महात्मा जोतिबा फुले लिखित, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा

अनिल चव्हाण -

छत्रपती शिवाजी महाराजांवर असंख्य लोकांनी लिखाण केले आहे. लेख लिहिले, चरित्रे लिहिली, कथा लिहिल्या, कविता लिहिल्या, कादंबर्‍या लिहिल्या, पोवाडे लिहिले! पण आपणाला ठाऊक आहे का? शिवाजी महाराजांवर सर्वांत पहिला पोवाडा कोणी लिहिला?

   त्याचे उत्तर आहे महात्मा जोतिबा फुले.

समाधीचा शोध घेतला

महात्मा फुले यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अत्यंत आदराची भावना होती. त्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या समाधीची लोकांना माहिती नव्हती. पण महात्मा जोतिबा फुले यांनी त्यांच्या समाधीची माहिती घेतली, समाधीचा शोध घेतला आणि समाधीचा जीर्णोद्धार केला. रायगडावर मोठ-मोठे डोंगरी कडे, अवघड चोरवाटा शोधत महात्मा जोतिबा फुले गडावर पोहोचले. शिवाजी महाराजांची समाधी मोडकळीस आलेली होती. त्यावर गवत आणि झुडपे वाढली होती. समाधीची फारच दुर्दशा झाली होती. ही बाब महात्मा फुले यांनी ‘दिनबंधू’ पत्रातून प्रसिद्ध केली. पुण्यातील हिराबागेत सभा घेऊन ‘शिवसमाधी जीर्णोद्धार कमिटी’ नेमली. आधुनिक काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठेपण ओळखणारे महात्मा फुले हे महान पुरुष होते आणि त्याच भावनेतून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिला.

पोवाडा लिहिण्याचा हेतू

हा पोवाडा लिहिण्याचा हेतू काय, ते त्यांनी सुरुवातीला सांगितले आहे. ते म्हणतात, “कुणबी, माळी, महार, मांग वगैरे पाताळी घातलेल्या, क्षेत्र्यांच्या उपयोगी हा पोवाडा पडावा असा माझा हेतू आहे!”

ज्यांच्यासाठी पोवाडा लिहीत आहे त्याला समजावा, म्हणून आपण काय केले ते सांगताना म. फुले म्हणतात, “लांबच लांब मोठाले संस्कृत शब्द मुळीच घातले नाहीत व जेथे माझा उपाय चालेना, तेथे मात्र लहान सहान शब्द निर्वाहापुरते घेतले आहेत. माळी, कुणब्यास समजण्याजोगी सोपी भाषा होण्याविषयी फार श्रम करून, त्यास आवडण्याजोग्या चालीने रचना केली आहे!

आपला शत्रू कोण आहे, तेही त्यांनी स्पष्टपणे प्रस्तावनेमध्ये लिहिले आहे. ‘हे दयाळू इंग्रज लोक, आम्हा गांजलेल्या अज्ञानी लोकांस खरे ज्ञान शिकवू लागल्यामुळे, ब्राह्मणांनी बनविलेल्या मतलबी कुटापासून स्वतंत्र होण्याची, नेहमी आमच्या मनात डोहाळे होऊ लागले आहेत, ब्राह्मणांच्या कुटाविषयी थोडासा येथे मासला लिहितो. तो येणे प्रमाणे…’

ब्राह्मण स्वतःस उच्च मानतात आणि इतरांचा  हाडवैरी असल्याप्रमाणे द्वेष करतात, त्यांनी इतरांना इतके नीच मानण्याचे कारण काय असावे? हा प्रश्न मनात नेहमी घोळत असतो. याविषयी इतर भाषेतील ग्रंथावरून व ब्राह्मणांच्या एकंदरीत शूद्राशी आचरणावरून असे सिद्ध होते की, ब्राह्मण लोकांचा या देशाशी काहीच संबंध नसता, ब्राह्मणांनी केवळ लोभाने या देशात एकाएकी लागोपाठ हल्ले करून, सापडलेल्यास  दास केले. त्यांनी दास्यत्वात राहावे म्हणून कायदे करून त्यांची अनेक पुस्तके केली. अनेक तर्‍हेचे भेद करून ठेवले. त्यास भेद म्हणण्याचे सोडून वेद म्हणत आहेत.

वेद म्हणजे भेद

ज्या ‘वेदांना’ वैदिक अपौरुषेय मानतात, त्या वेदांना महात्मा फुलेंनी ‘भेद’ म्हणून त्यांचे स्वरूप उघड केले आहे.

पुढे ब्रह्माच्या कथेची त्यांनी खिल्ली उडवली आहे.  “ब्रह्माच्या तोंडातून ब्राह्मण पडले, शूद्र पायापासून जन्म पावले, असे कोठे कोठे ग्रंथात कोंबून लिहिले आहे. यावरून ब्रह्मचे मुख इतर दुसरे तत्संबंधी व्यापार करीत होते, असे त्याच्या शिष्यमंडळींना कबूल करावे लागेल.”

शिवरायांचा पोवाडा लिहिताना सुद्धा त्यांनी असे चिकित्सकपणे आणि अभ्यासू वृत्तीने लिखाण केले आहे. आपण ही माहिती “ग्रँट डफ, मरी वगैरे इंग्रज लोकांच्या बहुतेक लेखी आधारावरून” घेतली आहे, असे ते म्हणतात.

‘कुळवाडी’ भूषण

ब्राह्मण्यवादी वर्णसमर्थक लेखक, शिवरायांचे वर्णन ‘गो ब्राह्मण प्रतिपालक’ असे करतात. महात्मा फुलेंनी त्यांना ‘कुळवाडी’ भूषण म्हटले आहे. पोवाड्याच्या सुरुवातीच्या ओळी आहेत, कुळवाडी भूषण पोवाडा गातो भोसल्याचा, छत्रपती शिवाजीचा!”

हे ध्रुवपद असल्यामुळे पोवाड्यात पुन्हा पुन्हा येते, आणि सर्वसामान्यांच्या मनावर ठसवले जाते.

पुढे ते म्हणतात, “लंगोट्यास देई जानवी पोशिंदा कुणब्यांचा! काळ तो असे यवनांचा!”

म्हणजे शिवराय ब्राह्मणांचे, गायींचे नव्हे, तर कुणब्यांचे पोशिंदे आहेत आणि यवनांचे म्हणजे मोगलांचे काळ आहेत.

शिवरायांचे बालपण चितारताना त्यांनी आपली साहित्यिक प्रतिभा वापरली आहे. ते म्हणतात, हे जिजाबाईस रत्न सापडले आहे. त्यांची नखे आणि बोटं कमळाला लाजवणारी आहेत. त्यांची छाती सिंहासारखी, मान राजहंसासारखी, दात चमकणारे आणि  शुभ्र आहेत. ओठ नाजूक आणि रक्तवर्णी आहेत. नाक सरळ आणि डोळे विशाल आहेत. कपाळ सुंदर आणि विशाल असून जावळ लोंबते आहे, केस कुरळे आहेत… वगैरे.

शिवरायांचे आजोबा आणि वडील यांनी फौजा पाळल्या, ते विचाराने पक्के होते, त्यांनी देऊळ आणि तळी बांधली; पण “उपाय नसल्यामुळे चाकर झाला यवनाचा.” असे म्हटले आहे.

गुरु कोण?

वडील बंधू संभाजीने त्यांचे लळे पुरवले आणि  तालीम, फरीगदगा, कुस्ती, घोडेस्वारी, भाला, बोथाटी शिकविले.

इतिहास लेखकांनी शिवरायांवर दोन ब्राह्मण गुरू थापले आहेत. पण म. फुलेंनी त्या काळातील अपुरी साधने असतानाही सांगितले, मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्याचा? पोवाडा गातो शिवाजीचा!”

दादोजी कोंडदेवांसंबंधी ते म्हणतात “दुसरा भ्याला, मेला, बेत नव्हता पूर्वीचा| दादोजी कोंडदेवाचा॥”

धर्मविषयक लोक समजुतीमुळे शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर भवानी देवीचे मंदिर बांधले असावे आणि रामदास स्वामींचा महापुरुष किंवा आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार केला असावा, असे ग्रँट डफने म्हटले आहे. महात्मा फुले म्हणतात, “लोकप्रतिकरीता करी गुरु रामदासास, राजगडी स्थापि देविस|” शिवछत्रपतींचे कर्तृत्व हे त्यांचे स्वतःचे होते, त्याचे श्रेय रामदास स्वामींना अगर दादोजी कोंडदेवांना देण्यास जोतिराव तयार नव्हते.

आधीच्या पिढ्या राजकारणातच असल्यामुळे शिवरायांना ते ज्ञान घरातूनच मिळाले, मोठ्या भावानेही दिले, वेगळ्या ब्राह्मण गुरुची गरज नाही, हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

राजे राजवाड्यांच्या काळात एकापेक्षा जास्त विवाह करण्याची प्रथा राजे लोकांच्यात होती. शहाजीराजांनी सुद्धा दोन विवाह केले होते. पण पती-पत्नीने एक पती व एक पत्नी व्रत स्वीकारले पाहिजे, असा म. फुलेंचा आग्रह होता. या दृष्टिकोनाप्रमाणे त्यांनी जिजाबाईंना सवत आणल्याबद्दल शहाजीराजांना दोष दिला आणि जिजाबाईंच्या मनातील दुःख पोवाड्यात मांडले आहे. ते म्हणतात, नित्य पतीचा आठव डोंगर दुःखाचे झाले| घर सवतीने घेतले|”

देशाचे दुश्मन

यासंबंधी शिवरायांच्या मनात वेगळे विचार येऊ नयेत म्हणून त्यांनी, मनी पतीभक्ती पुता बागेमध्ये नेले, वृक्षाछायी बसिवले॥ या क्षेत्रीचे धनी कोण कोण बुडविले| सांगते मुळी कसे झाले|” असे म्हणून ब्राह्मणांनी इथल्या स्थानिक लोकांना जिंकून गुलाम बनवल्याचे म्हटले आहे. पुढे माता सांगते, शूद्र म्हणती तुम्हा हृदयी बाण टोचले| आज बोधाया फावले|”

शूद्र म्हणून केलेला अपमान महात्मा फुलेना जागोजागी टोचतो आहे. इथल्या क्षत्रियांना मारून देशापार घालवून ब्राह्मणांनी देशाचे नुकसान केले हे सांगताना ते म्हणतात, बहू केले देशा पारश्र बाकी राही मांग महार| नि:क्षेत्री झाल्यावर, म्लेंच्छ केले डोके वर|”

 म्हणजे  परक्यांनी, म्लेंच्छांनी, यवनाने देशावर राज्य केले, त्याचे कारण ब्राह्मणांनी नि:क्षत्रिय देश करून महारमांगांना अधोगतीस आणून ठेवले हे आहे.

            ही माहिती जिजाऊंच्या तोंडी घातली आहे. त्या यवनांनी केलेले अत्याचार सांगतात. परिणामी, शिवराय लढण्याचा बेत करतात, मावळे जमा करतात, किल्ले ताब्यात घेतात. त्यासाठी, विविध मार्ग वापरतात.

पुढे शहाजी महाराजांची कैद, अफजल खान, शाहिस्तेखान, सिद्दी जोहार, औरंगजेब इत्यादी शत्रूंशी केलेला संघर्ष वर्णिला आहे.

औरंगजेबाबद्दल ते लिहितात,

“सच्चा हरामी शैतान आया|

औरंगजेब नाम लिया॥

छोटे भाई को भूल दिया|

बडे भाई की जान लिया॥”

औरंगजेबाचा क्रूर व्यवहार सांगत असतानाच त्याची जबाबदारी आजच्या मुस्लिमांवर टाकण्याचा धर्मांधपणा महात्मा फुले करत नाहीत. औरंगजेबाला हरामी म्हटले, पण सामान्य मुस्लीम बांधवांचा द्वेष केला नाही.

महात्मा जोतिबा फुले आणि शिवरायांचे नाव घेणारे आजचे लबाड शिवप्रेमी यामधील हा महत्त्वाचा फरक आहे. 

राज्याभिषेकाच्या वेळी काशीच्या गागाभट्टाने स्वराज्यातील पैसा दारूगोळ्याचा खर्च न करता धर्माच्या नावावर कसा लुटला, याचे वर्णन महात्मा फुले करतात,

“काशीकर गंगाभट घाली डौल धर्माचा| केला खेळ गारुड्याचा|”

महात्मा फुलेंनी मनुस्मृती आणि ब्राह्मण्यवादावर कठोर टीका केली, पण ब्राह्मणांचा द्वेष केला नाही. विधवा ब्राह्मण महिलांच्या केशवपनाच्या विरोधात नाभिकांचा संप घडवून आणला. वाट चुकलेल्या विधवांसाठी सुतिकागृह काढले, त्यामध्ये सर्व ब्राह्मण भगिनीच होत्या. आपल्या कार्यामध्ये अनेक ब्राह्मण सहकार्‍यांना सहभागी करून घेतले.

कुणाचाही द्वेष न करणारे असे महात्मा फुलेंचे सत्यशोधकी विचार होते.

रयतेचा राजा

शिवरायांच्या निधनानंतर मावळे कसा शोक करत होते, ते सांगताना शिवरायांचे गुण महात्मा फुलेंनी पुन्हा एकदा गायले आहेत.

ते म्हणतात,

“युद्ध नाही विसरला| लावी जीव रयतेला|

टळेना रयत सुखाला| बनवी नव्या कायद्याला॥

दाद घेई लहानसानाची| हयगय नव्हती कोणाची॥

आकृती वामन मूर्तीची| बळापेक्षा चपळाइची॥

सुरेख ठेवण चेहर्‍याची|

कोंदिली मुद्रा गुणरत्नाची॥”

रयतेला जीव लावणारा आणि लहानाची सुद्धा दखल घेणारा असा हा राजा होता.

शिवाजी महाराज हे ‘गो-ब्राह्मण प्रतिपालक’ नव्हे, तर ‘कुळवाडी भूषण’ होते, ‘रयतेचे राजे’ होते. रयतेला जीव लावत होते, हे महात्मा फुलेंनी १८६९ साली लिहून ठेवले. हेच विचार पुढे केळुस्कर गुरुजींनी शिवरायांच्या चरित्रात लिहिले. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू अप्पासाहेब पवार यांच्यापर्यंत अनेक पुरोगामी तज्ज्ञ इतिहासकारांनी सत्य शिवराय चितारले.

पण त्यातील एक अक्षर न वाचता, एक अक्षर न समजून घेता, बहुजन समाजातील शिकलेल्या इतिहासाच्या शिक्षकांनी, प्राध्यापकांनी, ब्राह्मणी विचारसरणीने चितारलेले, हिंदू-मुस्लीम द्वेषावर आधारित शिवरायांचे चरित्र विद्यार्थ्यांना शिकवले. हा मोठा दैवदुर्विलास आहे.

अलीकडच्या काळात शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यासारख्या लेखकांनी शिवाजी महाराजांचे सत्य चरित्र पुढे आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. महात्मा जोतिबा फुले यांनी लिहिलेला छत्रपती शिवरायांचा पोवाडा आजसुद्धा अभ्यासणे आवश्यक आहे.

– अनिल चव्हाण

लेखक संपर्क ः ९७६४१ ४७४८३


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ]