कोरोनानंतरचे शिक्षण क्षेत्र

हेरंब कुलकर्णी - 9270947971

कोरोनाचा वेगवेगळ्या क्षेत्रावर नक्कीच दीर्घकालीन परिणाम होणार आहे. मी ज्या शिक्षण क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात काय घडेल, याचा विचार करताना असे वाटते की, शैक्षणिक वर्ष बहुधा उशिरा सुरू होईल व शाळा हे हजारो विद्यार्थी एकत्र येण्याचे ठिकाण असल्यामध्ये सातत्याने त्यावर नियंत्रणे लादली जातील. थोडी जरी चाहूल लागली की सारख्या शाळा बंद केल्या जातील. काश्मीरमधील शांतता जशी तात्कालिक असते कुठे काही घडले की, लगेच संचारबंदी असेच दुर्दैवाने किमान पुढील वर्षभर तरी आपल्याकडे घडत राहील. त्यामुळे शाळा या अतिशय अस्थिर केंद्र होतील, असे वाटते आहे. त्यात काळजी करणारा पालक वर्ग शासन करेल त्यापेक्षा जास्त चिंता करेल !!!

कोरोनाचा वेगवेगळ्या क्षेत्रावर नक्कीच दीर्घकालीन परिणाम होणार आहे. मी ज्या शिक्षण क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्रात काय घडेल, याचा विचार करताना असे वाटते की, शैक्षणिक वर्ष बहुधा उशिरा सुरू होईल. शाळा हे हजारो विद्यार्थी एकत्र येण्याचे ठिकाण असल्याने सातत्याने त्यावर नियंत्रणे लादली जातील. थोडी जरी चाहूल लागली की, सारख्या शाळा बंद केल्या जातील. काश्मीरमधील शांतता जशी तात्कालिक असते, कुठे काही घडले की लगेच संचारबंदी; असेच दुर्दैवाने किमान पुढील वर्षभर तरी आपल्याकडे घडत राहील. त्यामुळे शाळा या अतिशय अस्थिर केंद्र होतील, असे वाटते आहे. त्यात काळजी करणारा पालक वर्ग शासन करेल, त्यापेक्षा जास्त चिंता करेल!!! अनेक जण मुलांना शाळेत पाठवणार नाहीत. त्यामुळे शिक्षणातून आपल्याला जे काही घडवायचे आहे, त्याला खूपच मर्यादा येणार आहे, असे वाटते. यानिमित्ताने काही गोष्टी पुढेही जातील उदाहरणार्थ होम स्कूलिंग ही कल्पना काही पालकांनी प्रायोगिक तत्त्वावर राबवली होती. पण अशा दीर्घकाळ शाळा बंद राहू शकतात, याची आपल्यापैकी कोणीही कल्पना केली नव्हती. त्यामुळे शाळेच्या इमारतीबाहेर शिक्षणाच्या संधी हा विचार आता विकसित करायला हवा. किंबहुना तो अपरिहार्यतेतून होणारच आहे. होम स्कूलिंगमध्ये विद्यार्थी घरीच शिकतात.

अनेक प्रसिद्ध माणसांनी आपल्या मुलांना घरी शिकवले आहे. होम स्कूलिंग हे पूर्वी कठीण होते. परंतु इंटरनेट आल्यामुळे आज परदेशातील अनेक वेबसाईट रोजच्या रोज मुलांना गृहपाठ देणे ऑनलाईन शिकवणे, असा अभ्यासक्रम वर्षभराचा तयार करून तयारी करून घेतात. पुन्हा होम स्कूलिंगला शासनांने प्रतिष्ठा द्यायला हवी. त्यातून विद्यार्थी शिकू शकतील. जरी कोरोनाचे संकट दूर झाले तरी सुद्धा विद्यार्थ्यांना वर्षभरात 145 दिवस सुट्टी असते. या पाच महिन्यांचा अभ्यासक्रम तयार करून पुस्तकाव्यतिरिक्तचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना कसे देता येईल, विद्यार्थ्यांच्या क्षमता कशा विकसित करता येतील, असा विचार या होम स्कूलिंगच्या निमित्ताने करायला हवा. ती खरे तर कोरोनामुळे घडलेली एक सकारात्मक संधी आहे, असे मला वाटते. मुक्त विद्यापीठ, मुक्त शाळा हे सारे प्रयोग यानिमित्ताने मुख्य प्रवाहाचा भाग बनण्याची शक्यता आहे. या कोरोनाच्या काळात शिक्षक व विद्यार्थी हा मिळणारा वेळ स्वतःच्या विकासासाठी वापरत आहेत, असे खूप अपवादाने दिसते आहे. याचे कारण असे की तुम्ही एकांताचा वापर कसा करता, यावर तुमच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण अवलंबून असते. परंतु या एकांताचा विनियोग करण्याचे छंद किंवा सवय आपल्याकडे फारशी विकसित झाली नाहीत. वाचन करणे ही गोष्ट आपल्या समाजमनाचा भाग बनू शकली नाही. त्यामुळे शिक्षक समुदायातही खूप वाचन असणारे शिक्षक संख्येने कमी आढळतात. पालकांची अवस्था तशीच आहे.

अनेक घरांमध्ये लाखो रुपयाचे फर्निचर आहे. परंतु पुस्तके नाहीत. अशा दीर्घ सुट्टीच्या काळात हे लक्षात येते की, घरातच पुस्तके नाहीत. त्यामुळे मुले उपलब्ध असणार्‍या कॉम्प्युटर, मोबाईल, टीव्हीकडे आकर्षित झाली आहेत. यात त्यांना दोष देता येणार नाही. याचे कारण घरात पालकांमध्ये ती वाचन संस्कृती नाही. पुन्हा पूर्वीचे पारंपरिक घरगुती खेळही नव्या पिढीच्या मुलांना माहीत नाहीत . त्यामुळे व्यक्तिमत्त्व घडवणारी संधी देणारी इतकी मोठी सुट्टी असूनही त्या सुट्टीचा शिक्षक व विद्यार्थी-विकासासाठी फार वापर होतो आहे, असे वाटत नाही. त्यामुळे अनेक सामाजिक संघटनांना आता ऑनलाईन छंदवर्ग घ्यावे लागतील, असे दिसते आहे. कोरोनाचा आणखी सर्वांत मोठा फटका हा वंचितांच्या शिक्षणाला बसणार आहे. याचे कारण कोरोनानंतर जेव्हा समाज जीवन पूर्ववत होईल, तेव्हा अनेकांच्या नोकर्या गेल्या असतील. स्थलांतरित मजूर हे पुन्हा आपल्या राज्यात गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची परवड होईल. गरीब कुटुंबांचा जीवनसंघर्ष पुढील काळात अतिशय तीव्र होणार आहे. महागाई वाढणार आहे. अशा काळात मुलांना शिकवण्यापेक्षा त्यांना थेट कामाला लावण्याकडे काही पालकांचा कल होऊन समाजात बालमजुरी वाढेल, मुलींची जबाबदारी नको म्हणून बालविवाह वाढतील व शाळांमधून मुलींची गळती मोठ्या प्रमाणावर होईल. अगोदरच महाग असलेले उच्च शिक्षण परवडत नव्हते.

गरीब कुटुंबातील मुले उच्च शिक्षणाकडे न घालण्याकडे कल असेल. त्यामुळे दारिद्र्यामुळे शिक्षणाची गती मंदावेल का, अशी साधार भीती यानंतरच्या काळात वाटते. त्यातून शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या खूप वाढेल. अस्थिर भेदरलेला समाज हा भीतीपोटी धार्मिकतेकडे ओढला जातो. कोरोनाने घडवलेले अनेक मृत्यू आणि अनेक आजार यातून शहरी व ग्रामीण समाज हा पुन्हा कर्मकांडांकडे वळेल. शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवायला शिक्षकांना जास्त लक्ष द्यावे लागेल. शिक्षणात या प्रश्नांचा आपण सातत्याने आग्रह धरतो. ते सगळेच मुद्दे केवळ जगण्यास महत्त्वाचे आल्याने पाठीमागे ढकलले जातील. मी असंघटित वर्गासाठी काम करतो. त्यांची ही परवड कोरोनानंतरच्या काळात अधिक तीव्र होणार आहे. आजच छोटी दुकाने, हॉटेल या ठिकाणी काम करणार्‍या कामगारांना सुट्टीत वेतन मिळत नाही. ऊस तोडणी कामगार, वीटभट्टी मजूर व इतर अनेक असंघटित समाजघटक आज आपल्या घरी गेले असले, तरी त्यांनी समाजाचे जे क्रूर अनुभव घेतलेत, त्यामुळे पुन्हा कामाकडे जाण्याची त्यांची मानसिकता उरली नाही. त्यामुळे दिवाळीनंतर कदाचित पुढच्या वर्षीच उपाशी राहून नंतर कामाला जाऊ, अशी मानसिकता या मजुरांची झाली आहे. त्यामुळे ते कामगार कामालाच जाणार नाहीत. त्यामुळे अर्थव्यवस्था मागे पडेल. पण त्याहीपेक्षा यांच्या कुटुंबातील अडचणी अधिक वाढतील, अशी स्थिती आहे. स्थलांतरित मजूर हे पुन्हा गाव सोडून दुसरीकडे कामाला जायच्या मानसिकतेत नाहीत. ते एका शॉक मध्ये आहेत, असे या वर्गाचा विचार करताना जाणवते. आज कितीही नाही म्हटले तरी उद्योजकता समाजामध्ये वाढली होती. गरिबीचा अभ्यास करताना माझ्या असे लक्षात आले की, गरीब माणसे ही सरकारवर अवलंबून न राहता आपले आपले रस्ते शोधत आहेत. त्यातून स्थलांतर वाढले. भारतात दरवर्षी एका राज्यातून दुसर्या राज्यात नऊ कोटी कामगार जातात व राज्याच्या अंतर्गत एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात पाच कोटींपर्यंत कामगार जातात. असे 14 कोटी कामगार देशात स्थलांतर करतात. पण हे सर्व कामगार आज पूर्णतः निराश झाले आहेत. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर आणि त्यांच्या जगण्यावर होणार आहे. ते कामाला गेले नाही, त्यांच्या घरातील महिलांचे आणि मुलांचे हाल अधिक वाढणार आहेत.

आपल्या समाजातील वृद्धांची स्थिती अगोदरच वाईट असताना गरीब कुटुंबातील वृद्ध अधिक दुर्लक्षित होण्याची शक्यता आहे. एक कार्यकर्ता म्हणून वाईट याचे वाटते की दारिद्र्य निर्मूलन हा विषय 70 वर्षे आपण बोलतो आहोत. आता कुठे उद्योगांच्या वेगवेगळ्या संधी व जागरुकतेमुळे दारिद्र्य निर्मूलनाला गती येण्याची शक्यता निर्माण होताना कोरोनाने आपले सारे प्रयत्न पुन्हा किमान वीस वर्षे पाठीमागे ढकलले आहे. एका जागतिक अहवालात भारतात दहा कोटी लोक पुन्हा गरिबीत ढकलले जातील, असे म्हटले आहे. ही आकडेवारी विषण्ण करणारी आहे. यासाठी रोजगारनिर्मिती हे महत्त्वाचे उत्तर असते. पण अनेक देशांच्या अर्थकारण एकमेकांत गुंतल्यामुळे जागतिक स्तरावरचा आता रोजगाराच्या संधी मर्यादित होणार आहेत. त्यातून बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि गरिबांच्या जगण्याची परवड अधिकच तीव्र होईल, हे लिहिण्यापलिकडे आपण या गरिबांसाठी फार काही करू शकत नाही, ही वेदना, शल्य अधिक सलत राहते.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]