संपादकीय -

मानवी संस्कृतीच्या इतिहासात ज्या-ज्या लोकांनी समाजातील वर्ण, वंश, जात, लिंग, धर्माधारित आर्थिक, सामाजिक शोषणाविरोधात संघर्ष केला; अगदी अहिंसक, विधायक, सनदशीर मार्गाने केला व प्रस्थापित सनातन्यांची व्यवस्था, तत्त्वज्ञान यांना आव्हान दिले, व्यवस्थेच्या आतून अगर बाहेरून विद्रोह केला, त्यांना नेहमीच हिंसक प्रतिक्रियांना सामोरे जावे लागले आहे, आपला जीव गमवावा लागला आहे. अशी उदाहरणे भारतीय संस्कृतीत तर मुबलक आहेत. अगदी चार्वाकापासून ते थेट गांधी, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश, डॉ. नरेंद्र दाभोलकरांपर्यंत! या खुनांना धार्मिक नैतिकतेचे मुलामे चढवून त्या हिंसेचा प्रतिकार करणार्यांनाही देशद्रोही, धर्मद्रोही, हिंसक ठरवले गेले आहे.
आज देशाचे स्वातंत्र्य 75 व्या वर्षात प्रवेश करीत असताना सभोवतीची परिस्थिती तर अशी आहे की देशद्रोही, धर्मद्रोही ठरविण्यासाठी फार मोठा विद्रोह करायचीही गरज नाही. आजच्या सत्ताधार्यांच्या दलित, आदिवासी, कामगार, किसानविरोधी धोरणावरची हलकी-फुलकी टीकाही देशद्रोहाचा गुन्हा दाखल होण्यास कारणीभूत ठरू शकते. मणिपूरमधील पत्रकार किशोरचंद्र वांगखेम यांनी, ‘गोमूत्राने कोरोना बरा होत नाही,’ असे केलेले विधान असो वा बंगळुरूच्या दिशा रवी या तरुणीचे ‘टूलकिट’ प्रकरण; अशा संदर्भातही देशद्रोहाचे खटले नोंदविण्यात आले आहेत. व्यंग्यचित्रकार, नकलाकार, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, मानवाधिकार कार्यकर्ते, आंदोलन करणारे विद्यार्थी; जे-जे सामाजिक, आर्थिक शोषणाच्या विरोधात उभे राहत आहेत, अशा अनेकांना देशद्रोहासह विविध खटल्यांत गुंतविले जात आहे. वृत्तपत्र, चित्रपट माध्यमे; मग ती डिजिटल असोत अगर छापील, त्यांच्यासंदर्भात कायदे करून, विविध एजन्सीकडून छापे मारून त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. आता तर ‘पेगासीस’सारख्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तुमच्या अत्यंत खासगी आयुष्यातही सत्ताधार्यांना प्रवेश करता येऊ लागला आहे.
दुसर्या बाजूला, लव्ह-जिहाद, खानदानी, जातीय प्रतिष्ठेसारख्या कल्पितांच्या आवरणाखाली आंतरजातीय-धर्मीय मिश्रविवाहांना होणारा टोकाचा विरोध, गोहत्येच्या नावाखाली पडणारे झुंडबळी, जातपंचायतींचे बहिष्कार, धर्माचे बाजारीकरण, धर्मातील अनिष्ट चाली-रीती, रुढी-परंपरा, कर्मकांडे आणि त्यांच्या आधारावर होत असलेल्या आर्थिक, सामाजिक अन्याय, शोषणाविरोधात जर तुम्ही असाल तर तुम्हाला धर्मद्रोही ठरवले जात आहे.
गेल्या दोन वर्षांतल्या कोरोनाच्या साथीने देशाच्या अर्थकारणाचे कंबरडे मोडलेले आहे. कोरोना लाटेच्या तडाख्याबरोबर बेरोजगारी, महागाईचेही तडाखे सर्वसामान्य जनतेला सोसावे लागत आहेत. त्यात हवामानबदलाच्या परिणामांमुळे होणारी अतिवृष्टी, पूर यामुळे लोकांच्या हालात भरच पडत आहे. यातून मार्ग काढण्याची कोणतीही धमक, धोरणे आजच्या सत्ताधार्यांकडे नाहीत. त्यामुळेच त्यांचा सारा भर एका बाजूला देशाची सारी साधनसंपत्ती आपल्या भांडवलदार बगलबच्चांच्या घशात ओतण्यावर; तर दुसर्या बाजूला टाळ्या, थाळ्या, गोमूत्र, यज्ञ, मंत्र, जपजाप्य, जडीबुटी, देवभक्ती, देशप्रेम आणि तथाकथित धर्माचरण यावर आहे आणि या सगळ्याला विरोध करणार्यांना देशद्रोही, धर्मद्रोही ठरवत खटले भरले जात आहेत. अशा या पार्श्वभूमीवर डॉ. दाभोलकरांचा 8 वा स्मृतिदिन येत आहे. त्यांच्या खुनामागच्या सूत्रधारापर्यंत चौकशी यंत्रणा अजूनही पोहोचू शकलेल्या नाहीत; पण खून कोणा व्यक्तीने केला आहे, याला तसा मर्यादित अर्थ आहे. ज्या धर्मांध विचारसरणीतून हा खून झाला आहे, तीच या खुनामागची सूत्रधार आहे. तिचा पराभव करण्यासाठी संघर्ष करत राहणे, हेच डॉ. दाभोलकरांचा खर्या अर्थाने वारसा पुढे चालविणे आहे.
माणूस मारला तरी त्याचे विचार मरत नाहीत, हे तर खरेच आहे. तो विचारसंघर्षाचा वारसा पुढे प्रवाहित होत राहतोच. पण अशा विचारवंत कार्यकर्त्याच्या जाण्याने त्या विचारांच्या, कार्याच्या विकासाला मर्यादा येतातच. नवनव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्या सर्जनशीलतेने समाजाला कार्यक्रम आणि ऊर्जा देणारी शक्ती क्षीण करणे हाच अशा विचारवंतांचा खून करण्यामागे सनातन्यांचा हेतू असतो; पण त्यांचा हा हेतू सफल होऊ न देणे व आजच्या आव्हानांवर मात करण्यासाठी सर्जनशीलपणे डॉ. दाभोलकरांचे विचार व संघर्षशील कार्य विकसित करत नव्या तडफेने संघर्षासाठी उभे राहणे, हीच डॉ. दाभोलकरांना कृतिशील आदरांजली असेल.