कष्टकर्‍यांचा झरा नव्वदीतही खळखळता

प्रा. सुभाष वारे - 9822020773

डॉ. बाबा आढाव म्हणजे सतत चळवळीत असलेल व्यक्तिमत्त्व. कष्टकर्‍यांचे नेते हीच बाबांची ओळख बनलीय. एका बाजूला कष्टकर्‍यांच्या घामाला न्याय मिळवून देण्यासाठी; तसेच माणूस म्हणून कष्टकर्‍यांना सन्मान मिळवून देण्यासाठी; तर दुसर्‍या बाजूला सत्यशोधक विचार समाजात रुजविण्यासाठी बाबा वयाच्या नव्वदीतही सक्रिय असतात. वयाची नव्वदी आज एक जूनला पूर्ण करीत असतानाही बाबा आपल्याला कोणत्या ना कोणत्या आंदोलनात उभे असलेले दिसतातच. बाबांच्या आंदोलनांचा इतिहास तसा खूप मोठा आणि व्यापक आहे. कष्टकर्‍यांच्या सामाजिक सुरक्षेचे गार्‍हाणे संसदेसमोर मांडण्यासाठी त्यांनी महाड ते दिल्ली अशी सायकल यात्रा काढलेली आहे. झोपडपट्ट्या हटवल्या जाऊ नयेत, मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं म्हणून, ‘एक गावएक पाणवठाबनावा, धरणग्रस्तांचे न्याय्य पुनर्वसन व्हावे म्हणून बाबा सातत्याने शेतकरी, कष्टकरी यांच्यासोबत संघर्ष करत आले आहेत.

भेटणार्‍या प्रत्येकाला सोनचाफ्याची ताजी फुले देऊन स्वागत करणार्‍या बाबांचे वय आताशा चेहर्‍यावर दिसू लागले आहे. त्यांचा चेहरा सतत उन्हातान्हात फिरणार्‍या माणसाचा असतो तसा दिसतो. त्यावर तुकतुकीचा लवलेश नाही. केस पांढरे, मागे वळवलेले, बहुतेक वेळा विस्कटलेले. अंगात फिकट रंगाचा खादीचा झब्बा. बोलताना आवाज चढेल तसे त्यांचे हातवारेही वाढतात. संभाषण कधी समजावणीचं असतं, तर कधी वयाचा अधिकार दर्शवणारं. बाबा मोर्चात असोत की संघटनेच्या कार्यालयात; त्यांचं रूप असंच.

मोर्चा असेल तर आधीच मार्ग ठरलेला असतो. शिष्टमंडळात कोण-कोण असेल याची यादी तयार असते. मनात मुद्द्यांची जुळवाजुळव पक्की असते. मोर्चा निघाला की बाबा सर्वांच्या पुढे तरातरा चालू लागतात. हात उंचावून खड्या व धारदार आवाजात घोषणा देऊ लागतात. केस पाठीमागून उडू लागतात. झब्ब्याचा शेव फडफडू लागतो. पायजमा चालताना वाजू लागतो. वातावरण गरम होत जाते. मोर्चा जरा सैलावल्यासारखा दिसला की बाबा लगेच गाणे सुरू करतात. मोर्चेकरी जोषात साथ देऊ लागतात. प्रत्येक कडव्याबरोबर बाबांचा आवाज चढत जातो; पण उंच चढतानाही तो फाटत नाही, पिचत नाही. नव्वद वर्षांचा ‘तो’ आवाज थरथरत नाही. संपूर्ण आयुष्यात संघर्षाच्या अनेक आघाड्यांवर सातत्याने कार्यरत राहून एवढे अनुभवसमृद्ध जीवन जगलेले कार्यकर्ते अभावानेच सापडतात, म्हणूनच बाबांची नव्वदी कष्टकर्‍यांच्या लढ्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.

राष्ट्र सेवा दलाच्या बिनभिंतीच्या शाळेतून संस्कारित होऊन रचना, प्रबोधन व संघर्ष अशा सर्वच क्षेत्रांत लक्षवेधी काम करून दाखवणारे अनेक कार्यकर्ते महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात सापडतील. अशा सर्वांच्या अग्रभागी डॉ. बाबा आढाव यांचेच नाव आवर्जून अभिमानाने घेता येईल. बाबांनी उभ्या केलेल्या अनेक संघटनांपैकी ‘हमाल पंचायत’, ‘कष्टाची भाकर’ हा एक प्रयोगसुद्धा अनेक अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. मागील 46 वर्षे कष्टकर्‍यांनी कष्टकर्‍यांची भूक भागविण्यासाठी चालवलेला हा प्रकल्प विदेशी संस्थांची अथवा देशी कंपन्यांच्या ‘सीएसआर’ फंडाची आर्थिक मदत हा प्रकल्प घेत नाही. रेशनच्या धान्याव्यतिरिक्त सरकारचीही कुठलीही मदत नाही. कष्टकर्‍यांमधल्या चिकाटीला, प्रामाणिकपणाला आणि सहकार्याच्या भावनेला जागवत; त्याचबरोबर त्यांच्या कार्यक्षमतेला प्रोत्साहन देत हा प्रकल्प ज्या यशस्वीपणे गेली 46 वर्षे राबविला जातो आहे, तो म्हणजे बाबांमधल्या उत्कृष्ट संघटनकौशल्याचा नमुना आहे. हा प्रकल्प जसा कष्टकर्‍यांची भूक सन्मानाने भागवण्याचे काम करतो, तसाच तो अनेक कष्टकरी महिलांना रोजगार देण्याचे कामही करतो. अलिकडेच सामाजिक कृतज्ञता निधीच्या वतीने आम्ही ‘हमाल पंचायत’, ‘कष्टाची भाकर’ला सामाजिक उद्योजकता पुरस्काराने गौरविले आहे.

रिक्षा पंचायत, टेंपो पंचायत, अपंग कष्टकरी पंचायत, कागद-काच-पत्रा कष्टकरी पंचायत, हमाल मापाडी महामंडळ अशा अनेक संघटना उभ्या करताना समाजातल्या खर्‍या अर्थाने तळागाळातल्या जनसमूहाशी म्हणजेच ‘नाही रे’ वर्गाशी इतके घट्ट नाते बाबांनी जोडले आहे की, ते आपोआपच असंघटित कष्टकर्‍यांचे नेते आणि त्याचबरोबर त्यांच्या जीवाभावाचा माणूस बनले आहेत.

एक गाव-एक पाणवठा, मत मिळाले; पत कुठाय?, मनू पुतळा हटाव अशा सामाजिक समतेच्या विविध मोहिमा बाबांनी यशस्वीपणे राबवल्या.

बाबांची सर्वच सार्वजनिक कामे ही अशीच प्रश्नांच्या तळाशी जाणारी, दुर्लक्षित आणि शोषित समूहांची वेदना वेशीवर टांगणारी असतात. शोषित समाजाची वेदना दूर करण्याचे काम समाजाच्या दयाभावाच्या आधारे होऊ नये, तर ज्यांचा प्रश्न आहे त्या कष्टकर्‍यांचा स्वाभिमान जागवत, त्यांच्या संघटित दबावातूनच माणूस म्हणून जगण्याचा त्यांचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे, हा त्यांचा आग्रह असतो. त्यांच्या कामातल्या या सच्चेपणामुळेच बाबांची भूमिका मान्य नसणारे त्यांचे विरोधकसुद्धा त्यांच्याबद्दलचा आदरभाव आपल्या मनातून कमी होऊ देत नाहीत.

1980 च्या दशकात महाराष्ट्रातील सामाजिक, आर्थिक विषमतेच्या विरोधात संघर्ष करणार्‍या सर्व गटांना व नेत्यांना एकत्र आणणार्‍या विषमता निर्मूलन परिषदेसारख्या मंचाचे समर्थ नेतृत्व बाबांनी केले. विषमता निर्मूलन शिबिरातला जोष आणि उत्साह पाहूनच आमच्यासारखे अनेक जण प्रभावित होऊन या चळवळीत ओढले गेले. विषमता निर्मूलन शिबिरे हळूहळू थांबली. वास्तविक, आज तशा पद्धतीच्या शिबिरांची जास्त आवश्यकता असताना असे का झाले, याचा विचार बाबा आणि आपण सर्वांनीच केला पाहिजे.

महाराष्ट्रात पूर्ण वेळ कार्यकर्त्यांची कमतरता नाही; पण बदलत्या जमान्यात, वाढत्या चंगळवादी जीवनशैलीच्या प्रभावात पूर्णवेळ कार्यकर्त्यांच्या अडचणी कोण समजून घेणार? बाबा आढाव, डॉ. नरेंद्र दाभोलकर, श्रीराम लागू, निळू फुले यांच्यासारख्या संवेदनशील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन, प्रचंड धडपड करून सामाजिक कृतज्ञता निधी स्थापन केला. गावपातळीवर स्वयंप्रेरणेने धडपडणार्‍या कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून त्याला कृतज्ञता म्हणून काही ना काही आर्थिक आधार देण्याची कल्पना ही अफलातूनच म्हटली पाहिजे. देशातच नव्हे, तर जगभरातील हा एकमेव प्रयोग असेल. या प्रयोगातले बाबांचे योगदानही तितकेच महत्त्वपूर्ण आहे.

माझ्या मते, बाबांनी महात्मा फुले समता प्रतिष्ठानमार्फत सत्यशोधक समाजाचा व सत्यशोधक नेत्यांच्या कार्याचा जो इतिहास समोर आणायचे काम केलेले आहे, ते फारच मूलभूत आहे. सत्यशोधक विचार हा केवळ निषेधाचा विचार नसून तो विवेकावर आधारित समतेची संस्कृती उभी करण्याचा पर्यायी आराखडा आहे. बाबांनी केवळ सत्यशोधक इतिहास पुढे आणलेला नाही, तर चळवळीच्या कार्यक्रमात छोट्या-मोठ्या कृतीद्वारे तो रुजविण्याचा त्यांचा सतत प्रयत्न राहिलेला आहे. प्रत्येक कार्यक्रमात ‘सत्य सर्वांचे आदी घर’ हा महात्मा फुले यांचा अखंड, प्रार्थना म्हणून सामुदायिकरित्या म्हणवून घेण्याचा आग्रह असेल, कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या सत्काराआधी वयाने ज्येष्ठ असलेल्या एका कष्टकरी स्त्रीचा व पुरुषाचा सत्कार आधी करणे, वर्षभरात दारू सोडल्याचा निर्धार कसोशीने पाळलेल्या कष्टकरी पुरुषांच्या हातूनच पुढील वर्षी बाबासाहेबांच्या जयंतीदिनी बाबासाहेबांना हार घातला जाईल, असा संकल्प देणे असो, अशा अनेक छोट्या-छोट्या कृतींतून समतेचा, विवेकाचा सत्यशोधक विचार रुजविण्यासाठी बाबा आग्रही असतात.

या वयातही बाबा किती काम करतात, असं त्यांच्या बाबतीत म्हटलेलं बाबांना आवडत नाही; पण वयाच्या नव्वदीतही ‘म्हातारपणाचं करायचं काय? पेन्शन घेतल्याबिगर राहायचं नाय?’ असं म्हणत देशातल्या 93 टक्के कामगारांच्या म्हणजेच जवळपास पन्नास कोटी असंघटित कष्टकर्‍यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न बाबा व्यवस्थेसमोर आणत आहेत. यात बाबांच्या कल्पक नेतृत्वाबरोबरच समाजातल्या खर्‍या अर्थाने शोषित-पीडित समूहाबरोबरच राहण्याच्या त्यांच्या वृत्तीचे वैशिष्ट्य आहे.

दिवसभर कार्यकर्त्यांबरोबर काम करून घरी गेल्यावरही बाबा स्वस्थ बसत नाहीत. शीला वहिनींना स्वयंपाकघरात मदत करतात. ते थकत कसे नाहीत? कितीही वेळ काम कसे करू शकतात? लांबचा प्रवास करून गेल्यावरही गाडीतून उतरून थेट व्यासपीठावर जात भाषण कसे करू शकतात? दूरगावचा प्रवास करून आल्यावरही लगेच महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या साप्ताहिक बैठकीला न चुकता हजर कसे राहू शकतात? समाजातली विषमता संपावी, संधीची असमानता संपावी, कष्टकर्‍यांमधील निर्मितीक्षम कौशल्यांना वाव मिळावा आणि सर्वांना आपलं आयुष्य आनंदी, सुखी बनवता यावं, ही आंतरिक तळमळ सच्ची असल्याने हा उत्साह आतून सतत जागता राहत असावा. संत तुकाराम महाराज म्हणतात तसं – झरा आहे मुळचाच खरा.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]