वैद्यकीय उपचार चालले नाहीत. तेव्हा एक बुवा आले. त्यांनी कानात मंत्र म्हटल्यावर रविदासांनी शांत होऊन दूध प्यायला सुरुवात केली. त्या बुवांनी स्पष्टीकरण दिले. “रविदास गेल्या जन्मी ब्राह्मण होते. त्यांनी साधूंना जाणूनबुजून दूषित अन्न खायला घातले, साधूंच्या छातीत दुखू लागले. तेव्हा त्या ब्राह्मण तरुणाला शाप देऊन चांभार जातीत जन्माला घातले आहे.”

“दुसर्‍या कथेत ते ऋषी होते, अशीच चूक केल्यामुळे त्यांना चांभाराचा जन्म मिळाला आहे.” चांभार समाजात थोर पुरुष जन्माला आला हे ब्राह्मण्यवाद्यांना पचणे अवघड झाले, त्यातून अशा कथा तयार होतात. ‘मन चंगा तो कठौती में गंगा’ या त्यांच्या वचनाचा विपर्यास करून, गंगेने त्यांना सोन्याचे कंकण बहाल केले, असा चमत्कार सांगितला जातो. भर दरबारात त्यांच्या भक्तीमुळे रामाची मूर्ती स्वतःहून त्यांच्याकडे आली असाही चमत्कार सांगितला जातो. आपल्या गुरुला मोठेपणा मिळावा यासाठी भक्तजन असे चमत्कार रचत असतात. काही वेळा त्यातून लोकशिक्षण केले जाते. भर दरबारात वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मणांनी संस्कृतमधून मंत्र म्हटले, वेद म्हटले, प्रार्थना म्हटल्या, पण रामाची मूर्ती जागची हलली नाही. मनापासून प्रार्थना करणार्‍या रविदास यांच्या प्रार्थनेमुळे मात्र मूर्ती त्यांच्याकडे आली. यावरून मंत्रात शक्ती नसते. तुमच्या भावनेत शक्ती आहे, हे दाखवून दिले आहे.

शेवटचा चमत्कार म्हणजे ते अदृश्य बनले

झाशी राणीच्या निमंत्रणानुसार ते चितोडला गेले असता त्यांचे अत्यंत भक्तीभावपूर्वक स्वागत झाले. परंतु भोजनावेळी त्यांच्या पंगतीत बसायला ब्राह्मणांनी नकार दिला. जानव्याचा अभिमान असलेल्या ब्राह्मणांना रविदासांनी आपल्या त्वचेतून सुवर्णासारखे झळकणारे दिव्य यज्ञोपवीत दाखविले. त्याच्या तेजाने ब्राह्मणांचे डोळे दिपले, बंद राहिले आणि यानंतर रविदास कोणासच दिसले नाहीत. ते आजही चितोडमध्ये स्मारकरूपाने अस्तित्वात आहेत. सर्वत्रच चातुर्वर्ण्याला विरोध करणार्‍या संतांचा अंत संशयास्पद झालेला आहे; त्याला रविदासही अपवाद नाहीत. नामदेव आणि ज्ञानेश्वर भावंडांनी समाधी घेतली; तर संत तुकाराम विमानात बसून वैकुंठाला गेले आणि ते फक्त ब्राह्मणांनी पाहिले. रविदासांना दीर्घायुष्य लाभले होते. काही जण त्यांचे वय मृत्युसमयी १२० वर्षे होते असे म्हणतात.

लिखाण संपदा

रविदासांचे उपलब्ध साहित्य १८ साखी आणि १०१ पदे एवढेच आहे, असे प्रा. डॉ चंद्रशेखर चांदेकर यांनी नोंदवले आहे. डॉक्टर काशिनाथ उपाध्याय यांनी विविध पुस्तकांचा धांडोळा घेऊन रूपांतरीत पदासह एकूण पदे १७७ असून साख्या १९४ आहेत असे म्हटले आहे. संपूर्ण देशात नाव कमावलेल्या या थोर महात्म्याचे लिखाण इतके कमी असेल, हे संभवत नाही. संतांचे लिखाण विकृत करणे किंवा नष्ट करणे, हे प्रयत्न भारतात झालेले आहेत. तीच बाब रविदासांच्या बाबतीत घडली असावी.

भक्तीची पद्धत नामजप

देवाच्या भक्तीसाठी कडक व्रत करून पूजाअर्चा करणे, सोवळे-ओवळे पाळणे, संस्कृतमधून श्लोक-मंत्र म्हणणे, यज्ञ करणे हे मार्ग वैदिकांनी सांगितले आहेत. वेदमंत्रांचे उच्चारण शास्त्रशुद्ध पाहिजे, नाहीतर त्याचा विपरीत परिणाम होतो, असाही समज आहे. हे सर्व फक्त ब्राह्मणांना शक्य आहे. इतरांना याचा अधिकारच नाही. अशा नियमामुळे काल्पनिक स्वर्गापासून आणि मोक्षापासून सर्वसामान्यांना वंचित ठेवण्यात आले. त्यांना भक्तीचा सोपा मार्ग संतांनी उपलब्ध करून दिला आणि तो म्हणजे नामजप.

तुम्ही काम करत असताना देवाचे फक्त नाव घ्या की तुमची भक्ती पूर्ण झाली. देवाचे नाव घेण्यासाठी शास्त्रशुद्ध अभ्यासाची काहीही गरज नाही. मनात भावना हवी. ‘मन चंगा तो कठौती मे गंगा.’ रविदास म्हणतात,

रविदास सत्त एक नाम है, आदी अंत सचु नाम।

हनन करेइ सम पाप ताप, संत सुखन करि खान॥”

“नाम हेच एक मात्र सत्य आहे व ते आदिपासून अंतापर्यंत नित्य राहणारे आहे. नाम सर्व पापांचा व दुःखांचा नाश करणारे असून सर्व सुखाचे भांडार आहे.”

देव देवळात नाही

संत रविदास यांना मंदिरात जाण्याचा अधिकार नव्हता. त्यांनी मंदिरात जाण्याचा प्रयत्न केल्याची एक चमत्कार कथा आहे, पण तिला त्यांच्या लिखाणात पुरावा सापडत नाही. ते म्हणतात,

मस्जिद सो कछु घिन नहीं, मंदिर सो नहीं पिआर ।

दोऊ महं अल्लाह राम नही, कह रविदास चमार ॥”

“मला मशिदीबद्दल कोणतीही घृणा नाही, तसेच मंदिराबद्दल प्रेम नाही. कारण की या दोन्हीपैकी कुठेही अल्ला किंवा राम नाही.” आधुनिक संत गाडगेबाबा म्हणत, “देव देवळात नसतो, देवळात भटजीचे पोट असते, देव माणसात असतो.” हेच विचार संत रविदास यांनी सहाशे वर्षांपूर्वी सांगितले आहेत.

जातीवरून श्रेष्ठत्व नाकारले

रविदासांचा काळ म्हणजे वैदिकांनी बर्‍यापैकी पाय पसरलेला काळ होता. त्यांचे चातुर्वर्ण्याचे, जातीवरून श्रेष्ठ समजण्याचे विचार समाजात पसरले होते. अशा काळात रविदासांनी स्पष्टपणे जातीवरून किंवा जन्मावरून श्रेष्ठ समजायला नकार दिला आहे. ते म्हणतात,

ब्राह्मण, खतरी, वैस, सूद,रविदास जनम ते नाहिं।

जो चाहइ सुबरन कउ, पावई करमन माहिं ॥”

“कोणी मनुष्य जन्मापासून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अथवा शूद्र होत नसतो. उच्च कर्मापासून उच्च वर्ण प्राप्त होत असतो.”

रविदास ब्राह्मण मति पूजिए, जउ होवै गुनहीन ।

पूजिहिं चरन चंडाल के, जउ होवै गुन परवीन ॥”

“कोणत्याही गुणहीन ब्राह्मणाची पूजा करू नका. जर एखादा चांडाळ गुणवान असेल, तर त्याची पूजा करा.” कोणतीही गुणवान व्यक्ती, कोणत्याही जाती अथवा वर्णाची असो, पूजनीय आहे. हाच विचार वारकरी, संतांनी मांडला आहे. संत कबीर यांनीही मांडला आहे. संत कबीर म्हणतात,

जाती न पूछो साधु की, पूछ लिजिए ज्ञान।

मोल करो तलवार का, पडा रहन दो म्यान॥”

याच्या उलट रामदास स्वामी आणि तुलसीदास यांची भूमिका आहे. रामदास स्वामी म्हणतात,

ब्राह्मण कितीही झाला भ्रष्ट। तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ ॥”

संत तुलसीदास ‘रामचरितमानस’मध्ये म्हणतात,

पूजही विप्र सकल गुणहिना।

सूद्र न पूजहि ज्ञान प्रतिता॥”

गुणहीन ब्राह्मणाला पूजा, पण गुणवान शूद्राला पुजू नका.

सामाजिक ऐक्य

त्या काळातही मुस्लीम द्वेष पसरवून सामान्य जनतेला वर्णवर्चस्वाखाली आणण्याचे प्रयत्न झाले असावेत. त्यामुळेच रविदासांनी हिंदू-मुस्लीम ऐक्याचा पुकारा केला आहे. ते म्हणतात,

मुसलमान सों दोसती, हिंदूअन सों कर प्रीत।

रविदास ज्योती सभ राम की, सभ है अपने मीत॥”

“मुसलमान आणि हिंदू; दोघांशी आपण मित्रत्वाने, प्रेमाने वागायला पाहिजे. एकाच ज्योतीपासून तयार झाल्यामुळे सर्व जण समानच आहेत.” राम रहीम एक आहेत. ‘मंदिर मस्जिद तेरे धाम’ हा महात्मा गांधींचा विचारही त्या काळामध्ये रविदासांनी मांडला आहे. ते म्हणतात,

रविदास हमारो राम जोई, सोई है रहमान।

काबा कासी जानीयहि दोउ एक समान ॥”

रामरहीम एकच आहेत आणि काबाकाशी, मंदिरमशीद ही एकच आहेत.”

न्यूनगंड नाही

सनातनी ब्राह्मण अहंगंडाने पछाडलेले असतात. ते इतरांना तुच्छ लेखतात. बर्‍याच वेळा त्यांचे मत सामान्य लोक स्वीकारतात आणि सामान्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. ते स्वतःची जात कमी आहे, असे समजतात. पण वैदिकांनी तयार केलेल्या या न्यूनगंडावर रविदासांनी मात केली आहे. ते म्हणतात,

ऐसी मेरी जाती, विख्यात चमार.”

संत तुकारामांनीही आपल्याला शूद्र केल्याबद्दल विठ्ठलाचे आभार मानले आहेत. महात्मा जोतिबा फुलेंनी छत्रपती शिवरायांना ‘कुळवाड्यांचा राजा’ म्हणून गौरविले आहे.

श्रमाला प्रतिष्ठा

वैदिकांनी श्रम करणार्‍याला खालच्या दर्जाचा मानले आणि श्रमाला दुय्यम स्थान दिले. त्याच्या उलट अवैदिकांनी, श्रम करणे श्रेष्ठ मानले आहे. संत रविदास म्हणतात,

रविदास श्रम करके खाइए, जौ जौ पार बसाय।

नेक कमाई जो करई, कवहु न निष्फल जाय॥”

कबीर, रविदासांसह सर्व वारकरी संत श्रम करून जगण्यावर भर देतात. त्यातील प्रत्येक जण आपली उपजीविका कष्ट करूनच करत होता. रविदास चामडे कमवून चप्पल तयार करण्याचा व्यवसाय करत. अनेक राजेरजवाड्यांशी जवळचे संबंध आले तरी त्यांनी व्यवसाय सोडला नाही. दक्षिणा घेऊन मजा मारली नाही.

कर्मकांडांना विरोध

आपण देवाचे फार मोठे भक्त आहोत, हे दाखवण्यासाठी काही लोक ढोंग करतात. कुणी सोवळं नेसून, उघडा बंब होऊन, गळ्यात जानवं घालून, केसांची शेंडी ठेवून, कपाळाला भस्म लावून, गंध लावून फिरत असतो; कुणी मुंडन करतो, भगवे वस्त्र नेसतो, पूजापाठ किंवा तीर्थव्रत करतो, दान पुण्य किंवा अग्निहोत्र करतो, जंगलात किंवा पर्वतामध्ये भटकत फिरतो, जटा आणि दाढी मिशा वाढवतो. अशा बाह्य अवडंबराला साधुसंत काडीची किंमत देत नाहीत. गुरु रविदास म्हणतात,

माथै तिलक हाथ जपमाला,

जग ठगने कुं स्वांग बनाया।

मारग छांडी कुमारग डोके,

सांची प्रीत बिनू राम न पाया॥”

“जे जगाला फसविण्यासाठी कपाळास गंध लावतात, हातामध्ये जपमाळा जपतात, सोंग ढोंग करतात. जे अशा कुमार्गात असतात त्यांनी मनापासून परमेश्वर भक्ती न केल्याने परमेश्वर प्राप्ती होणार नाही.” अशा सोंग-ढोंग करणार्‍यांना त्यांनी व्यभिचारिणीची उपमा दिली आहे. ते म्हणतात,

कहा डिंभ बाहर कीयै, हरि कनक कसौटी हार।

कहा भयै बहु पाखंड कीयै, हरि हिरदै सुपीनं न जान॥

ज्यू दारां बिभचारिनी, मुखपतिव्रता जीव आन॥”

“अंगात कफनी घालणे, गळ्यात माळा घालणे, कपाळास गंध लावणे इ. बाह्य अवडंबर केल्याने परमेश्वर प्राप्ती होऊ शकत नाही. कारण, परमेश्वर आपली भतिरुपी सोन्याची खरी कसोटी लावून परीक्षा करीत असतो. दिखाऊ सोंग-ढोंग केल्याने ईश्वर प्राप्ती होईल हे स्वप्नातही आणू नका. कारण, ज्याप्रमाणे व्यभिचारिणी पत्नीने पतिव्रतेचा किती आव आणला तरी, ती खरी पतिव्रता होऊ शकत नाही. त्याप्रमाणे बाह्य सोंग ढोंगाने परमेश्वर प्राप्ती होऊ शकत नाही.”

मनावर संयम

मन ताब्यात ठेवावे, त्यावर सकारात्मक विचारांचे रोपण करावे हा प्रयत्न संत नेहमी करतात. मनाचा संयम हे धर्माचे महत्त्वाचे अंग आहे. तीच समाधी आहे. गुरु रविदास म्हणतात,

मन ही पूजा, मन ही धूप।

मनही सेऊ सहज स्वरूप॥”

“मन हेच श्रेष्ठ आहे. मनाचीच पूजा केली पाहिजे. मनाला नियंत्रित केले तर सगळ्या विकारांवर आपण नियंत्रण करू शकतो आणि सदाचारी बनू शकतो. याबद्दल ते पुढे म्हणतात,

मन चंगा तो कठौती में गंगा”

बेगमपुरा आणि रामराज्य

रामराज्याची कल्पना तुलसीदासांनी मांडली आहे. ती वर्णाश्रम धर्मावर आधारित आहे. रामराज्यामध्ये सर्व लोक वर्णाश्रम धर्माचे पालन करतात. म्हणजे शूद्र ब्राह्मणांची सेवा करतात, तर स्त्रियांनी पुरुषांची सेवा करायची आहे. उत्पादन आणि सेवा शूद्रांनी करायची आणि ब्राह्मणांनी पूजापाठ करायचे. संत तुलसीदास म्हणतात,

वर्णाश्रम निज निज धरम, निरत वेद पथलोग।

चलहि सदा पावहि सुखद, नहि भय शोक न रोग॥”

रामाचा जन्म ब्राह्मणांच्या रक्षणासाठी झाला आहे असेही तुलसीदास म्हणतात,

विप्र, धेनू, सुर, संत हित, लीन्ह मनुज अवतार।

निज इच्छा निर्मित तनु,माया गुन गोपार॥”

त्याच्या उलट गुरू रविदासांचा विचार व्यापक आहे. दुःख नाही, शोक नाही, जातिभेद नाही, शंका नाही, शोषण नाही, चिंता नाही अशा प्रकारचा देश त्यांना हवा आहे. ते म्हणतात,

अब हम खूब वतन घर पाया,

उंचा खेर सदा मन भाया। बेगमपूर सहर को नाऊँ,

दुःख अंदाज नहीं तेही ठाऊ॥ ऐसा चाहो राज मैं,

जहाँ मिलै सबन को अन्न। छोट बडो सभ सम बसै,

रविदास रहै प्रसन्न॥”

सर्व जण सुखी व्हावेत हा त्यांचा विचार ६०० वर्षांपूर्वीच संत रविदास यांनी मांडला आहे. रविदासांचे विचार थोडक्यात सांगायचे तर, त्यांनी मांसाहाराचा आणि मद्यपानाचा निषेध केला आहे. त्यांनी हिंसेचा निषेध केला आहे. त्यांना सनातनी हिंदू धर्म मान्य नव्हता. त्यांनी वेदांचे खंडन केले आणि पुराणांचा विरोध केला. ते रामभक्त किंवा कृष्ण भक्त नव्हते. त्यांना अवतारवाद मान्य नव्हता. त्यांना कर्मकांड, व्रते, देवदेवतांचे अवडंबर मान्य नव्हते. तीर्थयात्रा, पवित्र तीर्थांचे ठिकाणी स्नान, उपवास, यामुळे पुण्य प्राप्त होते, यावर त्यांचा विश्वास नव्हता. ते निराकार निर्गुणाचे उपासक होते. पुराणातील भाकडकथा त्यांना मान्य नव्हत्या. त्यांनी चमत्कारांचा विरोध केला. त्यांचा जोर नामभक्तीवर होता. ते सामाजिक एकात्मतेचे पुरस्कर्ते होते. जात आणि जन्मावरील श्रेष्ठत्व त्यांना मान्य नव्हते. त्यांनी खोटे बोलणार्‍यांचा धिकार केला. उपजीविकेकरिता प्रामाणिक साधनांचा वापर करावा असे ते म्हणतात. त्यांनी सद्गुण नीती आणि सदाचार टिकवण्यासाठी काम, क्रोध, माया, मद, मत्सर, अहंकार यांचा त्याग करावा असे म्हटले आहे. ते समतेचे आणि मानवतेचे पुजारी होते.

या थोर समाज क्रांतिकारकाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे कोटी कोटी प्रणाम.

लेखक संपर्क : ९७६४१ ४७४८३

-अनिल चव्हाण


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]