वारकरी चळवळीतील स्त्री संतांचे योगदान

शामसुंदर महाराज सोन्नर -

सामाजिक असमानता, अंधश्रद्धा, भोंदूगिरीविरोधात साडेसातशे वर्षांपूर्वी वारकरी संतांनी पहिली आरोळी पंढरपूरच्या वाळवंटात ठोकली. नामदेव, ज्ञानदेवांपासून ते वारकरी संप्रदायाचा कळस म्हणून ओळखल्या गेलेल्या संत तुकाराम महाराजांपर्यंत आणि संत जनाबाईंपासून ते बहिणाबाई पाठक यांच्यापर्यंत वारकरी स्त्री-पुरुष संतांनी समाजातील कुप्रथांवर प्रहार केले. या वाटचालीमध्ये स्त्री संतांची भूमिका अधिक धिटाईची दिसते. त्यांना सामाजिक विषमतेचे चटके बसलेले होते, तसेच स्त्री म्हणूनही दुय्यम वागणूक दिली जात होती. त्याचे प्रतिबिंब स्री संतांच्या साहित्यात उमटल्याचे दिसून येते.

महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा भक्कम वारसा असून तो अधिक मजबूत करण्यात वारकरी संतांचे योगदान मोठे आहे; किंबहुना ज्यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धेच्या दलदलीत रुतून बसला होता, जातिव्यवस्थेच्या रेट्याखाली चिरडला जात होता, त्याच काळात वारकरी चवळवळीने अधिक आक्रमक होत त्याच्याविरोधात जागरण केले. सामाजिक समता आणि अंधश्रद्धामुक्त समाज हेच वारकरी संप्रदायाचे मूळ उद्दिष्ट आहे. अंधश्रद्धेच्या अधीन गेलेल्या समाजाला जागृत करण्यासाठी ज्ञानोबांपासून तुकोबांपर्यंत आणि जनाबाईपासून बहिणाबाईंपर्यंत सर्वांनीच प्रयत्न केले.

ज्ञानेश्वर, नामदेव यांची भाषा काही सौम्य असली, तरी तुकोबा मात्र अत्यंत परखड आणि थेट भाषेत भोंदूगिरीवर कोरडे ओढतात. त्याचप्रमाणे स्त्री संतांमध्ये मुक्ताबाई आणि बहिणाबाई पाठक यांची भाषा काहीशी मृदु आहे. मात्र जनाबाई, सोयराबाई, निर्मळा यांच्या भाषेत तीव्र विद्रोह दिसतो, तर कान्होपात्रेच्या भाषेत आगतिकता दिसते.

समाजातील शोषित वर्गाने उभारलेला लढा म्हणजे वारकरी चळवळ आहे. संत ज्ञानेश्वरादी भावंडांना तत्कालीन व्यवस्थेचा प्रचंड जाच सहन करावा लागला. बहिष्कृताचे जिणे जगावे लागले. त्यावेळच्या समाजाने अत्यंत हीनपणे त्यांना वागविले, तेव्हा उद्विग्न होऊन ज्ञानेश्वर महाराज आपल्या झोपडीचे दार लावून बसले. तेव्हा त्यांची समजूत छोट्या मुक्ताबाईने काढली. तुम्ही संत आहात. जग कितीही आक्रमकपणे अग्नी झाले तरी संतांनी पाण्यासारखे शीतल व्हावे, असा सल्ला देताना मुक्ताबाई म्हणते-

जग झाले वन्ही

संती सुखे व्हावे पाणी

ज्ञानेश्वर महाराज यांची समजूत मुक्ताबाईने काढली नसती, तर कदाचित ‘ज्ञानेश्वरी’सारखा अलौकिक ग्रंथ आम्हाला पाहायला मिळाला नसता. ही मुक्ताबाईची देणगी आहे, असे म्हणावे लागेल.

जनाबाई ही तर वारकरी चळवळीतील अत्यंत बंडखोर स्त्री संत म्हणून ओळखली जाते. संत ज्ञानेश्वरादी चारी भावंडांनी समाधी घेतल्यानंतर संत नामदेव हे वारकरी चळवळीचा विस्तार करण्यासाठी संपूर्ण देशात फिरले. आपला जास्तीत जास्त काळ त्यांनी पंजाबमध्ये घालविला. तेव्हा पंढरपुरात वारकरी चळवळीचे नेतृत्व जनाबाई यांनी केले. खरे तर त्या काळी स्त्रियांनी नेतृत्व करणे परंपरावाद्यांना सहन होणारे नव्हते. परंतु जनाबाई एवढी खंबीर की, त्या व्यवस्थेच्या नाकावर टिच्चून सर्व कारभार अचूक करीत होती. जेव्हा एखाद्या स्त्रीच्या कर्तृत्वावर बोटं ठेवता येत नाहीत, तेव्हा तिच्या राहणीमानावर बोट ठेवले जाते. जनाबाईंच्या राहणीमानावर बोट ठेवले जाऊ लागले. ती डोक्यावर नीट पदर घेत नाही, असा आक्षेप घेतला जाऊ लागला, तेव्हा जनाबाईने थेट त्या व्यवस्थेलाच आव्हान दिल्याचे दिसते.

डोईचा पदर आला खांद्यावरी।

भरल्या बाजारी जाईल मी॥

हातामध्ये टाळ, खांद्यावरी वीणा।

आता मज मना कोण करी॥

जनाबाई असे आव्हान देते. स्त्री म्हणून मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीबद्दलही नाराजी व्यक्त करते. तेवढे करून ती थांबत नाही, तर इतर स्त्रियांना प्रोत्साहन देताना स्त्रीचा देह मिळाला म्हणून उदास होऊ नका, असा आशावाद जागविताना म्हणते-

स्त्री जन्म म्हणोनी न व्हावे उदास।

साधूसंता ऐसे केले जनी॥

अशा शब्दांत इतर स्त्रियांना आत्मभान देते.

जनाबाईप्रमाणेच संत चोखाबांच्या पत्नी सोयराबाई यांची भाषाही खूप आक्रमक वाटते. स्त्रियांच्या मासिक पाळीवरून जो विटाळ पाळला जायचा, ही अत्यंत स्त्री म्हणून अपमानजनक गोष्ट आहे, हे आता स्त्रियांनी मान्य करून ते झुगारून दिले आहे. त्यासाठी 20 वे शतक उजडावे लागले. पण या विरोधात पहिला आवाज संत सोयराबाई यांनी दिल्याचे आपल्याला दिसते. या विटाळाविरोधात कणखर भूमिका घेताना सोयराबाई लिहितात-

देहाचा विटाळ म्हणती सकळ।

आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध॥

देहाचा विटाळ देहीच जन्मला।

सोवळा तो झाला कवण धर्म॥

अशा तर्‍हेने वारकरी चळवळीच्या उभारणीत आणि तिला पुढे घेऊन जाण्यात ज्या स्त्री संतांनी योगदान दिले, त्यांचा परिचय करून घेण्याचा प्रयत्न आपण पुढील प्रत्येक भागात करणार आहोत.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]