डॉ. अस्मिता बालगावकर -

महाविद्यालयीन जीवनात कधी कुठे व्याख्यान आहे असे कळले की, आवर्जून तिथे जाणे व्हायचे. त्यात माझ्याच संगमेश्वर कॉलेजमध्ये डॉ नरेंद्र दाभोलकरांचे व्याख्यान आहे असे कळले आणि त्या व्याख्यानाला अगदी उत्सुकतेने आम्ही सर्वजण गेलो. डॉ दाभोलकरांची शांतपणे तर्कसंगत बोलण्याची पद्धत आणि विचार ऐकून आम्ही विद्यार्थी खरे तर अत्यंत भारावून गेलो होतो. प्रत्येक शब्द कान देऊन ऐकत विषय समजून घेत होतो. अंधश्रद्धा निर्मूलनसारख्या कार्याची गरज व्याप्ती त्यापूर्वी कधीच लक्षात आलेली नव्हती. व्याख्यान संपताच माझी सवय होती वक्त्यांना मनात आलेल्या शंका, प्रश्न विचारून त्याचे निरसन करून घेण्याची. त्याच पद्धतीने मी डॉ. दाभोलकरांना गाठलं आणि प्रश्नांचा भडिमार सुरू केला. त्यांनी सर्व प्रश्नांची शांतपणे उत्तरे दिली आणि मला म्हणाले, ‘तू अंनिसमध्ये का नाही येत?’ लगेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शाखेतील कार्यकर्त्यांना सांगून त्यांनी शहर शाखेची बैठक कधी कुठे होत असते याचे तपशील दिले आणि मी अंनिसची कार्यकर्ता झाले.
घरी बोलताना असे कळले की, माझे वडीलसुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काही काळ कार्य करीत होते. त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांचं खूप कौतुक केलं आणि मी अंनिसचं काम करणार असल्याचं कळताच त्यांनी खंबीर पाठिंबा दिला. मग अनेक पथनाट्ये, गाणी, विवेकवाहिनी इ उपक्रमात अगदी हिरिरीने सहभाग घेतला. त्या वयात जी जिज्ञासा, बौद्धिक भूक असायची ती या चळवळीत सहभागी झाल्यामुळे शमायची. प्रत्येक गोष्टीकडे एका वेगळ्या चौकस दृष्टीने, वैज्ञानिक दृष्टीने पाहण्याची सवय लागली. वाचनाची आवड लागली. लोकांमध्ये बोलत असताना एक वेगळाच आत्मविश्वास आला. स्टेज डेअरिंग वाढले. पुढे शिक्षण, करियर, लग्न, मुले इ. मुळे चळवळीत कार्य करणे जमले नाही. एके दिवशी घरी टीव्ही पाहत असताना डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनाची बातमी पाहिली आणि ढसाढसा रडू कोसळले. चळवळीतील सर्व विचारांनी पुन्हा पेटून उठले आणि मी आता अंनिसमध्ये सक्रीय काम करणार, हीच डॉ. नरेंद्र दाभोलकरांना खरी श्रद्धांजली असेल असे ठाम ठरवले. सध्या सोलापुरात बैठक कोठे कधी होते ही माहिती काढण्यात फार वेळ गेला; परंतु सरतेशेवटी पुन्हा अंनिसमध्ये सहभागी होऊन सक्रिय कार्यकर्ता झाले.
सामाजिक चळवळीमध्ये कार्य करताना अनेकदा वैचारिक संघर्ष करावा लागतो. तो अनेकदा घरातूनच सुरू होतो. सर्वच कार्यकर्त्यांना कुटुंबातून सहकार्य आणि पाठिंबा मिळतोच असे नाही. कुटुंबातील प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात. तेव्हा ज्या त्या व्यक्तीला त्यांच्या विचाराप्रमाणे वागण्याचे, कार्य करण्याचे व्यक्तिस्वातंत्र्य असलेच पाहिजे. माझ्या व्यक्तिस्वातंत्र्यावर मी कधीच कोणाला गदा आणू दिली नाही. मला असे वाटते की, हा कणखरपणा आणि विचारांचा ठामपणासुद्धा मला या चळवळीत काम केल्यामुळेच आला. अनेक लोकांनी मला अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीबद्दल अनेक नकारात्मक गोष्टी सांगितल्या, टीका टिपण्णी केली; परंतु डॉ. नरेंद्र दाभोलकारांसोबत काही वर्ष कार्य केल्यामुळे मला अंनिसवर श्रद्धा होती, विश्वास होता. त्यामुळे मी सक्रियपणे पुन्हा कार्य करत राहिले. आणि ती श्रद्धा, विश्वास अजूनच वाढत गेला. आता माझी मुलगी मुलगा सुद्धा लोकांना नकळतपणे गप्पा मारताना अंनिसचे विचारच सांगत असतात तेव्हा मनोमन मी फार सुखावते.
समाजामध्ये वावरताना आपल्याला जशी वेगवेगळ्या पद्धतीची माणसे भेटतात, तशीच विविध माणसे मला अंनिस मध्येही भेटली. व्यक्ती व्यक्तीतील गुण दोष इथेही पाहायला मिळाले; पण सर्व जण एका विशिष्ट विचारांमुळे एकत्र येऊन कार्य करण्यासाठी प्रेरित झालेले असतात. प्रत्येकाची कार्यशैली वेगवेगळी असते. जे पटलं ते घेतलं, जे नाही पटलं ते सोडून दिलं. अंनिसची तत्त्वे मूलभूत विचार यासाठी कायम डॉ. नरेंद्र दाभोलकरांकडून शिकलेल्या गोष्टींचा आधार घेतला, त्यांची पुस्तके वाचत राहिले.
काम करताना असंख्य अडचणी आल्या. तसेच अनेक लोकांची खंबीर साथही मिळाली. दर आठवड्याच्या साप्ताहिक बैठकीत झालेल्या कामांचा आढावा घेतला जाई. पुढे घेण्यात येणारे उपक्रम व त्यांचे नियोजन केले जाई. विविध विषयांवर अंनिसचे विचार आणि कार्य याबाबत चर्चा होत असे. सर्वच कार्यकर्त्यांच्या सहमतीने, एकमताने प्रत्येक निर्णय घेण्यात येत असे. आपल्या चळवळीमध्ये कायम लोकशाही टिकली पाहिजे हा विचार कायम डोक्यात असतो. काही स्थानिक लोकांनी काही वेळेस अगदी हुकूमशाही, एकाधिकारशाही, कट्टरता, वैयक्तिक टीका केल्या. तरीसुद्धा कधीही अंनिस चळवळ सोडून जाण्याचा विचारही मनाला शिवला नाही. जिथे गरज पडेल तेथे मध्यवर्तीची मदत आणि मार्गदर्शन मिळतच होते. चळवळीत कार्य करताना कार्यकर्त्यांनी अशा चांगल्या वाईट अनुभवांना सकारात्मकतेने सामोरे जाणे गरजेचे असते. अन्यथा काही जण जाऊ दे कशाला डोक्याला ताप म्हणून चळवळ सोडून देतात.
मी वैयक्तिकरीत्या कधीच कोणत्या भिशी पार्टीत, गेटटूगेदरमध्ये रमले नाही. जिथे त्याच त्या टिपिकल गप्पा चालू असतात, गॉसिपिंग चालू असत अशा ठिकाणी जीव घुसमटतो. काहीतरी वैचारिक, समाजोपयोगी कार्य करण्यावर भर द्यावासा वाटला. हळदी कुंकू, सत्यनारायण पूजेला कोणी बोलावले तरी तिथे मी ‘स्त्रिया आणि अंधश्रद्धा’ ही डॉ. दाभोलकरांची पुस्तके भेट म्हणून वाटण्यास घेऊन जाई. लग्न समारंभ इ. ठिकाणीसुद्धा अंनिसच्या पुस्तकांचे संच भेट म्हणून देत असते. अंनिसचे कार्य करत राहिल्याने समाजात एक वेगळी ओळख मिळाली, प्रसिद्धी सुद्धा मिळाली. अंनिसबद्दल सर्वच लोकांमध्ये अत्यंत आदर आणि सहकार्याची भावना असते. अनेकदा कार्यक्रमामध्ये विद्यार्थी, प्रेक्षक इतका सुंदर संवाद साधतात की, अनेक वेगवेगळे पैलू, अडचणी, समस्या लक्षात येतात आणि त्यांचे निरसन केल्यानंतर, त्या समस्या सोडविल्यानंतर, लोकांशी संवाद साधल्यानंतर इतके अप्रतिम असे आत्मिक समाधान मिळते की जे पुढील कार्यास प्रेरणा आणि बळ देते. एका कार्यक्रमानंतर एक वृद्ध येऊन भेटले आणि ते म्हणाले, अंधश्रद्धा निमूर्र्लन समिती करीत असलेले कार्य हे खरोखर संतांचे कार्य आहे.
– डॉ. अस्मिता बालगावकर (सोलापूर)
संपर्क : ९०२११ ०८६८६