चमत्कारांचा कर्दनकाळ : बी. प्रेमानंद

उत्तम जोगदंड - 9920128628

21 सप्टेंबर 1995 रोजी ‘गणपती बाप्पा दूध पित आहेत’ या ‘चमत्कारा’ची अफवा भारतात निर्माण झाली आणि केवळ काही तासांत संपूर्ण जगभर पसरली होती. संपूर्ण देश या अफवेत आकंठ बुडालेला असताना ‘महाराष्ट्र अंनिस’चे कार्यकर्तेमात्र गावोगावी, शहरोशहरी त्या ‘चमत्कारा’मागील विज्ञान दाखवून देऊन लोकांना यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते. या घटनेमागील वास्तव कळल्यावर, यथावकाश या चमत्कारातील हवा निघून गेली. या घटनेची आठवण म्हणून 21 सप्टेंबर हा दिवस ‘महाराष्ट्र अंनिस’तर्फे दरवर्षी ‘चमत्कार सत्यशोधन दिन’ म्हणून पाळला जातो.

भारताला असे चमत्कार आणि त्याद्वारे होणारे शोषण, पिळवणूक, फसवणूक हे प्रकार काही नवीन नाहीत. त्याविरुद्ध काही दशकांपूर्वी अत्यंत शिस्तबद्ध, विवेकी पद्धतीने प्रखर लढा देणारे, चमत्कार-अंधश्रद्धेविरुद्धच्या आंदोलनाचे प्रतीक असलेले, प्रमुख बुद्धिवादी नेते बी. प्रेमानंद यांचे आणि त्यांच्या कार्याचे स्मरण केल्याशिवाय ‘चमत्कार सत्यशोधन दिन’ पूर्ण होऊ शकणार नाही, एवढे त्यांचे कार्य महान होते.

बसव प्रेमानंद अर्थात, बी. प्रेमानंद हे 17 फेब्रुवारी 1930 रोजी केरळ राज्यातील कोझिकोड येथे जन्मले. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी देशभक्तीने प्रेरित होऊन ‘भारत छोडो’ आंदोलनात सहभागी झाले. इथेच त्यांच्या औपचारिक शालेय शिक्षणाला पूर्णविराम मिळाला. त्यानंतर त्यांचे जे काही शिक्षण झाले, ते घरीच खासगी शिकवण्यांमधून. त्यांचे पालक थिओसॉफिकल (ब्रह्मविद्या) सोसायटीचे अनुयायी होते. या सोसायटीच्या संस्थापक हेलेना ब्लावस्की यांच्या विचारांचा प्रेमानंद यांच्यावर प्रभाव होता. गूढ विद्या आणि योग यामध्ये त्यांना आवड निर्माण झाली. मग ईश्वराचा शोध घेण्यासाठी त्यांनी घर सोडले. अनेक बुवा, बाबा, साधू यांना भेटले. त्यांचा स्वभाव अत्यंत चौकस आणि चिकित्सक होता. त्यानुसार, त्यांना भेटलेल्या साधूंना अनेक असे प्रश्न विचारत, ज्यांचे उत्तर देणे अवघड जात असे. साधू जे काही सांगतील, ते आंधळेपणाने ऐकून घेत नसत. कुंडलिनी शक्ती जागृत करून चांगल्या आरोग्याची हमी देणारे एक स्वामी स्वतः मात्र मधुमेह आणि अन्य जुनाट रोगांनी त्रस्त होते, हे त्यांच्या लक्षात आले. याचे त्या स्वामींनी सांगितलेले कारण, ‘पूर्वजन्माचे कृत्य आहे,’ हे काही त्यांना पटले नाही. पुढे ते प्रख्यात बुद्धिवादी कसे झाले, याचे मूळ त्यांच्या या चौकसपणात आणि अनुभवात दिसून येते. ईश्वराच्या शोधाच्या या यात्रेत त्यांच्या हाती काही न लागल्याने आणि तार्किक प्रश्नांना उत्तरे न मिळाल्याने त्यांची यात्रा नास्तिकतेकडे झुकू लागली, जिथे त्यांना प्रश्नांची उत्तरे मिळू लागली.

1969 साली थोर बुद्धिवादी अब्राहम कोवूर यांची भारतात चमत्काराचा भांडाफोड मोहीम चालू असताना प्रेमानंद यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर बुद्धिवादी मार्ग अनुसरून ब्रह्मविद्येचे ते टीकाकार बनले. डॉ. कोवूरांच्या चमत्कारांचा पर्दाफाश करण्याच्या मोहिमेत सामील झाले, या चळवळीला बळ दिले आणि आपले पुढील आयुष्य याच कार्यासाठी समर्पित केले. 1978 साली कोवूर यांचे निधन झाल्यावर त्यांनी कोवूर यांचा बुद्धिवादी वारसा पुढे चालवला. त्यांनी अनेक चमत्कारांचा भांडाफोड करीत बुवाबाजीविरुद्धचा आपला लढा चालू ठेवला. देशातील विविध राज्यांत अशा प्रकारचे काम करणार्‍या संघटनांना फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनालिस्ट असोसिएशन्स (फिरा) च्या छत्राखाली त्यांनी एकत्र आणले.

त्यांची निरीक्षणशक्ती जबरदस्त होती. तिचा पुरेपूर वापर करून कोणत्याही चमत्काराची उकल ते चुटकीसरशी करत असत. त्यांच्या नजरेतून कोणत्याच बाबाचा कसलाही चमत्कार सुटू शकला नाही. एका मुलाखतीत यांनी सांगितले होते की, सर्वसाधारणपणे कोणत्याही भोंदू बाबाला 50 ते 60 चमत्कार माहिती असतात. परंतु त्यांना स्वतःला मात्र 1500 चमत्कार माहिती आहेत. त्यांच्या निरीक्षणानुसार चमत्कार करण्याचे चार मार्ग आहेत – हातचलाखी, रसायनांचा वापर, यांत्रिक साधनांचा वापर आणि मानवी शरीराबाबत अत्यंत कमी माहिती असलेल्या बाबी आणि त्यांचे कार्य आणि त्यांचा उपयोग करणे. आपल्या कार्यकर्त्यांना ते चमत्कारांचे प्रशिक्षण देत असत आणि सर्वत्र प्रबोधन कार्यक्रम सादर करीत असत.

ते एकेका बाबा, बुवा, अम्मा यांच्या मागे हात धुऊन लागत आणि त्यांना आव्हान देत असत. त्या काळातील बाबा, बुवा त्यांना घाबरत असत. प्रेमानंद आणि त्यांच्या कार्यकर्त्यांपासून संरक्षण मिळावे म्हणून निर्मलादेवी श्रीवास्तव, पहिल्या भोंदू ‘अम्मा’ यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर धरणे धरले होते. त्यांना प्रेमानंद यांनी मॅजिकल रेमेडीज (ऑब्जेक्शनेबल अ‍ॅडव्हर्टाइजमेंट) कायदा आणि मेडिकल प्रॅक्टिशनर्स कायद्यांतर्गत नोटीस पाठवली होती आणि त्यांच्या चमत्काराचा भांडाफोड केला होता. त्या काळातील केरळमधील प्रभाकर योगी हे आपले वय 800 वर्षेअसल्याचे सांगत; म्हणजे केरळपेक्षाही त्यांचे वय जास्त होते! तो तरुण असतानाचा एक फोटो त्याच्याकडे होता म्हणे! त्यांना भेटायला प्रेमानंद गेले असता त्यांची कीर्ती माहिती पडल्याने त्यांनी भेट द्यायला नकार दिला होता. 1980 साली स्वतःला जपानी म्हणून सांगणारा एक सिद्धपुरुष श्रीलंकेतून आला आणि त्याने दावा केला की, देवाच्या आशीर्वादाने तो डोक्यावर 100 नारळ फोडू शकतो. प्रेमानंद यांनी नीट लक्ष देऊन निरीक्षण केले असता तो फक्त कोवळे, मऊ नारळच फोडतो, असे दिसून आले, जे नारळ तुम्ही-आम्ही सुद्धा फोडू शकतो. मग त्यांनी नारळांची एक पिशवी बदलली आणि तीत कडक नारळ ठेवले. तेव्हा ते नारळ मात्र फुटेनात. त्यावर त्याने आपली चलाखी लपविण्यासाठी अशी मखलाशी केली की, सकाळी त्याने एका महिलेला आंघोळ करताना पाहिले होते, म्हणून तो विचलित होता. परंतु त्याची चलाखी तोपर्यंत लोकांच्या लक्षात आली होती. अशा प्रकारचे मुक्तानंद आणि अमृतानंदमयी वगैरे त्यांना खुलेआम भेटणे टाळत असत. प्रेमानंद आणि त्यांची टीम येत आहे, हे कळताच ते ‘भूमिगत’ होत असत.

त्यांनी अनेक बाबा, बुवांच्या चमत्काराचा भांडाफोड केला असला, तरी त्यांचा लक्षात राहणारा लढा आहे, चमत्कार करणार्‍या सत्य साईबाबाविरुद्धचा. त्या काळी पुट्टपर्थी येथील सत्य साईबाबा या ‘हाय प्रोफाइल’ गुरूचा बोलबाला होता. त्याच्या अनुयायांमध्ये मोठमोठे राजकारणी, मंत्री (अगदी पंतप्रधान, राष्ट्रपती, न्यायमूर्ती देखील), उच्चपदस्थ अधिकारी, श्रीमंत लोक, विविध क्षेत्रातले मान्यवर, सेलिब्रिटिज होते. त्यामुळे त्याला राजाश्रय आणि पैशाचे पाठबळ लाभले होते, एक वेगळे वलय प्राप्त झाले होते. तो आपल्या अंगातील ‘दैवी’ शक्तीच्या सहाय्याने हवेतून उदी, सोन्याची अंगठी, सोनसाखळी अशा वस्तू काढून दाखवीत असे आणि त्याचे भक्त हे चमत्कार पाहून आश्चर्यचकित होत असत. अर्थात, गरीब भक्तांना उदी आणि श्रीमंत, दानशूर भक्तांना मात्र सोन्याची अंगठी, सोनसाखळी सत्य साईबाबाकडून का दिली जायची, याचा विचार त्याने कधी केलाच नाही. चमत्कारांचा भांडाफोड करण्याच्या डॉ. कोवूर यांच्या मोहिमेत सामील झालेल्या प्रेमानंद यांची नजर 1975 मध्ये या सत्य साईबाबावर पडली. या बाबाचा जाहीरपणे धिक्कार करून आणि विविध विवेकी, संवैधानिक मार्गांनी मागे लागून त्याला सळो की पळो करून सोडले. बाबा कितीही मोठा असो; त्याच्या चमत्कारांचा भांडाफोड करायलाच पाहिजे, हा संदेश त्यांनी दिला आणि तो कसा करावा, याचा वस्तुपाठच भावी विवेकी पिढ्यांसाठी घालून दिला.

सत्य साईबाबा जे चमत्कार करत असत, तसेच चमत्कार प्रेमानंद आणि त्यांचे साथी ठिकठिकाणी करून दाखवत आणि त्या मागील रहस्य निदर्शनास आणून देत असत. त्यांनी आव्हान दिले की, सत्य साईबाबांनी त्यांचे चमत्कार वैज्ञानिक निरीक्षणाखाली त्यांच्यासमोर करून दाखवावेत. परंतु सत्य साईबाबा यांच्याकडून काही प्रतिसाद मिळत नव्हता.

सत्य साईबाबा हवेतून सोन्याचे दागिने काढून दाखवीत असत. असे करणे हा सुवर्ण नियंत्रण कायदा – 1968 अंतर्गत गुन्हा असल्याचा दावा करून त्याच्यावर कारवाई करावी, यासाठी त्यांनी संबंधित सरकारी विभागाकडे 1981 पासून पत्रव्यवहार सुरू केला. त्यांनी 1986 साली सत्य साईबाबा यांच्या पुट्टपर्थी येथील आश्रमावर 500 सहकार्‍यांसह मोर्चा सुद्धा काढला होता. त्या वेळी त्यांना अटक करण्यात आली होती. त्याच वर्षी त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात सत्य साईबाबा आणि केंद्र सरकारच्या संबंधित खात्याविरोधात रिट पिटिशन दाखल केले. सत्य साईबाबा ज्या पद्धतीने सोने हवेतून काढतात, तसे केल्याने सोने निर्माण करण्याच्या बाबतीत असलेल्या सुवर्ण नियंत्रण कायद्यातील कलमांचा भंग होतो; शिवाय अशा प्रकारे हवेतून सोने निर्माण केल्यावर संबंधित सरकारी विभागाला त्याची माहिती दिली पाहिजे, या नियमाचा देखील भंग होतो, असा युक्तिवाद त्यांनी केला. ही बाब संबंधित सरकारी खात्याच्या निदर्शनास 1981 पासून आणून देखील ते काही कारवाई करीत नाहीत, असे प्रेमानंद यांचे म्हणणे होते. हवेतून निर्माण केले जाणारे दागिने सत्य साईबाबांच्या ट्रस्टच्या मालकीचे असू शकतात आणि ट्रस्टच्या लोकांनी प्रत्यक्ष चमत्काराच्या आधी त्याच्याकडे पोचविलेले असू शकतात, असे मत सुद्धा प्रेमानंद यांच्या अर्जात व्यक्त केले होते. परंतु वरील दोन्हीही नियमात सत्य साईबाबा जे काही करत असत, ते बसत नाही म्हणून त्यांचा हा दावा न्यायालयाने फेटाळला आणि रिट अर्ज निकालात काढला. हा खटला प्रेमानंद हरले असले, तरी अर्ज दाखल करताना त्यांनी सत्य साईबाबांचे फसवे चमत्कार, त्याच्या आश्रमात चालणारे प्रकार चव्हाट्यावर आणले होते. असे हवेतून काढलेले दागिने त्याच्या ट्रस्टच्या ताब्यात आधीच असतील, हा त्यांच्या अर्जातील मुद्दा त्यांच्या विरोधात गेला. या खटल्यामुळे समाजात चमत्कार आणि चमत्कारी बाबा यांच्याविषयी एक वेगळाच संदेश पोचविण्यात आणि साईबाबाच्या चमत्काराच्या बाबतीत संशय निर्माण करण्यात प्रेमानंद यशस्वी ठरले होते.

प्रेमानंद हे एक योद्धा असल्याने त्यांनी या निकालाविरुद्ध अपील केले आणि आध्यात्मिक शक्ती ही कायद्यानुसार बचाव म्हणून वापरता येणार नाही, असा दावा केला. परंतु इथेही त्यांना हारच पत्करावी लागली. या निकालांमुळे ते निराश झाले नाहीत की त्यांच्या कामात खंडही पडला नाही.

त्यानंतर, 1993 मध्ये सत्य साईबाबा यांच्या आश्रमातील त्याच्या सहा भक्तांचे खून झाले होते. ते प्रकरण पुढे आले. या खूनप्रकरणी दाखल करण्यात आलेला मूळ ‘एफआयआर’ दडवून दुसरा ‘एफआयआर’ दाखल केल्याचा आणि आश्रमात चालत असलेली दुष्कृत्ये दडपून सत्य साईबाबांना वाचविण्याचा प्रयत्न केला जातो आहे, अशा प्रकारचा आरोप त्यांनी रिट पिटिशन दाखल करताना केला होता. तसेच या खून प्रकरणात पोलिसांनी केलेल्या बेकायदेशीर कृत्यांमुळे किंवा त्यांच्या उदासीनतेमुळे हे मृत्यू झाले, असा त्यांनी आरोप केला होता. मोठे पोलीस अधिकारी सत्य साईबाबांचे शिष्य असल्याने ते आश्रमातील गैरव्यवहार, गुन्हे दडपून टाकण्यास मदत करीत आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांचे हे पिटिशन देखील कोर्टाने फेटाळून लावले. त्या विरुद्ध ते अपिलात गेले. मात्र तिथेही त्यांना हार पत्करावी लागली. दोन्ही निकालात त्यांच्यावर न्यायालयाने कठोर ताशेरे देखील ओढले. परंतु हे निकालपत्र वाचल्यावर एक बाब लक्षात येते की, त्यांनी या पिटिशनमध्ये सुद्धा साईबाबांची 6000 कोटी रुपयांची संपत्ती, त्याला लाभणारा ‘राजकीय’आश्रय, जनतेचे पैसे खर्च करून सत्य साईबाबा यांना भेटी देणारे देशाचे अध्यक्ष, पंतप्रधान, मुख्यमंत्री, न्यायाधीश इत्यादींचा उल्लेख; त्यामुळे होणारी धर्मनिरपेक्षतेची थट्टा या बाबींचा उल्लेख करून त्या जनतेच्या निदर्शनास आणल्या. एवढे सर्व केल्यामुळे त्यांना त्रासही सहन करावा लागला. त्यांच्यावर अनेक वेळा हल्ले झाले. अशा हल्ल्यामध्ये ते जखमी सुद्धा झाले. या जखमांचे व्रण ते एखादे परितोषिक दाखवावे तसे दाखवीत असत.

केवळ चमत्कारांचा भांडाफोड करणे, एवढेच न करता त्यांनी यास पूरक असे विपुल लेखन केले, त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली, अनेक वर्तमानपत्रात, नियतकालिकांत त्यांनी लेखन केले. त्यांच्या डॉक्युमेंटरीजही खूप गाजल्या. इंग्लंडमधील प्रसिद्ध ‘चॅनल 4’ वरील त्यांची एक डॉक्युमेंटरी जगभर चांगलीच गाजली होती. कर्करोगामुळे त्यांची तब्येत बिघडत गेली. आपली तब्येत ढासळत असताना सुद्धा 5 मार्च 2009 रोजी ‘विज्ञानाच्या पद्धती’ या विषयावरील कायमस्वरुपी प्रदर्शन पूर्ण करून, ते जनतेसाठी खुले करून, बर्‍याच काळापासून उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण केले. 4 ऑक्टोबर 2009 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यापूर्वी, ‘प्रेमानंद आता देवाला मानू लागले आहेत,’ अशा अफवा त्यांच्या विरोधकांनी उडवल्या होत्या. अत्यंत कमजोर अवस्थेत इस्पितळात असलेल्या प्रेमानंद यांना ही बाब सांगितली गेली, तेव्हा तशा क्षीण अवस्थेत 20 सप्टेंबर 2009 रोजी त्यांचा ‘मृत्युशय्येवरील संदेश’ त्यांनी डॉक्टर आणि अन्य लोकांच्या समोर दिला. या संदेशावर त्यांना कमजोरीमुळे सही करता येत नव्हती, म्हणून हाताचा अंगठा दिला आणि बुद्धिवादावरील आपली निष्ठा अक्षरशः ‘मरते दम तक’ कायम ठेवली होती. विशेष म्हणजे त्यांनी कोणाच्याही श्रद्धेला कधीही विरोध केला नाही. संविधानाद्वारा प्रत्येकाला प्राप्त श्रद्धा-स्वातंत्र्याचा ते आदर करीत. परंतु चमत्काराच्या नावाने शोषण, फसवणूक करणार्‍या अंधश्रद्धांवर ते तुटून पडत. ‘बी. प्रेमानंद’ हा शब्द ‘चमत्कार’ या शब्दाचा विरोधार्थी शब्दच वाटावा, अशी आपली प्रतिमा त्यांनी आपल्या कार्यातून निर्माण करून ठेवलेली आहे.

सप्टेंबर महिन्यात येणाया ‘चमत्कार सत्यशोधन दिना’निमित्त, कसलीही भीडभाड न ठेवता ‘चमत्कारां’चे शिरकाण करणार्‍या बी. प्रेमानंद या योद्ध्याला विनम्र अभिवादन!

बी. प्रेमानंद यांचे लेखन

इंग्रजी पुस्तके :

1. सायन्स व्हर्सेस मिरॅकल्स

2. ल्युअर ऑफ मिरॅकल्स

3. डिव्हाईन ऑक्टोपस

4. द स्टॉर्म ऑफ गॉडमेन, गॉड अँड डायमंड स्मगलिंग

5. सत्य साई ग्रीड

6. सत्य साई बाबा अँड गोल्ड कंट्रोल अ‍ॅक्ट

7. सत्य साई बाबा अँड केरला लँड रिफॉर्म्स अ‍ॅॅक्ट

8. इन्व्हेस्टिगेट बालयोगी

9. युनायटेड फ्रंट – ‘फिरा’ सेकंड नॅशनल कॉन्फरन्स

10. मर्डर्स इन साईबाबाज बेडरूम

11. ए. टी. कोवूर ः ऑक्टोजनरी सुवेनीर

मल्याळम भाषेत :

1. साईबाबायूडे कलिकल

2. साईदासिकल देवदासिकल

3. पिंथिरिप्पनमारुडे मास्टरप्लॅन

याशिवाय ‘द इंडियन स्केप्टिक’ या नियतकालिकाचे ते मालक-प्रकाशक-संपादक होते. या नियतकालिकात अलौकिक वाटणार्‍या घटनांची वैज्ञानिक चिकित्सा करणारे लेखन असते. यात विशेषतः भारतातील अशा प्रकरणांवर विशेष भर दिला जातो.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]