दानिश सिद्दिकीः एक बेडर फोटोजर्नालिस्ट

आलोक देशपांडे -

‘रॉयटर्स’ या विश्वविख्यात वृत्तसंस्थेचे जगप्रसिद्ध छायाचित्रकार आणि पत्रकारितेमधील जगातील सर्वोच्च समजला जाणारा ‘पुलित्झर’ पुरस्कार विजेते भारतीय दानिश सिद्दिकी यांचा गेल्या महिन्यात अफगाणिस्तान येथे तालिबानी अतिरेक्यांनी निर्घृण खून केला. सिद्दिकी अफगाणिस्तान येथे तालिबान व तेथील सैन्य यांच्यात चालू असलेल्या निकराच्या लढाईचे वृत्त जगापुढे आणण्यासाठी अक्षरश: जीवाची बाजी लावून पत्रकारिता करीत होते. पाकिस्तानच्या सीमेनजीक असलेल्या कंदहार प्रांतातील ‘स्पिन ब्लॉडोक’ भागात ते तालिबानच्या गोळीबारात सापडले. त्यांच्यासोबत असलेला अफगाणिस्तानच्या विशेष फौजांचा वरिष्ठ अधिकारी देखील यात मरण पावला.

पत्रकारितेमधील एक महत्त्वाचा अलिखित नियम आहे – पत्रकार ओळखला जाण्यापेक्षा त्या पत्रकाराचे काम ओळखले गेले पाहिजे. म्हणूनच सिद्दिकी यांनी काढलेले फोटो आपण सर्वांनी अनेक वेळा बघितलेले असून देखील त्यामागचा संवेदनशील चेहरा त्यांच्या मृत्यूनंतरच पुढे आला. साधारण 2016 नंतर आशिया खंडात घडलेल्या जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या घटनेचे बरेचसे फोटो सिद्दिकी यांच्या नावावर आहेत. हाँगकाँग येथील निदर्शने, म्यानमार येथील रोहिंग्या मुसलमानांचे विस्थापन आणि नंतरची लष्करी राजवट, ‘सीएए’विरोधातील आंदोलन, दिल्ली दंगल, शेतकरी आंदोलन आणि कोरोना महामारी.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत जेव्हा देशातील अनेक राज्ये मृत्यूची संख्या लपवीत होती, तेव्हा गंगा घाटावर वाळूत पुरलेल्या मृतदेहांचा हृदयद्रावक फोटो सिद्दिकी यांनी टिपला आणि सरकारी अनास्थेला आणि खोटेपणाला अक्षरश: उघडे पाडले. स्मशानातील मृतदेहांच्या जळण्यातून येणारा उग्र पिवळा अग्नी आणि स्मशानाच्या बाजूला असणार्‍या कॉलनीमधील घरांत पसरलेला काळा उदास प्रकाश सिद्दिकी यांनीच एका फ्रेममध्ये टिपला होता. दिल्ली दंगलीच्या वेळेस आपले डोके हाताखाली घेऊन अंगावर दंगलखोरांच्या काठ्या झेलणारी व्यक्ती असो किंवा कोल्हापूरच्या मातीत कुस्ती खेळणारे रांगडे मल्ल; सिद्दिकी यांचा कॅमेरा नेहमीच एक कथा मांडायचा, एकही शब्दही न लिहिता फोटोतील भावना बघणार्‍यांपर्यंत पोचवायचा.

म्यानमारमधल्या निर्वासित स्त्रीच्या एका फोटोबद्दल सिद्दिकी एकदा म्हणाले होते की, “आजूबाजूला प्रचंड शांतता होती; इतकी की, माझ्या कॅमेर्‍याच्या ‘क्लिक’चा आवाज देखील तिला ऐकू गेला. मी एकच फोटो काढला आणि बाजूला झालो. कारण तिला तिचा देश सोडून जावे लागत होते आणि माझ्या कॅमेर्‍याच्या आवाजाने तिच्या मातीशी ती साधत असलेल्या ‘त्या’ शेवटच्या संवादाची तंद्री मला भंग करायची नव्हती.”

जेमतेम 38 वर्षांचे वय होते सिद्दिकी यांचे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. जामिया युनिव्हर्सिटीमधून पत्रकारितेचे शिक्षण घेतल्यावर सिद्दिकी यांनी काही काळ ‘न्यूज एक्स’ या वाहिनीमध्ये काम केले आणि तिथून ते ‘हेडलाईन्स टुडे’(सध्याची ‘इंडिया टुडे’) येथे गेले. हातात माईक घेऊन पत्रकारिता करत असतानाही सिद्दिकी स्वतःजवळ एक कॅमेरा कायम बाळगायचे. “तो कुठल्याही दौर्‍यावर गेला की, तिथल्या बातमीपेक्षा, तिथे फोटो कसे काढले, याबद्दलच भरभरून बोलायचा. म्हणून त्यानं जेव्हा न्यूज चॅनल सोडले आणि पूर्णवेळ कॅमेरा धरायचे ठरवले, तेव्हा आम्हाला कोणालाच फारसे आश्चर्य वाटले नाही,” सिद्दिकी यांचे लहानपणीचे मित्र आणि पत्रकार बिलाल झैदी सांगतात.

सिद्दिकी यांच्या मृत्यूनंतर जगभरातील संवेदनशील राज्यकर्ते, पत्रकार आणि नागरिक यांनी आपापल्या शोकभावना व्यक्त केल्या. अफगाणिस्तान, अमेरिका येथील सरकारे, संयुक्त राष्ट्रसंघ; तसेच आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असो, भारतातील प्रमुख विरोधी पक्ष; तसेच बंगाल, केरळ, तामिळनाडू, राजस्थान व इतर काही राज्यांचे मुख्यमंत्री, या सर्वांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या. मात्र सिद्दिकी ज्या भारताचा नागरिक होते, त्या देशाच्या सरकारमधील अनुराग ठाकूर हे एकमेव मंत्री वगळता एकाही नेत्याला साधे दु:ख देखील व्यक्त करावेसे वाटले नाही. एखाद्या क्रिकेट खेळाडूला खरचटल्यावर त्याच्या उत्तम आरोग्याची ‘मन की बात’ करणार्‍या भारतीय पंतप्रधानांना पत्रकारितेतील जगातील सर्वोच्च सन्मान मिळवणार्‍या भारतीयाचा तालिबान्यांनी केलेल्या खुनाचा साधा निषेध देखील करावासा वाटला नाही, यासारखी अस्वस्थ करणारी घटना दुसरी नसावी. सिद्दिकी यांच्या मृत्यूनंतर हिंदुत्ववादी शक्तींकडून सामाजिक माध्यमांवर ज्या अर्वाच्य भाषेत त्यांची खिल्ली उडवली गेली, त्यांचे मरण अक्षरश: ‘सेलिब्रेट’ केले गेले व ‘त्यांनी उत्तर प्रदेशमधील गंगेच्या घाटावर फोटो काढून केलेल्या पापांचे प्रायश्चित्त म्हणून त्यांना मारले जाणे चांगलेच झाले,’ असे लिहिले गेले, त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. भारतीय जनमानसात किती पराकोटीची हिंसा आणि शत्रुत्व पेरले गेले आहे, त्याचेच पुन्हा एकदा प्रदर्शन यानिमित्ताने झाले.

आपल्या पत्रकारितेबद्दल बोलताना एका मुलाखतीत सिद्दिकी म्हणाले होते की, “कोरोना काळात ज्याचा फोटो काढायचा, त्याची अप्रतिष्ठा कधीही करता कामा नये आणि मी ती कधीही केली नाही.” ते पुढे म्हणाले होते, “एक फोटोजर्नालिस्ट म्हणून माणसांना त्यांच्या अत्यंत खालच्या पातळीवर घसरलेले मी पाहिले आहे, तर अत्यंत मोठ्या मनाच्या लोकांना देखील भेटलो आहे. या दोन्ही टोकांच्या मध्ये वावरणारे लोक तर नेहमीच आपण बघत असतो. माझं काम आरशाचं आहे. आहे ते सत्य मांडणं हे माझं काम आहे. तुम्ही ते न बघता नजर वळवू शकता किंवा ते बघून त्यात बदल करण्यासाठी उभे राहू शकता, निर्णय तुमचा आहे.”

आलोक देशपांडे, मुंबई


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]