अभिषेक भोसले - 9421375083

कोरोनाच्या आधीचं जग आणि नंतरचं जग आता एकसारखं नसणार आहे. ते बदललेलं असेल. त्या जगातील माध्यमंही बदललेली असतील. माध्यमं बदलली नाहीत, तर आपल्याला त्यांना बदलासाठी तयार करावं लागेल. कोरोनाकाळात त्यांनी केलेल्या वार्तांकनातून ही गरज निर्माण झाली आहे. मीडिया ट्रायल चालविणारा मीडिया आता त्यांच्या वार्तांकनामुळं ट्रायलवर आहे.
‘कोव्हिड 19’च्या साथीनं बहुतांश सर्व जग थांबलं आहे. पण या थांबलेल्या जगात सर्वाधिक गतीनं फिरत आहे ती म्हणजे माहिती. म्हणजे खरं तर ‘कोव्हिड – 19’च्या अनुषंगानं माहितीचा स्फोट झालेला आपल्याला दिसतो आहे. ‘कोव्हिड – 19 पॅनडेमिक.’
सोबतच आपण ‘कोव्हिड – 19 इन्फोडेमिक’ (Infodemic) मधून सुद्धा जात आहोत. वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्यांपासून ते फेसबुक, व्हॉट्सअॅपपर्यंत फक्त माहिती फिरत आहे. पण ती फिरत असलेली, निर्माण होत असेलेली किंवा निर्माण केली जात असलेली माहिती प्रत्येक वेळा खरी, अधिकृत असेलच असं नाही, तरी अनेक वेळा ती खोटी किंवा अनधिकृत असण्याचीही शक्यता असते. पूर्वी सूचना किंवा माहितीचं प्रसारण, वार्तांकन करणं फक्त पत्रकारांपुरतं, माध्यमातल्या लोकांपुरतं मर्यादित होतं. त्यामुळं ती माहिती अधिकृत आहे, असं समजलं जात असे.
पण माध्यमं बदलली, संज्ञापनाचं तंत्रज्ञान बदललं. आधुनिक तंत्रज्ञान आली. त्यामुळं माहिती, सूचनांची निर्मिती आणि प्रसारण करण्याच्या विकेंद्रित प्रक्रियेला सुरुवात झाली.
यामुळं फायदेही झाले आणि नुकसानही झालं. सर्वांत महत्त्वाचा फायदा म्हणजे, नाकारलेले समाजघटक या नवीन तंत्रज्ञानामुळं मुख्य प्रवाहात येऊ लागले. किमान त्यांचा दृष्टिकोन या माध्यमांमुळं मांडता यायला लागला. माध्यमांमध्ये असलेली विशिष्ट जात-वर्गाची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी ही नवमाध्यमं महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
पण या नवीन माध्यम तंत्रज्ञानाच्या विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेमध्ये पणाला लागली आहे, ती विश्वासार्हता आणि विश्वासार्ह माहिती, हे आता आपल्या लक्षात यायला लागलं आहे. तसंच भारतीय वृत्तमाध्यमांमध्ये झालेला बदलही ही अविश्वासार्हता निर्माण होण्यास कारणीभूत आहेच. मुख्य प्रवाहातील बहुतांश वृत्तसंस्था या सत्ताधार्यांच्या किंवा सत्ताधारी राजकीय पक्षाच्या विस्तारित शाखा बनल्या आहेत. त्यातून अवैज्ञानिकता, मुस्लिमद्वेष, खोट्या माहितीचा प्रसार करण्याकडं या संस्थांचा कल असल्याचं तुम्हाला लक्षात येईल.
पण आता माहितीचा प्रसार करण्याची साधनं फक्त माध्यमकर्मींच्याच हातात राहिली नसल्यामुळं अधिक क्षमतेनं माहितीची निर्मिती आणि प्रसार होत आहे. आपल्याकडं आलेल्या स्मार्ट फोननं आता कोणीही बातमीदारी करू शकतो, म्हणजे रस्त्यावर चालत असताना एखादी घटना घडली की, तुम्ही लगेच तुमच्या खिशातला फोन काढता, त्यातनं त्या घटनेचा फोटो क्लिक करता, व्हॉट्सअॅप ग्रुपवर दोन ओळीसह तो फोटो ‘शेअर’ करता. तुमच्या त्या कृतीमुळं अनेक लोकांना ती घटना समजायला लागते. मग तो फोटो एकाकडून दुसर्याकडं, दुसर्याकडून पाचजणांकडं, त्या पाचजणांकडून पंचवीस लोकांपर्यंत आणि पुढं पोचत राहतो. त्या घटनेला बातमीमध्ये रूपांतरित करण्याचं काम तुम्ही पार पाडलेलं असतं. पण या प्रक्रियेमध्ये पणाला लागते आहे, ती विश्वासार्हता आणि विश्वासार्ह माहिती.
एकदा विचार करून पाहूयात, वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, सोशल मीडिया व बहुतांश माहितीचे स्रोत जेव्हा तुम्हाला अनअधिकृत, चुकीची माहिती देत असतील तर… आपण त्या माहितीची खातरजमा न करताच ती सगळीकडं पसरवत असू तर… त्यातून एखादा समाज, व्यक्ती, त्याचं जगणं अवघड झालं असेल तर… हा विचार आपल्याला करावा लागेल. कारण कोरोनाच्या या काळात आपल्यातील बहुतांश लोकांनी हे केलं असेल. हे फक्त आत्ताच केलं जातंय का? तर नक्कीच नाही. मागच्या अनेक वर्षांपासून तुमच्यापर्यंत खोटी, अवैज्ञानिक, एका विशिष्ट समुदायाविरोधातील माहिती पसरविण्यासाठी आयटी सेल या संकल्पनेखाली एका नियोजित व्यवस्था काम करत आहे. त्याबद्दलच्या सविस्तर माहितीसाठी स्वाती चतुर्वेदी लिखित ‘आय एम अ ट्रोल’ हे पुस्तक वाचता येईल. कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर अशा अफवा, खोटी माहिती पसरविण्याचं आणि विशिष्ट समाजाबद्दल द्वेष पसरविण्याचं काम वृत्तवाहिन्या, वृत्तसंस्था आणि सोशल मीडियावरील मंडळी, गट करताना दिसले. आपल्याकडंही सोशल मीडिया असल्यानं आपण त्या माहितीच्या प्रसारात हातभार लावल्याची शक्यता नाकारता येत नाही. ही माहिती खरी आहे की खोटी, हे समजेपर्यंत त्यानं व्हायचं ते नुकसान झालेलं असतं.
पण आता अशी फिरत असलेली एखादी खोटी माहिती, घटना ही खोटी असल्याचं आपण कमीत कमी वेळात सिद्ध करू शकतोय. अल्ट न्यूज (www.altnews.in) सारख्या माहितीचं सत्य तपासणार्या माध्यमसंस्थांमुळं हे आपण करू शकत आहोत. ‘अल्ट न्यूज‘नंतर आता अनेक वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि संकेतस्थळांनी; तसंच डिजिटल माध्यमसंस्थांनी फॅक्ट्स चेक करण्याची स्वत:ची स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली आहे. गुगल, फेसबुक यांनीही अशा खोट्या माहितीला आळा घालण्यासाठी व्यवस्था तर निर्माण केलीच आहे; सोबतच त्यांच्या तंत्रज्ञानामध्येही आवश्यक बदल केले आहेत. त्यामुळं आता एखादा फोटो, माहिती वा व्हिडिओ खोटा असेल आणि व्हायरल झाला असेल तर आपल्याला त्याची सत्यता कमीत कमी वेळामध्ये तपासता येऊ शकते. पण तरी हा वेळ जरी कमी झाला असला तरी माहितीची सत्यता लक्षात येईपर्यंत खोटी माहिती, फोटो, व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोचलेले असतात. पण त्याची सत्यता तेवढ्या लोकांपर्यंत नंतर पोचण्याची शक्यता कमी असते. त्यामुळं ज्या लोकापर्यंत ती सत्यता पोचली नाही, त्यांना पूर्वी मिळालेली खोटी माहितीच खरी वाटू शकते. मग हे सगळं रोखायचं कसं? आता आपण कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून जसं ‘सोशल डिस्टसिंग’ पाळतोय ना; तसंच खोट्या माहितीबद्दल पण आहे. एकदा का ती पसरायला लागली की तिला थांबवणं शक्य नाही. ज्यांना खोट्या माहितीची लागण होईल, त्यावर औषध नाही. म्हणून आपण माहिती पाठवितानाच योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. माहितीची विश्वासार्हता तपासल्याशिवाय ती पुढं पाठवायचीच नाही. आपल्याकडं व्हॉट्सअप, फेसबुक आहे म्हणून आपल्याला वृत्तसंस्थांच्या ‘ब्रेकिंग न्यूज‘सोबत शर्यत करायची नाही.
आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्या वृत्तसंस्थावर विश्वास ठेवतो, त्याही अशी खोटी, अवैज्ञानिक आणि अनधिकृत माहितीचा प्रसार करण्यामध्ये सहभागी असतात. त्यांच्याकडून कधी हे नकळत होतं, तर कधी हे सगळं त्यांच्या धोरणांचा भाग असतो. ते नकळत झालं असेल आणि त्या माहितीची सत्यता समजली असेल, तर त्या वर्तमानपत्रांनी आणि वृत्तवाहिनीनं त्याचं स्पष्टीकरण देणं गरजेचं असतं. पण बहुतांश माध्यमसंस्थांना जेव्हा आपण प्रकाशित वा प्रसारित केलेली बातमी खोटी असल्याची जाणीव होते. त्यानंतरही त्या त्याचा खुलासा करण्याची शक्यता कमी असते.
आपल्या माध्यमंस्था असं स्पष्टीकरण देत नाहीत, याचा अर्थ असा होतो. माध्यमसंस्था त्यांच्या वाचक आणि प्रेक्षकांप्रती उत्तरदायी नाहीत. हे आपण वाचक-प्रेक्षक आणि त्या माध्यमसंस्थांचे ग्राहक म्हणून लक्षात ठेवलंच पाहिजे. पण सगळी माध्यमं एकसारखी नाहीत, हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. विश्वासार्ह माध्यमसंस्था आणि कमी विश्वासार्ह माध्यमसंस्था असा फरक आपल्याला आता करताच आला पाहिजे. जी माध्यमं खोटी माहिती पसरवीत नाहीत किंवा तशी चूक झाल्यास तात्काळ तिचा खुलासा करतात, ती माध्यमं विश्वासार्ह समजायला हरकत नाही.
पत्रकारांचं, माध्यमसंस्थाचं लोकशाहीमधलं काम हे तुमच्यापर्यंत सत्य सूचना पोचिवण्याचं आहे. सरकारची धोरणं तुमच्यापर्यंत पोचविणं आणि तुमचे प्रश्न मतं सरकारपर्यंत पोचविणं हे पहिलं काम आहे. तसंच सरकारची धोरणं कुठं कमी पडत असतील, तर त्याबद्दलही सांगणं गरजेचं आहे, तरच त्यामध्ये सुधारणा होऊ शकतील.
पण यामध्ये सकारात्मकता नावाची एक गोची सद्यःस्थितीमध्ये करून ठेवण्यात आली आहे, म्हणजे काय की सतत नकारात्मक कशाला दाखवायचं, आपण सकारात्मक बाबींवर लक्ष ठेवायला हवं, असा एक मोठा माध्यमांमध्ये उदयास आला आहे. खरं तर या गटाचं पत्रकारिता आणि माध्यमांशी काही एक देणं-घेणं नसतं. खरं तर ही मंडळी माध्यमसंस्थांमध्ये काम करणारे हे सत्ताधार्यांचे कार्यकर्तेअसतात. त्यांना सत्याची कास नसते, त्यांना फक्त त्यांच्या नेत्यांचा, त्यांच्या पक्षाच्या आणि त्या पक्षाच्या धोरणांचा प्रसार करायचा असतो. त्यातून हितसंबंध जपायचे असतात; तसंच सत्ताधार्यांकडूनही त्यांच्याबद्दल फक्त सकारात्मक बाबी दाखविण्याबद्दल दबाव निर्माण करण्यात येत असतो. पण जेव्हा सरकारच्या बाजूनं तथ्यं सकारात्मक नसतात किंवा दाखविण्यात सकारात्मकता राहत नाही, जेव्हा लाखो स्थलांतरित कामगार हजारो किलोमीटर पायी त्यांच्या गावाकडं परतत असतात, तेव्हा या देशातील पत्रकारांनी कोरोनाच्या उद्रेकाच्या काळात राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर अंताक्षरी खेळण्याचे काम केलं आहे, हे आपण विसरता कामा नये.
त्यामुळं आता वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांना आपण नागरिकांनी प्रश्न विचारायला हवेत. एखादी वृत्तवाहिनी, वर्तमानपत्रं खोटी, अनधिकृत, अवैज्ञानिक माहिती प्रसारित करत असतील तर आपल्याला आता त्याबद्दल गांभीर्यानं बोलावं लागेल. माध्यमसंस्थांच्या कार्यालयांना फोन करून त्यांच्या चुका त्यांना लक्षात आणून द्याव्या लागतील. चुका जाणीवपूर्वक केल्या जात असतील तर त्यावर लक्ष ठेवावं लागेल. त्यांना त्याचा जाब विचारावा लागेल. कोरोनामुळं सर्व पातळ्यांवर जगाची उलथापालथ होत असताना आपण जर आपल्या माध्यमांना त्यांच्यात बदल घडवून आणण्यासाठी भाग पाडू शकलो नाही, तर ते वाचक-प्रेक्षक आणि त्यांचे ग्राहक म्हणून आपलं अपयश आहे. आज माध्यमं त्यांच्या स्वत:च्या चुकांमुळं आरोपीच्या पिंजर्यात उभी आहेत. त्यांनी स्वत:ची विश्वासार्हता गमावली आहे. आपल्याला या देशाचे संवेदनशील नागरिक म्हणून फक्त त्यांच्यावर खटला चालवायचा आहे. तो कायदेशीर आणि सार्वजनिक अशा दोन्ही पातळ्यांवर असेल. कारण जेव्हा आपला आरोग्य आणि जगण्याशी संघर्ष सुरू होता, तेव्हा माध्यमांनी आपल्याला खोट्या, अनधिकृत, अवैज्ञानिक माहितीशी, द्वेषाशी संघर्ष करायला भाग पाडलं. त्यांच्या राष्ट्रीय कटाचा बळी पाडल्याचा आहे आणि आपल्या मूळ प्रश्नांपासून आपल्याला दूर नेऊन उभं केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
(सदर लेख दै. ‘दिव्य मराठी’च्या रसिक पुरवणीमध्ये लेखक लिहित असलेल्या मीडिया-मेनिया या स्तंभामध्ये पूर्वप्रकाशित झालेला आहे. ‘अंनिस’ वार्तापत्रासाठी लेखकाने या लेखामध्ये नवीन संदर्भांची भर टाकलेली आहे.)
(लेखक हे माध्यम अभ्यासक आहेत.)