ऐका दास्तान ए बडी बाँका

साहिल कबीर - 9923030668

इसको दास्तां कहते हैं,

जो खतम नही होती सिर्फ बयां होती हैं|

दास्तान म्हणजे गोष्ट सांगणे. आधी दास्तानची गोष्ट काय आहे हे बघू. बेवफा बेगमचा राग धरून बादशाहाने तिचं आयुष्य संपवलं. राजाने बेवफाई का बदला घेण्याचं सुरूच ठेवलं. नंतर बेगम म्हणून आणलेल्या काहीएक बायांची जिंदगी त्याने सकाळसोबतच संपवली होती! शेवटी वजीराच्या बेटीची पेशगी करण्यात आली, पण तिने राजाच्या मनसुब्याला पुरं होऊ दिलं नाही. राजाला गोष्ट सांगायला सुरुवात केली. तिने रात्रीमागून रात्री पालटल्या हळुवार, पण गोष्ट संपवली नाही.

गोष्टीत अनेक गोष्टी, अजिबोगरीब नायाब तिलिस्मि जादुई किस्से, प्रसंग, फँटसी भरली वर्णनं, नाकाबिलेयकिन कथातुकडे असलं सगळं भारावून टाकणारं. मग अशा खूप रात्री सरल्या. एक हजार रात्री आणि एक रात्र त्यालाच फारसी उर्दूत म्हटलं गेलं – ‘अलफ़ लायला ओ लायला’

गोष्ट सांगणारीने जीव वाचवला आपला आणि प्रेमाने बादशाहने स्वीकारलंही तिला. आयुष्य सुकर, सुंदर सुरू राहिले. गोष्टी सांगण्याने बदल घडला. त्या सगळ्या गोष्टी रमवून ठेवणार्‍या असतीलही पण गोष्ट मोठाली करून सांगणारी, त्यात गुंतवून ठेवणारी गोष्टीवेल्हाळबाई. तिचं सांगणं किती अफाट असेल. हे अफाट रंगवून सांगत राहणं म्हणजे दास्तांगो असणं.

असा दास्तांगो कलावंत दोस्त अक्षय शिंपी, मराठीतल्या पहिल्यावहिल्या अस्सल दास्तागोईचा प्रयोग यशस्वी लोकप्रिय तितकाच लोकाभिमुख करणारा हा प्रतिभासंपन्न कवी, लेखक, नाटककार माणूस. दास्तागोई हा तसा उर्दूतील कथनसादरीकरणातला प्रकार, आधी फारसी, उर्दू, हिंदीतून फुलला, आम झाला, थांबला काही काळ. या व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीच्या काळात विरामला पण पुन्हा २००५ नंतर बहरून सामोरी येऊ लागला. अक्षयने आधी लखनवी कलाकार मित्रांसोबत उर्दूतून अशा प्रयोगात आपलं कलाकारपण जोडून घेतलं. काही प्रयोग तिकडे केले. नावाजला गेला. नंतर लॉकडाऊनच्या काळात मराठीत असं काही बांधणी करायचं मनावर घेतलं. त्यासाठी अभ्यास केला तसा रियाजही केला. जाणत्यांकडून माहिती गोळा केली, सहकलाकारासोबत जोडत राहिला किस्से तुकडे आणि कॉस्मोपॉलिटीन मुंबापुरीला बाँके नगरीत विणून, जोडून घेतलं. कुठलाही समाज फार पूर्वीपासून आपली परंपरा जगणं वा भूगोल, इतिहास हे सगळं लोककथा व लोकगीते हे मौखिक सांगत राहतो. तेच अक्षय (नेहा व धनश्री) या कलाकारांनी केले. आपली कहाणी त्यांनी बांधली, जोडली आणि सांगत राहताहेत. याने मुंबईची गोष्ट जोडली, ही अजोड अशी कलाकृती म्हणजे मुंबईचे लिखित मौखिकातून आलेले, व्यवस्थितीकरण करून रचले गेलेले दृश्यकाव्य आहे.

दास्तां ए बडी बाँका! हा नाट्यप्रयोग

‡—

पेहराव, भाषा, बोली, बैठक अशा साध्या चीजातून जात-धर्म शोधून, माणसं वेगळं करण्याच्या दुखर्‍या मोसमात ही दास्तां प्रवाहित बोलकी झाली आहे. हसू, रडू, उमाळा आपलेपणा, एहसासात बंजर होऊ पाहणार्‍या मनावर ही दास्तान संवेदनाची ओल पसरवते आहे. मराठीत असा ललित सादरीकरणाचा प्रयोग करणं धाडसाचं तेही या काळात. अनेक कन्फ्यूजन्स् आणि दिखाव्याच्या कोरड्या संवेदनाहीन शोज्चा साज व्यवस्था टिकवून ठेवू पाहतेय अशा काळात हे मराठीत आणणं शक्य होतं?

एक कवितासंग्रह आणि पंडित नेहरू यांच्यावरचे महत्त्वाचं अनुवादित पुस्तक एवढं साहित्यिक योगदान यापूर्वीचे आहेच. टीव्हीवरच्या मराठी मालिकांतून दिसणारा हा चेहरा, गाण्याची योग्य जाण ठेवत गुणगुणायला लावणारा हसतमुख माणूस, काही नवं निर्माण करतो आणि या प्रकारातल्या रचनेचा मराठीतला पायोनिअर ठरतो हे कौतुकास्पद, अभिमानास्पद! समाज आणि समाजमाध्यमातून सगळे आवाज बंद केले जात असताना ट्रोलफॅक्टरीसाठी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून येणारा साहित्यिक कचरा उपसून वर येताना, सगळीकडे उकिरडा पसरतोचा मुका आक्रोश असताना असा प्रयोग नाट्यसाहित्य क्षेत्रात आणून आपली मोहर उमटविणारा हा कलावंत संवेदनशील माणसांच्या जवळचा होऊन काळाची कहाणी कुठल्याही अभिनिवेशाविना सांगतोय हे अभिमानास्पद आहे. अगदी कशावरूनही म्हणजे पहनावा, रंग, भाषा यावर द्वेष, दुही माजवण्याच्या काळात माजघरातून अगदी साध्या बैठक कट्ट्यावरुन ही दास्तानगोई सर्वांना आपलंसं करत माणूस मांडत राहते. हे सुंदर आहे बस !

—-

दोघे बसलेत वज्रासनात आणि दोघांच्या पेहराव्यात दिसतेय लखनवी अदब. दोघांच्या चेहर्‍यावर हलकी नजाकत रुबाबदार दिसतेय. आवाज फुटतोय. प्रेक्षागारात शांतता. सरळ आणि मध्येच हलक्या टाळ्या. पुन्हा टाळ्याऐवजी गोष्ट ऐकताना हां हं चे होकारी हुंकार सहज समोरून. दोन तास किंवा काही अधिक वेळ कसा सरला हे कळतं नाही तोवर एक कडक स्टँडिंग ओवेशन शेवटी. दोघांना गळामिठी मारून ऐकलेलं, पाहिलेलं जपून न्यावं. मनातून पुन्हा सांगत सुटावे आसपासच्या माणसांना ‘अरे आजही गोष्टी सांगितल्या, रंगविल्या, मांडल्या, बोलल्या जाताहेत. जा आणि ऐका.’ होय. काहीही कानी पडण्याच्या जबरदस्तीच्या कर्कश काळातही दास्तान ऐकवली जाते. दास्तां कभी खतम नही होती. ती सांगणं सुरूय अक्षय आणि सहकलाकाराकडून. मराठीतली पहिलीवहिली अस्सल मराठी माणसांची मुंबईची दास्तां मराठीत ‘दास्तान-ए-बड़ी बांका’

रंगमंच म्हणून दोघं बसू शकतील एवढीच व्यवस्था. त्यावर अंथरायला काही बिछायतीसारखं अगदी पांढरं काही. त्यावर धवलवस्त्रधारी दोन दास्तानगो. दोघे बोलू लागतात सन्नाटभरल्या अंधारातून प्रकाशाचा आवाज उमटत जातो. घड्याळाला मागे टाकत सलग धावणार्‍या मुंबापुरीच्या जगण्याचं गाणं सुरू होतं पहाटप्रहरापासून. अगदी अखंड काळाचा पट विणत राहतात दोघे. उसवलेल्या हंगामाचं वर्णन जिवंत करताना हलक्या हुंदक्याचा हळवा सूर प्रेक्षकातून मिसळत जातो. नगर, उपनगरांतून गल्ली-वस्त्यांतून, गर्दी, फलाटातून, सण-उत्सवातून ओव्या- शिव्या गाण्यातून, दंग्याधोप्यातून, प्रेमाप्रणयातून मुंबई सुंदर, सरळ, तिरकी, न्यूड, गुड उलगडत राहते कथा, किश्श्यांतून कविता-कथा तुकड्यातून, काळजातून!

मुंबापुरीचा रंग किस्से-कहाण्यातून मांडत जातात दोन कलाकार. प्रसंगांना केवळ आवाज आणि बैठकीच्या अभिनयमुद्रेतून साजीवंत करतात, शब्दचित्रकथी बनून रंगवत जातात दास्तां रंगमंचावर. वज्रासनातून, कधी मध्येच बैठकीतून एका गुडघ्यावर भार देऊन अक्षय मांडत राहतो माणसं, त्यांची खुशी, गम, दर्द… काय म्हणून दाद द्यावी कळत नाही तोवर केवळ मूकपणे विस्मित होऊन उभं राहून त्यांना सलाम करावं की सलाम मुंबई म्हणावं?

ये हैं मुंबई मेरी जान,

जरा बचके जरा हटके

किंवा

ये बम्बई शहर हादसों का शहर हैं

असल्या केव्हातरी ऐकलेल्या ओळी कधीच पुसल्या जात असतात आणि अस्सल भाषिक सौंदर्यासकट मुंबई अवतरते राहते काळीजभर!

अक्षय शिंपीचा डोक्यावर गोल टोपी, शुभ्र लखनवी, कुर्ता पांढरा शुभ्र आणि सफेद सलवार कमीजमधली सहकलाकार या पांढर्‍या कॅनव्हासवर उमटत राहतात मुंबैचे असंख्य रंग. रंगीबेरंगी.. हे दास्तानगो रंगरेजी होतात. या महानगराविषयीची उत्सुकता अफाट आहे. त्यात हे रंगवत नेतात सगळ्यांना… पांढर्‍या सफेद कुर्त्यावर उमटत राहतात रंग अनेक नेक भले बुरे मुंबईचे !

नेहमी सर्वांना सामावून घेणारी मुंबई म्हणजे संस्कृतीचा मिलाफी कॉकटेल सगळं एकवटून आपलेपणाने कवेत घेऊन फूटपाथ ते प्लॅटफॉर्मपासून गगनचुंबी इमारतीपासून झोपड्याखोपड्यांच्या जिंदगानीत गाणी फुलत राहतात. या कठीण कामाला आपल्या अथक व कल्पक सर्जनशीलतेने नव्या प्रकारातून व्यक्त करण्याचे धाडस अक्षय करतो. आवाजात नाट्य आणून ते खुलवायचं. प्रसंग हुबेहूब उभे करायचे, पात्रं रंगवायची आणि त्यांच्या संवादातून गोष्ट पुढे न्यायची. देशाच्या कानाकोपर्‍यातून आपापलं जगणं गठडीत गुंडाळी करून आलेली रंगाढंगाची, अनेक भाषांची, अनेक भाषाहेल घेऊन आलेली अनेकानेक माणसं, एकट्याने गर्दीने पिडलेली, नाडलेली, पिचलेली कशीही; पण जगणं सांगणारी भेटत राहतात.

आजही गावखेड्यातल्या स्त्रिया गाणं म्हणतात म्हणजे त्या गाण्यात शब्द जोडतात, त्याला आम्ही जोडलंय असं म्हणतात. लिहिलंय असं म्हणत नाहीत. हे साहित्य लोकमुखी. त्यात श्राव्यमूल्य अधिक असतं तेच दास्तानगोई मधून ऐकू येतं. हा प्रयोगच मूळ उर्दू भाषेतला, दृश्यरूप मुसलमानी. त्यातील कंटेंटमध्ये सगळं मराठी साहित्यातले नेमके, निवडक भारी… हे केवळ सुंदर फ्यूजन उत्कृष्ट, भन्नाट झालं. मग या शैलीतल्या सोपेपणाला धका न देता सादरीकरणात केवळ सांगणारा आणि ऐकणारा हीच अट मोठी केली. बाकी संगीत, पार्श्वसंगीत, वाद्यं, नेपथ्य, प्रकाशयोजना आणि रंगमंच असलं काही नाहीच.

सडकनाटक ते रंगमंचाशिवायच्या सोप्या सादरीकरण शैलीतील नाटकांचा (बादल सरकार) पुनःप्रयोग म्हणूनही या प्रयोगाचा विशेष उल्लेख करायला पाहिजे. मास आणि क्लास सगळं एक होऊन हा प्रयोग अनुभवू शकतात. एकाचवेळी इंटिमेट थिएटर म्हणत आपली प्रोग्रेसिव्हता जपत परंपरेच्या लोककलांची याद यातून सहज ठळक होत राहते. कीर्तन वा लोककलावंतांच्या तत्सम कलाप्रकारात असणारं कंटेंट हे धार्मिक किंवा माहात्म्य अनुनय करणारं येत राहतं. वेशभूषा आणि त्या त्या कलाप्रकारातील भाषेतून भौगोलिकता स्पष्ट होत जाते. यांना वाद्यांची जरुरत पडते. मात्र दास्तागोईत यातलं काही येतं नाही. ती स्वतंत्र ठरते. कोणताही कलावंत, त्याच्या कृतीतून जे सांगू पाहतो त्यात काळ बोलत नसेल तर ती कृती फुटकळ ठरते. काही फुटकळ प्रकारांना मोठं करून सांस्कृतिक मरण आणणार्‍या काळात काही रचना आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यात यशस्वी होतात. थेट भाष्य करायला निबंध लिहून अथवा लेखवजा लिहून मोकळं होता येतं, पण काळाशी निभावून आपली गोष्ट सांगण्याचं आव्हान पेलताना धीटपणे ठोस निर्माण करावं लागतं ही नीट कलाकृती म्हणून दास्तागोईचा उल्लेख करावाच लागेल. याची संहिता वा रंगावृत्ती ही नेटकी, नीट गोळीबंद आहे. अक्षय आणि सहकलाकार यांनी परिश्रमपूर्वक अनेक साहित्यिकांच्या कविता (कुसुमाग्रज, नारायण सुर्वे, मर्ढेकर यांच्या कविता,) उर्दू शेरोशायरी, पोवाडे, हिंदी चित्रपट संगीत यांची सुरेख गुंफण करत दास्तां बांधली आहे. मुंबई सिनेजगातल्या काही एक गाण्याचे बोल दास्तांगोच्या सुरात सूर मिळवून प्रेक्षकही बोलू, गाऊ लागतात.

अनेक दिग्गजांनी शब्दांत पकडू पाहिलेल्या मुंबईला इथे पेश ए खिदमत केली जाते. ही मुंबई नारायण सुर्वे, कुसुमाग्रज, कवी बापट, भाऊ पाध्ये, प्रकाश अकोलकर, शाहीर पठ्ठेबापूराव अशा सगळ्या नजरेतून खेळत राहते. सोबत अक्षयच्या स्वतःच्या कविताही रंगत आणतात. आवाजाचे पोत बदलत बदललेल्या मुंबईकरांचे पात्ररुप असो की हुबेहूब जिवंत राहणारी लोकल, लटकणारी माणसं सगळं साजिवंत करतात हे दोन कलाकार. मुंबईतला वेग, आवेग, उत्साह, स्पिरिट, गोंधळ, दंगा, राडा, मत्सर, वेदना, नंबरिंगच्या स्पर्धा, स्वप्नांच्या टेकड्या, झोपड्या, अपरिहार्य, अगतिकता या सगळ्या भावना गुंफत दोन तासात मुंबईचा ‘आँखों देखा हाल’ हे सुनावत राहतात. दर प्रयोगात काही आर्टफॉर्म बदललेही जातात पण कथा साधत सांधतच राहते.

तरी शाहीर अमर शेख, कॉ. अण्णाभाऊ यांचा पहाडी, डफेदार बाणा अजून गडद दिसावासा वाटू लागतो. डेव्हलपमेंटच्या नावाखाली गाडल्या गेल्या जाणार्‍या उर्दू आवामिचा लेखकीकाळ भायखळ्यातून या गोष्टींच्या मळ्यात फुलावासा वाटतो. नामदेवाने दाखवलेला बगीचा किंवा ओव्याशिव्यातली प्रिय मुंबई ऐकावीशी वाटते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे शहिदी व्रणाची रेघ कथेतून दिसू यावी आणि बिल्डिंगखाली दबला गेलेला अमरशेखी आवाज ही दास्तांमधून ऐकू यावा असं वाटू लागतं. सगळंच नष्ट होईल अशी भीती वाटताना हाशियेपर असणार्‍या कथा दास्तान मांडत राहते.

या दास्तागोने अशी आणखी एक दास्तां बांधली आहे. दास्तान ए रामजी ‘आता आमोद सुनासी आले’ या दि. बा. मोकाशी यांच्या मूळ कथेवर, खूप अभ्यासपूर्ण बांधणीतून अक्षय शिंपी आणि नेहा देशपांडे यांनी ‘दास्तान – ए – रामजी’ चा प्रयोग चालविला आहे. एका बाजूला मृत्यू समोर असताना, दुसर्‍या बाजूला जन्माची सुरू झालेली एक नैसर्गिक – भावनिक आणि खिळवून ठेवणारी कलात्मक रचना ही दास्तां मांडते. जन्म आणि मृत्यू हे शाश्वत सत्य. ही दोन्ही सत्यं मांडत असताना अक्षय आणि नेहा, जगण्याच्या एका असीम परिभाषेला तुका- ज्ञानोबांच्या अभंगांची जोड देतात, कथेतल्या रामजीच्या दुःख वेदनेसोबत स्वतः जोडत आपल्यालाही त्या प्रवाहात खेचून नेतात.

कथेच्या एका टोकापासून सुरू असणारा प्रवास शेवटच्या बिंदू येईपर्यंत आपण कधी रामजीच्या घर-गावातले होऊन जातो हे आपल्यालाच कळत नाही. आपण भरल्या डोळ्यांनी आसवे टिपत कधी त्यांचे होऊन जातो, कळत नाही. हे दोन्ही प्रयोग करत असताना, कलाकार म्हणून घेतलेली मेहनत आणि हे सगळं एकजीव करताना माणूस म्हणून कलाकार जगतानाचे आंतरिक विस्कटलेपण सांभाळणे कमाल आहे. ही ‘दास्तान’ हमेशा बहरत जावो आणि सुख हुडकण्याच्या धडपडीत दुःखात फसलेल्या फसवल्या गेलेल्या सगळ्यांना कळकळीचे बळ देत राहो…

हॅट्स ऑफ अक्षय… सलाम मनापासून!

हे लिहितोय तो दिवसंय जानेवारीतल्या लोकशाही गणराज्य उत्सवाचा आणि नुकताच साजर्‍या झालेल्या सणाचा. माझ्यातल्या नागरिकपणाला दुय्यम स्थानांवर बेदर्दीपणे ढकलू पाहणारं काहीतरी ठळक दिसतंय तेव्हा मला ‘दास्तान-ए-रामजी’ आठवते. अशा दिवसांत प्रयोग आठवून लिहिताना अक्षयला धन्यवाद देण्यापलीकडे खूप काही उरत जाते. अक्षय आणि सहकलाकार ‘दास्तांगोई’ द्वारे आपल्याला, भारताच्या एकमयत्वाची गोष्ट सांगतायत. हे सांगणं, ऐकणं सुरूच राहिले पाहिजे.

-साहिल कबीर

लेखक संपर्क – ९९२३०३०६६८


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]