डॉ. ठकसेन गोराणे -
सध्या कोरोना विषाणू हा, मानवी शरीरामध्ये आणि माणसाच्या मनामध्ये; म्हणजेच माणसाच्या मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात स्थिर होत आहे. त्यामुळे एक अदृश्य, अनामिक भीती माणसाच्या मनात निर्माण होणे, साहजिक आहे. पण या भीतीवर माणूसच मात करणार आहे, हेही आपणाला माहीत आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. माणूसच कोरोनाला हरवणार, हे मात्र नक्की!
कोरोना विषाणूविरोधी लस शोधण्यासाठी संशोधन करणे, लस शोधणे, शोधलेल्या लसींच्या वारंवार चाचण्या घेणे, यासाठी काही कालावधी लागणार आहे, हे आपण जाणतोच. इतरांनाही आपण ते सांगत राहिले पाहिजे.
तत्पूर्वी कोरोनावर प्रतिबंधक उपाय म्हणून शासन-प्रशासन जे काही शर्थीचे प्रयत्न करीत आहे, त्याला आपण संपूर्ण सहकार्य केले पाहिजे. शासनाच्या आदेशांचे, सूचनांचे तंतोतंत पालन आपण स्वतः आणि आपल्या कुटुंबाने केले पाहिजे. पुढील काही दिवस, आठवडे, महिने हे आपल्या सर्वांची मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि इतर सर्व प्रकारची कसोटी पाहणारे असणार आहेत, हे आपण आताच ध्यानात घेतले पाहिजे. त्यासाठी आपण, आपल्या व इतरांच्या मानसिक बळकटीकरणाच्या तयारीला लगेच सुरुवात करायला हवी. आपण आपल्या वर्तन बाबींवर जास्तीत जास्त नियंत्रण; तसेच स्व-नियंत्रण ठेवले पाहिजे. या सर्व बाबी लगेच सामान्य माणसाच्या लक्षात येत नाहीत. कारण त्याला दररोजच्या जगण्याची लढाई लढावी लागते. त्यातच तो मेटाकुटीला आलेला असतो आणि अचानक असे अस्मानी संकट त्याच्या जीवनात उभे राहिले तर तो कोलमडून पडण्याची दाट शक्यता असते. अशा वेळी तो घाबरून जातो, त्याची जगण्याची आशाच संपुष्टात येते की काय, असे चित्र त्याच्या मन:चक्षूंसमोर तयार होते. म्हणून आपल्यासारख्या शिक्षित, स्थिरस्थावर, समाजप्रेमी बांधवांनी आपल्या अशा सर्व माणसांना, बांधवांना सर्वार्थाने शक्य तेवढी सर्व मदत, सहाय्य प्रत्यक्ष केले पाहिजे. त्यासाठी कुणाच्या विनंतीची, आदेशाची प्रतीक्षा करण्याचे कारण नाही. अशा माणसांच्या (खरं तर सर्वच माणसांच्या) मानसिक उभारणीसाठी, त्यांना धैर्य देण्यासाठी, साथ देण्यासाठी त्यांच्याशी प्रत्यक्ष कृतिशील संवाद सतत ठेवला पाहिजे. एवढेही पुरेसे ठरणार आहे. कोरोनाचे संकट लवकरात लवकर संपुष्टात येवो, अशी इच्छा, अपेक्षा, आशा आपण सर्वजण बाळगू या!
मात्र या अस्मानी संकटावर मात केल्यानंतर पुन्हा आपणास आपल्या जीवनातील विविध क्षेत्रातील निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी मैदानात उतरावे लागणार आहे. या विविध क्षेत्रात उद्भवणार्या अनेक समस्यांचाही आपण आताच आपल्या मनाशी विचार करून त्यांची वस्तुनिष्ठ उत्तरेही शोधून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वच क्षेत्रांमध्ये आर्थिक समस्या ही प्रमुख असेल. कदाचित आपणही या मताशी सहमत असाल. या आर्थिक समस्येची झळ कमी-अधिक प्रमाणात सर्वांनाच बसेल. मात्र मोठ्या प्रमाणात ही झळ शेती, शेतीपूरक व्यवसाय आणि लघुउद्योग-व्यवसायांना मोठ्या प्रमाणात बसेल. या आर्थिक मंदीचा दूरगामी दुष्परिणाम वरील क्षेत्रांना जास्त काळ त्रासदायक ठरेल, असे दिसते. कारण या दोन्ही क्षेत्रांत काम करणारी जवळजवळ सर्व माणसं ही सर्वसामान्य किंवा गरीब कुटुंबातील असतात आणि या कामगार वर्गाची संख्या आपल्या देशात मोठी आहे. सरकारी पातळीवर वेळोवेळी त्याबाबतचे विविध प्रकारचे नियोजन व अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न होत राहतीलही. मात्र त्या सर्वांचा भारही सर्वसामान्यांवरच पडणार आहे, हेही आपणांस माहीत आहे. आताच्या कोरोनासारख्या संकटसमयी आपण आपल्या बांधवांच्या आजच्या स्थितीचा विचार करून त्यांच्याशी आपण आपल्या घरातच बसून सोशल मीडियाद्वारे संवाद साधत राहिले पाहिजे. त्यांच्या चिंतांना, दुःखाला, भावनांना वाट करून दिली पाहिजे, असे वाटते. त्यांचे जगण्याचे बळ वाढेल, त्यांचे मानसिक धैर्य वाढेल, अशाच प्रकारची सकारात्मक चर्चा, संवाद, माहितीची देवाण-घेवाण सातत्याने करावी, असे सुचवावेसे वाटते. कारण हा एकूणच मानवजातीच्या जिवंत राहण्याच्या कसोटीचा काळ आहे. अशा वेळी इतर अनावश्यक चर्चा करणे आपण जाणीवपूर्वक थांबविले पाहिजे. त्याचबरोबर वारंवार कोरोनाबाबत बोलणे, अफवांना आणि अंधश्रद्धायुक्त उपाय, उपचारांना खतपाणी मिळेल, असे मेसेज फॉरवर्ड करणे, अशा धोकादायक, बेकायदेशीर आणि भीती निर्माण करणार्या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. इतरांनाही याची समज आपण देत राहिले पाहिजे.
सोशल मीडियावर यासंबंधी आपण आपली मते मांडताना, माहिती पुढे पुढे पाठवताना आपले वर्तन हे काळजीपूर्वक व जबाबदारीचे असले पाहिजे. ते आपल्या सर्वांच्या हिताचेच असेल. मात्र सोशल मीडियातून बर्याच वेळा कालबाह्य झालेली उपचार पद्धती, अवैज्ञानिक, अघोरी आणि अंधश्रद्धायुक्त, भीतिदायक माहिती, विशिष्ट धर्मप्रेरित ग्रंथांतील कालबाह्य झालेले पुस्तकी पुरावे, समाजात भेदाभेद, दुही, संशय, अस्थिरता निर्माण करणार्या बाबी, एखाद्या प्राप्त माहितीची कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता, कार्यकारणभाव न तपासता, परिणामांचा विचार न करता केवळ उत्साह आणि स्वतःच्या प्रशंसेसाठी जीवघेण्या अफवा पसरविणे, चुकीची माहिती वारंवार फॉरवर्ड करणे, असेही होताना दिसते. लोकजीवन अधिक समृद्ध, सुखी-समाधानी करण्याचे शास्त्रशुद्ध उपाय, मार्ग सांगणारी, मानवता आणि माणुसकी उन्नत करणारी, विज्ञानाच्या सर्व कसोट्यांवर सिद्ध झालेली; तसेच या आपल्या भारत देशाचे संविधान सर्वश्रेष्ठ मानणारी आणि लोकशाहीवर नितांत निष्ठा बाळगाणारी माहिती मिळत राहिली, तर ती कोणत्याही मार्गाने आली, सांगितली गेली तरी तिचे स्वागतच आहे. परंतु माहिती पाठवताना इतर कोणत्याही जाती-धर्मातील बांधवांबाबत बुद्धिभेद, द्वेष, तिरस्कार निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण होईल, असे कृपया कोणीही करू नये, ही कळकळीची विनंती.
या जागतिक समस्येचे कोणीही राजकीय, धार्मिक, जातीय वा तत्सम ध्रुवीकरण करणार नाही, आपणही ते होऊ देणार नाही, हेही आपण पाहिले पाहिजे. जगातील मानवनिर्मित सर्वच सीमा ओलांडून, कोरोना विषाणू काहींच्या शरीरात, तर अखिल मानवजातीच्या मनात पोहोचला आहे. माणसाच्या शरीरातून माणूस त्याला हद्दपार करेलच; परंतु प्रत्येक माणसाच्या मनात घुसून कोरोनाने जीवघेणी धडकी माणसाच्या मनात निर्माण केली आहे, ही धडकी लगेच कमी होणार नाही, थांबणार नाही, लगेच दूरही होणार नाही. त्यासाठी वेळ द्यावा लागेल. कोरोनामुळे माणसाच्या मनात मृत्यूचे भय निर्माण झालेले आहे, आणि हीच खरी मोठी समस्या आहे. हे मृत्यूचे भय दूर करण्यासाठी पुन्हा आपणास विज्ञाननिष्ठ, विवेकी विचारांशिवाय पर्याय नाही, हे वस्तुनिष्ठ सत्य आहे. आपण प्रत्येकाने ठरवून आपल्या मनातील हे मृत्युभय प्रथम दूर करूया. त्यासाठी परस्परांना पुरेपूर मदत करूया. कोरोना विषाणूचा शारीरिक संसर्ग होणार नाही, यासाठी स्वयंशिस्त, सरकारी आदेश व सूचना यांचे पालन, स्वच्छता या सर्व बाबी कसोशीने आणि कटाक्षाने पाळूया. त्याचबरोबर आर्थिक व भविष्यातील इतर अनुषंगिक संकटांवर मात करण्यासाठी निसर्गाचे संतुलन साधणारे, निसर्गाला पूरक ठरणारे सण- उत्सव साजरे करणे, साधे, अर्थपूर्ण, विवेकी आणि आनंददायी जीवन जगणे, प्रत्येक बाबतीत शक्य तेवढी काटकसर करणे, निसर्गाच्या साधन- संपत्तीचे, सामग्रीचे जतन, संवर्धन व जपणूक करणे या सर्व कृतींचे स्वतःपासून नियोजन आणि कार्यवाही आता तरी आपण करूया. धन्यवाद.