परमेश्वराची रिटायरमेंट आणि डॉ. लागू

अनिल चव्हाण - 9764147483

आपल्या अभिजात अभिनयाने मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी पन्नास वर्षे गाजवलेले ज्येष्ठ कलावंत नटसम्राट डॉ. श्रीराम लागू नुकतेच काळाच्या पडद्याआड गेले. अभिनयाबरोबरच डॉ. लागू सामाजिक कार्यातही सक्रिय होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीबद्दल त्यांना विशेष आत्मीयता होती. ‘अंनिस’च्या वाढीसाठी त्यांनी सर्वतोपरी सहाय्य केले. अंधश्रद्धा निर्मूलनाचे विचार समाजापर्यंत जाण्यासाठी डॉ. लागू आणि डॉ. दाभोलकर यांनी अनेक शहरांतून परिसंवाद ठेवले. त्याचे नाव होते – ‘विवेकी वाद-संवाद’

वैज्ञानिक दृष्टिकोन

डॉ. लागू म्हणत – “जिथे-जिथे पोथीप्रामाण्य मानलं जातं, तिथे-तिथे अंधश्रद्धांचा उद्भव होतोच. म्हणून मग काय करायचं आपल्याला! तर शब्दप्रामाण्य टाकून द्या; बुद्धिप्रामाण्य माना. वेदांमध्ये लिहिलेलं आहे किंवा कुराणामध्ये लिहिलं आहे, बायबलमध्ये लिहिलं आहे म्हणून ते खरं माना, ही प्रवृत्ती सोडून द्या. ते खरोखरच खरं आहे का, हे वैज्ञानिक कसोट्यांनी तपासून घ्या. त्याचे उत्तर बरोबर आले, तर स्वीकारा; परंतु ते सत्य आलं म्हणून कायमच सत्य मानू नका. पुन्हा-पुन्हा तपासा. हे शेवटचे उत्तर सापडले आहे, असे समजू नका. विज्ञान म्हणते, हे आज मला सत्य सापडले आहे; पण हे अंतिम सत्य आहे, हा दावा विज्ञान करीत नाही; तो दावा आपण करत असतो. हा दावा सोडला पाहिजे.”

“अंधश्रद्धांच्या मुळे जे सर्वांत मोठे नुकसान होते, ते म्हणजे चिकित्सा करण्याची पद्धत बंद होते. माणसाचं मन कडी-कुलपे लावल्याप्रमाणे, घुसमटल्याप्रमाणे होते. ही अवस्था टाळण्याकरिता, त्याची कवाडं जास्त उघडण्याकरिता, त्याची विचारशक्ती जागृत करण्याकरिता प्रयत्न केले पाहिजेत.”

“माणसाला स्वतंत्रपणे विचार करायला प्रवृत्त केले पाहिजे. ‘देववादा’मुळे विचारशक्ती खुंटते. ती विकसित व्हावी म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन आवश्यक आहे.”

परमेश्वर

परमेश्वराच्या कल्पनेमुळे लोक दैववादी बनतात. ‘असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी’ म्हणत निष्क्रिय बनतात. गल्ली-बोळातून वाढणार्‍या देवळांमध्ये दान-दक्षिणेच्या रुपाने हजारो रुपये, तर मोठ्या देवालयांतून अब्जावधीची संपत्ती अनुत्पादक म्हणून पडून राहते; पुरोहितांच्या घशात जाते. त्यांचा समाजासाठी काहीच उपयोग होत नाही. देवाच्या नावावर भाकडकथा रचून चमत्कार पसरवले जातात. या कथांचा वापर करून बुवाबाजी फोफावते. धर्मांध संघटना याचा वापर आपसांत दंगली पेटवायला, द्वेष पसरवायला करतात. असे अनेक दोष परमेश्वर कल्पना मानल्यामुळे तयार होतात. म्हणून डॉ. लागू म्हणत- “परमेश्वराला रिटायर करा.”

हे वाक्य सकारात्मक, आज्ञार्थी आणि सनसनाटी असल्याने लोकांपर्यंत लगेच पोचत असे.

संविधानाची भूमिका

भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला धर्मस्वातंत्र्य, उपासना स्वातंत्र्य दिले आहे. इथला नागरिक कोणताही धर्म पाळू शकतो, स्वीकारू शकतो किंवा निधर्मी राहू शकतो. तो कोणत्याही देवाची भक्ती करू शकतो किंवा नास्तिक राहू शकतो. हीच ‘अंनिस’ची भूमिका आहे.

‘तुम्ही देव मानता का?’ असा प्रश्न दाभोलकरांना अनेक वेळा विचारला जाई. ते म्हणत, “हा प्रश्न विचारताना देव या कल्पनेची व्याख्या केली असेल, अधिक नेमकेपणाने विचारले, तर उत्तर देणे सोपे आहे. “तुम्ही नवसाला पावणारा देव मानता का?” “तुम्ही विश्व निर्माण करणारा, चालवणारा आणि नष्ट करणारा देव मानता का?” इ. प्रश्नांचे उत्तर ‘नाही’ असे आहे.

गाडगेबाबा

याउलट ‘तुम्ही गाडगेबाबांनी सांगितलेला देव मानता का?’ या प्रश्नांचे उत्तर ‘होय’ असे आहे.

“जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपले

तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा”

या संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे गाडगेबाबांचा हा जिता जागता देव होता.

परमेश्वर आणि अंधश्रद्धा

परमेश्वराला रिटायर केल्यामुळे अंधश्रद्धा दूर होतील, हेही खरे नाही. अंधश्रद्धा काही परमेश्वरामुळे निर्माण झालेल्या नाहीत. अंधश्रद्धेतून परमेश्वराचा जन्म झाला आहे. अंधश्रद्धा या धार्मिक असतात, तशाच सामाजिक, राजकीय, आर्थिकही असतात. जात ही सामाजिक अंधश्रद्धा आहे.

राजकीय अंधश्रद्धा

“आर्य रक्त श्रेष्ठ आहे, शुद्ध आहे, तेच या पृथ्वीवर राज्य करायला लायक आहेत. जर्मन शुद्ध आर्य रक्ताचे आहेत,” अशी अंधश्रद्धा पसरवून ज्यूंचे शिरकाण करणारा आणि जगाला दुसर्‍या महायुद्धाच्या खाईत लोटणारा हिटलर आपण पाहिला. सर्व भारतीय समस्यांचे मूळ मुस्लिमांत शोधणारे ‘श्रद्धाळू’ भक्त भारतात वाढत आहेत. चिकित्सक वृत्तीचा अभाव हे त्याचे कारण आहे. असे नागरिक ‘गोबेल्स’च्या विषारी द्वेषपूर्ण प्रचाराला बळी पडतात.

मार्क्स व देवधर्म

देव आणि धर्माच्या कल्पनेचा शास्त्रशुद्ध अभ्यास मार्क्सने केलेला आढळतो. धर्माचे वर्णनही त्यांनी नेमक्या शब्दांत केले आहे. – “धर्माच्या रुपाने व्यक्त होणारे दु:ख हे एकाच वेळी खर्‍या दु:खाचे प्रकट रूप असते आणि त्याचवेळी तो खर्‍या दु:खाचा निषेधही असतो. धर्म हा दबलेल्या दीन-दुबळ्यांचा उसासा असतो. धर्म हृदयशून्य जगाचे हृदय असतो. निरुत्साही परिस्थितीतला उत्साह असतो.” “धर्म म्हणजे दुर्गंधीयुक्त जगाचा आध्यात्मिक सुगंध असतो. दु:खितांना दिलासा आणि शोषितांचा विश्वास असतो. तो लोकांची अफू असतो.“धर्म सुखाचा केवळ आभास निर्माण करतो; अफूप्रमाणेच. मार्क्सच्या काळात भांडवली शोषण अधिक तीव्र आणि क्रूर होते. कामगार कायदे नव्हते. दिवसभर राबूनही संसार चालत नाही, म्हणून पती-पत्नी दोघेही गिरणीत कामाला जात. अशा वेळी मुलांना सांभाळण्याचा प्रश्न होता. लहानग्याला अफू चारून शांत झोपवण्याचा पर्याय कामगार आई वापरत होती. यावर उपाय काय? अफू चारली नाही, तर संपूर्ण कुटुंबालाच टाचा घासून उपाशी मरण्याशिवाय पर्याय राहणार नाही. म्हणून मार्क्स पुढे म्हणतो – “सुखाचा केवळ आभास असणारा धर्म नाहीसा करण्याची मागणी करणे, म्हणजेच लोकांच्या खर्‍या सुखाची मागणी करणे होय. आभास सोडून देण्याची मागणी करणे, म्हणजेच ज्या परिस्थितीमुळे अशा आभासाची गरज भासते, ती परिस्थितीच नाहीशी करण्याची मागणी असते.” म्हणजेच जोपर्यंत वर्गीय समाज आहे, वर्गीय शोषण आहे, तोपर्यंत देव-धर्मरुपी अफू राहणार.

कॉ. गोविंद पानसरे व धर्म

कॉ. गोविंद पानसरे यांनी ‘धर्मासंबंधी परिवर्तनवाद्यांची भूमिका काय असावी?’ या पुस्तिकेत धर्मासंबंधीची कल्पना स्पष्ट करताना – त्यांचे निष्कर्ष नोंदवले आहेत-

1) मानवी समाजाच्या विशिष्ट परिस्थितीतून धर्मकल्पना जन्मास आली आहे; कुणा दुष्टाच्या ‘सुपीक’ मेंदूतून समाजाला फसवण्यासाठी मुद्दाम अस्तित्वात आणलेली कल्पना नव्हे.

2) विशिष्ट परिस्थिती जोपर्यंत आहे, तोपर्यंत धर्मकल्पना पूर्णतया नाहीशी करता येणार नाही. त्यासाठी परिस्थिती नाहीशी केली पाहिजे.

3) जोवर ती विशिष्ट परिस्थिती बदलली जात नाही, तोपर्यंत धर्मकल्पना शोषितांना-पीडितांना दिलासा आणि उत्साह देत राहते. हा उत्साह-दिलासा भ्रमावर आधारित आहे. आधार भ्रमाचा असला, तरी उत्साह-दिलासा खरा आहे.

4) केवळ धर्मावर टीका करून किंवा सत्यस्वरूप विषद करून धर्म नाहीसा होणार नाही.

लेनिन व धर्म

‘धर्म’ या पुस्तकात दि. के. बेडेकर यांनी कॉ. लेनिन यांचे विचार दिले आहेत – “अंधश्रद्धा आणि धार्मिक कलह यावर समाजवादी समाजपरिवर्तन हा उपाय त्यांनी सांगितला आहे. त्यांनी भांडवलदारी नास्तिकता आणि समाजवादी नास्तिकता यातील फरक स्पष्ट केला आहे. शासन संस्थेवर आणि शिक्षणव्यवस्थेवर धर्मसंस्थेचा ताबा असता कामा नये, असे त्यांनी म्हटले आहे. श्रमजीवी वर्गाचे जीवन पंगू करणार्‍या अनिर्बंध दडपशाहीवर जेथे समाजधारणा आहे, तेथे धर्माच्या विरुद्ध केवळ पांडित्य सांगून उपयोग नाही. वर्गलढा तीव्र करणे गरजेचे आहे.”

महात्मा गांधींचा राम

महात्मा गांधींनी रामराज्याची कल्पना मांडली; पण त्यांचा राम युद्धोत्सक धनुर्धारी, सीतेला अग्निपरीक्षा करायला लावणारा, मुुस्लिमद्वेषावर स्वार होणारा नव्हता- ईश्वर, अल्ला तेरो नाम, सबको सन्मती दे भगवान’ असा समता आणि बंधुत्वाचा संदेश देणारा होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिज्ञा

डॉ. बाबासाहेब श्रेष्ठ दर्जाचे समाज क्रांतिकारक होते. धर्माशिवाय एखादी व्यक्ती राहू शकेल; पण समाज नाही. आता संत- महात्म्यांच्या उदयाचा काळ संपला असून नवा धर्म स्थापन होणे अशक्य आहे, म्हणून त्यांनी चार कसोट्यांवर जुने धर्म तपासले आणि बौद्ध धम्म निवडला. बौद्ध होऊ इच्छिणार्‍यांना त्यांनी 22 प्रतिज्ञा सांगितल्या आहेत. त्यामध्ये – मी ब्रह्मा, विष्णू, महेश, राम, कृष्ण, गौरी, गणपती इत्यादी कोणत्याही देवदेवतेस देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. देवाने अवतार घेतले, यावर विश्वास ठेवणार नाही. बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, हा प्रचार मी खोडसाळ मानतो. मी श्राद्ध-पिंडदान करणार नाही. कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांच्या हातून करवून घेणार नाही. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करेन इत्यादी प्रतिज्ञांचा समावेश आहे.

या सर्व विचारवंतांच्या विचारांचे सार आपल्याला ‘अंनिस’च्या खालील चतु:सूत्रीत एकवटलेले दिसते.

1) वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व प्रचार 2) शोषण करणार्‍या अंधश्रद्धांना विरोध 3) धर्माची विधायक आणि कृतिशील चिकित्सा 4) व्यापक समाजपरिवर्तनाच्या कामात सहभाग.

याच विचारांसाठी मोठे योगदान देणार्‍या डॉ. श्रीराम लागूंना भावपूर्ण आदरांजली!


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]