सादिक खाटीक -
सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातल्या शेरेवाडी – आवळाई गावच्या लताताई बाळकृष्ण बोराडे हे नाव आता महाराष्ट्राला हळूहळू परिचयाचे होऊ लागले आहे. त्या एक अशा शिक्षिका आहेत, ज्यांनी स्वतःच्या वैधव्याच्या दुःखावर मात करून गेली 30 वर्षे विधवा महिलांना समाजात मानाचे स्थान मिळावे, विधवांना सुहासिनीचा दर्जा देणारा कायदा अस्तित्वात यावा, विधवा प्रथा बंदीचा कायदा व्हावा, यासाठी कायदा करण्याचा हट्ट वेळोवेळीच्या राज्यकर्त्यांकडे धरला आहे. अर्थातच त्यांची ही वाट बिकटच होती. विधवेने टिकली लावणे, सौभाग्यालंकाराचा पुन्हा वापर करणे, याला कुटुंबाची आणि समाजाची साथ मिळणे मुश्कील असताना त्या गावोगावी विधवांची हिंमत वाढवत फिरल्या. आधी त्यांनी त्यांच्या मनाची तयारी केली. त्यासाठी स्वतः 2004 पासून सौभाग्यालंकार वापरण्यास सुरुवात केली; प्रसंगी लोकांच्या अघोषित बहिष्काराला त्यांना सामोरे जावे लागले; पण त्या डगमगल्या नाहीत. आज त्यांचा विचार गावोगावी रुजताना दिसतोय. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड आणि माणगाव या दोन गावांनी यापुढे आपल्या गावातील विधवांना वैधव्याचे आणि अपमानाचे जिणे जगावे लागणार नाही, यासाठी गावात विधवांचा सन्मान आणि सौभाग्यालंकार वापरण्याबरोबरच गावातील सर्व शुभकार्यांत प्राधान्याने निमंत्रित करण्याचे ठराव झाले आहेत. या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीपासून महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांमध्ये असे ठराव व्हावेत, अशी सूचना केली. त्यानुसार राज्य शासनाने तसे परिपत्रक काढले आहे आणि राज्यातील ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका, महानगरपालिकांमध्येही तसे ठराव होऊ लागले आहेत; पण बदलाची सुरुवात करणार्या लताताई बोराडे आणि त्यांचे आयुष्य जाणून घेणे गरजेचे आहे.
सुमारे 30 वर्षांपूर्वी 19 वर्षांच्या लताताई विवाहानंतर पतीसह मुंबईला निघाल्या. आवळाई माहेर आणि शेरेवाडी सासर या दोन्हींचे मिळूनच आवळाई एकत्रित गाव आहे. मुलीचे कल्याण होईल म्हणून ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणार्या युवकाबरोबर त्यांचे लग्न झाले; पण लग्नानंतर अवघ्या 25 व्या दिवशी त्यांच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. हातातील हिरवा चुडा अजून तसाच होता आणि ही दुर्घटना घडली. पतीच्या मृतदेहावर हातातला चुडा फोडणे, मंगळसूत्र तोडणे, जोडवी काढून घेणे, या सार्या विटंबनेपेक्षा मरण बरे, असे त्यांना वाटून गेले. ‘हे सगळे करण्यापेक्षा पतीसोबत मलाही त्याच अग्नीत लोटून द्या,’ म्हणत सती जाण्याचा आग्रह लताताईंनी धरला; मात्र समाजासमोर व नातलगांसमोर त्यांचे काहीएक चालले नाही. ‘त्या’ विद्रुप अवस्थेतच वैधव्याचा शाप घेऊनच त्यांना माहेरी परतावे लागले; पण या अपमानाचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. ही परिस्थिती बदलायची तर हा विषय लोकांना समजावून सांगीतला पाहिजे आणि लोकांनी आपले ऐकावे, तर त्यासाठी समाजात आपले काही स्थान असले पाहिजे, म्हणून लताताईंनी पुढचे शिक्षण घ्यायचे आणि शिक्षक व्हायचे ठरविले आणि पुढच्या काही वर्षांत अर्धवट राहिलेले शिक्षण व आवश्यक प्रशिक्षण पूर्ण करून त्या शिक्षिका बनल्या. राज्य सरकारने नव्यानेच वस्ती शाळांचे धोरण आखले होते. 20 किंवा त्यापेक्षा थोडे कमी विद्यार्थी जमवून जर एखादा प्रशिक्षित शिक्षक तेथे शाळा चालवत असेल तर त्याला स्वयंसेवक म्हणून काम मिळायचे. अशी स्वयंसेवकाची लताताईंना नोकरी मिळाली. अवघ्या हजार-दीड हजार रुपये पगारावर पुढे 13 वर्षे त्यांना काम करावे लागले. अखेर लताताईंच्या कष्टाचे चीज झाले आणि त्या वेतन आयोगधारक शिक्षिका बनल्या. नोकरीने दिलेले आर्थिक स्थैर्य त्यांच्या निश्चयापासून दूर करू शकले नाही.
आटपाडी तालुका आणि आसपासच्या गावांतील विधवा महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी ‘विधवा महिला विकास प्रतिष्ठान ’नावाने संस्था स्थापन केली. एकाकी पडलेल्या, असहाय्य विधवेच्या पाठीशी इतर महिलांचे पाठबळ उभे करून, संघटितरित्या जाऊन त्यांच्या प्रश्नांबाबत कुटुंबीयांशी चर्चा करण्याचे काम त्यांनी सुरू केले. प्रारंभी त्यांच्या कार्याचे कौतुक व्हायला लागले. मात्र विधवांना समानतेचा हक्क पाहिजे, असे जेव्हा लताताई म्हणत, तेव्हा त्यांना विरोध होऊ लागला.
अगदी आजच्या काळात सुद्धा सकाळच्या वेळी विधवा स्त्री रस्त्यावर दिसली तरी तिला दोष द्यायचा, ‘तुझ्या सकाळच्या दर्शनाने आमच्या दिवसाची वाट लागणार,’ असे हिणवायचे, विधवेचे तोंड बघावे लागले म्हणून तिचे नाव न घेता शिवीगाळ करायची, असे प्रकार सुरूच होते. तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन वडिलोपार्जित इस्टेटीतून तिला बेदखल करायचे, तिचा हक्क डावलायचा. कोणत्याही निर्णयप्रक्रियेत सामील होऊ द्यायचे नाही, असे प्रकार व्हायचे. अशावेळी या महिलांना साथ द्यायला लताताई पुढाकार घ्यायच्या. या दरम्यान त्यांना आणखी एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे पुरुषाच्या बाबतीत अशी घटना घडली आणि त्याची पत्नी वारली तर समाज त्याला; म्हणजे विधुराला दुर्दैवी ठरवत नव्हता. त्याला तत्काळ दुसरा विवाह करण्याची परवानगी असायची. त्याला कोणीही हिणवायचे किंवा बाजूला करायचे नाही किंवा कोणत्याही सणा-समारंभात विधवेचा प्रवेश त्याज्य मानला जायचा; मात्र विधुराला मोकळीक असायची. या विरोधाभासाने लताताईंच्यातील बंडखोरी वाढत गेली.
पतीच्या निधनानंतर त्याच्या मुलाबाळांचा आणि त्याच्या आई-वडिलांचा विधवा स्वीकार करते. त्यांची कर्जेआपली जबाबदारी म्हणून फेडते; पण तरीही त्या कुटुंबात तिला महत्त्वाचे स्थान मिळत नाही. तिच्या म्हणण्याला काही किंमत दिली जात नाही. ‘बायकांची अक्कल चुलीम्होरं,’ म्हणून त्यांचा आवाज दडपला जातो. त्यांना कितीही समजावलं, तरी ते विधवांना सन्मान द्यायला तयार नाहीत, हे लक्षात घेऊन लताताईंनी बंड पुकारले.
2004 मध्ये त्यांनी स्वतःच सौभाग्यालंकार म्हणून कुंकू अथवा टिकली लावणे, दागिने घालणे, जोडवी घालणे सुरू केले. आपल्या या कृतीने इतर महिलांना बळ देईल, हे त्या जाणून होत्या. विशेषत: शहरी किंवा मोठ्या गावातील विधवा महिलांनी त्यांच्याप्रमाणे सौभाग्यालंकार परिधान केले, यानंतर तर ग्रामीण भागात अनेकांनी दबावाचे प्रयत्न सुरू केले. खरे तर वैधव्यामुळे आपल्या मुली घरात मरणप्राय यातना सहन करत जगत आहेत, हे कोणाला सहन होत नाही. अशा मुली आणि विधवा सुनांचे किमान हाल थांबले पाहिजेत, असे प्रत्येकाला वाटते; पण भावकी काय म्हणेल, लोक काय म्हणतील, आपल्या मुलीबद्दल शंका घेतील, अशा अनावश्यक दबावाला बळी पडत पालक आपल्या मुलीच्या या यातना सहन करत राहतात. तोंड दाबून बुक्क्यांचा मार घेण्याचे समाजात सुरू आहे. विधवांची अनेक कुटुंबात अशी हेळसांड सुरू असल्याने लोक नावे ठेवतील, म्हणून विधवेला साधी टिकलीही लावू दिली जात नाही, हे लताताईंच्या ध्यानात आले. त्या टिकली लावण्यास सुरुवात केल्यापासून अनेकांनी आपल्या घरातील महिलांवर त्यांच्याशी बोलणे टाळण्यासाठीही दबाव आणला. एक प्रकारे अघोषित बहिष्काराचा प्रयोग सुरू झाला. महिलांनी त्यांच्याशी संपर्क ठेवू नये, हा दबाव फारसा टिकला नाही; मात्र त्याचा परिणाम झाला. अखेर हा विषय केवळ लोकांना समजावून मार्गी लागू शकत नाही. त्यासाठी कायद्यानेच दबाव वाढवावा लागेल, असे त्यांनी पक्के ठरविले आणि मग सुरू झाला मंत्रिमंडळ पातळीवर पाठपुरावा. एका बाजूला, तक्रार घेऊन येणार्या महिलांच्या बाजूला धावून जायचे आणि दुसर्या बाजूने मंत्री, खासदार, आमदार, विरोधी पक्षाचे नेते यांची भेट घेऊन या सुधारणांचे महत्त्व सांगायचे, अशी दुहेरी कामगिरी लताताई नोकरी सांभाळत करायच्या.
1997-98 पासून त्या मंत्री, आमदार यांना भेटून अथवा पत्रव्यवहाराद्वारे विधवा महिलांना समानतेचा अधिकार द्यावा, सुहासिनीचा दर्जा आणि विधवांना, विधवा न म्हणता ‘सक्षम कुटुंबकर्ती’ संबोधले जावे आणि विधवा महिलांना सौभाग्यालंकार वापरण्यापासून सर्व हक्क समान पद्धतीने देणारा कायदा केला जावा, अशी मागणी त्या वारंवार करीत आल्या आहेत. अनेक नेत्यांनी त्यांच्या या मागणीचे कौतुक केले; मात्र समाज सहजासहजी आपले मत बदलत नसतो. त्यासाठी सामाजिक रेटा निर्माण झाला पाहिजे, तरच सरकारला दखल घेता येईल, असे नेतेमंडळी सांगू लागली. यानंतर निराश न होता लताताईंनी आपल्या कार्याला ‘विधवा महिला मेळाव्या’ची जोड दिली. गावोगावी जायचे, विधवा महिलांना एकत्र करायचे आणि ‘विधवांचे हळदी-कुंकू करणार आहोत,’ असे नीडरपणे सांगून विधवा महिलांना निमंत्रित केले जाऊ लागले. सांगली शहरात वसंतदादा पाटील साखर कारखान्याजवळील डेक्कन हॉलमध्ये प्रसिद्ध साहित्यिक तारा भवाळकर यांच्या उपस्थितीत लता बोराडे यांचे जाहीर कौतुक करणारा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात परिवर्तनवादी संघटना व अंनिसने सहभाग नोंदविला. स्त्री सुधारणेच्या प्रश्नाची जाणीव असलेल्या नीता केळकर यांनीही लता बोराडेंचं याप्रसंगी कौतुक केले. आटपाडी तालुक्यातल्या अनेक गावांमध्येही लताताईंच्या प्रयत्नांना विधवांनी धाडसाने साथ देणे सुरू केले. हे सुरू असतानाच महिलांमध्ये असणारी अंधश्रद्धा, देवाला सोडलेल्या महिलांचे शोषण, महिलांच्या अंगात येणे, जटा ठेवणे, करणी, भानामती, जादूटोणा या विरोधातही लोकांचे प्रबोधन करणे सुरू केले.
आता या कार्याला गती आली आहे. महिला ठामपणे कपाळाला टिकली लावून आपल्याला विधवा म्हणणार्यांना आव्हान देऊ लागल्या आहेत. कोणाच्याही दबावाखाली न राहता आपल्या कुटुंबाच्या हितासाठी त्या झटत आहेत. पतीपश्चात संसार तर त्यांनाच सांभाळावा लागतो; मग अन्याय का, हे प्रश्न महिला उपस्थित करू लागल्या आहेत. त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे नव्या युगातील महिला आपल्या समवयस्क विधवांच्या हक्कासाठी एक होऊ लागल्या आहेत. त्याचेच पडसाद हेरवाड आणि माणगावसारख्या गावातील महिलांनी सूचक, अनुमोदक होऊन विधवांच्या सन्मानाचा प्रस्ताव ठेवला आणि समस्त गावाने तो उचलून धरला. कोल्हापूरच्या प्रागतिक भूमीत संमत झालेले हे ठराव महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात मांडले जाऊ लागले आहेत. राज्य सरकारने आता ही जबाबदारी आपली मानून काम सुरू केले आहे. ‘विधवा प्रथा बंदी’ आणि ‘विधवांच्या सन्मानाचा कायदा करा’, ही लताताईंची मागणी असली तरी त्यांच्या विचारांना समाजमान्यता मिळण्यापर्यंत, सध्या समाजसुधारणा सुरू झाली, हे त्यांच्या आजवरच्या कार्याचे यश आहे. कदाचित पुढच्या टप्प्यात ‘विधवा प्रथा बंदी’चा कायदा आणि ‘विधवांना सुहासिनींचा दर्जा’ देणारा नवा कायदा अमलात येईल, ही खर्या अर्थाने लताताई बोराडेंच्या कार्याची पोहोच पावती असेल.
लताताई बोराडे संपर्क : 99700 28673