लोकमाता अहिल्यादेवी होळकर

अनिल चव्हाण -

अण्णासाहेब डांगेंनी आपल्या पुस्तकात एक अनुभव लिहिला आहे… १९९५ साली ते इंदुरास गेले होते. तिथे मुलांसाठी मिठाई घेण्यासाठी ते एका दुकानात गेले. म्हणाले, “चांगली आहे ना? भेसळ वगैरे नाही ना?”

त्या दुकानदाराने उत्तर दिले, “भाईसाब, आपका दिल चाहे तो आप खरीद लो, या छोड दो! लेकिन एक बात ध्यान रखना, अहिल्या माँ की भूमी है ये! उन्होंने हमे बेइमानी से बिजनेस करने को नही सिखाया!”

हा अनुभव त्यांना खूप ठिकाणी आला!

आजही इथली सामान्य जनता आपल्या नैतिक वर्तनासाठी, अडीचशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्यादेवींचा आधार घेते. याचे रहस्य शोधावे म्हणून, मी आमच्या भागातील सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत बबनराव रानगे यांची भेट घेतली, आणि चर्चा केली. त्यांनी आपल्याकडील ग्रंथ संग्रह माझ्यासमोर ठेवला!

त्यांच्या प्रयत्नाने महापालिकेने नुकतेच अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक कोल्हापुरात उभे केले आहे. ते बहुधा अहिल्यादेवींचे भारतातील पहिले स्मारक आहे. आपल्या उज्ज्वल कार्याने ‘देवी’ ही पदवी प्राप्त करून घेणार्‍या अहिल्याबाई होळकर यांच्या व्यक्तिमत्वाने अनेकांना मोहिनी घातली आहे.

मालव प्रांत बाजीराव पेशव्यांनी काबीज केल्यावर तेथे अनुशासनासाठी तीन मराठी घराण्यांची स्थापना केली. उज्जैन येथे शिंदे, धार देवास येथे पवार, तर इंदोरला मल्हारराव होळकर यांना सुभेदारी दिली. मल्हारराव होळकर यांच्या सूनबाई म्हणून अहिल्याबाई इतिहासात गाजल्या. एकापाठोपाठ अनेक आघात झाले, तरी त्यांनी ते झेलले आणि धडाडीने आयुष्याची वाटचाल केली. एक आदर्श निर्माण केला!

मल्हारराव आणि गौतमाबाई यांना १७२३ साली पहिला पुत्र झाला. त्याचे नाव ‘खंडेराव.’ त्यांचे लग्न सतराशे सदतीस साली अहिल्यादेवी यांच्याशी पुण्यात झाले.

बीड तालुयातील चौंडी गावचे धनगर पाटील, माणकोजी शिंदे यांच्या त्या कन्या. त्यांचा जन्म १७२५ सालचा. म्हणजे लग्नाच्या वेळेस त्या बारा वर्षांच्या होत्या.

अहिल्याबाईंना सासू-सासर्‍यांनी स्वतःच्या मुलीप्रमाणे वागवले! लष्कर, छावण्या, रणांगण, दरबार, राज्यकारभार यांचा परिचय करून दिला!

अहिल्याबाई दौलतीचा कारभार सांभाळू लागल्या, पण त्यांच्यावर मोठा आघात झाला.

१७५४ मध्ये एका लढाईत तोफगोळा अंगावर पडून खंडेराव होळकर मृत्यू पावले. त्या वेळीच्या रिवाजाप्रमाणे अहिल्यादेवींनी सती जाण्याची तयारी केली, पण मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाण्यापासून परावृत केले. इतर पत्नी मात्र सती गेल्या. पुढे अहिल्याबाईंच्या सासूबाई गौतमाबाई मृत्यू पावल्या. सासरे मल्हारराव होळकरही वारले. मुलगा मालेराव वारला. त्याच्या पत्नी सती गेल्या! अहिल्याबाईंना जगण्याची आशा म्हणून वंशाची मुलगी मुक्ता हा एकच तंतू राहिला. पण मुक्ताचा मुलगा म्हणजे अहिल्याबाईंचा नातू वारला. त्याच्या शोकाने जावई यशवंतराव फणसे वारले! मुलगी मुक्ता सती गेली!!

सुमारे २९ वर्षे, त्यांनी दौलत सांभाळून अनेक धर्मकृत्ये केली. सामाजिक कामे केली! आज त्यांची कीर्ती सर्वत्र पसरलेली दिसते ती नेमकी कशामुळे हे आपण पाहिले पाहिजे.

धार्मिक कृती :-

अहिल्यादेवींनी अनेक देवालये बांधली. अनेक देवालयांना वर्षासने नेमून दिली! त्या स्वतः धर्मपरायण होत्या! त्यांचा फोटो किंवा पुतळा पाहिल्यास त्यांच्या हातात महादेवाची पिंड दिलेली दिसेल! उपवास-तापास आणि पूजाअर्चा यामध्ये त्यांचा वेळ जात असे, अशी वर्णने वाचायला मिळतात!

ही लेखकांची चलाखी आहे. अशाच लेखकांनी छत्रपती शिवरायांना गो ब्राह्मण प्रतिपालक ठरवले होते. त्यांचा जन्म १७२५ सालचा, तर मृत्यू १७९५ सालचा !

हा पेशवाईचा सुवर्णकाळ आहे ! मराठी राज्य स्थिर झाल्यावर समाजाला फावला वेळ मिळाला. हा वेळ धार्मिक कार्यामध्ये आणि धार्मिक अवडंबर वाढवण्यासाठी वापरला गेलेला दिसतो! पेशव्यांच्या राज्यात वर्णवर्चस्व, ब्राह्मणी वर्चस्व वाढले! इतर जातींवर अनेक बंधने आली. याच काळात दलितांच्या गळ्यात मडके आणि पाठीला झाप बांधण्यात आला!

लढाईत मर्दुमकी गाजवल्यावर इतर समाजातही सरदारकी मिळाली; सत्ता आणि पैसा आला. तेव्हा ते धार्मिक प्रतिष्ठा वाढवण्याच्या मागे लागले. पेशव्यांचे अनुकरण करू लागले! पूर्वीपासून सुरू असलेली सती प्रथा या नवश्रीमंत घराण्यांनी स्वीकारली! धार्मिक कृत्ये वाढली. अहिल्यादेवींच्या राज्यातही असेच झाले, पण त्यांनी जातिभेदाला थारा दिलेला दिसत नाही!

पेशवाईत महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, पण अहिल्यादेवींना त्यांच्या माहेरी आणि सासरी दोन्ही ठिकाणी राज्यकारभाराचे चांगले शिक्षण मिळालेले दिसते!

या काळात देव, धर्म, भक्ती आणि नीती हातात हात घालून चालताना दिसतात! अहिल्यादेवींच्या जीवनात ह्या गोष्टींचा प्रभाव होता का? दिवसभर पूजाअर्चा, धार्मिक कार्य, पुराणकथा श्रवण, ब्राह्मण भोजने अशा धार्मिक कार्यात मग्न राहणे, हे लोकप्रियतेचे कारण असेल का? आणि यात सगळा वेळ जात असेल तर त्या राज्यकारभार कधी करतील? हे शय नाही !

मग त्यांची कीर्ती दिगंत होण्याचे हे कारण आहे काय?

इतिहासात धार्मिक राजांची कमी नाही! हजारो ब्राह्मण भोजने घातल्याच्या कहाण्या राजे लोकांच्या नावावर प्रसिद्ध आहेत! प्रत्येक गावात देवळे आहेत! म्हणजे देवळांचे कर्तेही हजारो, लाखो आहेत. या धार्मिक लोकांची नावे आपल्याला माहीत नाहीत! कोणी त्याची चौकशी करू इच्छित नाही!

म्हणजे धार्मिक कार्य हे काही कीर्ती वाढवण्यासाठी फारसे उपयोगी नाही! अहिल्यादेवींच्या किर्ती मागे इतर कोणती कारणे आहेत याचा शोध घेतला पाहिजे!

समाजासाठी काही केले असल्याशिवाय समाज इतकी वर्षे त्यांचा आदर्श सांगत राहणार नाही!

न्यायप्रियता ः समाजात विविध कारणांनी झगडे, तंटे सुरू असतात. एकमेकांबद्दल तसेच अधिकार्‍याबद्दल तक्रारी सुरू असतात! आज न्यायदान आणि कोर्टकचेरी सर्वसामान्यांच्या आवायात राहिलेल्या नाहीत! कोर्टाचा उपयोग न्यायदानापेक्षा एक वेळ काढण्याचे, वेळ मारून नेण्याचे, विरोधकाला त्रास देण्याची हत्यार म्हणून केला जातो. न्यायाला विलंब म्हणजे अन्याय होय, याची प्रचिती जागोजाग येते.

अहिल्यादेवींची कीर्ती न्यायप्रिय म्हणून आहे. आपले न्यायदान जास्तीत जास्त योग्य झाले पाहिजे, यावर त्यांचा कटाक्ष होता! त्यांच्या राज्यातीलच नव्हे, तर आसपासच्या राज्यातील जनता सुद्धा त्यांच्याकडे न्याय मागायला येत असे! जनतेला न्यायासाठी काहीही पैसा खर्च करावा लागत नसे.

आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही, याची खात्री देण्यासाठी त्या आपल्यासोबत महादेवाची पिंड ठेवत. त्या म्हणत, “सत्तेच्या, धनदौलतीच्या जोरावर मी जे काही करते, त्याचा जाब मला परमेश्वरापुढे द्यावा लागणार आहे; प्रजा म्हणजे माझी लेकरे. त्यांचा सांभाळ तन, मन, धन खर्च करून, प्रेमाने, मायेने करण्यासाठी परमेश्वराने आपणास जन्म दिला आहे!

नैतिकता सचोटी, प्रामाणिकपणा, सत्य, अशा नैतिक मूल्यांवर त्यांचा जोर असे. तीच शिकवण आपल्या आचरणातून त्यांनी जनतेला दिली!

शासकीय खजिना आणि खाजगी उत्पन्न या दोन्ही ठिकाणी त्यांचा हिशोब व्यवस्थित असे. लढाईतील लूट सरकारी खजिन्यातच भरली पाहिजे, घरी आणता कामा नये, हे आपल्या कृतीतून त्यांनी पतीलाही दाखवून दिले!

साधेपणा आपल्याच राज्यात तयार झालेली साधी पांढरीशुभ्र साडी आणि घोंगड्याचा बिछाना, त्या वापरत. श्रीमंती पायाशी लोळण घेत असताना सुद्धा इतया साध्या राहणीमानामुळे, त्यांची सर्वत्र छाप पडत असे!

प्रजेची काळजी त्यांच्या राज्यात खेमदास नावाच्या सावकाराचे निधन झाले. त्याची पत्नी विधवा झाली! ती निपुत्रिक होती. तिने दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. पण कमाविसदाराने, म्हणजे कर वसूल करणार्‍या अधिकार्‍याने दत्तकाला मजुरी देण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागितली! हताश झालेली विधवा महेश्वरास आली. तिला विनाविलंब दरबारात प्रवेश मिळाला. तिची तक्रार ऐकून घेतली गेली आणि त्या कमाविसदाराला शिक्षा करण्यात आली!

मोहितपूरचा मामलेदार दुप्पट कर वसूल करत होता. कर दिला नाही तर जुलूम करत असे, वेठ बिगारी करायला लावीत असे. ही तक्रार आल्याबरोबर अहिल्यादेवी स्वतः घोड्यावर बसून सैनिक तुकडीसह मोहितपूरला गेल्या. त्यांनी प्रजेची सभा बोलावली आणि चौकशी करून अधिकार्‍याला कडक सजा दिली.

सामाजिक सुधारणा

सती प्रथा खंडेरावांच्या इतर बायका सती गेल्या, पण अहिल्यादेवींना सासर्‍यांनी सती जाण्यापासून रोखले! सती आणि तिचा पती तसेच सासर आणि माहेरच्या ४२ पिढ्या कोटी वर्षे स्वर्गात राहणार, अशा आमिषांचा त्यांच्यावर परिणाम झाला नाही! अर्थात, त्यांचे विचार इतर बायकांपर्यंत पोहोचले नाहीत.

विधवेला दत्तक घेण्याचा अधिकार मनुस्मृतीप्रमाणे महिलेला बापाच्या, नवर्‍याच्या किंवा मुलाच्या संपत्तीत वाटा मिळत नाही. तिची परिस्थिती अत्यंत हलाखीची बनते. अहिल्यादेवींनी विधवा महिलांना दत्तक घेण्याचा अधिकार दिल्यामुळे, त्या नवर्‍याच्या संपत्तीचा उपभोग घेऊ शकल्या!

स्त्री शिक्षण राघोबादादा पेशवे अहिल्यादेवींवर चालून आले तेव्हा अहिल्यादेवींनी त्यांच्यासमोर महिलांची पलटण उभी केली!

म्हणजे महिलांनाही त्यांनी लष्करी शिक्षण दिलेले होते!

राजकुमारीचा आंतरजातीय विवाह राज्यात धुमाकूळ घालणार्‍या आणि प्रजेची लूट करून त्यांना त्रास देणार्‍या चोर, लुटारू, दरोडोखोरांचा बंदोबस्त करणार्‍या तरुणाशी आपल्या मुलीचा विवाह लावून देण्याचा त्यांनी पण जाहीर केला.

पण जिंकणारा कोणत्याही जातीचा, उच्च किंवा नीच जातीचा, वेगळ्या धर्माचा असू शकतो हे ठाऊक असूनही त्यांनी अशा तर्‍हेचा पण लावला होता.

यशवंत फणसे या आदिवासी युवकाने हा पण जिंकला; तेव्हा त्याचा आंतरजातीय विवाह लावून देण्यात आला.

विषमतेचे बळी ठरलेल्यांचा उद्धार सामाजिक विषमतेचे बळी ठरलेले बंजारा, भिल्ल, गोंड, गोवारी, रामोशी, पारधी यांसारख्या आदिवासी जमातीचे लोक, आपल्या उपजीविकेसाठी चोर्‍या, लुटालूट, दरोडे आदी गुन्हेगारी कृत्ये करत असत!

अहिल्यादेवींनी जागोजागी चौया बसून त्यांना संरक्षण करण्याच्या कामावर ठेवले! त्यामुळे गुन्हेगारी तर कमी झालीच, पण या जमाती मुख्य प्रवाहात आल्या!

लोकोपयोगी बांधकामे आपल्या देशातील पाण्याची व्यवस्था पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे! पाणी अडवले तर ते वर्षभर वापरता येते. अहिल्यादेवींनी जागोजागी विहिरी, तलाव, पाणपोई यांच्या सोयी केल्या.

त्या काळी यात्रेकरूंसाठी आजच्याप्रमाणे हॉटेल अथवा लॉज यांची सोय नव्हती! अहिल्यादेवींनी धर्मशाळा बांधल्या.

नदीत पाणी असले तरी पाण्यात उतरण्याची सोय असेल, तरच त्याचा उपयोग करता येतो. अहिल्यादेवींनी नद्यांना घाट बांधण्याचे काम केले.

त्या काळी बैलगाड्या आणि बैल त्यांच्या पाठीवर लादून व्यापारी माल इकडून तिकडे नेत असत. अहिल्यादेवींनी याकरिता प्रशस्त मार्ग बांधले!

राज्यभर कुठे ना कुठे अहिल्यादेवींची ही बांधकामे सुरूच असत. त्यामुळे पाथरवट, वास्तुशिल्पी, शिल्पकार, गवंडी, लोहार, सुतार, सोनार, चर्मकार लोकांच्या हाताला काम मिळत असे. यावरून अहिल्याबाईंची टाकी असा वाप्रचार प्रसिद्ध झाला!

सर्वाभूती परमेश्वर अहिल्यादेवींनी मुया प्राण्यांवरही दयाभाव दाखवला आहे! शेतकर्‍याला पैसे देऊन पिकलेले धान्याचे शेत पाखरांना खाण्यासाठी सोडले जाई. माशांना पीठ, मुंग्यांना साखर आणि भटया जनावरांना भाकरी घालण्यासाठी तरतूद केलेली असे .

पर्यावरण चक्र सुरू राहायचं असेल तर सर्व मुके प्राणीही जगले पाहिजेत.

उद्योगधंद्यांना प्रोत्साहन अहिल्यादेवींनी संस्थानाची राजधानी महेश्वर या ठिकाणी आणल्यानंतर उद्योगधंद्याला प्राधान्य दिले. वस्त्रोद्योग भरभराटीला आणला. वस्त्रोद्योगासाठी, विणकर, कोष्टी, हलबा यांना काम मिळाले. व्यापार वाढला!

कलाकार, साहित्यिक, कारागीर अशा गुणी लोकांनाही त्यांनी मदत केली.

धर्मनिरपेक्षता अहिल्यादेवींनी अनेक मंदिरांची बांधकामे केली. पण कुठेही इतरांची प्रार्थनास्थळे पाडल्याचा उल्लेख नाही. इतर प्रार्थनास्थळांनाही त्यांनी मदत केलेली आहे! आजच्या राज्यकर्त्यांनी याचा आदर्श घेतला पाहिजे!

समतेची भावना पेशवाईच्या काळात जात पाहून वागणूक मिळत असे. न्यायदान सुद्धा जातीप्रमाणे होई! ही विषमता होळकरांच्या राज्यात नव्हती! तिथे सर्व जातींना समान वागणूक मिळत असे!

तलवारबाजी त्या काळी वाहतुकीसाठी आणि लढाईसाठी आवश्यक असणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घोडेस्वारी आणि तलवारबाजी. या दोन्हींमध्ये अहिल्यादेवी तरबेज होत्या.

डू ड्रेनेक या फ्रान्स आणि जे पी बॉयड या अमेरिकन सेनापतींची नियुक्ती करून त्यांनी आपले लष्कर अद्ययावत ठेवले होते. भंडारी माजवणार्‍या चंद्रावताच्या विरोधात त्या रणांगणात उतरल्या होत्या!

रघुनाथराव पेशव्यांच्या विरोधात महिलांची पलटण उभी करून त्या लढाईस सज्ज झाल्या होत्या. त्यांच्या एखाद्या फोटोत हातात तलवार दाखवायला हरकत नाही!

चिंतन अहिल्यादेवी धार्मिक पुराणकथा ऐकत होत्या असे म्हटले जाते. पण त्यांनी या कथांचे चिकित्सकपणे चिंतन केलेले दिसते. त्यामुळे त्यांनी या कथांमधील चांगल्या गोष्टी स्वीकारल्या आणि चुकीच्या प्रथांना फाटा दिला! असे त्यांच्या वर्तनावरून म्हणता येते!

एकूणच काय, अहिल्यादेवी होळकर या हातात महादेवाची पिंड घेऊन दिवसभर पूजाअर्चा आणि धार्मिक कार्यात गुंतलेल्या साध्या धर्मभोळ्या महिला नसून त्या एक विचारवंत, पुरोगामी, समाजसुधारक, प्रजाहितदक्ष, लोकमाता होत्या!

त्यांच्या चरित्रावर चढवलेली धार्मिक पुटे बाजूला करून त्यांच्या कार्याचा चिकित्सकपणे अभ्यास केला तरच त्यांच्या लोकप्रियतेचे गमक लक्षात येईल !

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने त्यांच्या कार्याला सलाम…

लेखक संपर्क – ९७६४१ ४७४८३

संदर्भ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर -अण्णा डांगे

पुरोगामी राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर – होमेश भुजाडे

मातोश्री अहिल्याबाई : – इंजिनियर सिद्दिकी

(हा लेख लिहिण्यासाठी बबनराव रानगे यांचे सहाय्य झाले आहे.)


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]