-
धर्म चिकित्सा म्हणजे केवळ धर्मातील रूढी, परंपरा, कर्मकांडे, यावर टीका, टिंगल नव्हे तर धर्म या संकल्पनेचा मूळ अर्थ समजून घेणे आणि त्या त्या काळात धर्मगुरु आणि धर्मग्रंथांनी प्रस्थापित केलेला धर्माचा अर्थ आणि त्यानुसार प्रत्यक्षात होत असलेला त्या त्या काळातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, नैतिक व्यवहार याचे कठोर वैचारिक विश्लेषण करणे.
जगभरात प्रत्येक कालखंडात अशी धर्मचिकित्सा त्या त्या कालखंडात त्या त्या धर्मातील समाजसुधारकांनी केलेली आहे. त्यासाठीचे मोलही मोजलेले आहे. महाराष्ट्रातही समाजसुधारकांच्या धर्मचिकित्सेचा वारसा खूप मोठा आहे. जातीयवाद, अस्पृश्यता, धार्मिक कर्मकांडे, रूढी,परंपरा, पुरोहितशाही यांचे अवडंबर माजलेल्या काळात महाराष्ट्रात १९ व्या, २० व्या शतकात हा धर्म चिकित्सेचा वैचारिक संघर्ष अनेक महान समाजसुधारकांनी लढवला. आजकाल धर्म, धार्मिक भावना यांना फारच महत्व आलेले आहे. धर्मासंबंधाची कठोर जाऊ देत पण विधायकपणे केलेली चिकित्साही मान्य केली जात नाही. धार्मिक भावना दुखावल्याच्या नावाखाली प्रचंड गदारोळ माजवला जात आहे.
धार्मिक भावनांचे रूपांतर धर्मांधतेत होत आहे. आज पारंपारिक धार्मिक प्रथा, परंपरा, अनिष्ट रूढी, अवैज्ञानिक कर्मकांडांचे उदात्तीकरण यांना अक्षरश: ऊत आलेला आहे. सण, समारंभाच्या बाजारीकरणाने कळस गाठलेला आहे. धर्म आणि शासनसंस्था यातील सीमारेषा पुसट होत चाललेली आहे. त्यामुळे धर्मचिकित्सेला खीळ बसलेली आहे. अशा वेळेस आपण ज्या समाजसुधारकांचा वारसा मानतो त्यांनी अशाच परिस्थितीला तोंड देत आपले विचार मांडले होते जे आजही आपल्याला मार्गदर्शक ठरतील. म्हणूनच आम्ही आजच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या समाजसुधारकांच्या धर्मचिकित्सेच्या विचारांचा मागोवा घेण्यासाठी हा परिसंवाद आयोजित केला आहे.
