अवैज्ञानिकतेच्या, अन्यायाच्या, शोषणाच्या बेड्या झटकून टाका

विवेक सावंत -

कोल्हापूर येथे झालेल्या प्रा. एन. डी. पाटील वैज्ञानिक जाणिवा परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मा. विवेक सावंत यांनी केलेल्या भाषणाचा तिसरा आणि अखेरचा भाग.

लोकशाही का आणायची, याची अनेक कारणं आहेत. याचं प्रमुख कारण आजच्या जगात दिसतंय ते असं की, लोकशाहीचा इतिहास आपण काढून बघितला तर आपल्या लक्षात येईल की, कुठल्याही दोन लोकशाही राष्ट्रांमध्ये गेल्या तीनशे वर्षांत युध्द झालेलं नाही. जी युद्धं होत आहेत, त्यांच्या एका बाजूला लोकशाही असू शकेल आणि दुसर्‍या बाजूला एकाधिकारशाही किंवा दोन्ही बाजूला एकाधिकारशाही असू शकेल. परंतु जागतिक शांतता, गरिबी निर्मूलन या सगळ्यांसाठी अधिक चांगली लोकशाही आपल्याला कशी निर्माण करता येईल, त्यासाठी एक सजग समाज निर्माण करावा लागतो. ‘वैज्ञानिक प्रबोधन अभियान’ हे त्या दिशेने असलेले एक मोठं पाऊल आहे. आजचा काळ आपल्याला प्रतिकूल आहे. अशा परिस्थितीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या धाडसाचे मला खूप मनापासून कौतुक आहे. कारण असं जर केलं नाही तर समाज अजून अध:पतित होत जाईल. समाज अधःपतित आहे म्हणून त्यातील शिक्षक अध:पतित आहेत. त्यांच्यातले विचारवंत अध:पतित आहेत. ज्या वेळेस समाज अध:पतित होतो, त्या वेळेस जे समाजाला पुन्हा एकदा योग्य दिशेला नेण्याचं काम करतात, त्यांना शिक्षक असं म्हणतात आणि त्या प्रक्रियेला शिक्षण म्हणतात, प्रबोधन म्हणतात. यादृष्टीने तुमचा हुरूप वाढावा म्हणून एक गोष्ट सांगून आजचं विवेचन संपवतो.

Socio-Biology च्या जर्नलमध्ये मी वाचलेला एक रिसर्च पेपर आहे. पण काळजी करू नका, मी त्यातील क्लिष्ट भाषा सांगणार नसून काल्पनिक गोष्टीरुपात सांगणार आहे – जपानमधील एका बेटावर खूप माकडं होती आणि ती माकडं शेतात जाऊन मातीतील रताळी खायची. रताळी खात असताना अर्थातच त्यांच्या तोंडात माती जायची. एके दिवशी असं झालं, त्यांच्यातील एक तरुण माकडीण एक रताळं घेऊन झाडावर गेली. तिच्या हातातून रताळ सटकलं आणि खाली वाहणार्‍या ओढ्यात पडलं. ती लगबगीने खाली आली आणि पाण्यात वाहणारं रताळ पकडलं. अर्थातच ते धुतलं गेलं होतं. तेव्हा ते खूपच गोड लागलं. त्याच्यात मातीचा अंश शिल्लक नव्हता. केवढा आनंद झाला तिला..! तिनं मैत्रिणींना सांगितलं. मैत्रिणींनी आधी तिची थोडीशी चेष्टा केली. पण हळूहळू एक-एक मैत्रीण शेतातून रताळ घेऊन, ओढ्यावर जाऊन, रताळ खाऊन मजा करायला लागली. आपल्या मैत्रिणींच्या चेहर्‍यावर विलक्षण संतुष्ट भाव दिसताहेत म्हटल्यावर त्यांचे जे जिवलग मित्र होते, त्यांच्या असं लक्षात आलं की, शेवटी जग बदलणारे सर्वच शोध स्त्रियाच लावतात. त्यामुळे हाही शोध आपल्या मैत्रिणींनीच लावलेला आहे. त्यामुळे आपण याचं अनुकरण करावं, म्हणून तरुण माकडं रताळी धुऊन खाऊ लागली. प्रश्न ज्येेष्ठांचा होता. ज्येेष्ठ असं म्हणाले, ‘तुम्हाला काय वाटतं की आम्हाला हे माहीत नव्हतं, रताळी धुऊन खायची असतात. खरं म्हणजे त्या मातीमध्ये काही जीवनसत्वं असतात म्हणून आम्ही तशी खातो.’

पण ज्येष्ठांमध्ये सुद्धा वैज्ञानिक प्रबोधन करणारे काही वृद्ध होते. त्यामुळं त्यांनी सांगितलं, चांगले विचार असतील तर ते आपल्यापेक्षा कमी वयाच्या लोकांकडून आले तरी स्वीकारायला काय हरकत आहे? म्हणून त्यांनी सुद्धा रताळी धुऊन खायला सुरुवात केली; आणि मग काय झालं की, बेटांवरची माकडं होड्यांवर बसून जवळच्या बेटांवर जायची. तो संदेश त्यांनी जवळच्या बेटावरच्या माकडांना दिला. तीही रताळी धुऊन खाऊ लागली. कारण त्यांनाही प्रत्यक्ष प्रचीतीने अनुभव आला आणि मग विज्ञानामध्ये एक ‘फिनॉमिना’ आहे. त्याला आम्ही ‘क्रिटिकल मास’ असं म्हणतो. ज्यावेळेस एक विशिष्ट संख्या तुम्ही मिळवता, त्यावेळेस अनिर्बंध साखळी प्रक्रिया तयार होते. त्यामुळे माकडांचा एक विशिष्ट नंबर असा तयार झाला की, ती संख्या निर्माण झाल्यानंतर तिचा विस्फोट होतो. त्याची एक साखळी प्रक्रिया होते आणि ‘रताळी धुऊनच खायची असतात,’ ही जाणीव सर्व बेटांवरील माकडांमध्ये विकसित होते. त्यांच्या जाणिवेचे प्रबोधन होतं. त्यामुळं सुरुवातीला आपल्याला थोडं अपयश आलं. काही लोकांनी नाही रताळी धुऊन खाल्ली तर त्याच्याने एकदम नाराज होण्याचे कारण नाही. आपण रताळी धुऊन खाल्ली पाहिजेत; म्हणजे आपल्या स्वत:च्या जीवनात ज्या-ज्या वेळेस कसोटीचे क्षण येतील, त्यावेळेस निर्णय वैज्ञानिक कसोटीच्या आधारेच घेतले पाहिजेत. त्याला आपल्याला ‘ऑप्शन’ नाही.

तिथे डोळे बंद करायचे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा चेहरा समोर आणायचा की, मी जी कृती करतोय त्याबद्दल ते मला काय म्हणाले असते आणि याच्याविषयी आपल्याला अपयश येत असेल, त्या कसोटीला आपण उतरत नसू, तर अशा वेळेस आपल्या मित्रांशी मोकळेपणाने संवाद साधायला पाहिजे. माझ्या जीवनातील एक कसोटीचा प्रसंग आहे. मला अवैज्ञानिक असा निर्णय घेण्याचा मोह होतो आहे, तू मला मदत कर. ‘ज्या माणसांना दुसरी माणसं लागतात, ती माणसे भाग्यवान असतात,’ असं एका बल्गेरियन कवितेत कवयित्रीने म्हटलंय. असे प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात येतात. लोकमान्य टिळक ज्यावेळेस अनेक निर्णय घेत असायचे, त्यावेळेस त्यांच्या बरोबर काही ज्योतिषीपण बसलेले असायचे. कारण ते ‘टिळक पंचांग’ करायचे. ज्योतिषी त्यांना म्हणायचे, “बळवंतराव, हे त्या दिवशी सुरू करणे चुकीचे आहे. त्यादिवशी मुहूर्त नाहीये.” त्या वेळेस टिळक म्हणतात, “मला माझं काम करू द्या आणि ग्रहांना ग्रहांचं काम करू द्या. मला त्याच्यासाठी थांबायला वेळ नाहीये.” आपल्या जीवनात कसोटीचे प्रसंग येतील. आपण इतरांची मदत मागूया. संवाद साधूया. त्याच्यातून आपली शक्ती वाढत जाते. आपलं आत्मबल एकदा वाढत नेलं की, आपल्या जाणिवेत परिवर्तन होतं.

एक तळं असतं. त्यात आपण लिलीची वेल टाकली की लिलीच्या फुलांचा एक गुणधर्म आहे ती प्रत्येक दिवशी दुप्पट होतात. तीस दिवसांमध्ये तळ भरते, तर माझा प्रश्न असा आहे, की निम्मं तळं भरायला किती दिवस लागतील. पूर्ण तळं भरायला तीस दिवस लागतात आणि फुलं दर दिवशी दुप्पट होतात, तर निम्मं तळं भरायला एकोणतीस दिवस लागतात. एक चतुर्थांश तळं भरायला 28 दिवस लागतात; म्हणजे आपल्याला किती चिकाटी ठेवली पाहिजे, हे याच्यातून लक्षात येईल की, तळं एकदम भरत नाही. चिकाटीने प्रयत्न करत राहावे लागतात. त्या दृष्टीने डॉ. दाभोलकर आपल्यासमोर आदर्श आहेत. आपण हा आत्मविश्वास ठेवून काम केलं तर काही प्रश्न येत नाही. अनेक समस्या येतात. त्यांना त्यापद्धतीने जीवनाकडे बघावं लागतं. ज्यावेळेस न्यूटनने रंगाची थेअरी दिली, युरोपमधल्या कवींच्या जगात मोठी हलचल झाली, की ‘अरे, आपलं रंगाचं साम्राज्य हिरावून नेलं शास्त्रज्ञांनी.’ मग त्यांची बैठक झाली. प्रत्येक कवीने आपली करुण भूमिका मांडली. त्यानंतर जर्मन कवी गेंधे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. ते उभे राहिले. रंगांकडं कसं बघावं, याची दृष्टी आपल्याला कवीकडूनही मिळते. त्यांनी सांगितलं की, Theory is green, but life is evergreen! वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे आपल्या कर्तव्याला भिडणे, जीवनाला भिडणे.

अखेर, शेवटी ज्यांच्या नावाने हे अभियान पुढे जात आहे, त्या डॉ. एन. डी. पाटील यांना माझ्या जीवनात खूपच आदराचं स्थान होतं. 1996 पासून माझा आणि त्यांचा घनिष्ठ संबंध होता. ते ज्या-ज्या वेळेस पुण्याला यायचे, त्या-त्या वेळेस माझ्या कार्यालयात यायचे. आमचे वादविवाद झडायचे, दोन-दोन तास चालायचे. मला ते वादविवाद खूप समृद्ध करून जायचे. आमचे सर्व बाबतीत एकमत होते; पण आमच्या वादविवादात एक प्रमुख मुद्दा असायचा, तो म्हणजे संगणक वापरावेत की नाहीत. हा आमचा खूप मोठा वादाचा मुद्दा असायचा आणि त्यांचे काही ऐकले की, मी गर्भगळित होऊन जायचो. कारण मी तर ‘सुपर कॉम्प्युटर’ बांधण्याच्या प्रयोगात होतो आणि त्याच कार्यालयात आमच्या सगळ्या भेटी व्हायच्या. मग ते पुढच्या वेळी आले की मी प्रतिवाद करायचो. असं होत-होत एके दिवशी त्यांनी मला सांगितली की, ‘विवेक, रयत शिक्षण संस्थेत डिजिटल एज्युकेशन सुरू करायचंय.’ मला आनंद झाला. एन. डीं. चे आपण आशीर्वाद मिळवले की आता आपण जग जिंकलं. त्यामुळे सरांचा झपाटा एवढा होता की, त्यानंतर सातारा जिल्हा आणि रयत शिक्षण संस्थेत प्रचंड मोठ्या प्रमाणात कॉम्प्युटर एज्युकेशन दिलं गेलं. हजारो लोक शिकले. अगदी तलाठ्यापासून सकाळी लोक धोपटी मारून आमच्या रयत शिक्षण संस्थेच्या केंद्रात कॉम्प्युटर शिकायला यायचे. दोन वर्षांपूर्वी आमची एका पुरस्काराच्या निमित्ताने कोल्हापुरात भेट झाली. ती अखेरची भेट ठरली. परंतु ते ज्या वेळेस बोलायचे, त्याचे जे संस्कार मनावर झाले ते विलक्षण होते. एकदा मी त्यांना असंच विचारलं होतं की, अयोध्येच्या बेगमांची संपत्ती लुटली, ती व्हाईसरॉयने केलेली गोष्ट किती चुकीची होती? आपल्याला आश्चर्य वाटेल, सरांची विद्वत्ता, लोकशाहीवरची त्यांची निष्ठा इतकी विलक्षण होती की, त्या प्रश्नावर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये काय चर्चा झाल्या, त्या तर मला त्यांनी इत्थंभूत सांगितल्याच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्या चर्चेत एडमण्ड बर्कनं जे भाषण केलं, ते इंग्लिशमध्ये अक्षरश: तसंच्या तसं मला सांगितलं. लॉर्ड बेंटिकवर जो अभियोग चालवला गेला आणि ‘मी तुला पदच्युत करतो. याचं कारण तू माझ्या जनतेचा कायद्याच्या राज्याच्या संकल्पनेवरचा विश्वास डळमळीत केलास म्हणून मी तुला पदच्युत करतो.’ ते संपूर्ण भाषण त्यांनी मला माझ्या कार्यालयात बसून सांगितलं. त्या वेळेस त्यांनी डोळे पूर्ण मिटलेले होते. डोळे मिटून बोलण्याची त्यांना एक सवय होती. त्या काळात मोबाइल फोन नव्हते, नाहीतर रेकॉर्ड केलं असतं. असे एन. डी. सर होते.

त्यामुळे या अभियानाची सुरवात करत असताना मी त्यांची आवडती कविता तुम्हाला सांगतो, जिचं मराठीत रूपांतर त्यांनी स्वतःच केलेलं आहे. इंग्लंडमध्ये 19 व्या शतकात कामगारांचा मोर्चा येत असतो. त्यांचा गृहमंत्री त्यांच्यावर घोडदळ घालतो. अनेक कामगार चिरडले जातात, अनेक कामगार जन्माचे जायबंदी होतात. ते संघर्षाचे वातावरण कवितेत रंगवलेले आहे. तरीसुद्धा कामगार उठून लढा देतात. त्या कामगारांना शाबासकी देण्यासाठी प्रसिद्ध कवी शेली यांनी रचलेली कविता आहे. आपल्या संघर्षात ही कविता आपल्याला खूप बळ देत राहील –

दोस्तहो,

झोपलेला सिंह जसा जागा होऊन उठतो… तसे तुम्ही उठा. झोपेत असताना त्याच्या अंगावर पडलेले दवबिंदू तो सिंह जसा झटकून टाकतो, तशा बेड्या तुम्ही झटकून टाका!

म्हणजे ज्या अवैज्ञानिकतेच्या, अन्यायाच्या, शोषणाच्या बेड्या आहेत, त्या तुम्ही झटकून टाका.

तुम्ही असंख्य आहात आणि ते मूठभर आहेत.

धन्यवाद!


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]