जोडीदाराची विवेकी निवड राज्यव्यापी युवा संकल्प अभियान

आरती नाईक - 8652223803

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा ‘जोडीदाराची विवेकी निवड’ विभाग तरुणाईला आणि पालकांना नेहमीच आकर्षित करणारा ठरला आहे. गेल्या वर्षीपासून 12 जानेवारी (राष्ट्रीय युवा दिन) ते 14 फेब्रुवारी (जागतिक प्रेम दिन) या युवकांसाठी महत्त्वाच्या दिवसादरम्यान राज्यव्यापी युवा संकल्प अभियान राबविण्यात येते.

उपक्रमाची पंचसूत्री :

1) प्रेम व आकर्षण यातील फरक समजून घेणे.

2) बौद्धिक, भावनिक व मूल्यात्मक अनुरुपता पाहणे

3) हुंडा, पत्रिका व व्यसन यांना ठाम नकार देणे

4) लग्न साधेपणाने, किमान कर्ज न काढता करणे

5) आंतरजातीय, आंतरधर्मीयच्या पुढच्या टप्प्यावर जातविरहित, धर्मविरहित विवाहाची शक्यता आजमावून पाहणे.

याविषयीचा दृष्टिकोन युवकांपर्यंत पोचवत जवळपास 6000 तरुणांना अभियान काळात संकल्पित करण्यात आले. म्हणजेच गेल्यावर्षी पेक्षा अधिक तरुणांपर्यंत पोचण्यात आपण यशस्वी झालो. अभियानाची पूर्वतयारी तशी जोमदार झाली होती. संवादकांनी आपापल्या क्षेत्रातील जिल्हे ठरवून घेतले. जिल्ह्याचे कार्याध्यक्ष, सचिव यांबरोबरच तेथील राज्य पदाधिकारी यांच्यासोबत बोलून किमान एका परिषदेसाठी नियोजन करण्यात आले. अभियानादरम्यान दोन राज्यस्तरीय परिषदा संपन्न झाल्या. पहिली उद्घाटन परिषद जळगाव येथे, तर समारोप मेळावा कोल्हापूर येथे पार पडला.

जळगाव येथे उद्घाटन परिषद :

12 जानेवारी 2020 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या वतीने अभियानाची संकल्प परिषद जळगाव येथील अ‍ॅड. एस. ए. बाहेती कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आली होती. परिषदेसाठी उद्घाटक म्हणून विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पी. पी. माहुलीकर उपस्थित होते. तसेच विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. डॉ. सत्यजित साळवे व प्राचार्य डॉ. अनिल लोहार हे उपस्थित होते.

पाहुण्यांच्या हस्ते मिटलेल्या कळीचे रूपांतर उमललेल्या फुलात करताना तरुणांच्या मनातील नातं आणि जोडीदाराची निवड या अनुषंगाने पडणारे प्रश्न व त्याला उपक्रमाच्या माध्यमातून मिळणारी उत्तरे यांची सांगड घालण्यात आली होती. केवळ दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यापेक्षा सक्रिय पर्याय देणारे कल्पक व अभिनव उद्घाटन केल्याचे समाधान पाहुण्यांच्या मनोगतातून व्यक्त झाले.

‘तरुणांच्या जीवनाशी निगडित मुद्द्यांवर अंनिस संवाद करत आहे,’ असे मत प्र. कुलगुरूंनी व्यक्त केले. अभियानासाठी सर्वांनी सदिच्छा दिल्या. अध्यक्षीय मनोगतातून ‘अंनिस’चे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी आता आमचे ‘प्रेमाचे दूत’ असणारे हे संवादक महाराष्ट्रभर प्रेमाचा संदेश देत फिरतील आणि अभियान यशस्वी करतील, असे म्हणत सदिच्छा आणि संवादकांप्रती विश्वास व्यक्त केला. या सत्रात ‘अंनिस’चे पालघरचे कार्यकर्ते अण्णा कडलास्कर व अनिल करवीर यांनी लिहिलेल्या व संगीतबद्ध केलेल्या जोडीदाराची विवेकी निवड उपक्रमाच्या ध्वनिमुद्रित शीर्षक गीताचे (टायटल साँग) सादरीकरण करण्यात आले.

यादिवशी दुसर्‍या सत्रात ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या विषयावर परेश शहा यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद घेण्यात आला. या परिसंवादात महेंद्र नाईक, निशा फडतरे, सचिन थिटे यांनी मांडणी केली. जोडीदाराची निवड विवेकी पद्धतीने का करायची? ती कशी करायची? सहजीवनातील स्त्री-पुरुष समता यावर तिघांनी मांडणी केली. तिसर्‍या सत्रात विवेकी निवड केलेल्या जोडप्यांच्या स्वाती-कृष्णात हिने मुलाखती घेत रंगत आणली. यामध्ये जळगावचे विश्वजित आणि मीनाक्षी चौधरी, औरंगाबादची दीक्षा काळे व जामनेर येथील आशिष दामोदर आणि कांचन सोनवणे यांनी आपल्या लग्नाची गोष्ट सांगितली.

समारोपाच्या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रदीप जोशी हे होते. त्यांनी मानसिक आरोग्य व जोडीदाराची निवड या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांची मनोगतेही घेण्यात आली. लातूर, औरंगाबाद, सातारा, रायगड, नवी मुंबई येथील प्रतिसाद उत्साह वाढवणारा होता.

कोल्हापूर येथे समारोप मेळावा :

या अभियानाचा समारोप मेळावा कोल्हापूर मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने न्यू कॉलेज येथे घेण्यात आला. या परिषदेसाठी स्वागत सत्रात कॉ. अतुल दिघे आणि डॉ. रीना दिघे हे उद्घाटक आणि कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. अविनाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सत्राचे उद्घाटन देखील अतिशय आगळ्या-वेगळ्या संकल्पना वापरत झाले. ‘महाराष्ट्र अंनिस’ नात्यातील सुरेल संवादासाठी रुजवू पाहत असलेल्या 12 गुणांच्या कुंडलीतील एकेक मुद्दा प्रेमरुपी फुलावर बिंबवत विचारांच्या फुलांनी प्रेमाची कुंडी सुशोभित करण्यात आली. याही संकल्पनेचे उपस्थितांनी भरभरून कौतुक केले. सुरुवातीस विभागाची राज्य कार्यवाह आरती नाईक हिने प्रास्ताविक केले. कृष्णात व स्वाती यांनी अभियानकाळात भरून घेतलेल्या संकल्पपत्रांचा डेटा ‘पीपीटी’च्या माध्यमातून सादर केला. तरुणाई व पालक नक्की काय विचार करताहेत, हे त्यातून स्पष्ट होत होतं. याप्रसंगी कॉ. अतुल दिघे यांनी त्यांचे अनुभव सांगितले. तसेच अध्यक्ष अविनाश पाटील यांनी अभियानाच्या यशाचे कौतुक करतानाच या उपक्रमाची आवश्यकता घडणार्‍या घटनांतून सतत जाणवत असल्याचेही नमूद केले. या सत्राचे सूत्रसंचालन विभावरी हिने केले, तर आभार अमृता हिने व्यक्त केले.

सत्र दुसरे : या सत्रात ‘लग्न – आंतरजातीय, आंतरधर्मीय की आंतरमानवीय?’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. यामध्ये युवांची प्रतिनिधी म्हणून प्रियांका खेडेकर (पनवेल), पालक प्रतिनिधी अनिल करवीर (पालघर) व संघटनेचे प्रतिनिधी म्हणून सुनील स्वामी (इचलकरंजी) यांनी आपापल्या भूमिका मांडल्या. या सत्राच्या अध्यक्षा, शिवाजी विद्यापीठातील रशियन भाषा अभ्यासक व सामाजिक कार्यकर्त्या मेघा पानसरे या होत्या. अतिशय मुद्देसूद मांडणी करत त्यांनी उपस्थितांना खिळवून ठेवले. सत्राचे सूत्रसंचालन तुषार याने केले व आभार वैभव याने मानले.

सत्र तिसरे : हे सत्रदेखील उपक्रमाच्या वैविध्यामध्ये भर घालणारे होते. यावेळी जोडीदाराची विवेकी निवड उपक्रमाच्या ऑनलाइन प्रशिक्षणातील ‘कोपरा भेट’ या संकल्पनेची ओळख करून देत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कोपर्‍यातून आलेल्या, आपल्या ऑनलाइन प्रशिक्षणात सहभागी झालेल्या आणि विवेकी निवडीच्या मुद्द्यांवर जोडीदार निवडीसाठी आग्रह धरणार्‍या सहा तरुणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये पनवेलची वैदेही पाटील, सोलापूरचा लिंगेश्वर, लातूरचा अमोल तम्मेवार, औरंगाबादचा कृतार्थ, भंडाराची नीता वासनिक आणि सांगलीची मधुमती यांच्याशी महेंद्र व निशा यांनी संवाद साधला. या संवादातून ‘जोविनि’ उपक्रमाचे पदर उलगडत गेले. तरुणाई वेगळा म्हणजे नक्की काय विचार करते, त्यांचे निवडीतील प्राधान्य कोणते, पालकांशी ते सकारात्मक संवाद कशाप्रकारे करत आहेत, हे स्पष्ट व्हायला मदत झाली. तरुणांना हे सत्र फारच भावले. या सत्राचे सूत्रसंचालन यश याने केले, तर आभार मनोज याने व्यक्त केले.

समारोप सत्र : या सत्राचे अध्यक्ष डॉ. नितीन शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून निहाल व तनुजा शिपूरकर हे उपस्थित होते. सुरुवातीस या विभागाचा राज्य सहकार्यवाह सचिन याने अभियानाचा आढावा घेतला. त्यातील काही प्रेरणादायी अनुभवही सांगितले. 34 दिवस महाराष्ट्रभर उत्साहाने अभियान राबविणारांचे कौतुकही यावेळी स्नेहभेट देऊन करण्यात आले. त्यानंतर समारोप मेळाव्यात दिवसभर उपस्थित असणार्‍या विद्यार्थ्यांपैकी काही मुले व मुलींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. समारोप सत्राचे अध्यक्ष असलेल्या डॉ. नितीन शिंदे यांनी ज्योतिषाच्या पत्रिकेचा फोलपणा मांडत ‘जोडीदाराची विवेकी निवड’च्या उपक्रमातून सांगितले जाणारे स्वभाव, विचार यांचे गुणमीलन पाहावे, असे आवाहन करत सुंदर समारोप केला. या सत्राचे सूत्रसंचालन राजवैभव याने केले. संपूर्ण परिषदेचे आभार कृष्णात याने व्यक्त केले. परिषद यशस्वी करण्यासाठी कोल्हापूरच्या संवादकांनी खूप मेहनत घेतली होती.

एकूणच, अभियानाच्या यशस्वितेसाठी महाराष्ट्रभरातील संवादक, जिल्हा पदाधिकारी, राज्य पदाधिकारी आणि ज्यांना हा विषय अत्यंत प्राधान्याने मांडला जावा, असं वाटतं. अशा आपल्या हितचिंतकांचा मोलाचा वाटा आहे. समारोप परिषद यशस्वी करण्यासाठी क्षितिज बनसोडे, वैभव सावंत, वैष्णवी लोहार, निशा सुतार, ऋतुजा देसाई, अदिती निल्ले, आदिनाथ पाटील, सफिया जमाल, मिताली पाटील, तेजश्री पाटील व राजवैभव शोभा रामचंद्र, विभावरी नकाते, हर्षल जाधव, रेश्मा खाडे, नियाज अत्तार, अनिल शेलार, रमेश वडणगेकर या कोल्हापूर अंनिस व ‘विवेक वाहिनी’च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. आपसांतील टीम वर्क ज्या मैत्रीने घट्ट बांधले गेले आहे, त्यामुळेच अभियान स्वतःचे रेकॉर्ड मोडत यशस्वी होतं; शिवाय देखणंही होतं. या सगळ्यांच्या स्नेहात राहणे पसंत करतो आणि स्नेह वृद्धिंगत व्हावा, ही सदिच्छा ठेवू इच्छितो.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ]