अंनिसच्या महिला विभागाच्या वतीने राज्यभर आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

नीता सामंत -

8 मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘महाराष्ट्र अंनिस’च्या वेगवेगळ्या शाखांनी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत

वर्धा अंनिस :

‘म.अंनिस’च्या वर्धा शाखेने महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांचा सत्कार केला. महिलांमध्ये निर्माण होणार्‍या मानसिक समस्या व त्यावरील उपाय, कौटुंबिक वाद व त्यावरील कायदेशीर सल्ला आणि महिला-युवतींमध्ये असलेल्या अंधश्रद्धा या सर्व विषयांवर महिलांबरोबर संवाद साधला. जवळजवळ 150 महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. मानसिक आरोग्य विभागप्रमुख डॉ. रुपाली सरोदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा कायदेविषयक सल्लागार अ‍ॅड. पूजा जाधव, जिल्हाध्यक्ष नरेंद्रकुमार कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश रंगारी, जिल्हा कार्याध्यक्ष प्रियदर्शना भेले व इतर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

अंबरनाथ अंनिस :

अंबरनाथ शाखेने महिला दिनानिमित्त दि. 6 मार्चला वडवली विभागात असंघटित क्षेत्रात आणि घरकाम करणार्‍या दीडशे महिलांशी संवाद साधला. आठ मार्चला भारत गॅस कंपनीतील 20 महिला व पुरुष कर्मचार्‍यांसाठी महिला दिनाचा कार्यक्रम झाला. 10 मार्चला परिवर्तन संस्थेने ज्ञानामृत विद्यालय, अंबरनाथ येथे 70 प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी कार्यक्रम घेतला. महिलांचे आरोग्य आणि आर्थिक सबलीकरण या विषयावर ‘अंनिस’ कार्यकर्त्या किरण जाधव यांनी मार्गदर्शन केले.

सोलापूर अंनिस :

सोलापूर शाखेतर्फे वसुंधरा वरिष्ठ महाविद्यालयात ‘महिला आणि वैज्ञानिक दृष्टिकोन’ यावर राज्य महिला विभाग सदस्या प्रा. उषा शहा यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास 80 विद्यार्थिनी प्राचार्य आणि प्राध्यापक उपस्थित होते.

अहमदपूर अंनिस :

अहमदपूर शाखेने 13 मार्चला महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांचा समाजप्रबोधिनी पुरस्कार देऊन डॉ. विठ्ठलराव लहाने, आमदार बाबासाहेब पाटील, डॉ. धीरज देशमुख यांच्या हस्ते सत्कार केला. यामध्ये मंगला मस्के, कलावती भातांब्रे, मंजू निंबाळकर, उषा भोसले, माही आरदवाड, नुतन केंद्रे, अंजुम काजी, सुजाता तावडे, शिल्पा गिते, अनुसया पांचाळ, विजया भुसारे, जना मोरे, सुप्रिया पांढरे, रेखा पांचाळ, अ‍ॅड. पूनम भराडीया, मुयरी जाधव, लता लोभे यांचा समावेश होता. अहमदपूर शाखेचे कार्याध्यक्ष मेघराज गायकवाड यांच्या बरोबरीने सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.

भोर अंनिस :

‘अंनिस’ शाखा भोर यांच्या वतीने अनंतराव थोपटे महाविद्यालय व फार्मसी महाविद्यालयामध्ये 269 विद्यार्थिनींचे हिमोग्लोबिन तपासणी व औषधोपचार शिबीर झाले. राजगड ज्ञानपीठाच्या मानद सचिव स्वरुपा थोपटे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. ‘अंनिस’ राज्य सल्लागार समिती सदस्य डॉ. अरुण बुरांडे यांनी जागतिक महिला दिनाचा इतिहास व हा दिवस साजरा करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. हिमोग्लोबिन तपासणी करून लोहाच्या कमतरतेनुसार दोन-तीन महिन्यांच्या गोळ्यांचे वाटप केले. भोर शाखा सल्लागार डॉ. सुरेश गोरेगावकर, कॉ. ज्ञानोबा घोडे, कार्याध्यक्ष सविता कोठावळे विविध उपक्रम विभागाचे राज्य कार्यकारी समिती सदस्य धनंजय कोठावळे, डॉ. विद्या बुरांडे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला.

जयसिंगपूर अंनिस :

जयसिंगपूर शाखेच्या नीलम माणगावे यांनी जे. जे. मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजच्या एनएसएस शिबिरामध्ये महिला दिनानिमित्त स्त्री-पुरुष समानतेपासून स्त्री-पुरुष लैंगिकतेपर्यंत अनेक विषयांवर गप्पा स्वरुपात संवाद साधला. जवळजवळ दीडशे विद्यार्थी उपस्थित होते. कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील कारदगा (कर्नाटक) येथे नीलम माणगावे यांनी एका दुर्गा मंदिरात जाऊन शंभर पुरुष आणि साठ-सत्तर महिलांशी संवाद साधला. ‘स्त्री-पुरुष समानता’, ‘महिला आणि अंधश्रद्धा’ या विषयांवर ग्रामीण लोकांच्या पचनी पडेल अशा भाषेत त्यांच्याशी गप्पा मारल्या. या कार्यक्रमाच्या वेळी महिलांसाठी खुर्च्यांची सोय करून पुरुषांना जमिनीवर बसवले होते.

चाकण अंनिस :

चाकण शाखेतर्फे ज्ञानवर्धिनी विद्यालय, चाकण आणि आमदार सुरेशभाऊ गोरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चाकण येथे महिला दिन उत्साहात साजरा केला. चाकण परिसरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणार्‍या महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला. विद्यालयात शिक्षकांमार्फत विविध स्टॉल्स लावण्यात आले.

नागपूर अंनिस :

नागपूर शाखेतर्फे विविध क्षेत्रांत कार्य करणार्‍या ‘हिरकणीं’चा सत्कार करण्यात आला. ‘नॅशनल वुमन्स एक्सलन्स अवॉर्ड’ मिळवणार्‍या व सामाजिक, शैक्षणिक कार्यामध्ये उल्लेखनीय काम करणार्‍या प्रा. पुष्पाताई धोंडगे, शाळाबाह्य मुलांना गोळा करून शिकवणार्‍या आणि रेडलाईट परिसरातील महिलांच्या पुनर्वसनासाठी मोलाचे कार्य करणार्‍या श्वेता गजभिये-पाटील, अनाथ मुलींना दत्तक घेऊन संगोपन करणार्‍या व बेरोजगार महिलांना आर्थिक स्रोत उपलब्ध करून देणार्‍या वंदनाताई लांजेवार, वृद्धाश्रम चालवून अनाथांची आई झालेल्या बेबीताई रामटेके; तसेच अल्पशा काळात ‘महाराष्ट्र अंनिस’साठी शतकांच्या वर वार्तापत्र सदस्य करणार्‍या माधुरी मेश्राम या ‘हिरकणीं’चे अनुभवकथन ऐकून त्यांचा सत्कार करण्यात आला. ‘अंनिस’ राज्य कार्यकारणी सदस्य रामभाऊ डोंगरे आणि कार्यकर्त्या विजयाताई श्रीखंडे आणि इतर सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

पालघर अंनिस :

पालघर शाखेने जागतिक महिला दिनानिमित्त पाच ठिकाणी कार्यक्रम घेतले. त्यातील दोन कार्यक्रम अण्णा कडलासकर व राजेश कुमावत यांनी दाभोळ व रणकोळ येथे महिलांबरोबर जाहीर संवादाचे घेतले व ग्राममंगल मुक्त शाळा, ऐना येथे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ प्रा. रमेश पानसे यांच्या शाळेत एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांची सुखद भेट प्रेरणा देणारी ठरली. वसई आणि दिवाणपाडा डहाणू येथील महिलांना एकत्र बोलावून ‘महिला सक्षमीकरण’ आणि ‘महिला आणि अंधश्रद्धा’ यावर मार्गदर्शन केले. डहाणू ‘अंनिस’चे कार्याध्यक्ष यांनी मेहनत घेऊन एकाच दिवशी तीन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले.

सातारा अंनिस :

सातारा शाखेतर्फे शिवमनगर (शाहुपुरी, सातारा) येथे महिलांसाठी विविध उपक्रम गाणी, नकला, संगीत खुर्ची आणि त्याचबरोबर प्रबोधन असा कार्यक्रम घेतला. वैज्ञानिक दृष्टिकोन वापरल्यास व्यक्तिगत व सामाजिक पातळीवर महिला सक्षम होतील, अशी मांडणी करत ‘अंनिस’ कार्यकर्त्या वंदना माने यांनी महिलांबरोबर संवाद साधला. समाजकार्य, क्रीडा आणि इतर विभागांत उत्कृष्ट कार्य करणार्‍या महिलांचा सत्कार करण्यात आला.

ठाणे अंनिस :

‘अंनिस’च्या ठाणे शाखेतर्फे आठगावजवळील चिंचेचा पाडा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत वेगवेगळे चमत्काराचे प्रयोग करून त्यामागील विज्ञान समजावून सांगितले गेले. कार्यक्रमाची सुरुवातच पाण्याचा दिवा लावून झाली. कलशातून पाणी काढणे, नारळातून लाल कापड काढणे, त्रिशुळाच्या सहाय्याने कलश उचलणे, खिळ्यांच्या पट्ट्यावर झोपून त्यावर खिळ्यांचा पाट ठेवणे व त्यावर एक मुलगी उभी करणे, असे वेगवेगळे प्रयोग करून त्यामागचे विज्ञान सगळ्यांना समजावून सांगितले. बाबा- बुवा-महाराज आपल्याला कसे फसवतात आणि त्यांच्या आहारी कसे जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले. अजय भोसले, कामिनी आढाव आणि वंदना शिंदे यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

डोंबिवली अंनिस :

‘अंनिस’ डोंबिवली शाखेतर्फे 10 मार्च रोजी सावित्रीबाई फुले स्मृतिदिन व महिला दिनानिमित्त ‘चमत्कार व त्यामागील विज्ञान’ हा समाजप्रबोधन आणि चमत्काराच्या प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. राजेंद्र कोळी, बबन नागले सर, अर्चना कुमावत, सविता पवार, उदय देशमुख सर आणि संध्या देशमुख यांनी प्रात्यक्षिके करून त्यामागचे विज्ञान उलगडून दाखवले.

मोहने अंनिस :

‘अंनिस’ शाखा मोहने गाळेगाव येथील चमत्कार प्रशिक्षण घेतलेल्या अश्विनी माने, सुनीता चंदनशिवे, सरिता ससाणे, शर्मिला शिंदे व गौतम मोरे यांनी महिलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, त्यांच्या मनातील अंधश्रद्धा नाहीशा होऊन चिकित्सक दृष्टी निर्माण व्हावी, म्हणून चमत्काराच्या सादरीकरणाचे आयोजन केले होते. यावेळी 150 महिला उपस्थित होत्या. अशीच हातचलाखी बाबा, बुवा, महाराज करतात म्हणून प्रत्येक महिलेने चिकित्सक बनले पाहिजे, असे आवाहन महिला दिनाच्या निमित्ताने करण्यात आले.

इस्लामपूर अंनिस :

इस्लामपूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमधील सावित्रीबाई फुले युवती मंच आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. प. रा. आर्डे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी प्रा. आर्डे म्हणाले की, स्त्रियांच्या अधोगतीला कारण ठरलेल्या अंधश्रद्धांचा उगम धर्मव्यवस्थेतून होतो, अशी व्यवस्था बदलली पाहिजे आणि अंधश्रद्धा नष्ट करून समतेचा विचार समाजाच्या सर्व स्तरांत रुजला पाहिजे. महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या जनरल सेक्रेटरी सरोज पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. सरोज पाटील म्हणाल्या, आज विज्ञानाने कितीही प्रगती केलेली असली, तरी पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रियांचे स्थान दुय्यम आहे. पुरुषांनी त्यांच्या विरोधात उभं राहण्यापेक्षा त्यांच्या बरोबरीने उभं राहायला हवं आणि तिला सन्मान द्यायला हवा, तरच ही समाजव्यवस्था बदलू शकेल.

कोल्हापूर ‘अंनिस’च्या कार्यकर्त्या सीमा पाटील यांनी ‘व्हय, मला मास्तरीन व्हायचंय…’ हा एकपात्री प्रयोग सादर केला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सरोज पाटील यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी स्वागत केले. सावित्रीबाई फुले युवती मंचच्या अध्यक्षा प्रा. माधुरी पाटील यांनी प्रास्ताविक केले.

संकलन नीता सामंत,

राज्य महिला सहभाग विभाग, चाळीसगाव


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ]