मॅग्नेट थेरपी आणि वीरा द विनर!

अनिल चव्हाण -

प्रिन्सिपॉल सर वर्गात आले. ‘गुड मॉर्निंग, सीट डाऊन’ वगैरे झाल्यावर त्यांनी एक सूचना सांगितली. “उद्या आपल्या शाळेत ‘मॅग्नेट थेरपी’वर व्याख्यान आहे. त्याला पालकही उपस्थित राहणार आहेत. तुम्ही मॅग्नेटचा अभ्यास करून या, शंका विचारा; आणि खास वीराकडे वळून म्हणाले, “आपल्या बाल संशोधकांनाही सांगा!” त्यांचा निर्देश स्वरा आणि आदित्यराज यांच्याकडे होता. मग ते वळले विषय शिक्षकांकडे,”वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हे आपल्या शिक्षणाचे ध्येय आहे. पाहूया काय करताहेत मुले!”

दुसरा दिवस उजाडला. पालकसभेला जोडून अभ्यासपूर्ण व्याख्यान असल्याने आता पालकही उत्साहाने हजर राहत. स्वागत आणि ओळखीचे सोपस्कार झाल्यावर मुख्य भाषणाला सुरुवात झाली.

“मी आपल्याला एका बहुपयोगी, चमत्कारी वस्तूची ओळख करून देणार आहे. जगभर या वस्तूने रोग प्रतिबंध आणि रोग उपचार होत असून आपल्या गावी आम्ही ही वस्तू घेऊन आलो आहोत. ती वस्तू आहे, चुंबक! लोहचुंबक!! चुंबकाचा अभ्यास शेकडो वर्षे सुरू आहे. पूर्वी नैसर्गिक धातूचे चुंबक वापरत. आता विद्युत चुंबक तयार केले जातात. चुंबकाची शक्ती ‘गॉस’मध्ये मोजली जाते. विद्युत चुंबकीय क्षेत्रात काम करणार्‍या कामगारांच्या बाबतीत दोनशे ते तीनशे ‘गॉस’ एवढ्या मर्यादेचे विद्युत चुंबकीय क्षेत्र सुरक्षित म्हणून प्रमाणित करण्यात आले आहे, तर पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र अर्धा ‘गॉस’च्या आसपास असते. नैसर्गिक चुंबक उपकरणे, व्यक्तीच्या सान्निध्यात ठेवली, तर ती रक्तातील लोहकणांना आकर्षित करतात. परिणामी त्या अवयवाचा रक्तसंचय वाढतो, रक्ताभिसरण वाढते आणि आजार बरे होतात! हृदयरोग, कॅन्सर, डायबेटीस, रक्तदाब, अनेक रोग यांनी बरे होतात. आम्ही आपल्यासाठी हाय पॉवर चुंबक जोडी, चुंबक माळ, चुंबक पट्टा, चुंबक अंगठी, चुंबक प्लेट, चुंबक शर्ट अशा अनेक वस्तू आणल्या आहेत. त्या शाळेत विकता येत नसल्याने त्यांचे प्रदर्शन रस्त्यापलीकडील हॉलमध्ये लावले आहे. त्यांच्या किमती ५०० पासून ५००० रुपयांपर्यंत आहेत. आपल्या गरजेनुसार वस्तू घ्यावी.” असे बरेच विवेचन झाल्यावर सुरू झाले, शंका-समाधान.

“सर, चुंबकाने ब्लड प्रेशर बरे होते का?” एक प्रश्न आला.

“हो, हो! माझ्याकडे पॉझिटिव्ह रिपोर्ट असलेली उदाहरणे आहेत. तुम्ही चुंबक बेल्ट आणि चुंबक ब्रेसलेट वापरा. आजच्या दिवस सवलत असल्याने त्या वस्तू ५००० पेक्षा कमी किमतीत मिळतील.”

स्वराने बोट वर केले, “सर, चुंबकाने ब्लडप्रेशर कसे बरे होईल?”

निसर्गोपचार केंद्राचे प्रमुख उभे राहिले. “आपल्याला ठाऊक आहे, रक्तात हिमोग्लोबिन असते. त्यात लोहकण असतात. चुंबकाकडे ते आकर्षित होतात. चुंबक लोखंडाला आकर्षून घेतो. परिणामी रक्ताभिसरण जोरात होते, रक्तदोष कमी होतो आणि ब्लड प्रेशर बरे होते. आपल्या विज्ञानाच्या पुस्तकात चुंबकाकडे लोहकण आकर्षिले जातात, याचा प्रयोग दिला आहे.”

वीराने बोट वर केले होते; मात्र तिकडे दुर्लक्ष करून प्रमुख म्हणाले, “अजून काही शंका आहेत का?”

प्रिन्सिपल म्हणाले,”थांबा, या मुलीला काही सांगायचेय. वीरा उभी राहा!”

वीरा उभी राहिली,”सर, रक्तात हिमोग्लोबिन असते. त्यामुळे रक्ताला लाल रंग येतो. हिमोग्लोबिनमध्ये लोह असते, हे खरे आहे. लोहकण चुंबकाकडे आकर्षिले जातात, हे सुद्धा खरे आहे. पण…! पण बंधित स्वरुपाच्या लोहकणांना चुंबक आकर्षित करून घेत नाही. हिमोग्लोबिनमधले लोहकण स्वतंत्र असत नाहीत. ते बंधित असतात. रेणुंशी बांधलेले असतात. त्यावर चुंबकाचा काहीच परिणाम होत नाही.”

“नाही कसे?” आपला मुद्दा खोडला गेल्याने प्रमुख संतापले. मात्र संयम ठेवत त्यांनी पुन्हा तोच मुद्दा गिरवला, “शरीरातले रक्त कमी झाले, तर डॉक्टर आपल्याला लोहाच्या गोळ्या देतात. त्यांनी हिमोग्लोबिनमध्ये वाढ होते, तांबड्या पेशी वाढतात. आपल्या जेवणात वांग्याची भाजी असेल तर त्यातूनही लोह मिळते!”

“हे सर्व ठीक आहे; पण रक्तातले किंवा वांग्यातले लोहकण चुंबकाकडे आकर्षित होत नाहीत. आपण ते प्रयोगाने पाहू शकतो.”

वीराने असे म्हणताच आदित्यराज उभा राहिला. त्याच्या एका हातात वांगे, तर दुसर्‍या हातात चुंबक होता. तो चटकन पुढे झाला. त्याने वांग्याच्या वर चुंबक धरला. वांगे आकर्षित झाले नाही!

स्वरा पुढे आली, “मी बकर्‍याचे रक्त आणले आहे.” तिने काचेची बाटली वर केली. चुंबक जवळ नेला, तरी रक्तात कोणतीही हालचाल दिसली नाही.

“म्हणजे चुंबकाकडे रेणुंमध्ये बांधलेले लोहकण आकर्षाने जात नाहीत.” तिने निष्कर्ष सांगितला.

“शिवाय चुंबकाची प्रभावशक्ती कितीशी आहे, हेही पाहता येईल!”

“मी लोहचुंबक या पातळ कागदवर धरते. त्याखाली टाचण्या आहेत. कागदावर चुंबक ठेवू!” तिने कागदावर चुंबक धरला. टाचण्या कागदाला चिकटल्या!

त्यानंतर त्यांनी मध्ये दहा कागद घातले. “१० कागदांची जाडी एक मिलिमीटर आहे. पाहूया काय होते!”

एक मिलिमीटर अंतराच्या खाली चुंबकाचा प्रभाव जाणवला देखील नाही.

“म्हणजे एक मिलिमीटर जाडीच्या त्वचेखालील रक्तावर चुंबकाचा परिणाम होत नाही. म्हणजे चुंबकाने रक्ताभिसरण सुधारणे शक्य नाही!”

प्रमुखांनी माईकचा ताबा घेतला आणि म्हणाले, “आमच्याकडे उपचार घेणारे शेकडो पेशंट आहेत, ते सर्व काय मूर्ख आहेत? ज्यांना हवे असतील त्यांनी रस्त्यावरील आमच्या स्टॉलला भेट द्यावी!”

आता विज्ञान शिक्षक पंडित पाटील उभे राहिले.

“सर आपल्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल, तर आपण रोग उपचार करू शकत नाही, उपचार करण्याच्या वस्तू विकू शकत नाही. तो कायद्याने गुन्हा आहे. पूर्वीच्या काळी लोहचुंबकाचे गुणधर्म चमत्कारिक वाटत होते. आता संशोधन झाले आहे. चुंबक मानवी शरीरावर काहीही परिणाम करत नाही, हे सिद्ध झाले आहे. हे प्रयोगाने सिद्ध करणार्‍या वीरा आणि तिच्या भावंडांचे अभिनंदन करतो! अभिनंदन टाळी जोर से शुरू!”

मुलांनी टाळ्यांचा ताल धरला!

“एक, दोन! एक, दोन, तीन!

एक, दोन! एक, दोन, तीन! एक, दोन, तीन!”

मागून आवाज आला, “वीरा द विनर! वीरा द विनर!”

अनिल चव्हाण, कोल्हापूर

संपर्क : ९७६४१४७४८३


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]